प्रा. डॉ. द. ता. भोसले
महाविद्यालयामध्ये प्रथमच प्रवेश घेतलेल्या मुलांना दावे तोडलेल्या वासरासारखे मनसोक्त उधळावे वाटते. हुंदडावेसे वाटते. हंबरावेसे वाटते. वय आडमुठे असते. देह मुसमुसायला लागतो. मन त्यात मावेनासे होते. पिंजर्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे मुक्तपणे-मनसोक्तपणे आकाशभर सैर करावी असे वाटते. त्यातच भिन्नलिंगी शरीराची एक नवीच ओळख व्हायला लागते. एक वेगळेच आकर्षण उत्पन्न झालेले असते. स्वप्नासारखे वाटणारे एक वेगळेच जग त्याच्यासमोर हळूहळू उमलताना त्याचे मन सैरभैर होते. या स्वप्नाचा ध्यास अन् पाठलाग करण्यातच या वयाला कमालीचा आनंदही होत असतो. त्यातच घरातील सार्याच गोष्टी जर त्याला अनुकूल असतील, तर मग या वागण्या-जगण्याला धरबंद राहात नाही. उमलत्या फुलाभोवती गुंजारव करणार्या भ्रमरात व त्याच्यात फरक उरत नाही.
या मुलांचे वर्गात जितके लक्ष असते; त्यापेक्षा वर्गाबाहेरच जास्ती असते. कॉलेजचे पहिले वर्ष त्यांच्यासाठी शिकण्यासाठी नसतेच. ते ‘एन्जॉय इअर’ असते. यामुळेच मग वर्गात फारसे बसायचे नाही. बसले, तरी लक्षपूर्वक ऐकायचे नाही. वर्गात बसताना मुली ज्या बाजूला बसलेल्या असतात; त्याच्या नजीकच्या बाकावर बसणे, शिक्षकापेक्षा शेजारच्या मुलीकडेच कधी चोरून, तर कधी थेटपणे पाहणे, तिचे लक्ष आपल्याकडे वेधण्याची धडपड करणे त्या मुलींचा घोळका जिथे जिथे जाईल, त्या त्या ठिकाणी अंतर ठेवून रेंगाळणे, त्या उपाहारगृहात गेल्या तर त्यांच्या शेजारच्या टेबलावर तीन चहा सहा जणांत पिणे, कधी तरी धीटपणे बोलण्याचा प्रयत्न करणे, ती ज्यावेळी, ज्या बसने घरी जाते त्याच बसने आपले घर दुसर्या दिशेला असले, तरी तिच्या सोबतीने जाणे. तिने एखाद्या वेळी मंदस्मित करून बघितले तर सारा दिवस आनंदाने बेहोश होऊन नाचणे, असले उद्योग - असले पराक्रम करणे, यामध्येच त्यांना परमानंद होत असतो. असा आनंद घेण्याच्या वेडाने झपाटलेल्या दोन तरुणांची ही कथा पाहण्यासारखी आहे. या कथेचा शेवटही लक्षात घेण्यासारखा आहे.
सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरातील आणि शेजारी शेजारी राहणार्या दोन कन्या महाविद्यालयात पहिल्यांदाच दाखल झाल्या. मुळातच देखणे रूप त्यातच उन्मादक तारुण्यामुळे सौंदर्याला सुगंध लाभला. गंध आणि रंग यामुळे चिंब झालेली एखादी उमलती कळी जशी नजरेला घायाळ करते आणि जखमही करते, तशी या दोघींची यौवनावस्था. त्यांच्याच वर्गात प्रतिष्ठित आणि सधन कुटुंबातील
दोन तरुण दाखल झाले. दोघांचेही बाप पैशात अडकलेले : आया प्रसाधनात आणि महिला मंडळात अडकलेल्या आणि ही दोन्ही पोरे या मुलींच्या
एकतर्फी प्रेमात अडकलेली. कॉलेजमध्ये टक लावून या दोघीकडे बघायचे. उरलेल्या वेळात दिवसभर मनासमोर उभ्या केलेल्या त्यांच्या चित्रात रमायचे.
या दोघी त्यांना स्नानाच्या पाण्यात दिसायच्या. हातातल्या घासात दिसायच्या. काळजाच्या
घडावरही बसायच्या. अगदीच अनावर झाल्यावर
एकाने बसस्टॉपवर त्या उभ्या असताना म्हटले, ‘आय लव्ह यू. तू मला खूप आवडते. दिवसभर बघत बसावेसे वाटते.’ झाले. ती गर्रकन वळून फूत्कारली, ‘मुर्ख, बेशरम, निर्लज्ज, नालायक कुठला.’ एकाच वेळी त्याला चार पदव्या तर मिळाल्याच; पण तिरस्काराने त्याच्यासमोर ती थुंकली. दुसर्या मजल्यावरच्या गटारीचे घाण पाणी अचानक सार्या अंगावर सांडावे, तशी याची अवस्था झाली. ‘ठीक आहे. बघून घेतो तुझ्याकडे’ असे म्हणून त्यानेही एक शिवी हासडली.
आणि या चकमकीनंतर जीवघेण्या लढाईला सुरुवात झाली. तेव्हापासून तो तिच्यासमोर तिरस्काराने थुंकायचा. सर्वांसमोर अश्लील व घाणेरडी शेरेबाजी करायचा. पदोपदी अपमानास्पद कॉमेंट करायचा. ऐकणारी सारी मित्रमंडळी खो-खो हसायची. त्याला उत्तेजन द्यायची. ती कमालीची व्यथित व्हायची. उद्ध्वस्त व्हायची. हा त्रास वाचावा म्हणून दोन दोन दिवस ती कॉलेजातच जात नसे. ती तिसर्या दिवशी गेली, की पुन्हा हाच त्रास. चिडून ती म्हणाली, ‘खूप ऐकले तुझे. अति झाले हे. मी आता प्राचार्यांकडे जाऊन तुझ्याविषयी तक्रारच करते.’ तो घाबरला नाहीच. उलट उर्मटपणे म्हणाला, ‘खुशाल जा. यामुळे कुणाची बेअब्रू होईल हे तू ठरव. अन् दुसरे असे, की माझे बाबाच या कॉलेजच्या संचालक मंडळात आहेत. त्यांनीच या प्राचार्यांना नेमलेले आहे. ते काय करणार माझे? त्यातूनही काही घडलेच तर वर्गातल्या प्रत्येक फळ्यावर तुझा उद्धार करीन. कॉलेजला जाणार्या सार्या रस्त्यांवर तुझी बदनामीची जाहिरात करीन.’ हे सारे ऐकले आणि ती ढसाढसा रडायलाच लागली. खरेच उद्या याने रस्त्यावर खोटे नाटे लिहिले तर आपणाला तोंड दाखवता येणार नाही. त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी.’ असा विचार तिच्या मनात चमकून गेला.
शेवटी तिला तिच्या काही मैत्रिणींशी धीर दिला. तिनेही घरी आईवडिलांच्या कानावर सारा प्रकार घातला. वडिलांनी त्याच्या वडिलांना भेटून त्याला समज द्यायला लावतो, असे सांगितले. पण, वास मारणार्या मस्तवाल बोकडाप्रमाणे पुन्हा तो घोटाळू लागला. बडबडू लागला. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने त्याला थांबवले आणि सांगितले, ‘आता तुझा हा त्रास थांबला नाही, तर मी पोलिसांना सांगून बंदोबस्त करीन. माझे काकाच येथे फौजदार म्हणून बदलून आलेत. चांगला बदडायला लावीन. चार दिवस बिन भाड्याच्या खोलीत डांबला म्हणजे कळेल तुला.’ हे ऐकताच तो थोडासा वरमला. पण, पुन्हा उसळून म्हणाला, ‘तुरुंगातून सुटल्यावर तुझी वरात काढल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर तुझीही बेअब्रू करून टाकतो.’ आणि तो मित्राबरोबर ताबडतोब निघून गेला.
या दोघी आणि आणखी दोघी अशा चार मैत्रिणींनी शांतपणे विचार केला. काही तरी वेगळा उपाय शोधला पाहिजे असे त्यांना वाटले. बराच वेळ चर्चा केल्यावर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. घरामध्येही कुणाला सांगितले नाही आणि या चौघीजणी एके दिवशी दुपारी सरळ त्याच्या घरी गेल्या. त्याचे आईवडील टी.व्ही.समोर बसले होते. हा बैठकीच्या खोलीत सोफ्यावर पसरला होता. त्या आल्या. त्या सरळ आत घुसल्या. त्याच्या समोरच बसल्या. आणि आक्रमक सुरात म्हणाल्या, ‘तुला पोरींना खूप बघावेसे वाटते ना? तुला खूप आवडतात ना? कॉलेजच्या वेळात तासा-दोन तासांत बघून तुझी शांती होत नाही. तू पोटभर बघावे, मनसोक्त बघावे म्हणून आम्ही दोघीऐवजी चौघीजणी आलो आहोत. अशा नेहमीच्या बघण्याने तुझी शांती होत नसेल, तर आम्ही कपडे उतरून ठेवतो. काय बघायचे- किती बघायचे ते बघ. वाटल्यास तुझ्या आईबापांना बोलव. तुलाही एखादी बहीण असेल. भाची असेल. वहिनी असेलच ना? त्यांच्याकडे कुणी घाणेरड्या नजरेने बघितलेले तुला चालते का? त्यांना घाणेरडे शब्द वापरून लज्जित केलेले आवडते का? त्यांची छेडछाड केलेली चालत असेल तर.. ’ असे म्हणून त्या आपल्या अंगावरचे कपडे काढण्याचे नाटक करीत असताना तो सरळ चौघींपुढे आडवा झाला. नमस्कार करीत म्हणाला, ‘मी चुकलो. मला माफ करा. इथून पुढे तुम्हालाच काय कुठल्याही मुलीकडे बघणार नाही. एका शब्दाने बोलणार नाही.’ प्रत्येकीच्या पायाला स्पर्श करून तो हुंदके देत राहिला.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
नवृत्त प्राचार्य आहेत.)