मेहरून नाकाडेकोकणात गणेशोत्सवाइतकाच शिमगा हा मानाचा सण. एरवी जिचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावे लागते, ती ग्रामदेवता शिमग्यामध्ये पालखीत बसून घरोघरी जाते, हे या सणाचे मुख्य वैशिष्ट्य. परगावी, परप्रांतात गेलेली नोकरदार मंडळी पालखीच्या ओढीने गावात येतातच. गावं गजबजून जातात. या पालखीसोबत येतात ते खेळे. हे शिमग्याचे दुसरे वैशिष्ट्य. कुठे नमन, कुठे कापडखेळे, कुठे काटखेळ, कुठे टिपरीखेळे, संकासूर, अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेली जाते. शेवरीच्या झाडाची होळी उभी करून हा सण साजरा होतो, ही कोकणची ऊर्जा...फाल्गुन महिन्यात होळीला प्रारंभ होतो, त्याचवेळी ग्रामदेवतेच्या नावाने नमन/खेळ्यांनाही आरंभ होतो. घरोघरी नमन सादर केले जाते, ज्या घरासमोर नमन सादर केल्यानंतर त्या घरमालकाने दिलेल्या शिधा सन्मानपूर्व स्वीकारून पुढील घरी नमन सादर करण्यासाठी मंडळी मार्गस्थ होते. दहाव्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी जेव्हा सहाणेवर येते, त्यावेळी खेळे/नमन देखील परतात. शिमगोत्सवात पालखीच्या मांडावर नमन आवर्जून सादर करण्यात येते. रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यांतील नमनप्रेमींनी प्राचीन काळापासून ही लोककला जोपासून शासकीय विविध योजनांविषयीची जनजागृती करण्याबरोबर समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कामही करीत आहेत.
नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. त्यांची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे- उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, गळ्यात रंगीत ओढण्या असतात. रांगेच्या मध्यभागी असलेला सूत्रधार मात्र संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतो. सुरुवातीला बारा किंवा सोळा नमने सादर केली जातात.
बारा नमनांनंतर संकासूर प्रवेश करतो. त्याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करीत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासूर, मृदुंगवादक यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.नमन गाणाऱ्या मंडळीच्या कडेला दोन मृदुंग वाजविणारे असतात. या लोककलेत ‘गणगौळण’प्रमाणेच आणखीही काही सोंगे असतात. सोंगात सर्वप्रथम गणपती बाप्पांना अग्रक्रम आहे. गणेशाचे पूजन सादर करतानाच गणेशाची आख्यायिका गाण्यातून सादर केली जाते.गण सादर झाल्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते.
गवळण हा प्रकार मजेदार व श्रवणीय असतो. दही, दूध, लोणी विक्रीसाठी गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात. मात्र, त्यांची वाट गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्णाचे सवंगडी) रोखतात. त्यावेळी गवळणी, पेंद्या व सुदामा यांच्यातील संवादाबरोबर गाणी व मिश्कील प्रकार सादर केले जातात. कृष्णाचे सवंगडी गवळणींची वाट अडवित त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (ज्येष्ठ महिला) अनेक कला सादर करते.
गवळणी आपल्या गाण्यातून श्रीकृृष्णाची वाट सोडण्यासाठी विनवणी करतात. गवळणीनंतर कौटुंबिक जीवनावर आधारित मात्र एक चांगला संदेश देणारी नाटुकली सादर केली जाते. या नाटुकलीचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो. नमनामध्ये शिपाई हे हल्लीच्या पोलीस दलातील हवालदारप्रमाणे असतात.नमनाच्या शेवटी वगनाट्य सादर करण्यात येते. उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकाचा समावेश असलेले एखादे आख्यान असते. रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो. देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही मुखवटे घालून आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल-ताशांच्या तालावर नाचत, आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युध्द होते व रावण मारला जातो. रावण वधानंतर खेळ्याचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ उजाडता उजाडता समाप्त होतो.
राजापूर तालुक्यात कापडखेळे हा प्रकार अधिक दिसतो. त्यालाच काही ठिकाणी टिपरी खेळे असेही म्हणतात. विशिष्ट पद्धतीचे कपडे परिधान करून हातात टिपºया घेऊन पारंपरिक गीते ही मंडळी सादर करतात. राजापूर तालुक्याच्या काही भागात गोमूचा नाचही घरोघरी जाऊन सादर केला जातो.
शिमगोत्सवात घरोघरी खेळे सादर होतात. याशिवाय काही गावातून गोमूचा अथवा संकासूराचा नाच हा देखील कार्यक्रम होत असतो. वास्तविक दोन्ही पात्रे नमनातीलच आहेत. पूर्वीपासून जोपासलेली ही लोककला आजच्या पिढीलाही आवडणारी आहे. लाईव्हच्या जमान्यात पौराणिक विषयावरील कथानकाबरोबर सामाजिक संदेश देण्याचे कार्य नमनातून होत आहे. खेळे या लोककलेची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहोचली असताना देखील आर्थिक पाठबळाअभावी कोकणवासीयांनी ही लोककला जोपासली आहे. लग्नसमारंभ असो वा सार्वजनिक उत्सवातही ‘नमन’ कार्यक्रम ठेवतात.
(लेखिका लोकमतच्या रत्नागिरी आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)