- गौरी पटवर्धन
श्रेयाच्या घरी भयंकर आरडाओरडा चालू होता. बाबा आईवर ओरडत होते. तिला कशी एकही वस्तू नीट सांभाळून ठेवता येत नाही म्हणून रागवत होते. आई त्यावर चिडून त्यांना म्हणत होती की तुम्हीच तुमच्या वस्तू कुठेतरी ठेवता आणि माझ्या नावाने ओरडता. आजी त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आजोबा बिचारे गुपचूप हरवलेली वस्तू कुठे दिसते आहे का, ते शोधायचा प्रयत्न करत होते. काका बाबांची समजूत घालायचा प्रयत्न करत होते आणि बाबा चिडून म्हणत होते, ‘अरे जाऊ दे कसं? तू ते गिफ्ट आफ्रिकेहून खास तुमच्यासाठी आणलं आहेस असं मी माझ्या साहेबांना सांगितलंय आणि आज ते घेऊन येतो असंही सांगितलंय. आता ते नेलं नाही तर मी उगाच खोटारडेपणा करतोय असा अर्थ नाही का होत?’बाबांच्या या अग्यरुमेंटवर कोणीच काही बोललं नाही. शेवटी ऑफिसला उशीर व्हायला लागला तसे बाबा चिडचिड करत, साहेबांना काय सांगायचं याचा विचार करत ऑफिसला निघून गेले.हा संपूर्ण वेळ र्शेया आपण जणू त्या गावचेच नसल्याच्या थाटात सोफ्यावर पुस्तक वाचत बसली होती. सहावीत चांगले मार्क्स मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून आजोबांनी तिला लायब्ररी लावून दिलेली होती. तिथूनच आणलेलं एक कॉमिक ती वाचत बसली होती. बाबा ऑफिसला गेल्यावर घरात जरा शांतता पसरली. मग काका आईला म्हणाले, ‘वहिनी, अहो ते गिफ्ट मी इथेच ठेवलं होतं काल. असं कसं ते हरवलं असेल?’‘काही हरवलं नसेल. यांनीच कुठेतरी ठेवलं असेल आणि आता याच्या त्याच्या नावाने ओरडत फिरताहेत. तुम्ही नका लक्ष देऊ. त्यांनाच सापडेल केव्हातरी.’ असं म्हणून आई तिच्या तिच्या कामाला लागली. आजी आणि काकापण त्यांच्या कामाला निघून गेले. एकटे आजोबा अजूनही चिकाटीने ते गिफ्ट शोधत होते. आता र्शेयाला त्यांची दया यायला लागली. त्यांनी ते गिफ्ट कितीही शोधलं असतं तरी ते त्यांना सापडूच शकलं नसतं. कारण र्शेयाने ते गिफ्ट वर्तमानपत्नात गुंडाळून तिच्या खोलीतल्या कचर्याच्या डब्याच्या तळाशी ठेवून दिलं होतं. आणि वरून जुन्या वहीची काही पानं फाडून टाकलेली होती. शेवटी तिने ते आजोबांना सांगायचं ठरवलं. आजोबा तिचं म्हणणं ऐकून घेतील याची तिला खात्नी होती. आजोबा कधीच तिच्यावर उगीच रागवायचे नाहीत.शेवटी आजोबाही दमून हॉलमध्ये तिच्या शेजारी येऊन बसले. तेव्हा हातातलं पुस्तक खाली ठेवत र्शेया म्हणाली, ‘आजोबा, तुम्ही ते गिफ्ट नका शोधू.’‘का गं?’‘कारण तुम्हाला ते सापडणार नाही. ते कोणालाच सापडणार नाही.’‘तुला काय माहीत?’ आजोबा तिच्याकडे संशयाने बघत म्हणाले.’‘ते कुठे आहे ते मला माहितीये.’‘अगं मग मगाशी सांगायचंस ना.’‘मी मुद्दामच नाही सांगितलं.’‘अगं पण का? तुझ्या बाबांची मोठी पंचाईत झाली ना त्यामुळे!’‘हम्म्म..’ आपल्या उद्योगांमुळे बाबांची अशी अडचण होईल हे र्शेयाच्या मुळीच लक्षात आलं नव्हतं; पण तरी आपण जे केलं ते योग्यच केलं याची तिला खात्नी होती. त्यामुळे ती म्हणाली, ‘ते गिफ्ट म्हणजे काय होतं तुम्हाला माहितीये का?’‘नाही बुवा. एक वीतभर खोकं होतं आणि त्यात काहीतरी किमती वस्तू होती एवढंच मला माहिती आहे.’‘आजोबा..’ र्शेयाने सांगायला सुरु वात केली आणि मग म्हणाली, ‘इकडे माझ्या खोलीत या. तुम्हाला दाखवते.’तिने आजोबांना खोलीत नेऊन ते खोकं बाहेर काढून उघडून दाखवलं. त्यात कापसात गुंडाळून ठेवलेला छोटा हत्ती होता. मग तिने आजोबांना त्याच्या दाताला लटकवलेली चिठ्ठी दाखवली. त्यावर लिहिलेलं होतं, की तो खर्या हस्तिदंतापासून बनवलेला हत्ती होता.आजोबा कौतुकाने तो हत्ती न्याहाळून बघत असताना र्शेया म्हणाली, ‘तुम्हाला माहितीये का आजोबा, या गिफ्टसाठी आफ्रिकेतल्या हत्तीला कोणीतरी मारून टाकलं असेल.’‘म्हणजे?’ आजोबांना अजूनही लिंक लागत नव्हती.‘अहो आजोबा. तो हत्ती हस्तिदंतापासून बनवलेला आहे ना. मग खरा जिवंत हत्ती आपला दात थोडीच काढून देईल? वाघ मारून वाघाचं कातडं काढून घेतात ना, तसंच हत्ती मारून हत्तीचा दात काढून घेतात. मग असा हत्ती मारून टाकून त्याच्या दातापासून बनवलेला हत्ती आणणं बरोबर आहे का?’आजोबा आ वासून र्शेयाकडे बघत होते. आत्तापर्यंत आपण हिला समजावून सांगायचो की सर्कशीत प्राण्यांना त्नास होतो म्हणून आता सर्कशीत हत्ती नसतो. आणि आता हीच आपली छोटीशी नात आपल्याला आफ्रिकेतल्या हस्तिदंताच्या तस्करीबद्दल सांगते आहे!र्शेयाचं म्हणणं होतं, की असा हस्तिदंती दात मागणारे बाबांचे साहेब, तो आणायला काकांना सांगणारे बाबा, आफ्रिका बघायला ट्रीपसाठी गेलेले असताना तो हत्ती घेऊन येणारे काका, तिथे तो हत्ती विकणारे दुकानदार, बनवणारे कारागीर आणि तो दात काढून आणणारे शिकारी हे सगळे त्या हत्तीच्या खुनात सहभागी आहेत. हे ऐकल्यानंतर आजोबांच्या लक्षात आलं, की हे शाळेत दाखवलेल्या कुठल्यातरी माहितीपटातून मिळालेलं ज्ञान आहे; पण तरी, तिचा मुद्दा योग्य होता. फक्त ऐनवेळी तो हत्ती गायब करून बाबांची अडचण करण्याचा तिचा मार्ग मात्न नि:संशय चुकीचा होता. हे सगळं आजोबांनी तिला समजावून सांगितलं. तिलाही ते पटलं. बाबांना तो हत्ती परत देऊन हे सगळं समजावून सांगितलं पाहिजे हेही तिला मान्य होतं. प्रश्न असा होता की बाबा इतके चिडलेले असताना ते करणार कसं? आजोबांनी आणि तिने काहीतरी चर्चा केली आणि मग ती कामाला लागली.संध्याकाळी बाबा आले तेव्हा त्यांच्या पलंगावर तो हस्तिदंती हत्ती कापसात गुंडाळून ठेवलेला होता. पण, त्याच्या सोंडेला बांधून एका छोट्या हाताने शिवलेल्या जुन्या साडीच्या बटव्यात एक पत्न लिहिलेलं होतं.‘प्रिय बाबा.. आणि त्यांचे साहेब,तुमचं गिफ्ट मी लपवून ठेवलं त्याबद्दल मी सॉरी आहे.मी हे पत्न आफ्रिकेतल्या हत्तीच्या ‘बाजूने’; आजोबा म्हणतात की इथे ‘वतीने’ लिहिले पाहिजे, पण मी ‘बाजूने’ असेच लिहिते आहे. कारण तो हत्ती तर आता या जगात नाही. कारण तुम्ही त्याचा दात काढून त्याचा छोटा हत्ती बनवला आहे. आणि जिवंत हत्ती तर काही त्याचा दात देऊ शकत नाही. शिकार्यांनी त्याची शिकार केली असणार. त्यामुळे तो हत्ती आता या जगात नाही; पण त्याच्या दाताचा हत्ती तुम्ही आणणं मला अजिबात आवडलं नाही.बाबा तुम्ही असा हत्ती मारला असता का? नाही ना? मग कोणीतरी मारलेल्या हत्तीचा दात तुम्ही का बरं आणायला सांगितला? काकांनी तर तिकडे खरा हत्ती बघितला होता ना? मग त्यांनी तरी असा हस्तिदंती हत्ती कसा काय विकत आणला? आजोबा म्हणाले की माझं म्हणणं बरोबर आहे; पण मी तुमचं गिफ्ट लपवणं चूक आहे म्हणून मी ते परत देत आहे. पण, तुम्ही मोठी माणसं असं वागता तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. - र्शेया’आता बाबांच्या साहेबांच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये तो हत्ती ठेवून दिलेला आहे आणि र्शेयाचं पत्न फ्रेम करून त्यांच्या टेबलवर ठेवलेलं आहे. ते म्हणतात, ‘माझं वागणं चूक आहे की बरोबर अशी शंका आली की मी र्शेयाचं पत्न वाचतो. त्यातला निरागसपणाच मला योग्य मार्ग दाखवतो.’(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)
lpf.internal@gmail.com