- विनय उपासनी, मुख्य उपसंपादकगेल्याच आठवड्यात जस्टीन बिबरला ‘रामसे हंट सिंड्रोम’या विचित्र अशा आजाराने ग्रासले असल्याचे वृत्त आले. या आजारात चेहऱ्याचे स्नायू वेडेवाकडे होतात. सध्या जस्टीन त्यावर उपचार घेत असून येशू माझ्याबरोबर आहे त्यामुळे लवकरच बरा होईन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
वयाची तिशीही न ओलांडलेला जस्टीन जेव्हा गातो तेव्हा सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडतो. त्याच्या आवाजातली जादू पहिल्यांदा शोधली ती स्कूटर ब्राऊन या अमेरिकन रेकॉर्ड एक्झिक्युटिव्हने. २००८ मध्ये जस्टीनला करारबद्ध करण्यात आले. त्याच्या“माय वर्ल्ड’ या पहिल्याच अल्बमला अमेरिकेत तुफान लोकप्रियता लाभली. २०१० मध्ये आलेल्या ‘माय वर्ल्ड २.०’ या दुसऱ्या भागाने सर्व विक्रम मोडीत काढले. अमेरिकेच्या प्रतिष्ठित अशा बिलबोर्ड २००च्या यादीत जस्टीनने अव्वल क्रमांक पटकावला. ४७ वर्षांत प्रथमच असे घडले.
सार्वकालिक सर्वोत्तम म्युझिक आर्टिस्ट असे बिरूद जस्टीनच्या नावासमोर लावले जाते. १५ कोटींहून अधिक म्युझिक रेकॉर्ड्सच्या प्रति विकल्या गेल्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. हे सारे त्याने कष्टाने प्राप्त केले आहे आणि तेही ऐन उमेदीच्या वयात...
‘मी काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. माझ्या लहानपणी मी खूप दु:ख अनुभवलंय. माझे आई-वडील विभक्त झाल्याने मला त्याचे चटके सहन करावे लागले. या सगळ्याचा परिणाम माझ्या गाण्यावर झाला आहे’, असे मध्ये एकदा एका मुलाखतीत जस्टीनने सांगितले होते. आता सर्व सुखं पायाशी लोळण घेत असताना नियतीने जस्टीनसमोर नवा पेच टाकला आहे. त्यावरही जस्टीन मात करून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्यासमोर येईल, असा विश्वास आहे.”