- स्वामी मकरंदनाथ
ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची; तसेच सर्व संतांची इच्छा आहे. र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान।
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण।।’
अशा शब्दांत तुकाराम महाराज स्वत:ची दर्शनाची आस वर्णन करतात.
‘पाहू द्या रे मज विठोबाचे मुख।
लागलिसे भूक डोळां माझ्या।।’
अशी त्यांची तळमळ आहे. संत सांगतात, भगवंतांच्या स्मरणामध्ये समाधान भरलेले आहे. संसाराच्या स्मरणाने मात्र असमाधान वाढीला लागते. भगवंतांचे नाम घेतले, की आनंद निर्माण होतो, तर संसाराच्या गोष्टी बोलून रूखरूख, चिंता वाढते. संसार खरा असे वाटायला लागले, तर जीवन देहासक्त, भोगासक्त होऊन जाते. भगवंत खरा असे वाटायला तर मात्र ‘ऊध्र्वम् गच्छन्ति सत्त्वस्था:।’ या न्यायाने जीव ऊध्र्व गतीला प्राप्त होतो. या जगात भक्तही राहतो आणि अभक्तही राहतो. याच जगात राहून भक्त एका वेगळ्या प्रकारचे ऐश्वर्य, शाश्वत समाधान प्राप्त करून घेतो. अभक्तही त्याच्या पातळीवर इंद्रिय, मनाचे सुख समाधान मिळवतो; पण ते शाश्वत नसते.
अतिशय शुचिभरूत सुख, समाधान ईश्वराच्या प्रेमामध्ये नामामध्ये आहे, ध्यानामध्ये आहे. ध्यानामध्ये तेवढय़ा वेळापुरता संसार नाहीच असे होऊन जाते. झोपेमध्येही संसार नाहीसा होतो; पण तेव्हा आपण स्वत:लाही विसरलेले असतो. ध्यानामध्ये संसार नाहीसा होतो; परंतु ‘संसार नाही’ असे ज्याला समजते ‘तो’ शिल्लक राहतो. तो शुद्ध जाणीवस्वरूप आत्मा! तो आपणच आपल्याला जाणतो. तो सुखरूप असतो.
परमार्थाच्या साधना सुखदायी आहेत. कल्पनारहित व्हायचे कसे? मनाचे अमन, मन नाही अशी स्थिती साधायची कशी? इंद्रियांना आपल्या जागृत अवस्थेत विसरायचे कसे, हे परमार्थ सांगतो; म्हणून परमार्थामुळे निखळ सुख मिळते. हे सुख मिळवत असताना संसारसुख किंवा इंद्रियजन्य सुख टाकावे लागत नाही. थोडा वेळ साधनाकाळात इंद्रियांखेरीज असणारे, विषयांखेरीज असणारे आत्मसुख अनुभवायचे आणि त्या सुखाच्या प्रकाशात इंद्रिये, मन, बुद्धीने आपला उद्योग व्यवसाय उत्तम करायचा. जीवनाच्या र्मयादा कशा समजून घ्यायच्या आणि त्या र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
‘हे शब्देंविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोला आदि झोंबिजे। प्रमेयासी।।’
असे ज्ञानेश्वर महाराज परमात्म सुखाविषयी म्हणतात. ‘शब्द हे बहुसार। उपकारांची राशी।।’ असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. कारण, शब्द अर्थवाही असतात. अर्थाला निर्देशित करतात. मात्र, शब्द ऐकणारा श्रोता जेव्हा शब्दांनी केलेल्या अर्थाशी एकरूप होतो, समरस होतो, तेव्हा श्रोता वक्ता दोघेही रामरूप होऊन जातात. त्या वेळी त्यांना जो आनंदाचा भोग मिळतो तो इंद्रियांशिवाय असतो, सुख मिळते; पण इंद्रियांना न समजता. भगवंतांच्या नामात, भजनात तसेच ध्यानात ही शक्ती आहे. या अंतरंग साधनांच्या योगाने आपण आत्मसुखाला प्राप्त होतो. या सुखाच्या प्रकाशात संसारातील कर्तव्यकर्मे उत्तमपणे पार पाडायची आहेत.
‘संसारत्याग न करिता। प्रपंच उपाधि न सांडिता।
जनामध्ये सार्थकता। विचारेचि होय।।
तस्मात् विचार करावा। देव कोण तो ओळखावा।
आपुला आपण शोध घ्यावा। अंतर्यामी।’
असे सर्मथ म्हणतात. अंतर्यामी शोध घेताना लक्षात येते, की आपण अव्यक्त, अचिंत्य, निर्गुण-निराकार परमात्माच आहोत. कालांतराने ज्याची अनुभूती आत घेत होतो तोच परमात्मा जगतामध्ये सर्वत्र भरून राहिला आहे, असा बोध साधकाला होतो. हे ध्यानाने होते, नामाने होते. ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची; तसेच संतांची इच्छा आहे.
(लेखक नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)