नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याशी संवादमुलाखत : शफी पठाणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण हे देशभरातील मराठी साहित्यप्रेमींसाठी कायम कुतूहल अन् आकर्षणाचा विषय राहिले आहे. संमेलनाध्यक्षांनी या भाषणात मांडलेले विचार साहित्यमर्मज्ञ म्हणून मांडलेले असावे की समाज विचारवंतांच्या भूमिकेतून ते व्यक्त व्हायला हवेत, यावर संमेलनागणिक चर्चा घडत असते. यंदाही हाच सनातन सवाल पुन्हा विचारला जातोय. संमेलनाध्यक्षांनी आपल्या भाषणातून वाटा चुकत चाललेल्या समाजाला मार्गदर्शन करायला हवे, असे काहींचे मत आहे; तर अशा भाषणातून उगाच कुठल्याही वादाला जन्म न घालता संमेलनाध्यक्षांनी केवळ साहित्यावर बोलावे, असाही एक मतप्रवाह आहे. यंदाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्यानिमित्त संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्याशी विविध विषयांवर केलेली बातचित.. बाबरी ते दादरी बिघडत जाणारे सांस्कृतिक वातावरण, नोटाबंदी, शेतकरी आत्महत्त्या अशा सामाजिक विषयांवर संमेलनाध्यक्षांनी एक ठोस भूमिका घ्यावी असे काही साहित्यिकांचेच म्हणणे आहे. याबाबत आपली भूमिका काय?- समाज आणि साहित्य या दोन्ही गोष्टींना भिन्न नजरेने पाहू नका. तसे ते पाहताही येणार नाही. दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर परिणाम होतच असतो. साहित्यिकांच्या मनातील तीव्र सामाजिक कळकळ, आस्था, समकालीन पर्यावरणविषयीची जागरूकता मी वाचनातून सातत्याने अनुभवत असतो. असे विचार मांडणाऱ्या बहुतांश लेखकांनी या विषयावर अधिकाराने भाष्य केले आहे. त्यांच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांनी मी नेहमीच प्रभावित झालो आहे. त्यामुळे अध्यक्षीय भाषणाचे लेखन करताना मला या सूचनांनी एक आगळे बळ आणि विविक्षित दिशा प्राप्त झाली आहे. मराठी साहित्याला अंतर्मुख करणारे, पण तरीही समकालीन वास्तवाशी नाते सांगणारे हे भाषण असेल असाच माझा प्रयत्न राहणार आहे. संमेलनाध्यक्ष साहित्याच्या मंचावरून बोलत असला, तरी त्याने मानवनिष्ठ विश्वात्मकतेला नाकारण्याचे काही कारणच नाही.. डॉ. अक्षयकुमार काळे हे नाव साहित्यक्षेत्राला फारसे परिचित नाही, त्यामुळे त्यांच्या भाषणाबद्दल जास्त उत्सुकता आहे, असाही एक सूर ऐकायला येतोय. काय सांगाल?- अशा संमेलनाचे अध्यक्ष कुणाला उद्देशून भाषण करतात हा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यानुसार भाषणाचा घाट तयार होत असतो. आपल्या प्रतिपादित विषयाची मांडणी अध्यक्षांनी त्या अनुषंगानीच करावे, ही अपेक्षा असते. याशिवाय अशा भाषणातून त्या अध्यक्षाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होणे गरजेचे असते. भाषणात प्रतिबिंबित होणारे हे विचार केवळ संमेलनापुरते कृत्रिम रीतीने तयार झालेले नसतात. ती एक सलग चालणारी प्रक्रिया असते. यात संमेलनाध्यक्षांच्या जीवनदृष्टीचा आणि साहित्यदृष्टीचा मोठाच सहभाग असतो. ती दृष्टी म्हणजेच त्या साहित्यिकाचे वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संचित होय. ते या भाषणातून प्रकट होणे मला अधिक अगत्याचे वाटते. समकालीन वास्तवाची धग आणि साहित्यातील त्याचे प्रतिबिंब याकडे तुम्ही कसे बघता?- समकालीन तीव्र घटनांनी एखाद्या लेखकाचे हृदय खरंच पिळवटून गेले असेल तर त्याचे प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटणे अतिशय स्वाभाविक आहे. परंतु केवळ लोकाग्रहास्तव अशा घटनांचे प्रतिबिंब जसेच्या तसे आपल्या लिखाणात समाविष्ट करण्यात काही हशील नाही. समाज आणि व्यक्ती यांचे नाते अन्योन्यच आहे. पण, तो समाज लेखकाच्या व्यक्तिमत्त्वात घुसून, त्याचे व्यक्तिमत्त्व भारावून टाकून मग कलाकृतीच्या रूपाने धन्यर्थाची अर्थात महाअर्थाची योग्यता राखीत प्रकट होत असतो. ही प्रक्रिया सामाजिक अनुबंध मानणाऱ्या आपल्या क्षमतेनुसार ती सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लेखक, रसिकांना उद्देशून करावयाच्या भाषणात कशी राहील, याकडे मीही अभ्यासपूर्वक लक्ष दिले आहे. संमेलनाध्यक्षाचे भाषण तयार करताना अशा चारही बाजूने येणाऱ्या सूचनांचे दडपण नाही जाणवत?- महाराष्ट्रातील श्रोता वर्ग प्रबुद्ध आणि प्रगल्भ आहे. मी माझ्या भाषणातून प्रकट करणार असणारी वाङ्मयाची समाज सापेक्षता आणि विश्व सापेक्षता समजून घेण्याची ज्ञानात्मक आणि भावनात्मक क्षमता अशा सूचना करणाऱ्या सर्व लेखकांत भरभरून आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. या सर्व महानुभावांच्या सूचनांचा मी अतिशय आदर करतो. सर्व दिशांतून आलेले शुभविचार आपल्याला उपकारक ठरतात, यावर माझा प्रगाढ विश्वास असल्यामळे मी या सर्वांचे हृदयाच्या तळापासून आभार मानतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या नुसत्याच गमजा मारल्या जात आहेत. पण, दर्जा काही अद्याप मिळाला नाही. मराठीच्या या उपेक्षकडे तुम्ही कसे बघता?- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या दर्जाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निकषांच्या संदर्भातील सर्व पुरावे केंद्र शासनाला कधीचेच देण्यात आले आहेत. साहित्य अकादमीच्या अकॅडमिक मूल्यांकन समितीने महाराष्ट्र शासनाचा दावा मान्य करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्राकडे अनुकूल शिफारसदेखील केली आहे. मागच्या वर्षी २६ फेब्रुवारीला भाषादिनी हा दर्जा मिळेल अशी सर्वांची अटकळ होती. निदान येत्या २६ फेब्रुवारीला तरी तो दर्जा मिळेल, अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे. सर्व पुरावे दिल्यानंतरदेखील केंद्र शासनाकडून हा दर्जा देण्यास दिरंगाई होत असेल तर समस्त मराठी जनतेला यासंदर्भात आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. संमेलनाची बहुप्रतीक्षित कार्यक्रमपत्रिका अखेर हातात आली आहे. परंतु यात उद्घाटन व समारोपाला राजकीय संमेलन म्हणता येईल, इतक्या राजकारण्यांची गर्दी आहे..- साहित्य संमेलनाच्या उद्घाटन व समारोपाला राज्यातील मोठे राजकीय नेते येत आहेत, ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. ही सर्व राजकीय मंडळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निवडणुकीच्या संदर्भात बोलतीलच अशी अटकळ आताच बांधणे मला योग्य वाटत नाही. ते सर्व मराठी भाषेचे आणि साहित्याचे अभिमानी आहेत. त्या सर्वांच्या ठायी पुरेसा औचित्यविवेक आहे. त्यामुळे ते आपल्या भाषणामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनुषंगाने साहित्याविषयीचा त्यांचा विचार प्रकट करतील, अशी मला आशा वाटते. या संमेलनाच्या समारोपाला येणारे दोन्ही ठाकरे बंधू हे दोन कलाक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती आहेत. त्यामुळे कलेसंबंधी एक नवा विचार ते मांडतील, याची मला खात्री आहे. अशा संमेलनाच्या व्यासपीठावर त्यांचे स्वागतच आहे. फक्त अपेक्षा हीच की त्यांनी आपले भाषण झाल्यावर मंच सोडून जाऊ नये. कारण, असे केल्याने उपस्थित सर्वांचा हिरमोड होतो. त्यामुळे एवढे पथ्य त्यांनी अवश्य सांभाळावे. संमेलनाध्यक्षाचा कार्यकाळ वर्षभराचा असतो. या वर्षभरातील आपले नियोजित उपक्रम काय असतील?- अध्यक्षपदाच्या पुढील एक वर्षाच्या कार्यकाळात वेगवेगळ्या योजना माझ्या डोक्यात घोळत आहेत. तथापि, या आराखड्याला मूर्त स्वरूप संमेलन आटोपल्यावर १५ दिवसांच्या आतच देण्याचा माझा विचार आहे. बृहन्महाराष्ट्रातील भाषा व संस्कृतीची स्थिती लक्षात घेता तिथे मराठीचे अधिक संवर्धन करणे आवश्यक आहे. तेथील मराठी लोक भाषेकरिता संघर्ष करीत आहेत. पूर्वी महाराष्ट्र शासन त्यांना अनुदान देत होते. परंतु मध्येच हे अनुदान बंद करण्यात आले. ते पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना एकत्रित करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी अनुदानाचा हा मुद्दा लावून धरायचा आहे. किंबहुना हे आपले कर्तव्यच आहे, असे मला वाटते. तेथील या भाषेची स्थिती आणि भवितव्याबाबत विचार करण्याकरिता एक चर्चासत्र आयोजित करण्याचा माझा मनोदय आहे. त्यामुळे मराठी भाषेसंबंधीच्या त्यांच्या संवेदना, कार्य व संघर्ष समस्त मराठी जनांना कळू शकेल. दुसरे म्हणजे, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या मराठी विभागांना भेटी देऊन तेथे चाललेल्या मराठी भाषा संवर्धनाच्या कार्याचा मी अभ्यास करणार आहे. कोण आहेत डॉ. अक्षयकुमार काळे?डॉ. अक्षयकुमार काळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या वरु ड गावचा. एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या डॉ. काळेंना सामाजिक, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन कार्याचा वारसा परंपरेने लाभला. १९७४ साली ते एम.ए. मराठी प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाले. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली, तर वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी डी.लिट. पदवी प्राप्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ते मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २०१५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. विद्यापीठातील विविध पदं आणि स्पृहणीय कार्याबद्दल त्यांना कुलगुरूंचे सन्मानचिन्ह आणि महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. चर्चासत्रांचे आयोजन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरील साहित्य संमेलनाचे आयोजन, विविध परिसंवाद, विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.डॉ. अक्षयकुमार काळे यांचा आवडीचा विषय कविता आहे. काव्यसमीक्षा हा त्यांचा आपला एक खास प्रांत आहे. समीक्षा आणि आस्वाद हा त्यांचा पिंंड. गेली चाळीस वर्षे ते काव्यसमीक्षेवर लिहित आहेत. विविध चर्चासत्रे आणि परिसंवादात त्यांनी या विषयावर विवेचन केले आहे. १९८५ साली सूक्तसंदर्भ हा त्यांचा पहिला लेखसंग्रह प्रकाशित झाला. पुढे गोविंदाग्रज-समीक्षा, कविता कुसुमाग्रजांची या सर्व ग्रंथात त्यांनी सविस्तर विवेचन केले आहे. अर्वाचीन मराठी काव्यदर्शन या त्यांच्या काव्यग्रंथात १८८५ ते १९९५ या कालखंडातील आकारास आलेल्या काव्याची संयत, साधार चिकित्सा केली आहे. डी.लिट.साठीच्या अभ्यासाच्या विषयात अत्याधुनिक काव्यप्रवाह आणि काव्यप्रकारांचे चिकित्सक आकलन त्यांनी केले आहे. ‘मर्ढेकरांची कविता : आकलन, आस्वाद आणि चिकित्सा’ - पूर्वार्ध आणि उत्तरार्ध.. अशा दोन ग्रंथांत मर्ढेकरांच्या कवितांची साधार चिकित्सा त्यांनी केली आहे. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे. ग्रेसविषयी त्यांचे आगळे वेगळे पुस्तक आहे. ग्रेस यांची प्रदीर्घ मुलाखत घेऊन ग्रेस यांच्या अनुभूतीविश्वाचे घटक, त्यांची गुंतागुंत, निर्मितीप्रक्रि या, रचनेतील तर्कबंध, वास्तव आणि अद्भुतता, कवितेतील गेयता, सुभाषितं यासंबंधीचे आकलन या ग्रंथात आहे. ‘प्रतीतिविभ्रम’ या संग्रहात कवींच्या काव्यावरील परीक्षणात्मक लेखन त्यांनी संपादित केले आहे.नारायण सुर्वे आणि सुरेश भट यांच्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची सूक्ष्म मांडणी केली आहे. ‘गालीबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ हा एक त्यांचा गाजलेला ग्रंथ. यात काव्याभिरु ची आणि समीक्षासामर्थ्यांचे वेगळे परिणाम दिसून येतात. या ग्रंथास मराठवाडा साहित्य परिषदेचा म. भि. चिटणीस पुरस्कार, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सेतु माधवराव पगडी पुरस्काराने गौरविले गेले आहे. ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा गौरव व्हावा म्हणून ‘अर्वाचीन मराठी काव्यसमीक्षा’ हा ग्रंथ त्यांच्या लेखनासंबंधी लिहिला गेला आहे. ‘डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या काव्यसमीक्षेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर नागपूर विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्याने पीएच.डी.ही मिळवली आहे.(साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावरून साभार.)छायाचित्रे : विशाल महाळकर, नागपूर
लोकाग्रह आणि साहित्य
By admin | Published: January 28, 2017 4:55 PM