- अपर्णा वेलणकर१२, तुघलक लेन. राजधानी दिल्लीतला हा पत्ता प्रशंसेपेक्षा टीकेचा धनी अधिक आणि विश्वास अगर सरळ साध्या उत्सुकतेपेक्षा किरट्या संशयाचेच कारण अधिक असा !या वास्तूचा स्वामी गेली काही वर्षे समाजमाध्यमांच्या निशाण्यावर आहे. जल्पकांच्या फौजांचे लक्ष्य. सतत टीका. टवाळी. खिल्ली तर रोजचीच. घराणेशाहीचे जुने आरोप. अपरिपक्वतेचे नवे पुरावे. असे तुकडे तुकडे जोडून जणू रोज उद्ध्वस्त करण्यासाठीच उभी केलेली एक देशव्यापी ‘प्रतिमा’.- त्या ‘प्रतिमे’च्या आतला माणूस शोधण्याचा हेतू मनाशी धरून आम्ही या पत्त्यावर गेलो, तेव्हा दिवाळी अजून महिनाभर लांब होती. पेट्रोलच्या वाढत्या दरांची आग देशात भडकली होती. न्यायसंस्था-सीबीआय आणि रिझर्व्ह बॅँक या तीन महत्त्वाच्या संस्थांशी केंद्र सरकारने चालवलेल्या छेडछाडीविरोधात ठिणग्या उडू लागल्या होत्या आणि राफेल विमान खरेदीचा वाद पेटू लागला होता.इतक्या स्फोटक पार्श्वभूमीवर शांत, नेमस्त विचारविनिमयाची गरज असलेल्या संवादासाठी राजधानी दिल्लीच्या हवेत सध्या कोण तयार असते?- खरे तर आरोप-प्रत्यारोपांची गरम राळ उडवून देणे आणि परस्परांना चीत करण्यापुरेसे तीव्र-तीक्ष्ण वाक्पटुत्व असणे हीच ‘प्रभावी नेतृत्वा’ची व्याख्या होऊन बसलेल्या या काळात अशा ‘संवादाच्या शक्यता’ धूसर होत जणू संपल्याच असाव्यात, असे एकूण वातावरण. दिल्लीच्या हवेत तर हा विखार ठासून भरलेला. पण ‘१२, तुघलक लेन’ या पत्त्यावर असा एक संवाद घडला, आणि समोर होते कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी.
एरवी बिनीच्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती घडतात (म्हणजे जे अशा मुलाखतींना सामोरे जातात त्यांच्याच अर्थात) त्या समकालीन राजकीय संदर्भात. नेता सत्ताधारी असेल तर आपल्यावरच्या आरोपांचे खंडन, विरोधकांना धोबीपछाड देण्याची चतुराई आणि वेळ उरल्यास सरकारच्या ध्येयधोरणांचा प्रचार असा बाज असतो. नेता विरोधातला असेल तर सत्ताधाऱ्यांवरले आरोप, त्यांना खिंडीत गाठण्याची धडपड आणि पुढल्या निवडणुकीत आपल्याला हात देऊ शकतील अशा विषयांचा नेमका शोध अशा वळणाने मुलाखती जातात.या धाटणीच्या मुलाखती आता अतीव सवयीच्या आणि सपक (इंग्रजीत ज्याला ‘प्रेडिक्टिव्ह’ म्हणतात तशा) होऊन गेल्या आहेत. देशातल्या ‘राजकीय संवादा’ला आक्रस्ताळ्या, कर्कश कलकलाटाचे रूप आले आहे. पक्षीय राजकारण आणि अर्थातच सत्ताकारण वगळून समकालीन महत्त्वाच्या जागतिक, आंतरदेशीय, सामाजिक आणि समाजकारणाला वळण देणाºया ‘व्यक्तिगत’ प्रश्नांबद्दल राजकीय नेतृत्वाचे म्हणणे/ विचार/निरीक्षण काय आहे, याचा माग काढणे जवळपास अशक्यच होऊन बसले आहे. समाजकारणात अग्रणी असलेले नेते आपल्या ध्येयपूर्तीसाठी राजकीय भूमिका घेऊन सत्ताकारणात उतरत तो जमाना कधीच संपला. आता आरोप-प्रत्यारोपांचा कलकलाट, समाजमाध्यमांवरल्या पाचकळ वाचाळ पोस्टी आणि टीव्ही वाहिन्यांच्या स्टुडिओतले रोज रात्रीचे रतीब ही आपल्याकडल्या ‘राजकीय संवादा’ला आलेली अवकळा !- या पार्श्वभूमीवर लोकमत वृत्तसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी वार्षिकासाठी राहुल गांधी यांना निमंत्रित करतानाच म्हटले होते, की गेल्या काही वर्षात तुम्ही बदलत्या भारताच्या खेड्यापाड्यातून सातत्याने प्रवास करता आहात. या प्रवासाने तुम्हाला देशाचा बदलता चेहेरा दाखवला असेल, काही नवी उकल तुमच्या हाताशी लागली असेल; त्याबद्दल बोलूया ! अतीव कसोटीच्या या काळात देशाच्या वाट्याला आलेल्या सर्वाधिक तरुण लोकसंख्येच्या ‘लाभांशा’विषयी तुम्ही काय विचार करता, त्याबद्दल बोलूया ! भारताच्या अंतर्गत गुंतागुंतीच्या रचनेमुळे आणि परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या अनेक गटांच्या अंतर्गत संघर्षामुळे कोणत्याही प्रश्नासंबंधी भूमिका घेणे हे राजकीय नेतृत्वासाठी कसोटीचेच असते. या पेचातून मार्ग कसा काढावा, याचे इंगित तुम्हाला गवसले आहे का; त्याबद्दल बोलूया ! बदलत्या जागतिक रचनेत मिळालेले स्थान अधिक पक्के करायचे असेल तर भारतीय मानसिकतेत कोणता कळीचा बदल घडवावा लागेल, याविषयीचे तुमचे आकलन काय आहे, त्याबद्दल बोलूया ! ‘माहिती’नामक शस्र सोपे आणि स्वस्त होऊन थेट हाती आलेल्या ‘कनेक्टेड’ नागरिकांमुळे लोकशाही रचनेसमोर, लोकशाहीतल्या राजकीय नेतृत्वासमोर नवी आव्हाने आकार घेताना तुम्हाला दिसतात का, याबद्दल बोलूया !... असे आणि या आसपासचे जवळपास पंचवीसेक मुद्दे विचारार्थ पाठवल्याच्या मोजून चौथ्या दिवशी मुलाखतीसाठी ‘होकार’ आला.- आणि मग प्रत्यक्ष भेट झाली.सध्या प्रचलित असलेले सगळे ‘पूर्वसमज’ दूर ठेवून दृष्टी आणि कान मोकळे ठेवण्याचा पहिला फायदा म्हणजे अर्थपूर्ण संवादाची शक्यता जिवंत राहिली. प्रत्येक उत्तराचा पाय मोडून पुढल्या प्रश्नाचे अस्र फेकण्याची अपरिहार्यता मुळातच पुसलेली असल्याने संवाद वाहता राहिला.- आणि मागल्या चुका मान्य करून नवा रस्ता शोधण्याच्या हिरिरीने कामाला भिडलेल्या एका तरुण नेत्याच्या विचार-प्रक्रियेत थोडे डोकावून पाहता आले.राहुल गांधी या व्यक्तीच्या मनाचा/विचारांचा मला दिसलेला तुकडा पुष्कळसा उत्सुक आशावादी, त्यापायी कदाचित सौम्य भाबडेपणाचा आरोप ठेवता येईल इतपत खळाळाचा असा होता, हे खरे ! आपल्या मर्यादांची जाणीव जिवंत असलेली व्यक्ती स्वत:मधली सामर्थ्यस्थळे शोधण्यात, नवे सामर्थ्य कमावण्यात व्यग्र असते; तेव्हा सहज जाणवणारी प्रामाणिक धडपडीची ऊर्जा मोठी मोहक दिसते. हे राहुल यांचे आणखी एक बलस्थान. जे गप्पांच्या ओघात सहज जाणवत होते.राहुल यांनी प्रश्न टाळले नाहीत, उडवून लावले नाहीत वा फाटे फोडून विषयांतराची चतुराईही साधली नाही.देशातले अस्वस्थतेचे वातावरण, त्यामागची कारणे, स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेवरचे हल्ले, फक्त बोलण्याचा सोस जडलेली आणि कान मात्र घट्ट बंद करून घेतलेली यंत्रणा, विचारांचे वैविध्य पार पुसून एकमार्गी आज्ञाधारक देश घडवण्यातले छुपे धोके, समाजमाध्यमांमध्ये सतत उडत असलेल्या ‘व्यक्तिगत खिल्ली’ने प्रत्यक्षात केलेली मदत अशा अनेकानेक विषयांवर राहुल गांधी मोकळेपणाने बोलले.आणि निरोप घेताना म्हणाले, ‘माझ्या मनाला दारे आहेत आणि ती चर्चेसाठी, वादविवादासाठी खुली आहेत.’‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात ही सविस्तर मुलाखत वाचता येईल.राहुल यांच्याबरोबरचा हा संवाद सहज आणि वाहता होता.तो आरोप-प्रत्यारोपांच्या वाटेने गेला नाही. ‘ते’ आणि ‘आम्ही’ अशा सरावाच्या वाटणीत फसला नाही. थक्क करील अशी उंची गाठणे अजून दूरचे आहे याची नम्र जाणीव त्या संवादाला होती. त्या जाणिवेने आणलेली जबाबदारी सहज जाणवेल, इतकी स्पष्ट होती.- आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भारत’ नावाचे हे जटिल, गुंतागुंतीचे कोडे आपण चुटकीसरशी सोडवू शकू, असा उर्मट, आक्रमक वास या संवादाला चुकूनही आला नाही.प्राप्त वर्तमानात हा एवढा दिलासाही किती महत्त्वाचा!!‘येस, वी कॅन’, ...कॅन वी?तिकडे अमेरिकेत ‘येस, वी कॅन’ अशी हाक देऊन अवघ्या जगाला नेतृत्वाची नवी परिभाषा शिकवणाºया बराक ओबामा यांचे नाव चर्चेच्या ओघात निघाले, तेव्हा वाटले होते; ‘येस, वी कॅन’ ही राहुल यांना मोहिनी घालणारी परिभाषा असेल कदाचित. पण तसे नव्हते. पश्चिमी नेतृत्वाची शैली तिथल्या मातीमधून घडते, ती इथे भारतात आयात करण्याचा हट्ट अनाठायी आहे, असे राहुल यांचे मत होते. ते सांगत होते, ‘पश्चिमी देशात एका माणसाकडे एक ‘आयडिया’ असते. ती ‘आयडिया’ तो समूहासमोर मांडतो आणि त्या मार्गाने राष्ट्राला नेण्यासाठी पाठिंब्याचे आवाहन करतो. एका माणसाने मांडलेली ही ‘आयडिया’ समूहाला आपलीशी वाटली, तर तो समूह त्या व्यक्तीला आपले नेतृत्व बहाल करतो.’- भारताचा स्वभाव याच्या उलट आहे, हे जाणून असलेल्या राहुल यांना आकर्षण आहे ते गांधीजींनी नव्याने आकाराला आणलेल्या नेतृत्वशैलीचे. भारतामध्ये नेतृत्व करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने देशातल्या जनतेचा आवाज होणे, त्यांची ‘स्वप्ने’ आणि त्यांच्या ‘आकांक्षा’ मुखर करणे अपेक्षित असते. त्यासाठी स्वत:चा ‘इगो’, स्वत:चे आग्रह दूर ठेवणे ही पूर्वअटच असते. गांधीजींनी हेच केले होते. गांधीजींच्या शरीरावर झाडल्या गेलेल्या गोळ्यांनी अखेरीस संपवले, ते फक्त त्यांचे शरीर ! पण त्याच्या कितीतरी आधी गांधीजींनी ‘स्वत:’ला संपवले होते. जसजसा गांधीजींच्या ‘स्व’चा डोलारा कोसळत गेला, तसतसे ते अधिकाधिक लोकांचे होत गेले. अख्ख्या राष्ट्राचा आवाज बनले.’- ‘नेतृत्वाचा ‘हा रस्ता’ मला मोह घालतो’ अशी कबुली देणारे राहुल गांधी वर्तमान नेतृत्वाच्या ‘सर्वज्ञ’ हट्टाविषयीही अर्थातच बोलले; पण ते त्यांच्या मूळ विचारप्रक्रियेला छेदणारे नव्हते.
(लेखिका लोकमतच्या फीचर एडिटर आहेत.)aparna.velankar@lokmat.com