- विश्वास पाटीलकोल्हापूर म्हटले की, डोळ्यामोर उभे राहते एक रसरशीत शहर.. पवळा धम्मक गूळ, झणझणीत मिसळ, सौंदर्य खुलविणारा कोल्हापुरी साज, रुबाबदार कोल्हापुरी चप्पल, जिभेला वेड लावणारा कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि तांबड्या मातीतली कोल्हापुरी कुस्ती..! या ओळखीला आता नवी ओळख जोडली जात आहे ती क्रीडा क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीची...! देशाचा झेंडा अटकेपार फडकविणारे तब्बल दोन-चार डझन खेळाडू एकट्या कोल्हापूरचे आहेत. पायाभूत सुविधा नसतानाही, खेळांडूनी मिळविलेले हे यश आहे.हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये १९५२ ला कुस्तीत भारताला पहिले कांस्यपदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांची कर्मभूमी कोल्हापूरच. भारताचा पदकांचा प्रवास कोल्हापूरपासून सुरू झाला आहे. त्यानंतर कुस्तीतच आॅलिम्पियन के. डी. माणगावे, दिनकर शिंदे, गणपतराव आंदळकर, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, संभाजी वरुटे, राम सारंग, संभाजी पाटील, आताची रेश्मा माने, स्वाती शिंदे, संदीप सावंत, विक्रम कुराडे, फुटबॉलमधील रिची फर्नांडिस, अनिकेत जाधव, शिवाजी जाधव, कैलास पाटील, जलतरणमधील आॅलिम्पियन वीरधवल खाडे, मंदार दिवसे, नेमबाजीमधील तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, शाहू माने, तेजस कुसाळे, नवनाथ फरताडे (मूळचा बीडचा परंतु कर्मभूमी कोल्हापूर), क्रिकेटमध्ये भाऊसाहेब निंबाळकर, डी. आर. पाटील, नंदू बामणे, सदा पाटील, उमेश गोटखिंडीकर, महिला टी-२० संघाचा कणा असलेली अनुजा पाटील, हॉकीमध्ये शिवाजी डुबल, नेताजी डोंगरे, विजय जाधव, विजय सरदार, दयाजी पाटील, धीरज पाटील, बुद्धिबळमध्ये काशिनाथ मंगल, ऋचा पुजारी, टेबल टेनिसमध्ये पहिल्या अर्जुनवीर पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे, शर्मिला भोसले व छाया टेंगशे, कबड्डीमध्ये उमा भोसले, प्रो-कबड्डीमध्ये सध्या ऋषिकेश देसाई त्याचा भाऊ सिद्धार्थ देसाई, अक्षय जाधव, तुषार पाटील, आनंद पाटील, ऋतुराज कोरवी, गुरू मोरे अशी एक फळीच सध्या मैदानात आव्हान देत आहे. अॅथलेटिकमध्ये आश्लेष मस्कर, बाळासाहेब निकम, जयश्री बोरगी, दीपक कुंभार, परशुराम भोई, सॉफ्टबॉलमध्ये स्नेहल जाधव, आशपाक शिकलगार, ऋतिक फाटे, रसिका शिरगावे, बेसबॉलमध्ये गिरीजा बोडेकर, याटिंगमध्ये (नौकानयन) तारामती मतिवाडे, शरीरसौष्ठवमध्ये बिभीषण पाटील, सुहास खामकर, राजेंद्र सोरटूर, विजय मोरे, संग्राम चौगले, रेसिंगमध्ये दिवंगत राजू घोटवडेकर, आशुतोष काळे, कृष्णराज महाडिक, धु्रव मोहिते, वेटलिफ्टिंगमध्ये वर्षा पत्की, दया कावरे, दीपाली शिंदे, राजू सुतार यांनी ठसा उमटवला. आयर्नमन स्पर्धेत आकाश कोरगांवकर, वैभव बेळगांवकर, उदय पाटील, प्रदीप पाटील, संदेश बागडी, आशिष तंबाके, विजय कुलकर्णी, रौनक पाटील, आदित्य शिंदे, स्वप्निल माने, विनोद चंदवाणी, महेश मेठे, विशाल कोथळे, चेतन चव्हाण, सत्यवान नणावरे, बलराज पाटील, पंकज रवळू, अमरपालसिंग कोहली व दहा वर्षाच्या वरद पाटील यांनी यश मिळविले आहे.
नुसते खेळाडूच नव्हे, तर आताही देशाच्या विविध खेळांच्या फेडरेशनवर व प्रशिक्षक म्हणूनही कोल्हापूरचा दबदबा आहे. त्यामध्ये फुटबॉल फेडरेशनवर मालोजीराजे, त्यांच्या पत्नी मधुरिमा राजे, भारतीय व्हॉलिबॉल फेडरेशनचे माजी सचिव प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, भारतीय महिला क्रिकेट निवड समितीच्या सदस्या अमृता शिंदे, नेमबाजीचे कोच अजित पाटील, युवराज साळोखे, संदीप तरटे, बास्केटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम करणारे शरद बनसोडे, स्नेहल बेंडके, कबड्डीचे आंतरराष्ट्रीय कोच पांडुरंग मस्कर, रमेश भेंडिगिरी, हॉकीचे नॅशनल रेफ्री संदीप जाधव हे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापुरात नेमबाजीचा पाया अण्णासाहेब कुसाळे यांनी घातला व ती परंपरा पुढे जयसिंगराव कुसाळे यांनी चालवली. नेमबाजीच्या पंच म्हणून राधिका हवालदार यांनी चांगला ठसा उमटवला आहे. कमलाकर किलकिले या तरुणाने कोल्हापूरला स्केटिंगचे वेड लावले. म्हणजे असा एकही खेळ नाही की, ज्यामध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या कर्तृृत्वाचा झेंडा फडकविलेला नाही.
राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय देऊन कुस्तीचा प्रचार व प्रसार केला. कुस्ती वाढविली. कुस्तीनंतर आता कोल्हापूरचे लक्ष्य विस्तारले आहे. कुस्ती ही कोल्हापूरची ओळख असली तरी ती बरीचशी आता पुसट झाली आहे. उदयराज पाटील, महेश वरुटे, संतोष लवटे, कौतुक डाफळे, रणजित नलवडे यांच्यासारखे मल्ल कुस्ती गाजवत आहेत. कोल्हापूरने आतापर्यंत महाराष्ट्राला १४ महाराष्ट्र केसरी दिले; परंतु २००० साली विनोद चौगले ‘हिंदकेसरी’ झाल्यानंतर कुस्तीची गदा कोल्हापूरला आलेली नाही. पहिल्या पाचपैकी चार हिंदकेसरी कोल्हापूरने दिले आहेत. हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे व हजरत पटेल हे शाहुपूरी तालमीचे. गणपतराव आंदळकर मोतीबाग तालमीचे, तर दिनानाथसिंह यांची कुस्ती गंगावेश तालमीत बहरली. एवढी तेजस्वी परंपरा असूनही आजच्या घडीला कोल्हापुरात कुस्ती आहे; परंतु कुस्तीत कोल्हापूर नाही, अशी स्थिती आहे.
कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राला शासनाने नेहमीच पाठबळ दिले आहे. कोल्हापूरात २३ कोटी रुपये खर्च करून विभागीय क्रीडा संकुल उभारले आहे. वडणगे (ता. करवीर) येथे कुस्तीगीर रेश्मा माने हिच्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीतून आंतरराष्ट्रीय दर्जाची व महाराष्ट्रातील पहिली वातानुकूलित तालीम उभारण्यात आली आहे. हॉकीसाठी कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर अॅस्ट्रो टर्फ मैदान मंजूर झाले आहे. हॉकीपटू विजय सरदार हे टर्फ मैदानासाठी धडपडत आहेत.
भारतीय खेळ प्राधिकरणाची (साई) ची कुस्तीची कोल्हापूर आणि मुरगूडला दोन केंद्रे आहेत. कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला पाठबळ देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी सांगितले. शासनाने कोल्हापूरच्या खेळाला प्रोत्साहन दिले, तर त्यातून देशाला अनेक सुवर्णपदके मिळतील एवढी या मातीत नक्कीच क्षमता आहे.
(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीचे मुख्य बातमीदार आहेत.)