आर्ट ऑफ लिव्हिंग’ या जीवनप्रणालीचे जगद्गुरुश्री श्री रविशंकरयांच्याशी अस्वस्थ काळातला एक संवाद
*गुरुजी, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तुम्ही एक ट्विट केलं होतं, की ‘ही अस्वस्थतेची लक्षणं ओळखा. तुमच्या अस्वस्थ जीवलगांना योगसाधना आणि प्राणायामाकडे वळवा !’ माणूस स्वत:पासूनही लपवून ठेवतो, ती ही अस्वस्थता ‘बाहेरून’ ओळखता येऊ शकते का?- अर्थात !! तुमचं मन आणि संवेदना सतर्क असतील, तर जीवलगांच्या चेहर्यावरच्या बदललेल्या रेषा, त्यांचा सततचा खिन्न स्वर तुमच्या नजरेतून सुटणं शक्य नाही. तुम्ही हवापाण्याच्या गप्पा करताच ना, मेरा कहना है, की थोडा अंदर झांकीये !! औदासीन्य, अस्वस्थता यावर बाह्य उपचारांचा परिणाम अत्यंत र्मयादित स्वरूपाचा असतो. तिथे मदतीला येतो तो आपल्या ‘आत’ जाण्याचा प्रवास ! योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान ही या प्रवासाची सवरेत्तम साधनं आहेत, यावर आता जगभरातल्या शास्रीय संशोधनांनीही मोहर लावलेली आहे.लॉकडाऊनच्या या अस्वस्थ काळात आम्ही मेडिटेशनसाठी ऑनलाइन सत्रं घेतो आहोत. लोक सांगतात, गाठी सुटल्यासारखं वाटलं मनातल्या. धीर मिळाला. मनात कोंडलेल्या रागाला वाट मिळाली.
* कोरोना नंतरच्या ‘न्यू नॉर्मल’ जगातले उद्योगधंदे, व्यापार, मनोरंजन.. मानवी व्यवहाराच्या सगळ्याच रीती कशा बदलतील, यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण या अभूतपूर्व ताणातून गेलेल्या माणसांच्या मनाचं काय होईल, असं तुम्हाला वाटतं, गुरुजी?- असं पाहा, कोरोनाचा हल्ला होण्यापूर्वी औदासीन्य, ताणतणाव वाढलेले होतेच माणसाच्या आयुष्यात. जागतिक आरोग्य संघटनेने तर जाहीरच केलं आहे, की डिप्रेशन ही यापुढच्या काळात जगाला ग्रासून टाकणारी सर्वात विघातक व्याधी असेल. युरोपातले तर चाळीस टक्के लोक डिप्रेशनची शिकार आहेत, असं एक आकडेवारी सांगते. तिथे झालेल्या एका बैठकीत मी सुचवलं, की किती औषधं ध्याल डिप्रेशनवर? किती काळ घ्याल? आणि किती जणांना औषधं देत राहाल? ही तात्पुरती मलमपट्टी आहे. मनाच्या दुखण्यावर औषध एकच : स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची हिंमत कमावणं !.. आणि त्यासाठी आपल्या एकूणच जीवनशैलीत बदल करण्याची तयारी असणं ! योगाभ्यास ही या नव्या जीवनशैलीची ओळख असली पाहिजे. कोरोनाच्या संकटातून पार पडताना मानवी मनांवर उठलेले ओरखडे दीर्घकाळ राहातील, त्यासाठी ना कुठलं औषध असेल, ना कसली लस !
* मनाच्या व्याधींवर बाह्य औषध उपयोगाचं नाही, हे लक्षात घेऊन शालेय वयापासून मुलांना योगाभ्यासाची दीक्षा दिली पाहिजे, असा मतप्रवाह जगभरात बळावतो आहे, र्जमनीने तर तिसर्या इयत्तेपासून मुलांना योगासनं शिकवायला सुरुवात केली आहे..?- मी तेच म्हणतो, निदान आता तरी भारताने जागं व्हावं. लहान मुलांसाठीच्या अभ्यासक्रमात तर योगसाधनेचा समावेश असावाच; पण ही मुलं मूळ प्रवाहात यायला अजून दहा-पंधरा वर्षं आहेत. तोवर आत्ताच्या मोठय़ा माणसांना कसं वार्यावर सोडता येणार? कॉलेजं आणि विद्यापीठांमध्येही योगाभ्यासासाठी वेळ राखीव असला पाहिजे. अगदी कामाच्या ठिकाणीही जेवणाची सुट्टी अर्धा तास असेल, तर त्यातली वीस मिनिटं ध्यानधारणेसाठी राखून ठेवली पाहिजेत. योगाभ्यास ही काही फक्त विचारी मनांचीच गरज आहे, असं नव्हे. शारीरिक कष्ट करणारा कामगारही मोठय़ा मानसिक तणावातून जात असतो. त्याचंही लक्ष ‘मना’वर वळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यातून काही प्रत्येकानेच आध्यात्मिक उन्नती साधावी असं नव्हे! रोजच्या जगण्यातली ऊर्जा वाढवायला, आनंद निर्माण करायला आणि नैराश्याचं मळभ हटवून प्रसन्नतेचं कमळ फुलवायला योगाभ्यासच मदत करेल. फार नाही, रोज दहा मिनिटं काढा.. तेवढंही पुरेसं आहे!
* गुरुजी, आपल्या मुलांचं काय? मुलं फार चिडचिडी, चंचल झाली आहेत. त्यांचं कशात धड लक्ष लागत नाही..?- कसं लागेल? त्यांच्या हातात मोबाइल नावाचं एक खेळणं सोपवून अतिरेकी माहितीच्या समुद्रात ढकलून दिलं आहे ना आपण त्यांना ! आपल्या मुलांना व्हच्र्युअल जगाची माहिती असली पाहिजे, नव्या जगात जगायला ती सक्षम झाली पाहिजेत, हे मान्यच ! पण याचा अर्थ त्यांचं वास्तव जगण्याशी नातं तुटलं, तरीही त्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं नव्हे. आपल्या मुलांना मित्र नाहीत, ती मातीत खेळत नाहीत, पडत-धडपडत नाहीत, हा काळजीचा विषय नाही का? ज्या सिलिकॉन व्हॅलीत अनेक गॅजेट्स आणि अँप्स जन्माला येतात, तिथले तंत्रज्ञ आपल्या मुलांचा स्क्रीनटाइम कमी करत आहेत. आपल्यालाही हे करावं लागेल. आभासी जगात रमणारी आपली मुलं वास्तव जगाशी दोन हात करायला शिकली, तरच ती आत्महत्येपासून दूर राहातील, हे लक्षात घ्या!
* मोबाइल या यंत्राला तुम्ही शत्रुवत मानता का? मोबाइल हा माझा नव्हे, मन:शांती आणि मन:स्वास्थ्याचा मोठा शत्रू होऊन बसला आहे. आम्ही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या वतीने योग प्रसाराला सुरुवात केली, तेव्हा हा मोबाइल नव्हता. त्यामुळे माणसांची मनं जरा कमी गर्दीची होती. आता प्रत्येकाहाती असलेला मोबाइल याच योगसाधनेचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसला आहे. देखिये, ये मोबाइलका नेटवर्क आपको बाहरका कनेक्शन देता है, लेकिन सवाल ये है, की अंदरका कनेक्शन आप खरीद नही सकते, ना ही सोशल मीडियाके लाइक्स आपको वो सुकून दे पायेंगे..
* ‘कोरोनाची महामारी संपल्यानंतरही अख्ख्या जगाने दरवर्षी एक आठवडा स्वयंघोषित बंद पाळावा’, अशी जाहीर मागणीच तुम्ही काही दिवसांपूर्वी केली होती. या वार्षिक लॉकडाऊन’मुळे काय साध्य होईल असं तुम्हाला वाटतं? - सतत धावणार्या अस्वस्थ माणसांना थोडी उसंत मिळेल, आपल्या जीवलगांबरोबर चार निवांत क्षण घालवता येतील आणि मुख्य म्हणजे माणसाने स्वत:च्या सुखासाठी सतत ओरबाडून रक्तबंबाळ केलेल्या पृथ्वीलाही जरा मोकळा श्वास घेता येईल. लॉकडाऊनच्या काळात आपल्या नद्या पुन्हा खळाळू लागल्या, हवेतलं प्रदूषण कमी झालं. याचा अर्थच हा की, निसर्गालाही आपलं ‘पुनर्भरण’ करायला थोडी उसंत मिळाली पाहिजे. फक्त हा लॉकडाऊन पूर्वनियोजित आणि पूर्ण विचारांती केलेला असावा. काय हरकत आहे? .. काम थांबवा, वाहतूक थांबवा, घरी बसा, संगीत ऐका, आपल्या बिघडत चाललेल्या नात्यांना थोडं पाणी घाला.. नवी चेतना स्वत:मध्ये भरून घ्या!!यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान नाही होणार का? - अर्थातच होईल; पण ते फायद्यापेक्षा कमीच असेल, हे नक्की !