- संजय भुस्कुटे, ज्येष्ठ पत्रकार खो श्री सदस्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आप्पासाहेबांचा केलेला बहुमान हा समस्त श्री सदस्यांच्याच कार्याचा गौरव आहे.बैठक चळवळीचे प्रणेते महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरुपणातून समाजमनात आमूलाग्र बदलाचा ध्यास घेतला आणि देव, स्वदेश व धर्म या त्रिसूत्रीतून समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून प्रहार करीत समाजाला सकारात्मक वाटेवर आणलं. बैठक चळवळीतून, आध्यात्मिक शिकवणुकीतून असंख्य व्यसनी लोकांना चांगुलपणाच्या वाटेवर आणलं. नानासाहेब धर्माधिकारी यांची समाज बदलाची ही धुरा त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब यांनी लीलया पेलली आणि त्यातून आज बैठक चळवळीचा विश्वात्मक परीघ कवेत घेणाऱ्या चळवळीचा वटवृक्ष दिमाखात उभा आहे.समर्थ रामदासांच्या ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या समर्थ वचनाप्रमाणे आप्पासाहेबांनी आपल्या मितभाषी, शालीन, सुसंस्कृत, मृदू, सत्त्वशील व सत्यवचनी स्वभावातून समाजात दिसून येत असलेलं उणंपुरं भान जबाबदारीने पेलत, त्याला सामाजिक चळवळीचा नवीन आयाम दिला. आप्पासाहेबांनी बदलत्या पर्यावरणाचं स्वरूप लक्षात घेऊन वृक्षलागवड, संगोपन, स्वच्छता अभियान ही अभिनव चळवळ सुरू केली. शासकीय स्तरावरून कोट्यवधी रुपये खर्च करून जे काम होऊ शकत नाही, ते आप्पासाहेबांच्या एका हाकेनं सहज शक्य होत आहे. कारण दासबोधी निरुपणाच्या माध्यमातून दिलेली शिकवण श्री सदस्यांच्या नसानसांत, अंतःकरणात भिनली आहे. परमार्थ म्हणजे होमहवन, मोठे-मोठे यज्ञ, पारायणे, प्रवचनं असं मर्यादित स्वरूप न ठेवता परमार्थाची शिकवण आचरणातून दिसली पाहिजे, यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी लोकाभिमुख चळवळीच्या माध्यमातून उभं केलेलं सामाजिक कार्य अवर्णनीय मानायला हवं.देशभरात सध्या अनेक संप्रदायांचे बाबा, गुरू सत्संग व दर्शन सोहळे करीत असताना आप्पासाहेबांनी कामाच्या माध्यमातून आपलं सामाजिक उत्तरदायित्व कृतज्ञपणे व्यक्त करण्याचं काम सुरू ठेवलं आहे.वर्तमानात माणूस माणसापासून दुरावला जात असताना पोकळ बाता मारण्यापेक्षा सातत्याने कार्यतत्पर राहून समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम श्री सदस्यांची बैठक चळवळ करीत आहे. म्हणूनच तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं काही वर्षांपूर्वी गौरविल्यानंतर त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानंतर आता राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. वडील आणि मुलाला असा मोठा सन्मान दिला जाण्याचं बहुदा हे एकमेव उदाहरण असावं. म्हणूनच हा मणिकांचन योग आहे. हा देशभरातील लाखो श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव आहे.आप्पासाहेबांचे सुपुत्र सचिनदादा माझा प्रत्येक श्री सदस्य हा महाराष्ट्र भूषण आहे, असे म्हणत असतील. म्हणूनच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं या देशावर, धर्मावर व अंधश्रद्धाविरहित देवावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक श्री सदस्याचा होणारा गौरव हा ज्ञानियाचा व श्रवणाचा वेलू गेला गगनावरी, याच भावनेचं प्रतीक आहे.लोकसेवा समाजसेवा, आयएएस, आयपीएस, उद्योग, शिक्षक, क्रीडा, राजकारण, वैद्यकीय, कृषी अशा विविध क्षेत्रांत निष्ठेने काम करणाऱ्यांचा गौरव लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर कार्यक्रमात केला जातो. महाराष्ट्रात हा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. याच सोहळ्यात ज्यांनी आपापल्या क्षेत्रात आयुष्यभर काम केले आहे, अशांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. २०१९ मध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात, समाजभूषण जीवन गौैरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गौरवण्यात आले होते. आज आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना हे छायाचित्र आठवले नाही तर आश्चर्य. त्यावेळी व्यासपीठावर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बँकर व गायिका अमृता फडणवीस, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती.
ज्ञानियाचा, श्रवणाचा वेलू गेला गगनावरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:54 PM