डॉ. रंजन केळकर
आपण ज्यांना आपत्ती मानतो ती चक्रीवादळे वास्तविकपणे पृथ्वीच्या वातावरणातील आणि समुद्री प्रक्रियांचा एक आवश्यक भाग आहेत. ऊर्जा आणि बाष्प पृथ्वीच्या एका प्रदेशावरून दुसर्या प्रदेशाकडे पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य ती करीत असतात. चक्रीवादळे उष्ण तसेच शीत कटिबंधातही उत्पन्न होत राहतात. शीत कटिबंधातील वादळांमुळे केवळ पाऊस पडतो आणि हिमवृष्टी होते; पण उष्ण कटिबंधातील चक्रीवादळे रौद्र रूप धारण करून विनाशकारी बनतात. सायक्लोन, हरिकेन, टायफून अशा वेगवेगळ्या नावांनी उष्ण कटिबंधातील चक्रीवादळे ओळखली जातात.
चक्रीवादळाची उत्पत्ती तापलेल्या समुद्रावर होते. समुद्राचे तापमान सामान्यत: २७ अंश सेल्सिअस एवढे असल्याशिवाय चक्रीवादळ उद्भवू शकत नाही. म्हणून बंगालची खाडी आणि अरबी समुद्रावर फक्त एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या चार महिन्यांत चक्रीवादळे निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जागतिक परिस्थिती पाहिली तर वेगवेगळ्या समुद्रांवर एकूण ८0 ते ९0 चक्रीवादळे दर वर्षी निर्माण होत राहतात. यातील केवळ पाच-सहा वादळेच भारताच्या आसपासच्या प्रदेशावर बनतात; पण त्यांचे वैशिष्ट्य हे की, ती सर्वांत भीषण असतात.
चक्रीवादळापासून जी अपरिमित हानी होते, तिच्यामागे तीन कारणे असतात. ती म्हणजे सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे किनारा ओलांडून आत शिरलेले पाणी. काही ठिकाणची किनारपट्टी अशी असते, की तेथे दोन-तीन मजल्यांच्या इमारतीसुद्धा पाण्यात बुडतात.
चक्रीवादळांमध्ये जे वारे वाहतात, त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. कारण त्यावरून त्यांची नुकसान करण्याची क्षमता आजमावता येते. तीव्र चक्रीवादळात वार्याचा वेग ताशी ९0 ते १२0 किलोमीटर असतो. अतितीव्र चक्रीवादळात तो १२0 ते २२0 एवढा असतो. आणि सुपर-सायक्लोनमधील वारे तर ताशी २२0 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहतात. हे वारे किती भीषण असतात याची जर कल्पना करायची झाली तर विमानतळावर विमाने जेव्हा उड्डाण करतात किंवा खाली उतरतात, तेव्हा त्यांची गती इतकीच असते. म्हणून चक्रीवादळापुढे कोणी टिकाव धरू शकत नाही. लोकांना त्यांच्या राहत्या घरातून तत्परतेने हालवून उंचीवरच्या सुरक्षित स्थळी घेऊन जाणे हा एकच पर्याय उरतो.
चक्रीवादळाची पूर्वसूचना : बहुतेक नैसर्गिक आपत्ती पूर्वसूचना देऊन येत नाहीत. ढगफुटी, अतवृष्टी, गारपीट, भूस्खलन, वीज कोसळणे अशांसारख्या नैसर्गिक घटनांचा कालावधी मुळातच कमी म्हणजे फक्त काही तासांचा असतो. त्यांची भौगोलिक व्याप्तीही र्मयादित असते. त्यांचा प्रभाव स्थानिक असतो. म्हणून त्यांच्याविषयी तीन-चार दिवस आधी अंदाज वर्तवणे शक्य नसते. अशा प्रकारच्या घटना घडण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे एवढेच काय ते सांगता येते. पण त्या घटना प्रत्यक्षात किती वाजता किंवा नेमक्या कोणत्या ठिकाणी घडतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे उपाय योजण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि खबरदारीचे उपाय कुठे घ्यावेत, हेही ठरवता येत नाही.
मात्र, नैसर्गिक आपत्तींना अपवाद आहे तो चक्रीवादळाचा. बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचे तापमान २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढले, की चक्रीवादळासाठी परिस्थिती अनुकूल बनल्याचा पहिला संकेत मिळतो. त्यानंतर उपग्रहाकडून मिळणार्या छायाचित्रांत समुद्रावर दाट ढगांची जमवाजमव होत असलेली दिसू लागली, की तो दुसरा संकेत मानला जातो. हवामानाचे पूर्वानुमान देणार्या मॉडेल्सना समुद्रावरच्या आणि वातावरणातल्या हालचालींची माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर येणार्या काही दिवसांसाठीचे पूर्वानुमान केले जाते. मॉडेलच्या आधारावर चक्रीवादळाची उत्पत्ती खरेच होईल का हे ठरवले जाते आणि झाली तर वादळाची तीव्रता किती असेल आणि त्याचा मार्ग कोणता असेल, हेही सांगता येते. वादळ एकदा किनार्यापासून ५00 किलोमीटर अंतरावर आले, की ते जमिनीवरील रडारच्या कक्षेत येते आणि मग खालून रडार आणि वरून उपग्रह त्याची दृश्ये टिपतात. हवामानशास्त्रज्ञ ती डोळ्यांत तेल घालून पाहत राहतात.
ऐतिहासिक नोंदी : चक्रीवादळांची वेगवेगळी रूपे असतात आणि त्यांचे मार्गही विभिन्न असतात. सगळीच चक्रीवादळे भारताची किनारपट्टी ओलांडतात असेही नाही. अनेक वादळे बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान आणि ओमान या आपल्या शेजारी देशांकडेही जातात. सन १८७५ पासून ते आजपयर्ंत भारत आणि शेजारी देशांचा किनारा ओलांडलेल्या सगळ्या चक्रीवादळांची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने जतन केलेली आहे. ही वादळे कधी आणि कुठे निर्माण झाली होती, त्यांनी किनारपट्टी कुठे ओलांडली, त्यांची तीव्रता किती होती, त्यांचा प्रवास किती दिवसांचा होता, जीवितहानी किती झाली, मालमत्तेचे काय नुकसान झाले ही सर्व ऐतिहासिक माहिती हवामानशास्त्र विभागात उपलब्ध आहे. कोणतेही नवे चक्रीवादळ उद्भवले, की त्याच्या भविष्याची लगेच एक ढोबळ कल्पना करायला ही माहिती अतिशय उपयोगी ठरते.
आपत्ती व्यवस्थापन : हुडहुड चक्रीवादळ नुकतेच येऊन गेले आणि मागच्या वर्षी त्याच सुमारास फायलिन हे वादळ आले होते. ही दोन्ही वादळे जेव्हा बंगालच्या उपसागरावर निर्माण झाली, तेव्हा ती ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपासून एक हजार किलोमीटर अंतरावर होती. किनारपट्टी पार करायला त्यांना चार दिवस लागले. या चार दिवसांत आपत्ती निवारणाचे सर्वतोपरी उपाय करणे शक्य झाले.
गतकाळात जेव्हा आपल्या उपखंडात चक्रीवादळे यायची, तेव्हा मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होत असे. पूर्वीच्या काही वादळांत भारतात हजारोंच्या संख्येने आणि बांगलादेशात लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आताच्या काळात असे होत नाही. उपग्रह आणि रडार अशा आधुनिक उपकरणांमुळे चक्रीवादळांवर अखंडित नजर ठेवणे आणि शक्तिशाली संगणकावर चालवल्या जाणार्या अद्ययावत मॉडेल्समुळे चक्रीवादळांचे पूर्वानुमान आता सक्षम आणि विश्वसनीय झाले आहे.
ऑक्टोबर १९९९ मध्ये ओडिशावर आलेल्या सुपरसायक्लोनमध्ये दहा हजार लोक दगावले होते. त्यानंतर भारताच्या आपत्कालीन निवारणाच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा केली गेली. राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण ्व्यवस्था उभारण्यात आली. परिणामी आपण पाहिले, की मागील वर्षी आलेले फायलिन आणि यंदाचे हुडहुड यांच्यामुळे अत्यल्प जीवितहानी झाली. आपण ही एक फार महत्त्वाची सफलता मानली पाहिजे.
चक्रीवादळांचे विचित्र मार्ग : पण अजूनही आपण हे लक्षात घ्यायला हवे, की सगळीच चक्रीवादळे फायलिन किंवा हुडहुड यांच्यासारखी नसतात. या दोन्ही वादळांचा मार्ग सरळ रेषेसारखा होता आणि एकाच दिशेने ती पुढे सरकत गेली होती. त्यांचा वेध घेणे काहीसे सोपे होते. अशीही काही चक्रीवादळे असतात, जी दूर समुद्रावरून निघून तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ येऊन ठेपतात; पण ती किनारा पार करत नाही. ती उत्तरेकडे वळण घेतात आणि मग आंध्र प्रदेशाला धोका उद्भवतो. नंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालला सावधान करावे लागते. त्यांपैकी काही वादळे तर किनार्यापासून सुरक्षित अंतर ठेवून पुढे-पुढे सरकत जातात आणि शेवटी बांगलादेशापयर्ंत पोहोचतात. समुद्रावर यू-टर्न करणारी वादळेही असतात. ती जेथून निघाली तेथेच परत जायचा प्रयत्न करतात.
काही वादळांचा उगम किनारपट्टीपासून थोड्याच अंतरावर होतो. मग त्यांना समुद्राची ऊर्जा आत्मसात करायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यांची वाढ होत नाही आणि ती फारसे नुकसान करू शकत नाहीत. भरपूर पाऊस पडतो आणि कधी कधी तो पाऊस स्वागतार्हसुद्धा असतो. पण त्या वादळांचा जीवनकाल इतका लहान असतो, की सावधगिरीचे उपाय योजायला वेळच मिळत नाही.
फायलिन आणि हुडहुड यांच्यासंबंधीच्या आपत्ती निवारणाच्या बाबतीत जी सफलता लाभली ती वाखाणण्याजोगी आहे. पण हेही लक्षात घेतले पाहिजे, की ही सफलता जीवितहानी टाळण्यापुरतीच र्मयादित आहे. चक्रीवादळाचे चांगले पूर्वानुमान करता आले तर किनार्यावरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हालवून जीवितहानी टाळता येते. पण मालमत्तेचे तसे स्थलांतर करता येत नाही. शेते, फळबागा, कच्ची घरे, विजेचे खांब, रस्ते यांचे फार मोठे नुकसान अटळ असते. हुडहुड चक्रीवादळ विशाखापट्टणम शहरासारख्या मोठय़ा शहराला पार करून गेले, तेव्हा तेथे विमानतळ, मोबाईल टॉवर, पक्क्या इमारतींचे आतले भाग यांची दुर्दशा झाली. म्हणून आपत्ती निवारणाच्या बाबतीत आपल्याला काही प्रमाणात यश लाभले असले तरी अजून पुष्कळ काही साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे.
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक आहेत.)