- राजेंद्र शेंडे
* अँमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीनंतर ‘विकास कि पर्यावरण हा मुद्दा पुन्हा ज्वलंत होऊन आपल्यासमोर आला आहे.- ‘विकास कि पर्यावरण’ हा मुद्दा 1972ला पहिल्यांदा जागतिक पटलावर आला. स्टॉकहोम कॉन्फरन्सच्या निमित्ताने. 1992च्या दरम्यान ब्राझीलमधल्या ‘अर्थ समिट’नंतर एक संघर्षच सुरू झाला. ‘इकॉलॉजी कि इकॉनॉमी’ असंही जागतिक परिभाषेत या संघर्षाला म्हटलं जाऊ लागलं. अँमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीनंतर हा मुद्दा पुन्हा ठळकपणे पुढे आला आहे.सत्तेचाळीस वर्षांनंतरही या प्रo्नाचं उत्तर जगाला शोधता आलेलं नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि आपल्या सर्वांना चढलेली विकासाची नशा हे त्याचं मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रसंघात पर्यावरणविषयक उपक्रमांच्या संचालकपदाची जबाबदारी माझ्याकडे असताना आम्ही नेहमी सांगत असू, विकास आणि पर्यावरण म्हणजे फुटबॉलच्या मैदानात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले दोन प्रतिस्पर्धी नाहीत. दोन्हीही मैदानाच्या एकाच बाजूला उभे आहेत. त्यांची भूमिका एकमेकांना हरवण्याची किंवा पराभूत करण्याची नाही. हा प्रo्न सोडवण्यासाठी विचारांची दिशा बदलणं हाच आपला एकमेव गोल असला पाहिजे. या दोन्ही घटकांनी एकाचवेळी हातात हात घालून चाललं पाहिजे, हेच त्याचं उत्तर आहे.* अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग ‘ब्राझील पुरस्कृत’ आहे असं म्हटलं जातंय.- जंगलात लागलेल्या आगी नैसर्गिक नसतात, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. झाडं एकमेकांवर घासून किंवा वीज पडून आगी लागतात हे खरं, पण अशी किती झाडं एकमेकांवर घासून किंवा वीज पडून आगी लागतात?. हा आपला गैरसमज आहे की, जंगलातल्या आगी नैसर्गिक असतात. वैदिक इतिहास सांगतो, की विजेमुळे अग्नी पृथ्वीवर आला आणि घरांवर, झाडांवर वीज पडून आग लागू लागली. ‘मॉडर्न हिस्ट्री’ सांगते, आगीचा शोध मानवाने लावला, तो मानवी कृतीतून. दगडाला दगड घासून त्यानं आग निर्माण केली. निसर्गात काही आपोआप दगडाला दगड घासला जात नाही. आग लावण्याची कृती माणूसच करतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातही स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, की जंगलात लागलेल्या बहुसंख्य आगी ‘मानवनिर्मित’च असतात. कॅलिफोर्निया असो, सैबेरिया असो किंवा ब्राझील.. जंगलात लागलेल्या आगी मुख्यत: मानवनिर्मितच आहेत. अँमेझॉनच्या जंगलात ब्राझीलच्या हद्दीत लागलेल्या बहुसंख्य आगीही मानवनिर्मितच आहेत. यापूर्वी र्जमनी, फ्रान्स किंवा इतर ठिकाणी जंगलात लागलेल्या आगी मुख्यत: मानवनिर्मितच होत्या. मानवाकडून चुकून लागलेल्या किंवा मुद्दाम लावलेल्या! * जंगलांना आगी लावण्याचं हे लोण जगभरात का पसरलंय?.- माणसं जंगलांना आगी का लावत असतील, त्याची अनेक कारणं आहेत. एक - अपवाद सोडले तर माणसं झाडांवर राहू शकत नाहीत. राहायला जागा निर्माण करायची तर झाडं कापावी, तोडावी लागतात. आज जिथे शहरं आहेत, त्या सार्याच ठिकाणी पूर्वी जंगल होतं. वस्ती उभारण्यासाठी झाडं तोडायचा, नष्ट करायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना आग लावायची. जगात सगळीकडे तेच होतंय.दोन - जगभरात सगळीकडेच लोकसंख्या वेगानं वाढतेय. त्यांच्यासाठी अन्नधान्य पाहिजे. म्हणजे शेती आलीच. शेती करायची तर जंगलांवर गंडांतर आलं.तीन - माणसाला ‘लागणार्या’ अनेक गोष्टी झाडापासून, लाकडांपासून तयार होतात. त्यामुळे अख्ख्या जगभरच त्याचा ‘व्यवसाय’ सुरू झाला. इंडोनेशिया, म्यानमार, ब्राझील. इत्यादि ठिकाणचा हा व्यवसाय अक्षरश: जगभर पसरलेला आहे. त्यासाठी सागवान, रोझ वूड, बर्मा टिक. या झाडांचा आणि त्या जंगलांचा बळी दिला जातो.चार - गेल्या काही काळात खाणं ही ‘फॅशन’ झाली. माणसं बेसुमार खाऊ लागली. त्यामुळे मॅकडोनल्ड्ससारखी आऊटलेट्स उभी राहिली. पॉपर्कार्न, कॉर्नफ्लेक्स, बर्गर. जगभर विकलं जाऊ लागलं. खाण्याची उत्पादनं बदलली. शेंगदाण्यापेक्षा लोकांना सोयाबिन जास्त पसंतीस पडू लागलं. ब्राझीलचंच उदाहरण घेतलं तर जंगलं, झाडं तोडून ब्राझीलनं ‘निर्यातक्षम उत्पादनं’ तयार करायला सुरुवात केली. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत ब्राझील हा सोयाबिनची निर्यात करणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. शेतकर्याला फायदा झाला, पण जंगलांचा नाश झाला. ऊस, कॉफीची लागवड यामुळेही अँमेझॉनचं जंगल छोटं होऊ लागलंय.* नुकत्याच झालेल्या ‘जी-7’ परिषदेत अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग थांबवण्यासाठी वीस दशलक्ष डॉलर्सची देऊ केलेली मदत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी नाकारली, याचं कारण काय?.- ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी बोल्सोनारो मिलिटरी ऑफिसर होते. ‘अँमेझॉन जंगलाची आग हा ब्राझीलचा अंतर्गत मामला आहे’ आणि अँमेझॉन जंगलाला वाचवण्यासाठी अशी परकीय मदत घेणं त्यांना कमीपणाचं वाटलं असावं..आणि अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे अशा प्रकारे मदत देऊ करून विकसित देश करत असलेली नौटंकी. मुळात पर्यावरणासंदर्भातल्या पॅरिस करारानुसार विकसित देशांनी 2009 पासून विकसनशील देशांना दरवर्षी ठराविक मदत द्यावयाची होती. 10 अब्ज डॉलर्सपासून सुरुवात करून 2020पर्यंत ती शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत न्यावयाचं विकसित देशांनी कबूल केलं होतं. मात्र विकसित देशांनी विकसनशील देशांना आजवर एकूण केवळ दहा अब्ज डॉलर्सची मदत केली आहे! ब्राझीलला मदतीचं गाजर दाखवून आपला खोटेपणा ते लपवू पाहताहेत! बोल्सोनारोही त्यांचं वेगळं राजकीय नाटक करीत आहेत. वसाहती स्थापन करून ज्यांनी इतर देशांचं शोषण केलं त्या राष्ट्रांना आणि आग लावून वसाहत करणार्या देशांना आता मदत करायची हुक्की येते हा शुद्ध ढोंगीपणा आहे, असं बोल्सोनारो म्हणतात.* ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो म्हणतात, आमच्या जंगलांबद्दल बोलण्याआधी तुम्ही तुमची जंगलं टिकवा.- मी बोल्सोनारो यांचा सर्मथक नाही, पण यासंदर्भात त्यांच्या बोलण्यात काही अंशी तथ्य आहे. जगभरातच जंगलं कमी होताहेत. र्जमनीत जंगलांचं प्रमाण सध्या 34 टक्के आहे. त्याआधी ते बर्यापैकी जास्त होतं. भारतातलं जंगलांचं प्रमाण 24 ते 26 टक्क्यांपर्यंत आलं आहे. इंग्लंडमधलं जंगलांचं प्रमाण तर पार दहा टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. फ्रान्समध्ये हे प्रमाण 33 टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र आपलं जंगल वाचवण्यासाठी विकसित देशांनी एक वेगळीच ‘क्लृप्ती’ शोधली आहे. त्यांनी लाकडाची प्रचंड आयात करायला सुरुवात केली आहे. म्हणजे आपलं जंगल वाचवण्यासाठी एका अर्थानं त्यांनी दुसर्या देशांत जंगलतोडीला सुरुवात केली आहे! त्यामुळे विकसनशील देशांचं ग्रीन कव्हर कमी झालं आणि विकसित देशांची जंगलं सुरक्षित राहिली.बोल्सोनारो 1 जानेवारी 2019ला सत्तेत आले, त्याला आता फक्त आठ महिने झाले आहेत, पण त्यांच्या राजकारणाचा ‘इतिहास’ तपासता येऊ शकतो. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी ऐतिहासिक सत्य आहेत.अँमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीनंतर ते म्हणताहेत, यासंदर्भात जे लोक आम्हाला पैसा देऊ करतात, त्यांनी आधी आपलं जंगल आणि आपली इको सिस्टीम सांभाळावी. त्यांचं हे विधान सरसहा मान्य करता येणारं नसलं तरी त्यात तथ्य आहे. जंगलांना नैसर्गिक सीमारेषा असली तरी, आकाश किंवा हवेला सीमारेषा नाही, त्याचप्रमाणे जंगलांपासून होणार्या फायद्यालाही कुठली सीमारेषा असू शकत नाही. ब्राझीलचं जंगल वाचवून विकसित देशांनाही फायदा मिळणार आहे. झाडं कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ग्लोबल वॉर्मिंग कमी होतं. त्यामुळे विकसित देशांनी मदतीचा हात पुढे केला तर त्यात नवल नाही! ही वस्तुस्थिती आधी सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. * स्वयंसेवी संस्थांना दिल्या जाणार्या देणग्या बंद केल्यामुळे त्यांनीच अँमेझॉनच्या जंगलात आगी लावल्या असं बोल्सोनारो म्हणतात, त्यात कितपत तथ्य आहे?.- पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे सर्वाधिक ‘अँक्टिव्हिस्ट’ ब्राझीलमध्ये आहेत असं म्हटलं जातं. मग ते मानवी अधिकारांच्या संदर्भात असू देत, जंगलांच्या अधिकारांच्या बाबतीत असू देत किंवा प्रदुषणाच्या संदर्भात. ब्राझीलमध्ये जसा अँमेझॉनच्या जंगलाचा सर्वाधिक भाग आहे, तसंच सर्व प्रकारचे अँक्टिव्हिस्टही तिथे सर्वाधिक आहेत. त्यातल्या काहींचा हेतु खरंच चांगला आहे, पण अनेक संस्था स्वत:चे खिसे भरण्याला सोकावलेल्या आहेत, हेही वास्तव नाकारता येणार नाही.निवडणूक प्रचाराच्या काळात बोल्सोनारो यांनी शेतकर्यांच्या हिताची काळजी घेण्याचं, त्यांना अधिक जमीन उपलब्ध करून देण्याचं, आदिवासींच्या जंगलाधिकाराचा कायदा काढून टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांची सर्वाधिक भिस्त होती ती शेतकरी, लॉगर्स (लाकडासाठी झाडं तोडणारे लोक) आणि खाणकाम करणारे यांच्यावर. बोल्सोनारो यांची ही भूमिका खरं तर जंगलविरोधी होती. ‘जंगल जाळा’ असं त्यांनी स्पष्टपणे कधीच म्हटलं नाही, त्यासंदर्भाचे कायदेही ब्राझीलमध्ये आहेत, पण शेतकरी, लॉगर्स आणि खाणकाम करणार्या या ‘त्रिकुटा’च्या लक्षात आलं, आपण काहीही केलं तरी आपलं ‘संरक्षण’ करणारा मसिहा आपल्या बाजूनं आहे. त्यामुळे त्यांच्या हाती जणू आयतं कोलीतच मिळालं आणि त्यांनी जंगलं जाळायला सुरुवात केली. यंदा 10 ऑगस्टला ब्राझीलमध्ये ‘फायर डे’ साजरा करण्यात आला! बोल्सोनारो यांनी निवडणुकीत जो विजय मिळवला, त्या विजयाचं ‘प्रतीक’ म्हणजे हा दिवस होता! तो आनंद साजरा करण्यासाठी या ‘त्रिकुटा’नं आपापल्या शेतात अन्नधान्याच्या उरलेल्या ‘कचर्या’ला आग लावून आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. तीच आग जंगलांपर्यंत पोहोचली आणि अँमेझॉनच्या जंगलातली आग भडकली असंही म्हटलं जातं.10 ऑगस्टला ब्राझीलमध्ये ‘फायर डे’ साजरा झाला आणि 19 ऑगस्टपासून अँमेझॉनच्या जंगलात आग भडकली; जी अजूनही सुरू आहे. आज तब्बल 75 हजार ठिकाणी आग सुरू आहे, ज्यातील बर्याच ठिकाणी आधी आग लागलेली नव्हती. * अँमेझॉनचं जंगल सदाहरित जंगल आहे. अशा परिसरात आग लागली तरी फारसा धोका नसतो. कोरड्या जंगलांना मात्र पटकन आग लागते. मग ही आग नैसर्गिकपणे अजून का विझत नाही?.- सदाहरित जंगलांमध्येही ¬तू असतात. ब्राझीलमध्ये जून ते ऑक्टोबरपर्यंत साधारणपणे उन्हाळ्याचे दिवस असतात. पावसाळ्यात लागलेल्या आगींना विझवायची फारशी गरज पडत नाही. हेलिकॉप्टरमधून आग विझवण्यासाठी फवारणी करावी लागत नाही. कारण पावसामुळे आपसूकच या आगी विझतात. कॅलिफोर्निया, कॅनडा, फ्रान्स. इत्यादि ठिकाणीही पावसाळ्याच्या काळात लागलेल्या आगी बर्याचदा नैसर्गिकपणे विझतात. या सर्व देशांमध्ये उन्हाळ्यात लागलेल्या आगी मात्र लवकर विझत नाहीत. ब्राझीलमध्ये शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी हजारो ठिकाणी लावलेली आग शुष्क जंगलांपर्यंंत पोहोचली आणि भडकली. * यासंदर्भात जग काय करू शकेल? जगाची भूमिका काय असली पाहिजे?- अँमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवणं ही ब्राझीलची आणि सर्वांचीच प्राथमिक जबाबदारी आहे. अँमेझॉनचं जंगल हे जगाचं फुफ्फुस आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. ग्लोबल वॉर्मिंंग कमी होतं. हवा शुद्ध राहाते. जमिनीचा र्हास थांबतो. पाण्याचं शुद्धिकरण होतं. यापुढे जगातल्या प्रत्येक देशाला आणि नागरिकांना आपापल्या देशातलं, भागातलं जंगल काहीही करून टिकवावंच लागेल.त्या त्या भागातल्या कृषि क्षेत्राला कुठलाही धक्का न पोहोचवता ही जंगलं आपल्याला वाचवावी लागतील. अन्नासाठी जंगलं कापण्याची गरज नाही. शेतकर्यांनी पिकवलेल्या तब्बल तीस टक्के अन्नाची नासाडी होते हे आजचं धक्कादायक वास्तव आहे. अन्नाची नासाडी पूर्णपणे थांबवावी लागेल.थोडा, पण सकस आहार घेण्याचं तंत्र आचरणात आणावं लागेल. बहुतांश आगी मानवामुळे किंवा मानवी चुकांमुळे लागतात. शेतातील पालापाचोळ्याला आग लावण्याची प्रथा जगभर आहे. हीच आग पसरून नंतर जंगलाच्या विनाशाला कारणीभूत ठरते. हा प्रकार बंद करण्याबाबत शेतकर्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. शेतातील पालापाचोळ्यापासून खत बनविल्यास रासायनिक खतांचे कारखाने उभे करण्याची गरज राहणार नाही.
(राजेंद्र शेंडे पुणेस्थित तेर पॉलिसी सेंटरचे चेअरमन असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक उपक्रमांचे निवृत्त संचालक आहेत.)
shende.rajendra@gmail.com
मुलाखत : समीर मराठे