गणेशोत्सवात पूर्वी ‘बाप्पा मोरयाss’सोबत हाळी होती ‘आव्वाssज कुणाचा?’. वीस वर्षापूर्वी गणेशोत्सवात डॉल्बी यंत्रणाही सामील झाली आणि तरुणाईला बेफाम नाचवू लागली. त्या दणदणाटानं कुणी कायमचं जायबंदी, कुणी ठार बहिरं झालं, काहींचा तर जीवही गेला. .त्याचवेळी सुरू झाली ‘डॉल्बीमुक्ती’ची चळवळ. सुरुवात झाली दक्षिण महाराष्ट्रात. पर्यावरणवादी, सामान्य नागरिकांच्या प्रयत्नांना प्रशासनानं हात दिला, गणेश मंडळंही पुढं आली आणि त्यांनी शपध घेतली,
डॉल्बीमुक्त गणोशोत्सवाची.
श्रीनिवास नागे
काही वर्षापूर्वी ‘मोरयाss’सोबत ‘आव्वाssज कुणाचा?’ अशी आरोळी घुमली की, गणोशोत्सव मंडळाच्या बाप्पांची मिरवणूक चाललीय, हे आपसुक समजलं जायचं. कारण दणकेबाज आवाजाचं आणि मंडळांच्या मिरवणुकीचं नातं तसं घट्टच. सनई-चौघडा, टाळ-मृदंग, हलगी-घुमकं-लेजीम, ढोल-ताशे, झांज, नाशिक ढोल, गजी ढोल, बॅण्डपथक यांच्या साथीनं कार्यकर्ते इर्षेनं घसा खरवडून घोषणा द्यायचे. पुढं छोटे कण्रे आणि लांबडे स्पिकर आले. त्यातच नव्वदच्या दशकात बेन्जो पथकाची एण्ट्री झाली आणि मिरवणुकीत कर्णकर्कशता घुसली.
त्या आवाजावर उत्साहाची जागा उन्मादानं घेतली.. वीस वर्षापूर्वी डिजिटल क्रांतीनं ‘डॉल्बी’ यंत्रणोला जन्म दिला. ही ‘डॉल्बी साऊंड सिस्टिम’ मग मिरवणुकीत कधी सामील झाली, ते कळलंच नाही. जोशात आणि जोमात असलेल्या तरुणाईला ती वाट्टेल तसं नाचवू लागली. शहरांच्या सीमा ओलांडून ती निमशहरी भागातल्या गल्लीबोळांत आणि चक्क वाडय़ावस्त्यांवरही शिरली! कानाला हेडफोन लावून ‘मिक्सर’ फिरवणारे ‘डीजे’ उत्सवी माणसाला खेळवू लागले. डिस्को थेकपासून अगदी बारशार्पयतच्या कार्यक्रमांर्पयत डॉल्बीची भिंत हलू लागली.. त्या दणदणाटानं कानाला दडे बसू लागले, छातीत धडधड वाढू लागली. जमीन हादरू लागली, काचेची तावदानं फुटू लागली. उरात धडकी भरल्याचा शब्दश: प्रत्यय येऊ लागला.
..आणि त्याचवेळी सुरू झाली ‘डॉल्बीमुक्ती’ची चळवळ. पाच वर्षापूर्वी कोल्हापूर-सांगली-साता:यात ध्वनिप्रदूषणचा कहर होत असताना पर्यावरणवाद्यांचं बोट धरून ‘डॉल्बीमुक्ती’ची चळवळ आली. दक्षिण महाराष्ट्र हा तसा रगेल भाग. कार्यकत्र्याची रग जशी भारी, तशी ईर्षाही तोडीस तोड! ‘त्यांच्यापेक्षा आपला आव्वाज लई भारी पाह्यजे,’ असं डॉल्बी ठरवतानाच मालकाला बजावलं जायचं, पण इथंही ‘डॉल्बी नको रे बाबा..’ असं म्हणण्याची वेळ आली. त्याला कारणही तसंच घडलं. सांगली जिल्ह्यात डॉल्बीच्या दणकेबाज तालावर नाचताना मोठय़ा आवाजाच्या धक्क्यानं हृदयक्रिया बंद पडून गणोश मंडळांच्या दोघा कार्यकत्र्याचा जीव गेला. साता:यातल्या मिरवणुकीत डॉल्बीच्या काळ्याभोर भिंतीनं हादरवून सोडल्यानं घराच्या भिंती कोसळल्या. चार बळी गेले. कोल्हापुरातही कुणाला जीव गमवावा लागला, तर कुणी कायमचं जायबंदी झालं. कुणी ठार बहिरं झालं,
तर कुणी कायमचं जायबंदी झालं. कुणी ठार बहिरं झालं, तर कुणाच्या कानात ‘मशीन्स’ आल्या!
त्यातूनच ध्वनिप्रदूषणाविरोधात सूर उमटू लागला. ‘डॉल्बीमुक्ती’ चळवळीनं आवाज उठवायला सुरुवात केली. या कार्यकत्र्यानी प्रशासनाला जागं केलं. विशेष म्हणजे, प्रशासनातल्या कत्र्या अधिका:यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रबोधनाची अखंड चळवळ उभी राहिली. साता:यात तर ‘लोकमत’नं पुढाकार घेऊन गावंच्या गावं शहाणी केली. मंडळांचे कार्यकर्तेही सजग झाले. पण काही अतिउत्साही मंडळींमुळं ‘डॉल्बीमुक्ती’ला म्हणावं तसं यश येत नव्हतं.
अखेर पोलीस प्रशासनानं कारवाईचा दंडुका उगारला. त्यातूनही हुश्शार कार्यकर्ते सुटू लागले. मग पोलिसांनी थेट ‘डॉल्बी’च्या मालकांनाच ‘आत’ टाकायला आणि डॉल्बीच्या भिंतीसह गाडय़ा जप्त करायला सुरुवात केली. कार्यक्रम कुठलाही असू दे, तिथं डॉल्बी वाजायला लागला की पोलीस हजर! हातात डेसिबल मोजण्याचं यंत्र. ध्वनिप्रदूषणाची नोंद करायची आणि केस ठोकायची! आयोजकांपासून डॉल्बीमालकार्पयत सगळ्यांनाच दंड. त्यातून लग्नाची वरातही सुटली नाही. दुसरीकडं प्रसारमाध्यमांतून प्रबोधन सुरू होतंच. प्रशासनातल्या खमक्या अधिका:यांना नागरिकांनी बळ दिलं. ते बघून गणोश मंडळंही पुढं आली. मंडळाचे कार्यकर्ते स्वत:हून डॉल्बी वाजवणार नसल्याची शपथ घेऊ लागले. आणि सुरू झाला, जागर ‘डॉल्बीमुक्ती’चा.
मराठी माणसाचा ‘उत्सवी’ गुण कोल्हापूर-सांगली-साता:यात तंतोतंत उतरलाय. कोणत्याही आनंदी घटनेचा इथं ‘उत्सव’ होतो! पोराच्या बारशापासून लग्नार्पयत, पोरगं चौथीत स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास झाल्यापासून एमपीएससीत ङोंडा लावेर्पयत, सोसायटीच्या इलेक्शनमध्ये निवडून आल्यापासून खासदार होईर्पयत आणि म्हशीच्या पहिल्या वेतापासून बैलानं शर्यत जिंकेर्पयत. अगदी कुठल्याही आनंदी क्षणाचा ‘समारंभ’ घडवून आणला जातो. मग त्यातून गणोशोत्सवासारखा अपार उत्साही सण कसा सुटू शकेल?
या सण-समारंभांत सनई-चौघडय़ापासून ढोल-ताशांर्पयत पारंपरिक वाद्यं घुमवली जात. 1995 नंतर मात्र हलगी-घुमक्याची, ढोल-ताशांची आणि गेला बाजार स्टेरिओ बॉक्सची जागा डॉल्बीनं घेतली. इथल्या तरुण कार्यकत्र्यामध्ये दांडगा उत्साह. त्यामुळं जल्लोषी मिरवणुका हे इथलं खास वैशिष्टय़ बनलंय. ईर्षा तर नसानसात भिनलेली. आपल्या मंडळाची मिरवणूक दणक्यात निघाली पाहिजे, आवाजानं अख्खं गाव जागं झालं पाहिजे, सगळ्यांचं लक्ष आपल्या मिरवणुकीवरच असलं पाहिजे याकडं कार्यकत्र्याचं जातीनं लक्ष असतं. मंडळा-मंडळांच्या चुरशीतून मारामा:या झाल्यात. डॉल्बीचा सोस त्यातूनच आलेला. पारंपरिक वाद्यं मागं पडून डॉल्बीच्या अजगरानं विळखा कधी घातला, हे तरुणाईला समजलंच नाही. तीव्र सामाजिक भान असणा:यांना मात्र ते धोके दिसत होते, पण त्यांचा आवाज सगळ्या समाजार्पयत पोहोचतच नव्हता. न्यायालयानं डॉल्बीवर बंदी घालूनही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर डॉल्बी जेव्हा जिवावर बेतू लागला, तेव्हा मंडळांना खाडकन् जाग आली.
8 ‘भिंती’पासून लांब!
काही ठिकाणी डॉल्बीच्या अवाढव्य यंत्रणोचे बॉक्स, ऑपरेटिंग सिस्टिम, विद्युत जनरेटर ठेवण्यासाठी वाहनाची व्यवस्था मंडळांनाच करावी लागते. अलीकडं मात्र अनेक व्यावसायिकांनी यंत्रणोनं सज्ज असलेली वाहनं स्वत:च बनवून घेतलीत. वरच्या बाजूला किंवा दर्शनी भागावर डॉल्बीच्या बॉक्सची भिंत, मागील बाजूला आवाज नियंत्रित करण्यासाठी अॅम्प्लीफायर व भलामोठा मिक्सर, तो चालविण्यासाठी ‘डीजे’ अशी जय्यत तयारी असणा:या कॅराव्हॅन अनेकांकडं दिसतात. डॉल्बीची ही आलिशान भिंत हलू लागते, तेव्हा ती पाहण्यासाठी गर्दी उसळते, पण कानाला दडे बसू लागताच तीच गर्दी लांब पळायला लागते!
8 लाखाभराचा खुर्दा
सांगली जिल्ह्यात साडेचारशेवर, कोल्हापुरात पाचशे, तर साता:यात चारशे डॉल्बीचे संच आहेत. काहींचे भाडे तासावर, तर काहींचे भाडे दिवसावर ठरते. एकेका डॉल्बी संचासाठी लाखभराचा खुर्दा भाडय़ापोटी उधळणारी हौशी मंडळीही इथं आहेत.
8 डॉल्बीमुक्तीची मोहीम
दक्षिण महाराष्ट्रात ध्वनिप्रदूषणाविरोधात एकदमच उठाव झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फारशा हालचाली दिसत नसल्यानं पोलीस पुढं सरसावले. तीन वर्षापूर्वी सांगलीत दिलीप सावंत यांच्यासारखा जिगरबाज पोलीस अधीक्षक आला आणि डॉल्बीला ख:या अर्थानं खीळ बसली. मागील दोन गणोशोत्सवात तर त्यांनी कमालच केली. गणोशोत्सवाच्या आधी महिनाभर त्यांनी डॉल्बीमुक्तीची मोहीम हाती घेतली. प्रत्येक पोलीस ठाण्यांनी गणोश मंडळं, सामाजिक कार्यकर्ते, पोलीसमित्रंच्या बैठका घेऊन प्रबोधन केलं. डॉल्बी वाजवल्यानं गुन्हे दाखल होतील, असं सारखं समाजमनावर बिंबवलं. मंडळांच्या टग्या कार्यकत्र्याना दमात घेतलं. काही सभा-समारंभांमध्ये डॉल्बीला अटकाव केला. डॉल्बीवर नाचत निघालेल्या लग्नाच्या वरातीही रोखल्या. वर्षभरात पंचवीस-तीस गुन्हे दाखल केले. कार्यक्रम-उत्सवांचे आयोजक, मंडळांचे पदाधिकारी, डॉल्बीमालक यांना पोलीस कोठडीत टाकलं. डॉल्बीचं साहित्य जप्त केलं. पर्यावरण रक्षणासाठी झगडणा:या संघटनांनीही डॉल्बीमुक्त अभियानात सहभाग घेतला. डॉल्बीवर फुली मारणा:या मंडळांसाठी स्पर्धा जाहीर केल्या. फलक, पोस्टर्स, बॅनर लावले. त्यांना प्रसारमाध्यमांनीही साथ दिली.
परिणामी मंडळांनीच डॉल्बीपासून दूर राहण्याचा निश्चय केला. प्रशासनाची प्रबळ इच्छाशक्ती चमत्कार घडवू शकते, याचा प्रत्यय कोल्हापूरमध्ये आला. दोन वर्षापूर्वी तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी तिथं कारवाईचा धडाका लावला. यंदा 26 मंडळांवर कारवाई झालीय. डॉल्बीची भिंत कोसळून काहीजण जखमी झाल्यानंतर सामाजिक संघटना आणि सजग कोल्हापूरकर पुढं आले. तेव्हापासून ही चळवळ जोमानं सुरू झालीय.
साता:यात प्रशासनासोबत गावकरीही या लढय़ात उतरले. मागच्या वर्षी डॉल्बीच्या आवाजानं हादरे बसून इमारतीची भिंत कोसळली. त्यात चौघांचा बळी गेला. त्यामुळं सारेच हादरले. डॉल्बीमुक्तीच्या हाकेला मंडळांनी प्रतिसाद दिला. जनजागृतीला यश आलं. अनेक गावांनी खास ग्रामसभा घेऊन डॉल्बीबंदीच जाहीर केली. उत्सवाचं पावित्र्य जपलं जाऊ
लागलं.
डॉल्बीची भिंत
‘हलू’ लागते तेव्हा..‘डॉल्बीमुक्ती’ विरोधात प्रबोधनाची
अखंड चळवळ उभी राहिली,
पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारताना अगदी लग्नाच्या वरातींनाही सोडलं नाही. गणोश मंडळांचे कार्यकर्तेही सजग झाले, डॉल्बीच्या दणक्याला त्यांनी फाटा दिला. बाप्पाच्या मिरवणुकीत आता पुन्हा
पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झालाय. लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग, देखण्या पदलालित्याचे ‘नाशिक ढोल’, अगदी लग्नाच्या वरातीतली बॅन्डपथकंही आता बाप्पाच्या मिरवणुकीत जान
फुंकायला लागलीत.
डॉल्बीच्या दणक्याचे परिणाम
- दणदणाटामुळे हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका.
- पूर्ण बहिरेपणा किंवा कानावर विपरीत परिणाम.
- कानठळ्या बसवणा:या आवाजामुळं रुग्णांना त्रस.
- लहान मुले, वृद्धांच्या हृदयास सर्वाधिक धोका.
- हाद:यानं इमारतीची भिंत कोसळण्याची, तावदानांच्या काचा फुटण्याची शक्यता.
आवाजाची मर्यादा
ध्वनिप्रदूषण नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात आवाजाची मर्यादा 75 डेसिबल तर रहिवासी क्षेत्रत 55 डेसिबल आहे. डॉल्बी किंवा ध्वनिवर्धकाच्या क्षेत्रत यापेक्षा जादा डेसिबलची नोंद यंत्रवर झाली, तर तो गुन्हा ठरतो. सांगलीत पोलिसांकडं ध्वनिमापनाची आठ, तर साता:यात सात यंत्रे आहेत.
पाच वर्षे तुरुंगवास, एक लाखाचा दंड !
सार्वजनिक ठिकाणी डॉल्बी यंत्रणा लावून ध्वनिप्रदूषण केल्याचा गुन्हा पोलिसांकडून दाखल केला जातो. त्यावेळी ध्वनिमापन यंत्रनं केलेल्या तपासणीचा दाखला देऊन आयोजकांसह डॉल्बीमालकाला न्यायालयाच्या कठडय़ात उभं केलं जातं. तिथं गुन्हा सिद्ध झाल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार पाच वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. अशी शिक्षा झाल्यानंतरही गुन्हा केल्यास सात वर्षार्पयत तुरुंगवास होऊ शकतो.
‘आव्वाज’ बंद!
सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्याची नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. जिवंत नागांची पूजा आणि मिरवणूक हे तिथलं वैशिष्टय़ होतं. पण अलीकडं पर्यावरणवाद्यांच्या रेटय़ामुळं न्यायालयानं नाग पकडण्यास आणि त्यांचं प्रदर्शन करण्यास, मिरवणूक
काढण्यास बंदी घातलीय. त्यामुळं नाग मंडळांच्या उत्साही कार्यकत्र्यानी नागप्रतिमांची मिरवणूक सुरू केली. न्यायालयाच्या निकालानं हिरमोड झालेल्या मंडळांच्या पदाधिका:यांनी कार्यकत्र्याच्या हौसेखातर डॉल्बी मागवायला सुरुवात केली. डॉल्बीच्या पंचवीस-तीस गाडय़ा दणदणाट करू लागल्या. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करू नका, असं बजावूनही न ऐकल्यामुळं पोलिसांनी दणका दिला. यंदा मंडळांच्या पदाधिका:यांसह डॉल्बीमालकांवर गुन्हे दाखल केले. डॉल्बीच्या 14 गाडय़ा जप्त केल्या. जिल्हा न्यायालयानं तर जप्त केलेल्या गाडय़ा परत देऊ नयेत, असा आदेशच काढला. त्यामुळं सव्वा महिन्यापासून त्या गाडय़ा पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून आहेत. परिणाम एकच झाला, नागमंडळांसह मुजोर डॉल्बीमालकांना चाप बसला.
डॉल्बीचा आवाज बसू लागला!
शहरातल्या मंडळांनी ‘नो डॉल्बी’चा नारा दिल्यानंतर डॉल्बीमालकांनी ग्रामीण भागाकडं मोर्चा वळवला होता, पण पोलिसांनी आता तिथंही ध्वनिमापन करणारी पथकं नेमलीत. डॉल्बीला बंदी असल्यानं काही डॉल्बीमालकांनी बेन्जोला डॉल्बीचा बेस बसवून दणदणाटाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी सरसकट ध्वनिमर्यादेचं उल्लंघन करणा:यांवर कारवाई सुरू केल्यानं त्यांचा आवाजच बसलाय!
पुन्हा पारंपरिक वाद्यं
मागील वर्षापासून सांगली-सातारा-कोल्हापुरातली बहुतांश मंडळं डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांकडं वळलीत. गणपतीच्या आगमनाच्या आणि विसजर्नाच्या मिरवणुकीत पुन्हा पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झालाय. यंदाच्या मिरवणुकांमध्ये हे चित्र प्रकर्षानं नजरेस आलं. काही वर्षापूर्वी डॉल्बी यंत्रणा जुन्या पारंपरिक वाद्यपथकांच्या मुळावर आली होती. पण दोन वर्षापासून डॉल्बीमुक्त उत्सवामुळं त्यांना पुन्हा सुगीचे दिवस आलेत. यंदा तर महिन्यापूर्वीच त्यांचं बुकिंग फुल्ल झालंय!
वाद्यांचे दर पन्नास हजारांवर
विसजर्न मिरवणुकीसाठी सांगली-कोल्हापुरात बॅण्ड, बेन्जो, झांजपथकांचे दर पन्नास-साठ हजारांवर पोहोचलेत. काही बेन्जो व झांजपथकं तासासाठी आठ-दहा हजार वसूल करताहेत. लेजीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग पथकांनाही मागणी वाढलीय. देखणं पदलालित्य दाखवणा:या नाशिक ढोलपथकांना बरकत आलीय. लग्नाच्या वरातीतच दिसणारी बॅण्डपथकं बाप्पाच्या मिरवणुकीतही जान फुंकायला लागलीत.
मर्यादित आवाजाची मेख
सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन पोलिसांनी डॉल्बीला परवानगी नाकारल्यानंतर काही ठिकाणी डॉल्बीमालक उच्च न्यायालयात गेलेत. मर्यादित आवाजात डॉल्बी वाजवण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका त्यांनी दाखल केलीय. त्यावर न्यायालयही सशर्त परवानगी देऊ शकतं. डॉल्बीचा आवाज मर्यादित असेल तर त्याला कुणाचीच हरकत नसेल; पण मंडळाच्या कार्यकत्र्याचा हट्ट, वाढत जाणारी ङिांग, खुमखुमी यामुळं तो आवाज मर्यादेत न राहता काही वेळातच वाढवला जातो, कानठळ्या बसवणारा बनतो, त्याचं काय?
गणोश मंडळांची संख्या
4कोल्हापूर शहर : 579
4कोल्हापूर ग्रामीण : 3557
4सांगली-मिरज-कुपवाड शहर : 835
4सांगली ग्रामीण : 4534
4सातारा शहर : 107
4सातारा ग्रामीण : 4649
(ही संख्या केवळ नोंदणीकृत मंडळांची आहे. याशिवाय नोंदणी न केलेली अनेक मंडळं गल्लीबोळात दिसतात.)
(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
shrinivassnage@rediffmail.com