- शर्मिष्ठा भोसले‘आदमीके हाथको काम ना हो तब कहांका सुकून मिलेगा? हाथ पे हाथ रखके बैठे रहते बस. बैठना बोले तो बैठेभी कहां? हमारी बस्तीके घरबार भी ऐसे एक दुसरे से चिपककर खडे है न, की वो आप क्या बोलते, ‘सोशल डिस्टन्सिंग’ उसकी कोई गुंजाइश है ही नही.’ पन्नाशीचे अब्दुल हाफीज अन्सारी चपलांच्या कारखान्यात कामाला होते. मूळचे यूपीतल्या सिद्धार्थनगरचे. अब्दुल म्हणतात, ‘‘साफसफाई, एक दुसरेसे दूर रहना, इसपर जितना हो सके मै खुद अमल करता. अभी मेरा दुसरा साथी गांव चला गया. मै अकेला एक रूम में रहता. मेरा परिवार गांव तरफ है. आसपडोस के लोगो को देखता तो लगताय ये सब हालात के मारे हुए है. छोटे-छोटे मकान, उसमें आठ-दस-बारा लोग. कैसे मुमकिन है खबरदारी बरतना?’’मुंबईत गोवंडीच्या बैंगनवाडीत राहणार्या अब्दुलनं विचारलेला प्रश्न एरवीही सहजसोपा नाही. या कोरोनाकाळात तर त्याचं उत्तर अधिकच अवघड पण गरजेचं बनलंय. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 63 लाख आहे. दरम्यानच्या काळात हा आकडा अजून वाढलाय. मुंबई देशातलं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर. या लोकसंख्येच्या 55 टक्के रहिवासी झोपडपट्टीत राहतात. ही टक्केवारी जगात सर्वात जास्त आहे. शिवाय 54,500 लोक बेघर असल्याचंही 2011 ची जनगणना सांगते. झोपडपट्टय़ांमध्ये मोजके अपवाद सोडले तर खासगी शौचालये नाहीत. रहिवासी सार्वजनिक स्वच्छतागृहं वापरतात. तिथली रोजची स्वच्छता, सांडपाण्याची-कचर्याची विल्हेवाट, पाण्याची उपलब्धता याबाबतचं नकारात्मक वास्तव कोरोनासारख्या संकटाला अजूनच आव्हानाचं बनवतंय.मार्चच्या शेवटी 40 हजार लोकसंख्येच्या वरळीतल्या कोळीवाड्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यावर सगळ्या वस्तीला सील करण्यात आलं. तिथंही पुन्हा नवीन संक्रमित सापडले. हजारेक लोकांचं अलगीकरण करण्यात आलंय. आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या 15 लाख लोकसंख्येच्या धारावीत 56 वर्षे वयाचा कापड विक्र ेता कोरोना संसर्गाचा पहिला बळी ठरला. 1 एप्रिलला झालेल्या या मृत्यूनंतर या आठवड्यात शुक्रवारपर्यंत कोरोनाचे 214 रु ग्ण समोर आलेत. 3-4 फुटांच्या अरु ंद गल्ल्या, सूर्यप्रकाश, खेळती हवा आत जायला अवघड बनवणारी दाटीवाटीने उभी लहान-लहान बैठी एक किंवा दोन मजली झोपडीवजा घरं. आता साहजिकच धारावीत भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तशातच या भागात सेवा देणार्या बीएमसीच्या कर्मचार्यासह एका सफाई कामगारालाही संसर्ग झालाय. शासन अतिशय धीरोदात्तपणे कार्यवाही करतंय पण या वस्त्यांमधली लोकसंख्येची घनता बिकट आव्हान उभं करतेय. सादिका ‘कोरो’ संस्थेची कार्यकर्ता आहे. गोवंडीच्या बैंगनवाडी आणि आसपासच्या भागात संसाधनांच्या उपलब्धतेनुसार शक्य होईल तसं रिलिफ वर्क करते. दाटीवाटीची वस्ती, चिंचोळ्या गल्ल्या आणि अनेकदा विनाकारण फिरणारी लोकं या गोष्टी तिला धोक्याच्या वाटतात. पण मदत करणं थांबवूनही चालणार नाहीये. सादिका सांगते, ‘‘इथं अजून कुणाचीच मदत नीट पोचली नाही. स्थानिक नगरसेवक फिरकतही नाहीत. लोक भुकेनं बेजार आहेत. माहोल बहुत बिगडा हुआ है. आजुबाजूके किसीको सर्दी या खांसी भी होती है तो सभी डर जाते. आसपास देखने लगते की कहीं हमकोभी इन्फेक्शन ना हो जाये. कहींपर खाना मिल रहा है ऐसी खबर लगती है तो मै लोगोंको उधर भेजती. पर बच्चे, बुढे और अपाहीज है वो पहोच नहीं पाते. कई बार लोग पहोचनेसे पहले खाना खतम हो जाता. मेरे आजुबाजू बहोत लोग ऐसे है जो लगातार दो या तीन दिनसे भुखे है. क्या करें? किससे कहें?’’ ‘‘जे घरात थोडंबहुत होतं तेच कसंबसं पुरवून खातोय. पण खाणारी तोंडं इतकी आहेत, ते पुरणार कसं? इथं वस्तीत येऊन पाहा, आजूबाजूला सगळे बेजार झालेत. मी सतत आजारी असते. मुलं शाळेत जायची. नवरा रोजमजुरी करणारा. त्याला आता सक्तीनं घरी बसावं लागलंय. राशन कार्डावर धान्य आणायलाही पैसे पाहिजेत ना.. तेही अनेकांकडे नाहीत.’’ लक्ष्मी सांगते. अनेक ठिकाणी चढय़ा भावात धान्य आणि वस्तू विकल्या जाताहेत. लोकांच्या तक्र ारीनंतर ‘आम्हालाच वस्तू महाग मिळतात मग तुम्हाला कशा स्वस्त देणार?’ असं त्यांचं उत्तर असतं. रेश्मा यूपीतल्या उन्नावची आहे. लॉकडाउनमुळे ती आणि तिचं कुटुंब अडकून पडलंय. ती सांगते, ‘‘उधर गाव जाते तो हालात इससे बुरे है. कमानेवाला कोई नाही. ना खुदकी जमीन है. इसलिये यही रह गये. अब यहांभी वहीं सब सामने खडा है.’’कुणी घरकाम करणारी, कुणी मजुरी, कुणी कंपनीत कामावर जाणारी.. यांच्यासाठी आयसोलेशन, स्वच्छता, आरोग्य साक्षरता या सध्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत तरी महाग, कसल्याच अर्थानं न परवडणार्या गोष्टी आहेत, असं सगळं चित्न. सामाजिक कार्यकर्त्या सविता पंडित यांच्या शेजारी गजराबाई घरकाम करणार्या एकल महिला. राशन दुकानातली महागाई त्यांना कोरोनाच्या येऊ घातलेल्या संकटाहून मोठी वाटते. त्या म्हणतात, ‘‘शेजारपाजारचे किती लोक अनेकदा उपाशी झोपताना बघून वाटतं बाजूच्याची मदत करावी. पण आपणच मुश्कीलीत, इतरांना काय कसं आधार देणार? पाणी आहे वस्तीत, पण हात धुवायचं साबण वगैरे आणायला पैसे लागतात ना.. ते कुठून आणायचं? व्याजानंही कुणी पैसे देत नाहीय असा काळ आलाय. माझी मुलं घरातलाच कपडा तोंडाला बांधतात. दोघंही कामाला जायची आता घरी बसून आहेत.’’ फुलाताई उद्वेगानं म्हणतात, ‘‘आमचे नगरसेवक मतं मागायला बरोबर येतात, आता कोण कुठल्या हालातीत आहे चुकूनही बघायला आले नाहीत.’’ प्रमिलाताई चाळिशीतल्या. म्हणतात, ‘‘आम्ही स्वच्छता पाळण्याचा प्रयत्न करतो, पण मनच थार्यावर नाही. आम्ही कष्ट करायला कधी भीत नाही. पण वेळच अशी आली की चहूकडून कोंडी झालीय.’’ या असंघटित क्षेत्नातल्या करोडो लोकांच्या प्रश्नाचा विचार न करताच सरकारनं लॉकडाउन जाहीर केल्याचा संताप अनेकांच्या बोलण्यात जाणवला. ईश्वर गजाकोश धारावीतल्या शास्त्नीनगरमध्ये राहतात. गेली 18 वर्ष ते चामड्याच्या उद्योगात आहेत. साधारण 10-12 कारागीर त्यांच्यासोबत जोडलेले आहेत. ईश्वर सांगतात, ‘‘आधीच नोटाबंदीनं आम्हाला झटका दिला. त्यातून सावरणार तर कोरोना आणि लॉकडाउनचं संकट. माझ्या कारागिरांना मी कामावर न येताही मजुरी देतोय. पण सगळ्यांना हे शक्य नाही. अनेक कारागीर, व्यावसायिक हवालिदल झालेत. कुणालाच काही उपाय दिसत नाही. शासनाने आता मोठय़ा प्रमाणात अनुदान जाहीर करून असंघटित क्षेत्नाला तारण्याची ही वेळ आहे.’’भारतासारख्या देशात एक मोठा वर्ग असंघटित क्षेत्नात काम करतो, अधिकृत-अनधिकृत झोपडपट्टय़ा, वस्त्या, यांच्यात कसल्याही आर्थिक-सामाजिक सुरक्षेविना हा वर्ग राहतो. उद्यासाठी बचत करणं त्याला कुठल्याच प्रकारे परवडत नाही. कारण आजचाच प्रश्न अवघड झालेला असतो. अशा काळात आरोग्य आणीबाणी आल्यानंतर या वर्गासाठी काय प्रकारे वेगळी, विशेष तरतूद करता येईल याचं व्यवहार्य नियोजन आणि अंमलबजावणी गरजेची आहे.
सॅनिटायझर, मास्क पाहिजे,‘सगळं कळतं ताई,पण पैसे कुठून आणायचे?’आमच्या वाशीनाक्यातली न्यू भारतनगर ही झोपडपट्टी. दहा हजार लोकसंख्येची ही वस्ती आहे. इथं मोलमजुरी करून रोज कमावून खाणार्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना आणि ‘कोविड-19’ या रोगापासून वाचायचं असेल तर सॅनिटायझर, मास्क यांची गरज आहे हे इथल्या लोकांना कळतं. पण हे सगळं घेण्यासाठी पैसे लागतात. घरात सात-आठ सदस्य असतील तर आठवड्याला किती सॅनिटायझर लागणार, विचार करा. कसं परवडणार? पैसे नसल्याने सुरक्षा नाही, सुरक्षा नसल्याने सततची अस्वस्थता, भीती असं वातावरण आहे. सरकार तरी किती पुरं पडणार? लोकांना भेटता-बोलताना त्यांची अस्वस्थता चेहर्यावर दिसते. हाताला काम नाही. घरात राशनपाणी नसल्यानं होणारी घुसमट थांबत नाही. यातून घरातली हिंसापण वाढली. आयाबायांना घरातले पुरुष मारहाण करतात, बाया रडून सांगतात. जमेल तेवढं मी समजावते. सगळीकडे असंच आहे. शेजारच्या भीमनगर, रमामाता टेकडी, साई टेकडी या वस्त्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.- सविता पंडित, सामाजिक कार्यकर्त्या
‘दोन हात जागा- दहा माणसं,तीनशे माणसं- एक संडास,सांगा, काय करायचं?.’माझ्या आयुष्यातला बराच काळ धारावीत गेलाय. इथल्या वीसेक टक्के इमारती सोडल्या तर बाकी घरांमध्ये राहणार्या लोकांसाठी शौचालयं नाहीत. एका सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर साधारण शंभर, काही ठिकाणी तर तीनेकशे लोक तरी करतात. धारावीच्या लोकांना घरी बसणं, आयसोलेट होणं शक्य नाही. दहा बाय दहाच्या घरात आठ-दहा लोक राहत असताना कसं करता येईल हे? घराघरांत लहान-मोठे उद्योग चालतात. या उद्योगांचा कामगार, कारागीर हा जवळपास रोजंदारी करणारा आहे. कोरोनामुळं उद्या जीव जाईल ना जाईल, भुकेनं आजच मरण आहे अशी अवस्था. शासन मदत देतंय, पण ती तुटपुंजी आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हरेकाची नीट टेस्ट करायला शासनाकडे तरी मनुष्यबळ कुठाय? धारावीच्या आसपासची खासगी रु ग्णालयं आता शासनाने पॅन्डेमिक अँक्टनुसार याकामी ताब्यात घेतली पाहिजेत. अनेक लोक बोलतात धारावीचे लोक सुधरायला तयार नाहीत. नियम पाळत नाहीत. पण दोन-तीन हात जागेत इतके लोक राहत असतील तर सतत घरात कसं बसणार?’’- राजू कोरडे, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सचिव
‘कोरोना येईल तेव्हा येईल,माझ्या पोटात आजच आग पडलीय, त्याचं काय करू?’ अगदी जीवावरचं संकट आलं आणि समजा मरणाचे चार पर्याय समोर असतील तर त्यातल्या त्यात सोपं मरण कुठलं हा विचार माणूस करतो. कोरोना येईल तेव्हा येईल. पण माझ्या पोटात आज आग पडलीय त्याचं काय? हा झोपडपट्टीतल्या अनेकांच्या बोलण्याचा सूर आहे. क्वॉरण्टाइनसाठी गेलेल्या पोलिसांवर धारावीतल्या काही तरु णांनी हल्ला केल्याची घटनाही समोर आली. यामागेही असुरक्षितता, घुसमट असू शकेल. यातल्या अनेकांशी बोलताना हेसुद्धा जाणवलं, की वानवा केवळ संसाधनांची नाही. ती माहितीचीही आहे. योग्य वेळी सत्य, ठोस माहिती मिळत नाही. साहजिकच आसपास सहज पसरणार्या अफवा, फेक न्यूज, गैरसमज आणि त्यातूनच भीती, असुरक्षितता यांची पकड घट्ट होत जाते. मदत देणार्या साखळीशीही जोडून घेता येत नाही इतकी प्रतिकूलता, असहायता जगण्यात ठासून भरलेली असते. sharmishtha.2011@gmail.com(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)