- लीना पांढरे
एकोणिसशे सत्तर ऐंशीची दोन दशकं म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील मेलडीचा ,स्वर माधुर्याचा अभिजात गीतकार व संगीतकारांचा झगमगता काळ. या काळातील हिंदी सिने संगीतातील रत्नजडित मोहरे मशहूर कवी-गीतकार म्हणून साहिर लुधियानवी ,गुलजार ,जावेद अख्तर ,मजाज, शैलेंद्र यांची रुपेरी पडद्यावरील गीते आणि त्या गीतांना चेहरे देणारे नायक-नायिका सिनेरसिकांना सहज स्मरतात.पण त्याचं काळात लिहिल्या गेलेल्या ज्या गीतांवर अनेक पिढ्या फुलल्या उमलल्या.. त्यांच्या भावजीवनात ती गीतं जगल्या अशा ऑल टाइम फेवरेट गीतांचा कवी गीतकार योगेश याचं नावही बऱ्याचजणांना अपरिचित आहे ."दुर कही जब दिन ढल जाये" "रजनीगंधा फुल तुम्हारे, महके युही जीवन मे" " ,मैने कहा फुलों से ", "जिंदगी कैसी है पहेली", "रिमझिम गिरे सावन" ", युही देखा है ", "ना बोले तुम ना मैंने कुछ कहा , मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने, जानेमन जानेमन तेरे दो नयन'अशा भावमधुर गीतांची रेशमी पीसं आपल्या रखरखीत जीवनात टाकून जाणाऱ्या शायर योगेशजीच्या गीतांमध्ये शहद की मिठास और दिल का दर्द घुलमिलसा गया है .जसे अनेक वेडेपीर स्ट्रगल करण्यासाठी या मायावी मुंबईत येतात , तसाच अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर रोजीरोटीखातर लखनौहुन योगेश कौर थेट मुंबईला दाखल झाला. त्याचे चुलते व्रजेन्द्र कौर हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय पटकथालेखक होते पण त्यांनी योगेश ला काहीही मदत केली नाही .योगेशचा मित्र सत्यप्रकाशने योगेशला मदतीचा हात दिला .एका चाळीत राहून आयुष्यात प्रथमच स्वतः अन्न रांधून योगेश खात होता आणि रोजीरोटीसाठी दारोदार ठोकरा खात फिरत होता.चित्रपट क्षेत्राशी निगडित पटकथा लेखन ,संवाद लेखन तसेच गीतं लिहिण्याचं काम करायचं त्याने ठरवलं .शालेय वयापासून योगेशच्या कविता सहज तोंडपाठ व्हायच्या.त्याच्या आईलाही कवितेची खूप आवड होती आणि लखनऊच्या माहोलमध्ये मुशायरा, गझल ,नज्म अत्तराप्रमाणे महकत होते.१९६३ मध्ये संगीतकार रॉबिन बॅनर्जीने पहिल्यांदा योगेशला आपल्या चित्रपटातून ब्रेक दिला. रॉबिन बॅनर्जी योगेशला आपल्या म्युझिक रूम मध्ये बोलावून रोज वेगवेगळ्या धून वाजवून दाखवत होता. महिनाभर या धून ऐकल्यानंतर योगेश ने प्रश्न केला की "तुम्ही मला कधी काम देणार आहात?" त्यावर रॉबिन उत्तरला "गेला महिनाभर मी तुला वेगवेगळ्या धुन छेडून दाखवतो आहे .तू त्यावर गीत का लिहीत नाहीस?" तेव्हा योगेशच्या डोक्यात पहिल्यांदा लख्ख प्रकाश पडला की संगीतकाराने दिलेल्या धूनींवर गीतं रचायची आहेत. योगेशला हे सर्व सोपे वाटले .मग त्या क्षणानंतर योगेशने कधी मागे वळून पाहिलंच नाही . मजरूम सुलतानपुरी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी सुद्धा त्याने गीतं लीहिलेली आहेत. योगेशकडे त्या काळामध्ये पैसे नव्हते त्यामुळे तो स्वतःची गाणी ग्रामोफोनवर ऐकायला सलिल चौधरींची पत्नी सबिताकडे जायचा आणि स्वतःच्या रेकॉर्ड ऐकायचा. त्याच काळात सबिताने योगेशची सलिलदांकडे शिफारस केली. तेव्हा शैलेंद्रने नुकताच या दुनियेला अलविदा केलेला होता. सलिल चौधरींनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटासाठी योगेशला साइन केलं. तो क्षण योगेशच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला . ऋषिकेश मुखर्जीबरोबर योगेशने आनंद ,मिली ,रंगबिरंगी असे अनेक हिट झालेले चित्रपट केले .ती गीते आवडल्याने बासू चटर्जी यांनी योगेशला रजनीगंधासाठी गीते लिहायला सांगितले .त्यानंतर बासु चॅटर्जींच्याबरोबर छोटीसी बात ,दिल्लगी ,मंजिल ,बातो बातो में अशा चित्रपटांसाठी योगेश यांनी गाणी लिहिली. महेश भट्ट च्या" मंजिले और भी है 'मध्ये त्याने गीते लिहिली एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांच्यासाठी यांनी गीते लिहिली आर डी बर्मन साठी त्यांनी लिहिलेलं " मैने कहा फुलों से, हसो तो वो खिल खिलाकर हस दिये " हे मिली मधील गीत खुप लोकप्रिय झालं.फिल्म इंडस्ट्रीचा अत्यंत थंड आणि भावनाहीन व्यवहार सरळ मार्गी योगेशला जमणारा नव्हता त्यामुळे स्वतःलाप्रकाशझोतात कसे ठेवायचे आणि स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे हे त्याला कधी जमलंच नाही पण तरीही योगेश मध्ये कधीही कडवटपणा आला नाही .फिल्मसृष्टीबद्दल त्यांना अत्यंत कृतज्ञता होती .त्यांचं म्हणणं होतं की फिल्म इंडस्ट्रीने त्यांना आर्थिक सुरक्षितता दिली . त्यांच्या तिन्ही मुलांना फिल्म इंडस्ट्रीतून मिळालेल्या पैशामुळे ते अत्यंत उत्तम पद्धतीने सेटल करू शकले आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकल्या .या चित्रपटगीतांबरोबरच २०० टीव्ही मालिकांची शीर्षकगीतं योगेश यांनी लिहिलेली आहेत .मन्ना डे आणि किशोर दा यांच्यासाठी सुद्धा योगेशने गीते लिहिलेली आहेत.२०१८ मध्ये पण योगेशजीने चित्रपटासाठी गीत लिहिलेली आहेत."बातो बातो मे "या चित्रपटात "ना बोले तुम ना मैंने कुछ कहा "हे गीत म्हणत बाॅल डान्सवर थिरकणारी अमोल पालेकर आणि टीना मुनिमची जोडी आठवून पहा. त्याच चित्रपटात मुंबईतील गर्दीने गच्च भरलेल्या लोकलमध्ये "सूनिये कहिये कहिये ना ..कहते सुनते बातो बातो मे प्यार हो जायेगा' अशी रंगत गेलेली धमाल खट्टी-मिठी प्रेम कहाणी. साधे सोपे शब्द आणि साध्या सामान्य माणसाचं जगणं मांडणारी योगेशजींची गाणी होती.बासुदांच्या रजनीगंधासाठी त्यांनी लिहिलेलं प्रसिद्ध गीत"रजनीगंधा फुल तुम्हारे महके युही जीवन मेयुही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन मे"आपल्या पलीकडच्या घरात राहणारी साधीसरळ मुलगी वाटावी अशी विद्या सिन्हा आणि टिपिकल मध्यमवर्गीय वाटणारा अमोल पालेकर ,रोज तिच्यासाठी निशिगंधाचे छडे घेऊन येणारा.. या निशिगंधाच्या गंधातून उमटत जाणारा अत्यंत सल्लज आणि शालिन शृंगार.१९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मंजिल मधील योगेशजींची गाणी... कलेजातुंनअल्लाद फिरून जाणारी मिठी छुरीच.मुंबईतला झिम्माड पाऊस. बेस्ट बसेस, टॅक्सी ,चौपाटीचे समुद्रकिनारे ,उंच उंच गगनचुंबी इमारती आणि माडांच्या झाडांवरून, काळ्याभोर छत्र्यांच्या गर्दीतून बेशुमार कोसळणाऱ्या बरसातीत हातात हात गुंफून गुणगुणत जाणारी अमिताभ आणि मौसमी चटर्जीची लाघवी जोडी."रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मनभीगे आज इस मौसम मे लगी कैसी ये अगन."योगेशजी गमतीने म्हणायचे की" माझ्या रक्तामध्ये खरं म्हणजे मी लखनऊहून आल्यामुळे उर्दू गझल होती पण मला झाडून सगळे दिग्दर्शक भेटले ते बंगाली बाबूमोशाय .त्यामुळे मी गझलकार होण्याच्या ऐवजी गीतकार झालो." पण जे गझलच्या संदर्भात तेच गीतांच्याही बाबतीत खरं आहे की गीत या गझल के लिये सिर्फ बंदीशे अल्फाज ही नहीं काफी .जिगर का खून चाहिये कुछ असर के लिये.ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटातील राजेश खन्ना वर चित्रीत झालेलं अजरामर गीत आठवत आहे का? त्याला कॅन्सर झालेला आहे आणि तो अखेरचे काही दिवस या दुनियेत आहे . दूर समुद्राच्या लाटांमध्ये सूर्य मावळतो आहे. माडांच्या झावळ्यातून दाटून येणारी संध्याकाळ एखाद्या लाजऱ्या दुल्हनप्रमाणे आणि अशावेळी कवितेच्या पुस्तकाची पान अल्लाद उलटत असताना सुकलेले एक फूल सापडते आणि हृदयाच्या सात कप्प्याआड कोणीतरी स्वप्नांचे दीप तेवत ठेवून जाते."कही दूर जब दिन ढल जाएसांज की दुल्हन बदन चुराएचुपके से आएमेरे खयालों के आंगन मेकोई सपनो के दीप जलाए"दीर्घकाळापासून हा ७७ वर्षाचा शायर आजारी होता .आपल्या एका शिष्यासह मुंबईत नालासोपारा येथे तो अखेरचे दिवस कंठत होता. खेदानं नोंदवायच ते इतकचं की आपल्या तीन मुलांवर सारी जिंदगी साया धरणार्या योगेशजीने अखेरचा श्वास घेतला तो एका शिष्याच्या समवेत .त्यांच्याच शब्दात"जिंदगी कैसी है पहेली हायेकभी तो रुलाये कभी तो हसाये"pandhareleena@gmail.com