(संकलन :-धर्मराज हल्लाळे, हणमंत गायकवाड, चेतन धनुरे, आशपाक पठाण, राजकुमार जोंधळे)
माकणी धरणाखालील तेरणा तटीचा भाग.. काळ्या भुसभुशीत जमिनी, त्यावर हिरव्या लुसलुशीत पिकांची दुलई.. नदी-कालव्यांनी दारी धरलेली सुबत्तेची ओंजळ.. गुण्यागोविंदाने नांदणारी माणसे.. समृद्ध, संपन्न जीवनशैलीच्या कॅनव्हासवरील हे लुभावणारे चित्र आजपासून बरोबर 25 वर्षांपूर्वीच़े
30 सप्टेंबर 1993ची ती काळरात्र विध्वंसकारी भूकंप सोबत घेऊन आली आणि हे चित्र पूर्णत: चित्रविचित्र झाल़े अनेक वर्षांची दगडा-मातीची गुंफलेली घट्ट वीण उसवली, साथ सुटली अन् अवघ्या काही सेकंदातच ज्यांच्यावर पिढय़ान्पिढय़ा मायेचे छत्र धरले होते, त्यांच्यासह इथली घरे जमीनदोस्त झाली़ क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल़े उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल 26 गावे नकाशातून एका क्षणात पुसली गेली़ हजारो जीव माती-दगडाच्या ढिगाखाली गुदमरल़े कोणी अनाथ झाले, कोणाचे सौभाग्य हरपल़े मानवी मने कोलमडून पडली़ सगळेच जणू मातीमोल झाले. मदतीसाठी जगभरातून यंत्रणा धावल्या़ टप्प्याटप्प्याने गावांचे पुनर्वसन झाल़े डोक्यावर छत आल़े भौतिक सुविधा पुरविल्या गेल्या़ मदत, अनुदान मिळाल़े पण, पुढे काय? या प्रश्नाने भूकंपानंतर बाधितांना पुढची अनेक वर्षे छळले अन् आता सरकारी अनास्थेची धोरणे त्यांचा छळ करताहेत़
भूकंपात पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या गावांपैकी होळी, कवठा, पेठसांगवी यांसारख्या गावांमध्ये जाऊन तेथील बाधितांशी संवाद साधल्यानंतर पायाभूत सुविधांची लागलेली वाट, बिघडलेले पाणी व्यवस्थापन, भेगाळलेली घरं, घरांचे कबाले, शेतीची वाताहत, जुन्या गावची पडित जमीन, असे एक न अनेक प्रश्न भूकंपबाधितांना आजही छळत असल्याचे विदारक चित्र समोर येते. त्या व्यापक चित्रातले हे काही दुखरे तुकडे.
भूकंपानंतरच्या गेल्या 25 वर्षात..पालथ्या घड्यावर पाणीच!
ज्यांची माणसे गेली, घरे उद्ध्वस्त झाली, त्यांची मनेही उद्ध्वस्त झाली. ज्यांचे सर्वस्व हिरावले, त्यांच्या कटु आठवणी आजही पिच्छा सोडत नाहीत. मात्र आयुष्याचे दु:ख पाठीशी ठेवून उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भूकंपग्रस्त पुन्हा पुढे आले. हजारो मुले शिकली. जे एकटेच राहिले होते, त्यांचेही परिवार झाले.परंतु, आजही प्रत्येक वर्षी गणेश विसर्जनाचा दिवस जवळ आला की, आपल्या माणसांच्या आठवणींनी जीव व्याकुळ होतो.
* भूकंपाच्या धक्क्याने लातूर जिल्ह्यातील औसा, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा तालुक्यांत विध्वंस झाला होता. अन्य गावांना, तालुक्यांच्या ठिकाणी तसेच लातूर व उस्मानाबाद शहरालाही भूकंपाने हादरवून सोडले होते. काही महिने तेथीलही लोक भीतीने रस्त्यावरच तंबू ठोकून होते. लातूर शहरातही रिकाम्या जागेत, ज्यांना जागा नाही, त्यांनी अगदी रस्ता आणि नाल्यांवर तंबू ठोकले होते. दिवसभर घरात वावरायचे. स्वयंपाक-पाणी करायचे आणि रात्रीला तंबूत तळ ठोकायचा. उंच इमारती, बांधलेली पक्की घरे पाहून आता याचा काय उपयोग? असेही लोक बोलत होते. हळूहळू काळ लोटत गेला. भीती दूर होत गेली. धक्क्यांची तीव्रता कमी झाली. परिणामी, त्या 52 गावांनी जे भय अनुभवले होते, त्याच्यापासून कोसोदूर असणा-या गाव, शहरांमध्ये भूकंपाचे तुलनेने लवकर विस्मरण झाले.
* काही काळ बांधकामांवरही प्रश्न निर्माण झाला. भूकंपरोधक बांधकामाची चर्चा झाली. मात्र हे अल्पकाळ ठरले. 1993 साली रिकाम्या असलेल्या जागाही आता बांधकामांनी भरल्या आहेत. शहरांचा विस्तार होताना नियोजन पूर्वीही नव्हते अन् आताही नाही.
* भूकंपग्रस्त भागांतील गावांमध्ये अनेक लोक अरुंद रस्त्यांमुळे दगावले होते. भूकंपग्रस्तांची पुनर्वसित गावे नियोजनबद्ध आहेत, मात्र ज्यांना झळ पोहोचली नव्हती, ती गावे आणि शहरेसुद्धा नियोजनशून्य वाढत आहेत.
* लातूर शहरातील बहुतांश वाढीव वसाहतींमध्ये 15 फुटांचे रस्ते आहेत. बांधकाम परवाना एक असतो, आणि बांधकाम आपापल्या पद्धतीने होत असते.
* रिकाम्या जागाही अतिक्रमित झाल्या आहेत. भूकंपानंतर तंबू ठोकून रात्रीला निवा-यासाठी थांबायला असलेले 1993चे रस्ते हे तर आता वाहनतळ बनले आहेत.
* भूकंपानंतर गावांचे पुनर्वसन झाले. काहीअंशी आर्थिक पुनर्वसन झाले. कुठल्याही घटनेवरचे काळ हे औषध असते, त्याच नियमाने मानसिक पुनर्वसनही झाले. जी हजारो मुले पोरकी झाली होती, ती सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मोठय़ा शहरांमध्ये जाऊन स्थिरावली. अनेकांचे शहरांमध्ये स्थलांतर झाले.
* . पण या एवढय़ा विध्वंसानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे म्हणावे, तर ते ना व्यवस्था शिकली, ना नागरिक! झाले, गेले ते संपले. कालांतराने विसरले गेले!