- प्रा. रतनलाल सोनग्रा
या देशात वर्ण, जात नावाचे एक भीषण वास्तव आहे. जे आधीच आपणाला बंधनात अडकवते. या जाती-जातींचे समूह म्हणजे अदृश्य भिंतींची स्वतंत्र राष्ट्रे किंवा स्वायत्त राज्ये होत. आपली आर्थिक स्थिती कितीही खालावलेली असो, आपला सन्मान इतरत्र कुठेही असो वा नसो; पण जातीत मात्र त्याची खात्री असते. बाहेर काहीही किंमत नसली तरीदेखील जातीत ‘पंचा’च्या भूमिकेत तो स्वत:ला राष्ट्रपती समजतो. काही जातींची कामे जशी जन्माने निश्चित होतात, तशी ‘काहीं’ची पतदेखील शासनात निश्चित होते. काही जमातींवर गुन्हेगारीची ‘तप्तमुद्रा’ अंकित केल्याने त्यांना तसे वागायला भाग पाडायला लावणारी व्यवस्था सतत त्यांना बांधून ठेवते.अशाच वातावरणात 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथील ‘मातंग’ कुळात अण्णा भाऊंचा जन्म झाला. घरात काहीच नसल्याने ‘केवळ चुलीपुरते घर अन् सगळीकडे रानावनात वावर’ असा प्रकार होता. जन्मत:च हलाखी असली की एक प्रकारची चलाखीपण येते. शाळा शिकता आली नाही, तरी जीवन त्यांना सर्व शिकवते. अण्णा भाऊंनाही शाळा शिकता आली नाही; पण जीवनाच्या अनुभवांनी त्यांना शहाणपण दिले. गोरगरिबांचे राज्य आणण्यासाठी झटणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची तुकारामाने म्हणजेच अण्णा भाऊ यांनी सेवा केली. लहान पोरांनादेखील त्यावेळची अन्यायी राजवट बदलून टाकावीशी वाटली. काही कारण नसताना पोलिसांचा ससेमिरा मागे लागत असल्याने जगण्यासाठी साठे कुटुंबाने मुंबईची वाट धरली. मुंबई ही खर्या अर्थाने माणसांची सरमिसळ झालेली नगरी होती. इथे मुंबईकर फक्त रस्त्यावर एक होतो, बाकी सर्व जाती, जमातीच्या वस्त्या, गल्ल्या, झोपडपट्टय़ा, चाळी, सोसायट्या, नगरे आणि समाजमंदिरे आहेत.मुंबई ही मोठमोठय़ा कारखान्यांची, कापड गिरण्यांची नगरी होती. मजुरांची मोठी वस्ती परळ, लालबागला होती. या परळ, लालबाग वस्तीत सत्यशोधक चळवळ, साम्यवादी चळवळ प्रभावशाली होती. ‘लाल बावटा’ हा कामगारांचा दाता आणि त्राता होता. तुकाराम ऊर्फ अण्णा भाऊ मिळेल ते काम करून मोलमजुरी करून पोट भरू लागले. कधी माळीकाम, घरगडी, रोजंदारीवर मजुरी, तसेच फक्त जगण्यासाठी धडपडणारा हा जीव माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ‘लाल बावटा’ कार्यकर्त्यांच्या जवळ आला आणि त्याने या जगाचे रहस्य ओळखले. एका जागतिक विचारधारेशी त्याची नाळ जुळली होती. ‘जगातील कामगारांनो, एक व्हा गमवायला तुमच्याकडे काहीच नाही !’ ही तत्त्वज्ञ कार्ल मार्क्सची घोषणा सर्वत्र घुमत होती. मार्क्सबाबाच्या तत्त्वज्ञानाने र्शमिकवर्गाला मोठी आशा होती.आतापर्यंत जगातील मोठमोठय़ा, ज्ञानी लोकांनी, महर्षींनी, आचार्यांनी, तत्त्वज्ञांनी ‘जग काय आहे? कसे आहे? याचा अर्थ काय? ते कोणी बनविले? जन्माआधी आणि जन्मानंतर काय? या सार्या गोष्टींचे विवेचन केले; पण हे दु:खमय जग बदलायचे कसे, हे कोणीच सांगितले नाही. तथागत बुद्धाने जगाच्या दु:खाचा विचार केला, उपायांचा विचार केला आणि ‘मध्यम मार्ग’ दाखविला. त्यानंतर 19व्या शतकात कार्ल मार्क्सने दु:खावर उपाय म्हणून साम्यवादाचा जाहीरनामा मांडला. आतापर्यंत दु:खी, कष्टी, र्शमिक माणसाला प्रत्यक्षात कुणी काही दिले नाही ! कुणी ‘प्रेम’ वाटायला सांगितले, कुणी ‘नाम’ घेण्याचे साधन दिले, कुणी पुढच्या जन्माचे उधार आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात अन्न, वस्र, निवारा, प्रकाश याचे वाटप साम्यवादी तत्त्वज्ञानाने केले. रशिया, चीन आणि छोटी-मोठी राष्ट्रे बदलली. अर्धे जग मुक्त झाले.या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी, मानवतेच्या उद्धारासाठी हजारो कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व वेचले. अण्णा भाऊही यात मागे नव्हते. ज्या ज्या माध्यमांतून समतेचा प्रसार करता येईल, माणुसकीचा आविष्कार करता येईल, मुक्त समाजजीवनाचा पुरस्कार करता येईल, ते ते सर्व गीत, गायन, पोवाडे, नाटक, कादंबरी, लोकनाट्य या सार्या आयुधांचा वापर अण्णा भाऊंनी केला. अण्णा भाऊंनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. अण्णा भाऊ संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात उतरले आणि ‘जग बदल घालून घाव ! सांगुनि गेले भीमराव !’ ही महागर्जना केली. या सर्व लढय़ाचा मी सहभागी आणि साक्षीदार आहे. लाखो लोक बेभान आणि बेफाम होऊन त्यांच्या कलापथकाचे कार्यक्रम पाहत होते. अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ चित्रपट काढला. यशवतंराव चव्हाणांनीही त्यांचे कौतुक केले; पण अण्णा भाऊ कर्जात आणि कौटुंबिक कलहात अडकले. अत्यंत शोकाकुल अवस्थेत ते गेले. आम्ही मृतपूजक संस्कृतीचे लोक आता त्यांच्या प्रत्येक गुणांना आठवून ‘उत्सव’ करीत आहोत; पण निदान आता त्यांच्यासारख्या साहित्यिकांना, कार्यकर्त्यांना विसरू नका, त्यांची साथ सोडू नका !.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)