>> ज्योत्स्ना गाडगीळ
आपण आयुष्यात कितीतरी लोकांना भेटतो. पण मोजक्याच व्यक्ती स्मरणात राहतात. मात्र तुमच्या आयुष्यात संस्मरणीय व्यक्ती आल्या तर त्यांची नोंद कशी ठेवता येईल, या विचाराने प्रेरित होऊन ठाण्याच्या कौस्तुभ साठे या तरुणाने तब्बल चार हजारांहून अधिक नामवंतांच्या स्वाक्षरी गोळा केल्या आहेत. चोवीस वर्षे सातत्याने जोपासलेल्या या छंदातून त्याचा जीवनप्रवास कसा समृद्ध झाला ते जाणून घेऊ!
भौतिक शास्त्रात एमएससी झालेला कौस्तुभ मुंबई विद्यापीठात तिसरा आला होता. एका फार्मा कंपनीत आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्याने संगीत, साहित्य, क्रीडा, बॉलिवूड, हॉलिवूड अशा हर तऱ्हेच्या क्षेत्रातील मंडळींची भेट घेतली व आठवण म्हणून स्वाक्षरी आणि त्यांच्यासमवेत फोटो घेतले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांची भेट, त्यांना जाणून घेण्याची धडपड, त्यांच्या भेटीचे मोजके क्षण परिस्पर्शासारखे आपल्या जीवनाचे सोने करून गेले, असे कौस्तुभ सांगतो.
लता, आशा, बाबासाहेब पुरंदरे, सचिन, सुनील गावस्कर, ओ.पी. नय्यर, शम्मी कपूर, मन्नाडे, बिस्मिल्ला खां, झाकीर हुसेन, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर,आर.के. लक्ष्मण ही नावं माहीत नसतील असा विरळाच! पण कौस्तुभ या सर्वांना भेटला-बोलला आहे, याबद्दल त्याच्या नशिबाचा हेवा वाटतो. अर्थात अशा दिग्गजांच्या भेटी मिळवण्यासाठी त्याने अनेक खस्ता खाल्ल्या तो भाग निराळा, पण त्याची मेहनत फलद्रुप झाली आणि तो 'सही' माणूस बनला! या प्रवासात चार जणांची स्वाक्षरी घेण्याची संधी हुकली याबद्दल तो हळहळ व्यक्त करतो. डॉ. एपीजे. अब्दुल कलाम, माधुरी दीक्षित, बाळासाहेब ठाकरे आणि रतन टाटा! त्यातही रतन टाटांशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच! त्याचा हा छंद पाहून अनेक लोकांनी त्यांच्याकडे संग्रहित असलेल्या स्वाक्षरी कौस्तुभला भेट म्हणून दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी.डी. देशमुख, गदिमा, माणिक वर्मा यांच्या स्वाक्षरीची भर पडल्यामुळे कौस्तुभचा खजिना समृद्ध झाला.
अशा चार हजाराहून अधिक लोकांच्या भेटीची आठवण, त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांची साखळी आणि आजवर आलेले अनुभव लोकांना कळावेत, म्हणून कौस्तुभ स्वाक्षरीचे प्रदर्शन आणि भेटीचे किस्से सांगणारा कार्यक्रम सादर करतो. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आजवर ठाणे, पुणे, नाशिक परिसरात ५००० हून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली आहे. हजारो स्वाक्षरीचा संग्रह करणारे महाराष्ट्रात पंधरा जण आहेत, कौस्तुभ त्यातलाच एक! कलावंतांनी क्षणात केलेली 'सही' एखाद्याचे आयुष्य एवढे 'सही' करत असेल, हा अनुभव खरोखरच 'सही' म्हटला पाहिजे, 'सही' है ना?