- सचिन लुंगसे
डॉ. विद्या अत्रेय या वन्यजीव अभ्यासिकेने अहमदनगर येथे बिबट्याच्या अंगावर एक चीप बसवून जीपीएसच्या साहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव दिले आजोबा. माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आले आणि सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा मुंबईच्या दिशेने निघाला. माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे अंतर आजोबाने जवळपास साडेतीन आठवड्यात 120 किलोमीटर चालत पार केले. बिबट्या कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसवलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत गेले. नेमके आता हेच मुंबईतल्या बिबट्यांबाबत टिपले जाणार आहे. मुंबईसारख्या महानगरातल्या म्हणजेच शहरी भागाच्या आसपास अथवा मनुष्य वस्तीने आक्रमण केलेल्या जंगलात बिबटे राहतात तरी कसे? अशा अनेक प्रश्नांची उकल आता लवकरच होणार आहे. निमित्त आहे ते मुंबईतल्या तीन मादी आणि दोन नर बिबट्यांना लावण्यात येणार्या जीपीएस कॉलरचे.अमेरिका, युरोप, आफ्रिका, भारत, फिनलँड अशा अनेक देशात जीपीएस कॉलरचे प्रयोग करण्यात येत आहेत. भारतातदेखील हे प्रयोग राज्यभर केले जात असतानाच आता शहरी भागात वास्तव्य असलेल्या वन्यप्राण्यांना जीपीएस कॉलर बसविण्याचा पहिलाच प्रयोग भारतात मुंबईत केला जात आहे. र्जमनी, फ्रान्स, इंग्लंडमध्ये वन्यप्राणी कमी आहेत. युरोपमध्ये शंभर वर्षांपूर्वी मांसाहारी जनावरांना मारून टाकण्यात आले होते. आता फिनलँड आणि पूर्व युरोपात वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूआहेत. नॉर्वे आणि स्वीडनमध्ये लांडगा व अस्वलांवर जीपीएस कॉलरचा प्रामुख्याने प्रयोग केला जात आहे. अमेरिकेत लांडगा, पर्वतीय सिंह, अस्वल या प्राण्यांना जीपीएस कॉलर लावून अभ्यास केला जातो. आफ्रिकेतदेखील असे प्रयोग केले जातात. भारतात हत्तींवर फार मोठय़ा प्रमाणावर प्रयोग झाले आहेत. हत्तींवर प्रयोग करणे सोपे आहे. कारण हत्ती लगेच दिसतो. त्याला पकडता येते. त्याला कॉलर लावता येते. मात्र बिबट्या लवकर नजरेस येत नाही. त्याला पकडणे कठीण असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, पर्वतीय सिंह, बर्फाळ प्रदेशातील बिबट्या अशा अनेक प्राण्यांना कॉलर लावली जाते. किरगिझस्तानमध्ये 20 ते 30 बिबट्यांना कॉलर लावण्यात आली आहे. येथे बिबट्याचा वावर एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात असल्याचे निदर्शनास आले होते. कर्नाटक, उत्तर भारत, उत्तर पूर्व भारतात हत्तींवर मोठय़ा प्रमाणावर कॉलर बसविण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील एका हत्तीला कॉलर करण्यात आले होते, तेव्हा तो हत्ती नेपाळ सीमेवर जाऊन परत आल्याचे निदर्शनास आले होते. र्शीलंकेत 20 हत्तींवर जीपीएस कॉलर बसविण्यात आल्या होत्या. हे हत्ती ज्या प्रदेशात वास्तव्य करत होते; तो भाग ते कसा वापरतात, याचा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेत पर्वतीय सिंह असून, ते लॉस एंजिलिसमध्ये एक महामार्ग ओलांडतात. या सिंहांना कॉलर लावल्यानंतर ते महामार्ग कसा ओलांडतात याची माहिती मिळाली. यावर मग महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी कुठे पूल बांधता येईल, याचा विचार सुरूझाला.आशियाई सिंहावर कॉलर बसविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात वाघांवर कॉलर मोठय़ा प्रमाणात बसविण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशात वाघांवर असे प्रयोग झाले आहेत. पन्नामध्ये नव्याने आढळलेल्या वाघांवर कॉलर लावण्यात आल्या. बिबट्या, लांडगे या प्राण्यांवर कॉलरचे प्रयोग करण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये माळढोकवरही कॉलरचा प्रयोग करण्यात आला. यावेळी माळढोक तीन राज्यात फिरत असल्याचे निदर्शनास आले. पट्टेरी वाघांवरही असे प्रयोग मोठय़ा प्रमाणावर होत आहेत.जंगलात वास्तव्य असणार्या प्राण्यांवर असे प्रयोग झाले असले तरी शहरालगत वास्तव्य असणार्या वन्यप्राण्यांना कॉलर लावण्याचे प्रयोग फारच कमी झाले आहेत. नैरोबीमध्ये हा प्रयोग झाला आहे. तेथे सिंहासह बिबट्याला कॉलर करण्यात आले होते. अशा प्रयोगांसाठी, अभ्यासासाठी, विश्लेषणासाठी निधी मोठय़ा प्रमाणावर लागतो. ज्या प्रमाणे वाघाला वागणूक मिळते त्या प्रमाणे बिबट्याला मिळत नाही. वाघांचा अभ्यास करायचा म्हटले की, सूत्र वेगाने हलतात. मात्र बिबट्याचा अभ्यास करायचा म्हटले की वेळ लागतो. तीनवर्षांपूर्वी कॉलरची किंमत साडेतीन लाख होती, ती आता पाच लाखांच्या आसपास पोहोचली आहे. अशावेळी निधी कमी पडतो.वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी केंद्र आणि राज्याने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याचा फायदा मनुष्यासह वन्यप्राण्यांनादेखील होईल. केवळ राजकीय निर्णय नकोत. राजकारण्यांनीदेखील या विषयात लक्ष घातले पाहिजे. जंगलांसह वन्यप्राण्यांचे संवर्धन झाले तरच निसर्ग टिकून राहील.
कशी असते कॉलर?कॉलरमध्ये एक जीपीएस चीप असते. एक सिमकार्ड असते. याचा वापर संवादासाठी होतो. जीपीएसद्वारे कॉलरचे लोकेशन ट्रेस होते. थोडक्यात हे आपल्या फोनसारखे काम करते. मोबाइल टॉवरला लोकेशन एसएमएस केले जाते. मोबाइल टॉवरसोबत संगणक संवाद साधत असतो. या माध्यमातून नोंदी मिळतात. सॅटेलाइट कॉलरचा वापर करून हे लाइव्हही करता येते. सॅटेलाइट कम्युनिकेशन टाइमची मदत घ्यावी लागते. मात्र हे फार खर्चिक असते. त्यामुळे सिमकार्ड कॉलर वापरले जाते. तीन अथवा पाच तासांनी प्राणी कोणत्या वेळी कुठे होता याची नोंद होते.
असा होणार अभ्यास..ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या पलीकडे बिबट्या आढळला होता. माणसांची इतकी गर्दी असलेल्या क्षेत्रात बिबट्या कसा वावरू शकतो? याबाबत वनविभाग आणि संशोधकांनाही आश्चर्य वाटले. आरेतील कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसलेला बिबट्याच उद्यानाच्या विरुद्ध टोकाला असलेल्या काश्मिरातील कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसतो, तेव्हाही आश्चर्य व्यक्त केले जाते. मुंबईतील बिबटे उत्तरेकडील मोठा रस्ता ओलांडून तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात कसे जातात, बोरीवल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबटे तेथील जागा आणि वेळेचा वापर कशा प्रकारे करतात, याचा अभ्यास करतानाच आता मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात दाट वस्त्यांतील बिबट्यांचा वावर आणि संघर्ष निवारणासंबंधी व्यवस्थापकीय शिफारशी सुचविल्या जाणार आहेत. मानव व बिबट्या सहसंबंध समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्री अभ्यासाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे. राज्याचा वनविभाग व वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी-इंडिया त्यानुसार आता संयुक्तपणे अभ्यास करणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणार्या अभ्यास प्रकल्पावर वनविभागामार्फत अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये व वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी-इंडियामार्फत डॉ. विद्या अत्रेय मार्गदर्शनासह कामकाज पाहणार आहेत.
दोन वर्षात निष्कर्ष हातीपुढील दोन वर्षात अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील. कॉलर खरेदीसाठी शासन मान्यतेने निधी प्राप्त करून घेऊन हा प्रकल्प जानेवारी 2021 पर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूझाले आहेत. कॉलर लावण्यात येणार्या बिबट्यांचे वय, लिंग हे त्यासाठी पकडलेल्या बिबट्यांच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असेल. हत्तींची कॉलर बिबट्याला बसविता येत नाही. वन्यप्राण्यांच्या वजनावर कोणती कॉलर बसवायची याचा निर्णय घेतला जातो.
(पूरक माहिती - डॉ. विद्या अत्रेय, वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटी-इंडिया)
sachin.lungse@gmail.com(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ वार्ताहर आहेत.)