महामार्ग निर्मितीत तुम्ही दररोज नवीन रेकॉर्ड करता, तरीही सरकारीबाबूंवर ओरडता?देशातील महामार्ग आणि रस्त्यांची चर्चा सातत्याने होत असते. आधीच्या सरकारच्या तुलनेत आम्ही रस्तेबांधणीत खूप मोठा टप्पा गाठला आहे. मी नेहमी सांगतो, तेच आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या व्यासपीठावर पुन्हा सांगतो, परंतु हे श्रेय माझे एकट्याचे नाही. या यंत्रणेत काम करणाऱ्या सचिवांपासून तर कंत्राटदारांपर्यंत प्रत्येकाचे हे श्रेय आहे. कामामध्ये प्रामाणिकता असायला पाहिजे. कामाचे फायनान्सपेक्षाही परफॉर्मन्स ऑडिट व्हावे या मताचा मी आहे. सर्व सहकारी उत्तम काम करतात, परंतु मी ७५ टक्क्यांवर समाधानी नसतो.
८५ टक्के का झाले नाही, हा माझा प्रश्न असतो. जे कामचुकार आहेत त्यांना माझ्याकडून फटके पडतात, त्याला माझा नाइलाज आहे. माझे वैयक्तीक कोणाशीही शत्रुत्व नसते. गरिबांच्या हिताची असलेली योजना मंजूर व्हायला आधी सात वर्षे लागायची, आता केवळ तीन महिन्यांत होते. इतक्या जलद गतीने काम करण्याची काही कर्मचाऱ्यांना सवय नाही. आता देशात सरासरी दररोज ३४ कि.मी. राष्ट्रीय महामार्ग बांधले जात आहेत. येत्या मार्चअखेर ४० कि.मी.पर्यंत पोहोचू आणि तो जागतिक विक्रम ठरेल.
पेट्रोल-डिझेलचे भाव आकाशाला भिडलेत, तुम्ही बनवलेल्या रस्त्यांवरून गाडी कशी चालवायची? कॉँग्रेसचे सरकार असताना तर तुम्हीच रस्त्यावर उतरायचात? पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले हे सत्य आहे. लोकही त्रस्त आहेत. असे असले तरी ऑटोमोबाइल क्षेत्राला फटका बसला नाही. बजाज, टीव्हीएस, हिरो आदी कंपन्यांची वाहने उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक निर्यात होत आहे. आम्ही आता स्क्रपिंग पॉलिसी आणली आहे. त्यामुळे ऑटोमोबाइलचा टर्नओव्हर साडेचार लाख कोटीवरून येत्या पाच वर्षांमध्ये १० लाख कोटींवर जाईल. येणाऱ्या काळात इथेनॉल आणि विजेवर चालणाऱ्या बसेस, वाहने धावतील. एका चार्जिंगमध्ये ७००/८०० कि.मी. चा पल्ला गाठू शकतील अशी वाहने तयार होत आहेत. येत्या दोन वर्षांत या वाहनांची किंमत डिझेल आणि पेट्रोल गाड्यांच्या किमतीइतकीच असेल. आता जर पेट्रोल-डिझेल वापरणाऱ्या गाडीसाठी ५० हजार रुपये खर्ची पडत असतील तर इलेक्ट्रिक वाहनांच्या इंधनाचा खर्च केवळ दोन हजार रुपयांवर येईल. बायो सीएनजीचा ट्रॅक्टर मी अलीकडेच रस्त्यावर आणला आहे. पराळीपासून ही सीएनजी बनत आहे. त्याचे प्रदूषणही नाही.
महाराष्ट्रात कोरोना वाढतोय. नियोजन नसल्याचा हा परिणाम असावा का?महाराष्ट्रात, विशेषत: नागपुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवीन रुग्ण नोंदविले जात आहेत. नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत, मास्क लावत नाही, गर्दी करतात. आता कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येकाला लस मिळेल; परंतु कोरोनाला हरवायचे असले तर नियमांचे पालन करावेच लागेल.
सचिन वाझेप्रकरणी तुमचे मत काय?सचिन वाझे प्रकरणाबाबत माध्यमांना जेवढे माहिती आहे तेवढेच मलाही माहिती आहे; परंतु प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित ठरत नाही. परंतु देशाच्या हिताच्या दृष्टीने या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी.(मुलाखत : शोभना यादव, वरिष्ठ सूत्रसंचालक, एबीपी न्यूज)