- प्रा. केशव सखाराम देशमुख
ग्रामीण माणसांची सौष्ठवता आणि पुष्टता दूधदुभत्यामुळं आणि शेतात पिकणाऱ्या बहुधान्य तसेच बहुरानमेव्यामुळं सबळ टिकून होती. आज कालमान बदललं आणि चवीसह जगण्यातही भेसळ होऊन बसली. सोन्याचा धूर निघणारे दिवस मावळले. दुष्काळानं तर शेतीवर आघात सुरू केले. संकटांच्या मालिकांनी गाव आणि तेथील माणूस खऱ्या अर्थानं ‘बेजार’ झाला!
म्हणजे असे की, जे मातीखालून येते, पिकते ते खाण्याची सुंदर संस्कृती जगाला शेतांनी दिली हे खरे! आता मॉल हीच शेती; पण गाव-शहरात भेदाची रेघ ओढणारी. पैशाचे पाकीट किंवा बँकांची कार्डे मशीनच्या तोंडात खुपसून पाहिजे ते मॉलमध्ये आता तयार! आता, ‘शेतात पिकण्याची वाट कोण पाहतो?’ जमाना पार बदलला. सवयी बदलल्या. खाणे बदलले. ‘जीभ जागेवरच; पण चवी मात्र प्रचंड बदलल्या...’ ‘गावरान’ हा शब्द पाटी लावून, ओरडूनच सांगण्याचे दिवस आता जीव जाळत राहतात. तेव्हा सगळी रानफळं आणि शेतभाज्या गावात मिळत. आजपण मिळतात; पण त्यांचा ‘बाजार’ होऊन बसला. पिढीपालट झाला. मात्र, ‘ते’ भाज्यांचं चैतन्य उरलं नाही.
पिकांतच एक ‘तास’ (रांग) भाज्यांची ठेवण्याची शेती-रीत होती. या रांगेला ‘पाटा’ म्हणत. याला कोथिंबीर म्हणजेच ‘संबार’ असायचा. शेंदाडाचे ‘येल’ भुईला धरून, पसरून असायचे. येलाला ‘वाळकं’ लगडून यायचं. वाळकांच्या पाठीवर हिरव्या-काळपट-पिवळ्या पट्ट्यांचं सौंदर्य असतं. जणू वाळकांची पिलं म्हणजे छोटी वाळकंच जशी. त्यांना ‘शेलन्या’ म्हणतात. या फळांच्या बिया टचटचीत जाणवतातच. याच ‘पाट्याला’ (तासाला, रांगेला) भेंडीची झाडे असायची. त्यांना ‘बोंडं/भेडरं’ असापण शब्द आहे. मधे-मधे पाट्यात ज्वारीचे धांडे असत. या धांड्यांवर चवळीचे वेल वर चढत. वेलाला चवळीच्या शेंगाचे घोष असतात. त्याला ‘बरबटी’ असं ध्वन्यानुकारी नाव आहे.
कलिंगडाला - देवडांगर किंवा कलांगडू म्हणतात. कलांगडांचे वेल गावात, झोपड्यांवर किंवा जनावरांच्या गोठ्यांच्या वर सगळं घर व्यापून गडद सावलीसारखा हा ‘हंगामी’ वेल घरावर ‘गार सावली’ स्थापित करीत असायचा. फळभाज्या घरी आणून त्या ‘पत्रावर’ (टीन) उन्हात चिरून ‘फोडी’ करून वाळू घालत. म्हणजे हे ‘ड्रायफ्रूट’ पुढं सालभर भाजी म्हणून वापरत.
एकेका फळाचे, पदार्थाचे, भाजीचे तेच नाव जनभाषेत येताना अधिक ‘चवदार’ होऊन येते. जसे- भोयमुंग, आल्लू, बैंगन, कलांगडू, तमाटे, कोथमीर, संबार, बोडं, वाळकं, शेन्न्या, कºहाळू, ‘धावड्या’ (म्हणजे- काळे तीळ), जांब (पेरू), हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी वा चटणी (म्हणजे ‘घोळाना’) किती शब्दही छान; घोळानाही चवदार. हा पदार्थच आता दुर्मिळ होऊ पाहत आहे! शेंगांमध्येपण पुष्कळ भाज्यांची गर्दी आहे. त्यात ‘आवऱ्याच्या शेंगा’ ही एक शेंगवर्गीय भाजी आहे.
‘रताळू, गाजरं’ या मातीखालच्या कंदवर्गीय फळभाज्या आहेत. त्या टिकून आहेत अजून. ‘तरोठा’, ‘कुरडू’, ‘घोळ’ अशा काही रानभाज्या म्हणजे मजा!! पण फळभाज्या चिरणे, फोडी करणे, वाळू घालणे हा एक सुंदर कार्यक्रम असायचा, तो बंदच झाला आहे. जंगल हिंडले म्हणजे किंवा माळरान तुडवले म्हणजे बेहद्द चव असणारी फळं खायला मिळत. त्यात, टेंभुरनं, बिब्बे, धामनं, बोरं, चिचा, चारं, कारं, वाघाटं, करटुलं, हादग्याची फुलं, कामुन्या, जांभुळनं, रामफळं-सीताफळं यासारखी किती-किती फळं आणि भाज्या चार-सहा पाऊस कोसळले की मिळत. यातल्या अनेक फळांची आता बेरीज कमी आणि वजाबाकी मात्र जास्त झाली आहे. शिवाय, ‘झाडांवर चढून, लपून, वरून पडून फळं मिळवत ते खाण्याची जी मजा कूछ और होती; ती सरली...’
तात्पर्य, या फळांनी, या भाज्यांनी आपला आनंदही हिरवा, टवटवीत, फ्रेश, सदानंदी ठेवलेला होता. ते मिळविण्यात एक खुशी होती आणि खाण्यात होते सुख. आता काळ फिरला आहे. बाजाराला भाव आला आहे. जे शेतात पिकते आणि विकते ते रसायनांनी घेरले आहे. हिरव्यागार भाज्या दिसतात; पण त्यातून ‘संशय’ फिरतो. रानभाज्यांची, रानफळांची ही अशी चव चाखता येत नाही. फक्त कागदांवर लिहिता येते...!