- वंदना अत्रे
कोलकात्याच्या त्या प्रसिद्ध संशोधन केंद्रात पोचले तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. रखवालदाराने त्या जुन्या दगडी इमारतीतील माझी निवासाची खोली दाखवली. त्या पूर्ण इमारतीमध्ये मी एकटी मुक्कामी होते. अतिशय कलात्मकरीत्या सजवलेली ती खोली म्हणजे संपन्न अभिरुचीचा नमुना होता. पण तरीही एक गूढ, नकोसेपण तिथे जाणवत होते. रात्रभर सगळे दिवे सुरू ठेवूनच झोप घेण्याचा मी प्रयत्न केला... त्या देखण्या परिसराचे अनेक फोटो आणि दिवसा तिथे अनुभवाला येणारी प्रसन्न शांतता असा अनुभव घेऊन मी परतले.. त्या मुक्कामाचे विचार जेव्हा मनात येत तेव्हा तिथे अनुभवलेल्या निवांत शांततेचा भाव पुन्हा मनात जागा होत असे..! त्या भेटीनंतर काही वर्षांनी संशोधनासाठी तिथे काही काळ राहिलेली एक मैत्रीण भेटली. मी त्या इमारतीत राहिले हे समजल्यावर भयानक चेहरा करीत ती म्हणाली, “त्या खोलीत राहिलीस तू? अग, अनेकांना तिथे रात्री भुते दिसली आहेत म्हणे...” हे ऐकताच मी भीतीने बेशुद्ध पडणे फक्त बाकी होते....
आज त्या खोलीचा विचार चुकून मनात आलाच तर ती प्रसन्न शांतता वगैरे न आठवता फक्त भीतीने थरकाप उडतो! ती घटना घडून काही काळ उलटला आहे तरीही..! आपले विचार आणि आपल्या भावना यांचे अतिशय जवळचे नाते आहे, असे विवेकनिष्ठ विचारसरणी या संकल्पनेचा जनक अल्बर्ट एलीस सांगतो. विचार बदलला की भावना बदलतात आणि भावना बदलल्या की आपले वर्तन बदलते, अशी साखळी त्याने मांडली आहे.
आपल्या विचार प्रक्रियेत शब्दांचे स्थान फारच महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिने प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला तिच्या अनुभवाबद्दल सांगत असते तेव्हा यावर पटकन आपला विश्वास बसतो. किंवा स्वतःच्या अनुभवाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्यावरही आपला ठाम विश्वास असतो. कानावर वारंवार वेळी-अवेळी रस्त्यावरून धावत असलेल्या रुग्णवाहिकेचा सायरन किंवा पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज पडत असतो अशा अवघड काळात सतत मनात भीतीचे, स्वतःबद्दलच्या शंकेचे विचार घोळत राहणे स्वाभाविक आहे; पण त्याचा काय परिणाम होतो? तर, ती भीती किंवा काळजी आपल्याला आवडली आहे आणि म्हणून ती सारखी आपल्या मनात आहे असा आपल्या आंतरिक शक्तीचा गैरसमज होतो; आणि आपले शरीर मग तसेच प्रतिसाद द्यायला लागते. स्वतःच्या क्षमतेविषयी, आरोग्याविषयी मनात शंका निर्माण होऊ लागतात आणि त्यांना थारा दिला तर त्या प्रत्यक्षात आपली प्रकृती बिघडवूपण शकतात.
शब्दांचे एक सामर्थ्यही आहे आणि ते म्हणजे, ते वारंवार ऐकल्यामुळे किंवा उच्चारल्यामुळे आपल्या मनात विश्वासही निर्माण करीत असतात. विशेषतः ज्याच्या शब्दांवर किंवा शाब्दिक विचारांवर आपली श्रद्धा आहे ते आपल्यावर चांगला परिणामही करू शकतात. भारतीय योगशास्त्रात एक अतिशय प्रभावी उपाय सुचविला आहे आणि तो म्हणजे, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाताना आपल्या श्रद्धा, निष्ठा, क्षमता बळकट करणारा एक प्रभावी युक्तिवाद तयार करून तो वारंवार म्हणत राहायचा-
“मी या अवघड काळात सुदृढ निरोगी राहू शकतो. याला तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे!” असा काहीसा युक्तिवाद किंवा स्वसंवाद आपल्याला सध्याच्या काळात वापरता येईल.
- सतत मनात प्रबळ असणारा हा युक्तिवाद म्हणजे आपल्यामधील इच्छाशक्तीची उपासनाच आहे. अर्धी लढाई आपण इथेच जिंकतो. शेवटी, श्रद्धा म्हणजे तरी काय तर कोणतीही गोष्ट स्वतःला पटवून देणे! त्यामुळे कोणते शब्द किंवा वाक्य एखाद्या मंत्राप्रमाणे स्वतःशी म्हणत राहायचे ते नक्की करून ते म्हणत राहिलो तर शरीराकडून हवे ते प्रतिसाद मिळू शकतात..!
अर्थात याला अन्य प्रयत्नांची जोड मात्र द्यायला लागते. ते कोणते? त्याबद्दल पुढील लेखात...
तुम्हीकायकरूशकाल?
1. स्वतःच्या शब्दात स्वतःसाठी एक प्रबळ युक्तिवाद तयार करा.
2. तो तुमचे कपाट/आरसा असा सतत दिसेल असा लावून ठेवा आणि वाचत राहा.
3. ...आणि जाणवणारा फरक टिपून ठेवा.
(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)
vratre@gmail.com