- राहूल बजाज
- ख्यातनाम उद्योगपती कमलनयन बजाज यांचे जन्मशताब्धी वर्ष येत्या २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने...
बजाज उद्योगाचं साम्राज्य आज जगभरात पसरलेलं आहे. माझ्या आजोबांच्या, जमनालाल बजाज यांच्या काळातलं चित्र मात्र खूप वेगळं होतं. इतर छोटे-मोठे, किरकोळ उद्योग होते, पण मुख्य उद्योग कापसावर प्रक्रिया करण्याचा. दोनशेपेक्षाही कमी कामगार आणि वार्षिक उलाढाल होती केवळ एक कोटी रुपयांच्या आसपास. शिवाय आजोबा दानशूर. या उद्योगांतून जेवढी म्हणून मिळकत व्हायची, त्यापेक्षाही जास्त रक्कम सामाजिक उपक्रम, मदतीसाठी उदार हातानं वाटून मोकळे होत. नंतरच्या काळात ‘बजाज उद्योगसमूहा’ची मुळं देश-विदेशात पोहोचली, पण त्याची मुहूर्तमेढ रोवली होती ती आजोबांनी.
पण बजाज समूहाच्या साम्राज्याचा खर्या अर्थानं पहिला दगड रचला आणि कल्पकतेनं हा उद्योग नावारूपाला आणला तो ‘काकाजी’ (माझे वडील कमलनयनजी) यांनी. व्यवसायाची अत्यंत अचूक नस सापडलेले माझे वडील एका अर्थानं त्यांच्या वडिलांपेक्षाही एक पाऊल पुढेच होते.
अर्थात, एवढा मोठा डोलारा काकाजींनी केवळ स्वबळावर आणि एकट्यानंच उभा केला असं म्हणणं इतरांवर अन्यायकारक होईल. माझे काका रामकृष्णजी बजाज यांचीही त्यातली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कळीची होती. याशिवाय रामेश्वरजी नेवाटिया, आमच्या परिवाराशी एकनिष्ठ असलेले अनेक सहकारी, मदतनीस यांचाही ‘बजाज उद्योगसमूहा’च्या वाटचालीतला वाटा खूप मोठा आहे. पण कोणाही एकाला जर या यशाचं श्रेय द्यायचं असेल तर नि:संशयपणे काकाजींचंच (कमलनयनजी) नाव घ्यावं लागेल.
व्यवसाय-व्यापारातल्या रोजच्या चाकोरीबद्ध गोष्टींत त्यांनी कधी जरुरीपेक्षा जास्त लक्ष दिलं नाही. रोजच्या कामात ते स्वत: फार गुंतलेले नसत. त्यामुळे त्यांच्या निर्वाणानंतर बजाज उद्योगसमूहाच्या रोजच्या गाड्याला खीळ बसली असं झालं नाही. काकाजींची उणीव जाणवली ती व्यवसायातले कळीचे प्रश्न सोडवताना, भविष्याचे आडाखे बांधताना.
काकाजींची दृष्टी फार दूरवरची होती. अडचणीतून नेमका मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा होता. काकाजींच्या या कल्पक धाडसाच्या जोरावरच बजाज उद्योगसमूहानं अल्पावधीत यशाची एकामागून एक शिखरं पादाक्रांत केली. त्यांचं मार्गदर्शन आणखी काही काळ मिळालं असतं तरी या उद्योगसमूहानं आणखी कितीतरी मोठी उंची गाठली असती.
‘एखादी कल्पना डोक्यात आली आणि फारसा विचार न करता लगेच ती अंमलात आणली’ असं त्यांच्या बाबतीत कधीच होत नसे. त्यांनी नेहमीच साकल्यानं, विवेकानं आणि वस्तुनिष्ठपणे विचार केला आणि मगच ती कृतीत आणली. असं असूनही त्यांच्या प्रत्येक कृतीला मानवतेची संवेदनशील किनार होती. कोणत्याही गोष्टीचं अनेक अंगांनी विश्लेषण करण्याची त्यांची क्षमता खरंच विलक्षण होती. कोणत्याही गोष्टीचा असाच विचार केला पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वासही होता.
न्यायसंगत आणि तार्किक विचारांवरील प्रगाढ विश्वासामुळेच ‘नशिबा’ची कास काकाजींनी कधी धरली नाही. जे काही करायचं ते पूर्ण विचारांती. साधकबाधक विचार करून, स्वत:च्या मनगटावर विश्वास ठेवून.
याचा अर्थ ते नास्तिक होते असा नाही. पण कितीही कठीण समस्या आली तरी नशिबाविषयी कधीच, कुठलीही कुरकुर न करता विवेकी कृतिशीलतेवरच त्यांनी कायम भर दिला.
‘नशिबावर हवाला ठेवून जे आपला निर्णय आणि कृती करतात, ते कधीही प्रगती करू शकत नाही’ यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आयुष्यात तुम्हाला काही मिळवायचं असेल, तर वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानसंगत विचारांना पर्याय नाही, हे काकाजींनी कायम कृतीतून सांगितलं.
कामाची पद्धत, कार्यक्षमता आणि ‘तसंच का?’ हे समजावून सांगण्याची काकाजींची स्वत:ची अशी स्वतंत्र शैली होती.
त्यांच्या आवडीचं एक उदाहरण ते कायम द्यायचे.
समजा तुमच्याकडे दोन बल्ब आहेत. एक शंभर वॅटचा आणि दुसरा दहा वॅटचा. शंभर वॅटचा बल्ब पासष्ट वॅटचा उजेड देतो आणि दहा वॅटचा बल्ब अकरा वॅटचा प्रकाश देतो.
- तर कार्यक्षम कोण?
शंभर वॅटच्या बल्बचा प्रकाश भले जास्त असेल, पण दहा वॅटचा बल्ब जर अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन (प्रकाश) देत असेल, तर कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळायला हवा तो दहा वॅटच्या बल्बला, शंभर वॅटच्या बल्बला नव्हे!
काकाजींच्या स्वभावाप्रमाणे यश आणि अपयशाला त्यांनी कधीच फारसं महत्त्व दिलं नाही. त्यांचा भरवसा होता तो कृतीवर. यश आणि अपयशातली सीमारेषा कायम अंधुक असते. त्यामुळे अपयशाला कधी भिऊ नका आणि आव्हान कितीही मोठं असो, त्याच्यासमोर बिचकू नका असाच आदर्श त्यांनी कृतीतून घालून दिला.
आव्हान कितीही बलाढय़ असू द्या, हिंमतीनं त्याला सामोरं जा, आपल्या क्षमता आणि प्रयत्न पणाला लावा, यश मिळेलच मिळेल. आणि समजा, नाही मिळालं, तरी त्या आव्हानाची उंची तुम्ही कितीतरी कमी केलेली असेल - हीच काकाजींची शिकवण होती आणि त्यांचं जीवनध्येयही!
(लेखक बजाज ऑटो लिमिटेडचे चेअरमन आणि ख्यातनाम उद्योगपती आहेत)