- सोनाली नवांगुळ१ अपंगांसाठी कागदावर अनेक चांगल्या योजना आहेत, पण बहुसंख्य अपंगांना त्यांच्या उपयोगाची व्हीलचेअर, ट्रायसिकल, व्हाइट केन, फोल्डिंग कमोड, ट्रायपॉड, कॅथेटर्स, डायपर्स.. अशी सगळी साधनं स्वखर्चानंच का विकत घ्यावी लागतात?२ अपंग व्यक्ती जी साधनं स्वत:च्या खर्चानं घेणार आहेत त्यावर त्यांना ५ टक्के का होईना, जीएसटी का भरावा लागावा?३ सरकारी कोट्यातून जी साधनं दिली जातात, त्यांचा दर्जा तर यथातथा असतोच, पण ही साधनंही त्यांना त्यांच्या हयातीत मिळतील याची खात्री का नसावी?४ कृत्रिम साधनांचा पुरवठा पूर्वी शासनाची जबाबदारी मानली जायची. अशी साधनं एक्झेंप्ट कॅटेगरीत गृहीत धरली जायची. जबाबदारी झटकून नवाच भुर्दंड त्यांना बसतोय. याला काय म्हणावं?५ विकलांग व्यक्तींनी आरोग्य विमा काढला तर दावे वाढून कंपनी तोट्यात जाईल या भूमिकेमुळे आरोग्य विम्याचा फायदा विकलांगांना मिळतच नाही.६ वास्तविक अनेक प्रगत देशांमध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून अपंगांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.७ आपल्याकडे कॉर्पोरेट कंपन्यांनी ‘सीएसआर’मधील काही निधी अपंगांसाठी वापरावा, अशी तरतूद आहे. शासनाने याबाबतची जबाबदारी कंपन्यांवर न सोडता त्यांच्या आरोग्य विम्याची सोय करायला हवी.८ अपंगांना युनिक आयडेण्टिटी कार्ड दिल्यावर वेगळा बस पास, रेल्वे प्रवास सवलत अथवा अन्य योजनांसाठी अपंगत्वाचा वेगळा दाखला काढण्याची गरज उरणार नाही असा गाजावाजा झाला, प्रत्यक्षात नोंदणी करणाऱ्यांच्या हातात अजून कार्ड आलेले नाही.९ अनेक देशांमध्ये १०० अपंग व्यक्तींनी अर्ज दिला की त्यांच्यासाठी बसचा नवा मार्ग बनवून दिला जातो. मुळात तिथे बसही विशिष्ट उंचीची व व्हीलचेअर अलगद आत घेता येईल, अशी सोय असते. रेल्वेही तशाच, प्लॅटफॉर्मच्या लेव्हलला. तशा सोयी आपल्याकडे व्हायला हव्यात.१० अतिविकलांग व्यक्ती आपापल्या कृत्रिम साधनांसह खिशाला परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे दिवस प्रत्यक्षात येण्याचं स्वप्न महाराष्ट्रात, देशात कसं साकार करता रेईल? शासनाच्या अपंगविषयक धोरणामध्ये बºयाच गोष्टी नमूद आहेत, पण त्याविषयी बोलायला कोणीच तयार नाही.११ पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तर कधी जगण्याच्या झगड्यात आपण आपल्या कुटुंबाला व देशाला हवे आहोत याचा पुरावा न मिळाल्यामुळे अपंगत्वासह गुणवत्तापूर्ण जगणं लांब राहिलं, साधं जगण्यासाठीही इतकी शक्ती खर्ची पडते की, जगण्याचा आनंद घेण्यासाठी हुरूपच उरत नाही. त्यासाठी खडे सवाल विचारण्याशिवाय पर्याय उरत नाही!(लेखिका साहित्यिक व अनुवादक आहेत.)
sonali.navangul@gmail.com