- दादासाहेब श्रीकिसन थेटे
एक कप चहा, एक विडी ही त्याची गरज आणि त्याच गरजेपोटी भानू एका चहाच्या टपरीवरून, दुसऱ्या टपरीवर दिवसभर येरझाऱ्या मारायचा. दररोज दिसणारे चेहरे त्याला ओळखीचे वाटायचे. या चेहऱ्यांनाही तो चांगलाच माहीत होता. तरीही ओळख दाखवून प्रेमाचे दान देणारे चेहरे मात्र फार क्वचितच असायचे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण न करणारा सुजाण समाज या मनोरुग्णांना (माणसांना) माणसातून वारंवार बहिष्कृत करतोय हा अनुभव भानूच्या वेळीही मी अनुभवला. त्यांची विवंचना जर शहाण्या समजणाऱ्या समाजाला जाणवत नसेल, तर समाजशील म्हणवणारा माणूस किती अप्पलपोटी आणि आत्मसंतुष्टी झाला याचा प्रत्यय या बेवारस मानवी देहाकडे पाहून अनुभवायला येत होता. या मूळ गरजांपेक्षाही प्रेम आणि आपुलकी हीच त्याच्या जगण्याची गरज होती. हे सहवासातून आणि त्याला केलेल्या मायेच्या एका स्पशार्तून आम्हाला जाणवले होते.
‘भानू’ या हाकेला प्रेमाचा ओलावा देत पुकारले की, त्याची नजरा सैरभर होत होती. आजवर मनोरोगाचा शाप मिळाल्यापासून आपला विटाळ पाळणारा समाज आज आपल्याला मोटार गाडीत शेजारी बसवून कुठेतरी घेऊन जातोय या एका जाणिवेने तो बहुधा मनातून पाणावून गेला असावा. त्याला अंघोळ घालताना त्याच्या किळसवाण्या शरीरावर मायेचा फिरणारा हात त्याच्या जगण्यात अनामिक सुगंध भरत होता. वाढलेली नखे मोठ्या काळजीवाहूपणाने कापणारी समाजभान पोरं त्याला जणू जुन्या आठवाणीतच घेऊन जात होती. सांगितलेल्या सूचनेनुसार त्याने आपल्या हालचाली केल्या. त्याच्या अंगा-अंगातून घाणीचा दुर्गंध साबण, शाम्पूच्या फेसाबरोबर आणि माणुसकीच्या स्पर्शाने नाहीसा झाला होता. अंगावर ढीगभर साचलेला मळ पाण्याबरोबर धुऊन गेला होता. तशी भानूला तरतरी जाणवली होती. त्याचा चेहरा खुलला होता. जी गावातली पोरं आजवर त्याची किळस करीत होती तीच पोरं आता त्याला नवे कपडे आणत होती, तर कुणी टॉवेल, कुणी नेल कटर, तर कुणी चपला आणून देत होती...! गावातल्या प्रत्येक पोरात भानूमुळे माणुसकीचे समाजभान भिनल्यागत प्रत्येक जण भानूसाठी तळमळ करीत होता.
आपला भानू माणसागत दिसू लागला हे पाहून गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ज्या गावातल्या लोकांनी आजवर नाकारले त्याच भानूला पाहायला अख्खा गाव गोळा झाला होता. शोधला तर देवही सापडतो, तसाच आपल्यातलाच हरवलेला एक माणूस त्यादिवशी सापडल्यामुळे गावकरी जल्लोष करीत होते. एखाद्या नवविवाहित मुलीला बिदाई करते वेळेस जसा सारा गाव भावविवश होऊन तिला सासरी पाठवतो, तशीच भानूला बिदाई करायला सगळा गाव जमला होता. भानूच्या बदलत्या रूपड्यासोबत सेल्फी काढणारी गावातली मुले जणू माणसात माणूस शोधण्याची कला या भानूकडे पाहून अनुभवत होती.
यानंतर कोणत्याही समाजभान मोहिमेचा आम्हीही भाग होऊ, असे उत्साहाने बोलणारी तिथली पोरं एका कृतीतून एवढी प्रेरित झालेली पाहून मी मनातून ऊर्जित झालो होतो. हरवलेल्या समाजव्यवस्थेत हे माणुसकीचे समाजभान जागृत होताना पाहून आणि आणखी एक बेघर मानसाच्या डोक्यावर छत उभे करताना जिंदगी वसूल झाल्याचा परमोच्च आनंद, आज मी पुन्हा अनुभवत होतो. आता भानू बरा होऊन त्याच्या घरी परत येतोय. अगदी माणसासारखा होऊन! आनंद दिल्याने वाढतो. आयुष्य वाटल्याने वाढते. आज जेवढे दिले तेवढेच मला परत मिळत होते. आज परत एक माणूस जन्माला घातल्याचा आनंद होत होता. (लेखक समाजभान टीमचे संस्थापक आहेत)
( Sweetdada11@gmail.com )