सुधारक ओलवे
सिनेमा. जगाच्या या टोकापासून त्या टोकार्पयतच्या माणसांना सिनेमाची भाषा कळते. सिनेमानं आजवर किती मनांना स्पर्श केला, किती जणांना हादरवलं, हलवून सोडलं. कुणाकुणाला प्रेरणा दिली, उभारी दिली, कधी विचारांचे निखारे चेतवले, तर कधी मनात स्वप्नं पेरली, ती फुलवली. म्हणून तर जगभर सिनेउद्योगाला ‘ड्रीम्स फॅक्टरी’ अर्थात ‘स्वपAांचा कारखाना’ असं म्हटलं जातं. आणि जसं प्रत्येक कारखान्याला एक शोरूम लागते तशी सिनेमाच्या फॅक्टरीची शोरूम्स असतात थिएटर्स!
मला सिनेमा पाहण्याचं वेड अगदी कॉलेजच्या काळापासून. मी सतत सिनेमे पाहायला थिएटरमध्ये जायचो. त्यातलंच नेहमीचं म्हणजे ‘लिबर्टी सिनेमा!’ लिबर्टीत सिनेमा पाहायला जायचं म्हणजे त्याकाळी मोठा तामझाम. मउशार लाल गालिचे, पितळी वस्तूंचं सोनसळी डेकोरेशन, टंगस्टन लाइटच्या पिवळसर प्रकाशात उजळलेल्या भिंती आणि चकचकणारा माहौल. लिबर्टी सिनेमाचं बांधकाम 1947 मध्ये पूर्ण झालं. हबीब हुसेन यांनी ते बांधलं आणि देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची एक खूण म्हणून त्यांनी त्या थिएटरलाच ‘लिबर्टी’ असं नाव दिलं. स्वातंत्र्यापूर्वी दक्षिण मुंबईत हिंदी सिनेमे फार कमी प्रदर्शित व्हायचे. इथला सारा माहौल इंग्रजी सिनेमांचा. हुसेन यांना ही संधी दिसली आणि त्यांनी थिएटरचं बांधकामच सुरू केलं. त्या काळी युरोपात लोकप्रिय असलेल्या ‘आर्ट डेको’ शैलीत दोन हजार प्रेक्षक क्षमता असलेलं एक सिनेमागृह आकार घेऊ लागलं. लिबर्टीचे आर्किटेक्टही एक इंग्रज बाबू होते, मिस्टर अबॉट. मात्र आपल्या कल्पनेतून साकारलेलं हे भव्य लिबर्टी पूर्णत्वास गेलेलं ते पाहू शकले नाहीत. एका विमान अपघातात त्यांचं निधन झालं. मग भारतीय आर्किटेक्ट जे. बी. फर्नाडिस यांनी पुढच्या कामाची सूत्रं स्वीकारली. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसमधून साकारलेलं सारं इंटिरिअर हुसेन यांनी स्वत: डिझाइन केलं होतं. त्यासाठी त्यांना नामजोशी नामे गृहस्थांनी मदत केल्याची नोंद आढळते. दक्षिण मुंबईत हे लिबर्टी उभं राहिलं आणि तिथं पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तो मेहबूब खान यांचा ‘अंदाज’! लिबर्टीनं त्यानंतर यशाचे अनेक उच्चांक पाहिले! पण उत्पत्ती, गती आणि विलयाच्या चक्रानुसार लिबर्टीच्या वाटय़ालाही उतरती कळा आलीच. हबीब यांची तब्येत ढासळली आणि 197क् मध्ये त्यांनी लिबर्टी कॉण्ट्रॅक्ट बेसिसवर चालवायला देऊन टाकलं. इथून लिबर्टीला उतरती कळा लागली. त्यानं तोटा पाहिला, विस्मृतीच्या गर्तेतलं जीणंही अनुभवलं. कोर्टकज्जे झाले आणि पुढे त्या न्यायालयीन लढाईत हबीब कुटुंबाला लिबर्टीचा ताबा परत मिळाला. त्यांनी लिबर्टीची डागडुजी केली आणि राजश्री प्रॉडक्शनने आपल्या बहुचर्चित ‘हम आपके है कौन’ या सिनेमाचा प्रीमियर लिबर्टीत केला. ‘हम आपके’ला अभूतपूर्व यश मिळालं. रोज तीन शो असे सलग 44 आठवडे हा सिनेमा लिबर्टीत तुफान चालला. मल्टिप्लेक्सच्या आधीचा काळ. 5क् रुपये सिनेमाचं तिकीट असायचं. एक तरुण, भारावलेला फोटोग्राफर म्हणून त्याकाळी मला या सिनेमांनी खूप काही दिलं. मनोरंजनापलीकडचं जग दाखवलं. मला तर सिनेमांचं इतकं वेड होतं की, मी एकदा त्याकाळच्या पॉश आणि श्रीमंत अशा ‘बॉम्बे हॉटेल’मध्ये अमुकतमुक वृत्तपत्रचा पत्रकार आहे असं सांगत मी शिरलो होतो. तिथं सत्यजित रे उतरले होते, त्यांना पाहता यावं, हस्तांदोलन करता यावं म्हणून हा सारा खटाटोप. 2क्क्क् उजाडता उजाडता मल्टिप्लेक्सची पहाट झाली. सिंगल स्क्रीन काळवंडू लागले. लिबर्टीलाही या झगमगाटी मल्टिप्लेक्सशी स्पर्धा करता आली नाही आणि काही वर्षापूर्वी तिथं सिनेमे प्रदर्शित होणं थांबलं. आता उरलीय ती फक्त एक ऐतिहासिक भव्य इमारत. इथल्या लालचुटूक खुच्र्यावर गेल्या किती वर्षात कुणी बसलेलं नाही, प्रोजेक्शनिस्टचं कामही पार्टटाइम वर्कर म्हणून उरलंय आणि एकेकाळी शान असलेले पिवळे टंगस्टन दिवे आता क्वचित कधीतरी उजळले तर उजळतात.
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)