शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

शिक्षणाचे जादूभरे बेट

By admin | Published: January 28, 2017 4:18 PM

माझं नववीपर्यंतचं शिक्षण गांधीजींच्या ‘नई तालीम’ शिक्षणपद्धतीत झालं. फणसाच्या गर्द झाडावर चढून जंगल व प्राण्यांची ओळख आम्हाला झाली. बोरं, आवळे, करवंदं, कैऱ्या खात आम्ही वनस्पतिशास्त्र शिकलो. खऱ्या गायींसाठी खराखुरा हौद बांधताना गणिताची ओळख झाली. शाळेत भांडी घासता घासता आहारशास्त्र, अर्थशास्त्र, स्वयंपाकशास्त्र शिकलो. शाळेनेच दिलेल्या जमिनीच्या तुकड्याला पाणी घालताना कृषिशास्त्र कळलं.

. डॉ. अभय बंग

मी लहानपणी जशा शाळेत शिकलो तशी शाळा माझ्या मुलाला - आनंदला - मी देऊ शकलो नाही ही माझी एक खंत आहे. असं खरंच माझ्या शाळेत काय होतं? माझं नववीपर्यंतचं शिक्षण गांधीजींच्या ‘नई तालीम’ शिक्षणपद्धतीत झालं. त्यातली चार वर्षे तर मी प्रत्यक्ष सेवाग्राम आश्रमातील नई तालीम विद्यालयात शिकलो. शिक्षण म्हणजे चार भिंतींच्या आत बसून घोकंपट्टी पद्धतीने देण्याचा रटाळ धडा नाही, तर निसर्गासोबत राहून समाजोपयोगी भूमिका करताना प्राप्त होणारा संस्कार, विकास व कौशल्य आहे असा नई तालीम शिक्षणपद्धतीचा मुख्य विश्वास होता. या कल्पनेनुसार नवी शिक्षणपद्धती विकसित करण्यासाठी गांधीजींच्या मागणीवरून रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमधून आर्यनायकम् व आशादेवी या जोडप्याला पाठवलं. त्यामुळे गांधीजींच्या जीवन-शिक्षणपद्धतीला रवींद्रनाथांच्या निसर्ग व कलाप्रेमाची जोड मिळाली. त्यांनी ही शाळा सुरू केली. पुढे माझाी आई - सुमन बंग - या शाळेची मुख्याध्यापिका झाली. या शाळेतील शिक्षणपद्धती कशी होती? सेवाग्रामला गांधीजींच्या आश्रमाशेजारीच माझी शाळा होती. कुडाच्या भिंती व कौलारू छताची ही शाळा. दरवर्षी शाळा सुरू होताना प्रथम पहिला आठवडा आम्ही विद्यार्थीच शाळेला लिंपायचो, रंग द्यायचो, छत शाकारायचो. शाळेभोवती असलेली शेतं, विहिरी, गोशाळा, कपडा विणण्याचं ‘कबीर भवन’, सामूहिक स्वयंपाकगृह, कला भवन, बापूंची कुटी व प्रार्थनेची भूमी हे सर्व मिळून माझी शाळा होती. इथे जगता जगता शिकायचं. जंगल व प्राण्यांची ओळख वने व वन्यप्राणी संरक्षण याविषयी बोलणं हे आज चलनी नाणं झालं आहे. पण पन्नास-साठ वर्षांपूर्वी जेव्हा हे विषय चर्चिलेही जात नव्हते, तेव्हा माझ्या या शाळेतील बाबा पाटील नावाच्या गुरुजींनी आमचे मराठीचे वर्ग फणसाच्या गर्द झाडावर चढून, फांद्यांवर बसून चालवले होते. त्यांनी तिथे आम्हाला जंगलच्या गोष्टी, त्यांनी स्वत: केलेल्या शिकारीच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक पाडस असलेली हरिणी हातून मारली गेल्याने त्यांनी बंदूक कायमची फेकून दिली. त्यानंतर त्यांनी घेतलेलं विविध प्राण्यांचं दर्शन, त्यामुळे त्यांना प्रथमच निर्माण झालेली वन्यप्राण्यांविषयी आपुलकी असल्या गोष्टी त्यांनी रंगवून सांगितल्या. कानात प्राण आणून, त्यांच्यासोबत झाडावर बसून आम्ही त्या ऐकल्या. मला जंगलाविषयी प्रेम व ओळख यातून निर्माण झाली. रसहीन धडे वाचणं किंवा ‘प्राणी म्हणजे पशू’ अशी पाठांतरं करणं ही मुलांची आजची मराठी शिक्षणाची अवस्था आहे. गडचिरोलीसारख्या जंगलांच्या जिल्ह्यात राहूनही त्यांच्या शाळेचा व जंगलाचा दुरूनही संबंध नाही. संत मेळावा तुकारामाचे अभंग कडू औषध प्याल्याप्रमाणे पाठ करण्याची पाळी मराठी शिक्षणात आमच्यावर आली नाही. शाळेत आषाढी एकादशीच्या वेळी ‘संत मेळावा’ साजरा व्हायचा. वेगवेगळ्या संतांची भजने संगीतासह बसवणे, त्यांच्या जीवनावर नाटके बसवून सादर करणे, चित्र काढणे, लेख लिहून विद्यार्थ्यांचा हस्तलिखित अंक काढणे असल्या गोष्टीत पूर्ण शाळा पंधरा दिवस रमलेली असायची. तुकारामाचा ‘जे का रंजले गांजले’ हा अभंग तीन प्रकारच्या विविध चालींनी गायला मी यादरम्यान शिकलो व सोबतच भैरवी राग पण शिकलो. संतांचे काव्य, त्यांचा इतिहास, त्यांचे तत्त्वज्ञान हे सर्व आम्ही खोलवर डुंबून शिकत होतो; फक्त त्या शिकण्यावर भाषा, इतिहास, संगीत किंवा तत्त्वज्ञान असली विषयांची लेबले नव्हती. त्यामुळे तुकाराम, मीराबाई, कबीर व भैरवी राग आजही माझ्यासोबत आहेत. असं शिकलो वनस्पतिशास्त्र बहुतेक शाळांमध्ये वनस्पतिशास्त्र हे पुस्तकातील आकृत्या किंवा काचेच्या शिशीत ठेवलेले वनस्पतींचे नमुने यांवरून शिकवतात. मुळांचे प्रकार, पानांचे प्रकार असली माहिती कटकटीच्या रूपात विद्यार्थी पाठ करतात व परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी विसरून जातात. सेवाग्रामच्या नई तालीम विद्यालयात व भोवताली शेती व बगीच्यांमध्ये विविध प्रकारची झाडे होती. आमचे शिक्षक आम्हाला घेऊन या आसमंतात भटकायचे, दिसणाऱ्या झाडांची नावे सांगायचे व त्यांची पाने, फुले, फळे दाखवायचे. सोबत आमचं बोरं, आवळे, करवंदं व कैऱ्या तोडून खाणंदेखील सुरू असायचं. (असले खाद्यवर्ग नंतर मी फक्त अमेरिकेत पाहिले, पण तिथे वर्गात बसून चॉकलेट खाणं व कोकाकोला पिणं चालायचं!) फळे खाता खाता बोर आणि आंबा ह्यांची फळे कशी सारखी आहेत व या ड्रूप नावाच्या फलप्रकाराची वैशिष्ट्ये काय हेदेखील समजून व्हायचं! ‘ड्रूप’ या फळ प्रकारात फळाच्या आत कडक कवचाची आठोळी असते हे आंबा तोडून खाताना शिकवल्यावर कसं बरं विसरणार? बॉटनीची थिअरी सगुण साकार रूपात आमच्या सर्व बाजूंना पसरली होती. ती बघायला आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं. त्यामुळे ‘पामेट डायव्हर्जंट रेटिक्युलर’ हा पानांच्या रेषांचा प्रकार केवळ अगडबंब नाव वाटायचा नाही, डोळ्यासमोर स्वत:च्या घरामागच्या पपईचं पान उभं राहायचं! परीक्षा म्हणून आमच्या शिक्षकांनी आम्हाला (वर्ग ७ वा) विविध प्रकारच्या पाना, फुलांचे वैज्ञानिक अल्बम बनवायला सांगितले. पूर्ण आसमंत आम्ही छानून काढला. आज पन्नास वर्षांनंतरही सेवाग्राम परिसरात ‘पामेट डायव्हर्जंट रेटिक्युलर’ या प्रकारात मोडणाऱ्या पानांची विविध झाडे कुठे कुठे होती हे मी बघू शकतो. पुढे कॉलेजमध्ये वनस्पतिशास्त्र शिकायला विशेष काही प्रयास करावे लागले नाही. या विषयात मी कॉलेजमध्ये प्रथम आलो तेव्हा आमचे प्रोफेसर कौतुक करायला लागले. मी मनात म्हटले, ‘सर, मी वनस्पतिशास्त्र कॉलेजमध्ये नाही शिकलो, सेवाग्रामच्या शाळेत ते जगलो!’ त्या शाळेने मला झाड नावाचे मित्र दिले. ते आयुष्यभर सोबत राहिले. जीवनाशी संबंध असलेले गणित ‘एका हौदाला दोन तोट्या आहेत. एकाने पाणी येते, दुसरीने गळून जाते, तर किती वेळात हौद रिकामा होईल?’ असल्या प्रकारची गणितं गणिताच्या पुस्तकात वाचताना नेहमी प्रश्न पडतो की गणित शिकवण्याचा जीवनाशी संबंध जोडताच येणार नाही का? शहाणा माणूस हा वेळेचा हिशेब करण्याऐवजी ती गळती तोटी बंद करील व प्रश्न सोडवील. नई तालीम विद्यालयात मी गणित कसं शिकलो? रोज सकाळी तीन तास उत्पादक काम हा तेथील शिक्षणाचा भाग होता. गांधीजींचा ‘ब्रेड लेबर’ (स्वकष्टाची भाकरी) चा आग्रह तर त्यामागे होताच; पण सोबतच शिक्षणातून समाजोपयोगी कौशल्य व विज्ञान-शिक्षण प्राप्त करणे ही विनोबांची दृष्टीही त्यामागे होती. याप्रमाणे काही दिवस मी गोशाळेत काम करण्यास जात होतो. नवी गोशाळा बांधणं सुरू होतं. माझ्या शिक्षकांनी मला जबाबदारी दिली की एक गाय दररोज सरासरी किती पाणी पिते हे मोजून गोशाळेतील गायींच्या पिण्याच्या पाण्याची एकूण गरज व तेवढे पाणी मावू शकेल अशा टाक्याचे माप ठरव. त्या टाक्याच्या भिंतींना किती विटा लागतील याचा हिशेब करून विटा विकत बोलव. गवंड्याच्या मदतीने हौद बांध. हे गणित व काम मला आठवडाभर पुरलं. घनतेची कल्पना व विविध आकाराचे घनमाप कसे काढावे (बादली ही निमुळता दंडगोल, हौद हा घन, तर त्याच्या भिंती हे घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ) या गणिती पद्धती मी यातून शिकलो. खऱ्याखुऱ्या गायींना लागणाऱ्या पाण्यासाठी मी खरोखरचा हौद बांधला व तो बांधताना लिटर, घनमीटर, चौरस सेंटिमीटर हे सर्व मोजायला शिकलो. जीवन हेच पुस्तक. काम हाच धडा. ते करता करता मिळालं ते शिक्षण. पुढे विनोबांच्या ‘शिक्षण-विचार’ या पुस्तकात वाचलं - जे दिलं जातं, घेतलं जातं ते शिक्षण नाही. जगता जगता प्राप्त होतं ते शिक्षण. शिक्षण हे जीवनाचे आनुषंगिक फळ आहे. स्वयंपाकातून शिक्षण आमच्या शाळेच्या रसोईघरात जवळपास शंभर जणं जेवत. स्वयंपाकाची जबाबदारी पाळीपाळीने आठ जणांच्या टोळीवर येई. या टोळीला स्वयंपाकासाठी प्रतिमाणसी किती रुपयांचं बजेट उपलब्ध आहे हे सांगण्यात आलं. आहारशास्त्राच्या दृष्टीने संतुलित, सर्वांना आवडणारे पण उपलब्ध बजेटमध्ये बसणाऱ्या जेवणाची आठवडाभराची योजना बनवताना आमची धांदल उडाली. बटाट्याची भाजी स्वस्त पडे, पण त्यात आहाराचे तत्त्व कोणते हे पुस्तकात पाहिल्यावर फक्त स्टार्च आहे हे कळल्याने ती बाद होई. किमान आवश्यक तैल पदार्थ किती हे आय.सी.एम.आर.च्या पोषणविषयक तक्त्यांवर पाहून तेवढे तेल टाकले तर ते बजेटच्या बाहेर जाई. कधी वरण कच्चं राहायचं, कधी भाजीत तिखट जास्त. मग रात्रीच्या स्वयंपाकाची भांडी घासता घासता आज हरलेल्या लढाईचे जखमी सैनिक उद्याच्या स्वयंपाकाची पुनर्आखणी करीत. या जबाबदारीतून आहारशास्त्र, घरगुती अर्थशास्त्र व स्वयंपाक ही तीन शास्त्रे आम्ही शिकलो. कोथिंबिरीमध्ये १०६०० युनिट्स ‘अ’ जीवनसत्त्व आहे व कढीलिंबाच्या पानात १२००० युनिट आहे हे आजही जे माझ्या लक्षात आहे ते पुढे मेडिकल कॉलेजमध्ये दहा वर्षे शिकल्यामुळे नाही, तर आठवीत स्वयंपाकघरात या पद्धतीने काम केल्यामुळे आहे. त्यानंतर खूप वर्षांनी मी महाराष्ट्र शासनाच्या किमान मजुरीच्या दराला आव्हान दिले. पागे समितीचा मजुराला आवश्यक कॅलरीवर आधारित किमान मजुरीचा हिशेब चूक आहे हे दाखवून योग्य तो वैज्ञानिक हिशेब मांडला. त्यासाठी आवश्यक कॅलरीजचा हिशेब व अर्थशास्त्र मी सेवाग्रामच्या रसोईघरात शिकत होतो. शेतीचे प्रयोग आम्हा प्रत्येक विद्यार्थ्याला शेतीचा एक छोटासा तुकडा देण्यात आला होता. तिथे काय पेरायचं, मशागत कशी करायची, खत कोणतं द्यायचं ही सर्व जबाबदारी आमची. विहिरीचे पाणी आपआपल्या शेतीला देण्यासाठी मुलांची रांग असायची. त्यामुळे बऱ्याच वेळा रात्री नंबर लागायचा. मध्यरात्री कोल्ह्यांना निरखीत आपल्या शेताला पाणी द्यायला विद्यार्थी जायचे. ही शेती करताना कृषिशास्त्र व ग्रामीण अर्थशास्त्र यांची तोंडओळख झाली. खत देण्याआधी खतांचे रसायनशास्त्र समजून घ्यावे लागे. बऱ्याचदा अनुभवी शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी शरण जावे लागे. जपानहून भातशेतीची नवी पद्धत शिकून आलेले मुक्तेश्वरभाई, द्राक्षांच्या शेतीचा पहिला प्रयोग करणारे प्रेमभाई ही माणसे आसपास प्रत्यक्ष शेतीचे प्रयोग करीत असत. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे शेतीच्या अर्थशास्त्राचे नवेनवे प्रयोग सुचवीत असत. या वातावरणात शेती करता करता आम्ही काय शिकलो नाही? कुणाच्या शेतीत अधिक उत्पादन होते याची आम्हा विद्यार्थ्यांत स्पर्धा असे. खत म्हणून मी वांग्याच्या शेतीत बादल्यांनी गोमूत्र दिलं. वांग्याची झाडं माझ्याहून उंच झाली. एक वांगं तर पावणेदोन किलोचं निघालं. पुढे वर्धेच्या बाजारात कुणीच ते अजस्त्र वांगे विकत घेईना ही गोष्ट अलाहिदा! गिऱ्हाईक म्हणाले- आठवडाभर हे एकच वांगं कोण खाणार? सजीव शिक्षण शरीरश्रम करण्यात विद्यार्थ्यांचा शालेय वेळ खर्ची पडल्याने नई तालीमचा विद्यार्थी ज्ञानात मागे पडतो असा एक आरोप अनेक वेळा केला जाई. मद्रास प्रांतात बेसिक एज्युकेशन सुरू केले तेव्हा, ‘आमच्या मुलांना शरीरश्रमात गुंतवून अभ्यासात मागे ठेवतात’ या गैरसमजापायी तत्कालीन मुख्यमंत्री राजाजींना राजीनामा द्यावा लागला. वस्तुस्थिती काय होती? अनावश्यक माहितींची भेंडोळी विद्यार्थ्यांच्या डोक्यात ठासून भरून ठेवणे व परीक्षेच्या वेळी त्याने ती जादूगारासारखी पटापट बाहेर काढणे हा शिक्षणाचा खरा अर्थ नाही. ‘सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या महोत्पादनाच्या चार पद्धतींची विस्तृत माहिती’ याचा नववीतील मुलाला काय उपयोग? पण रूढ शिक्षणात हे त्याकाळी शिकवले जायचे. असल्या निरुपयोगी माहितीशी नई तालीममध्ये परिचय नसायचा. जीवनाशी संबंधित शास्त्रात नई तालीमचा विद्यार्थी अधिक सखोल व कुशल असे. भूगोल हा विषय या माझ्या जादूभऱ्या शाळेत मी कधीच औपचारिकरीत्या शिकलो नाही. पण भारताच्या विविध भागांतून व विदेशांतून येणाऱ्या पाहुण्यांची त्यांच्या देशांविषयी भाषणे व प्रश्नोत्तरी यातून अनेक देशांची ओळख झाली. आम्ही मुलं देश-विदेशांची पोस्टाची तिकिटे गोळा करायचो. भारतातली ऐतिहासिक स्थाने, जगभरातले अनेक देश त्यातून भेटले. इटलीचं तिकीट मिळालं की अ‍ॅटलास उघडून इटली देश कुठे आहे हे बघायचं. हंगेरी देशाची तिकिटे फारच सुंदर म्हणून हंगेरीशी मैत्री. पोस्टाची तिकिटे, अवांतर वाचनात वाचलेली प्रवासवर्णने व कथाकादंबऱ्यात येणारी विविध देशांची पार्श्वभूमी यातून मी भूगोल शिकलो. नववीत असताना शरत्चंद्रांचे ‘पथेर दावी’ आणि झवेरचंद्र मेघाणीचे ‘प्रभू पधारे’ या कादंबऱ्यांतून ब्रह्मदेशात गेलो व तो परिचय पुढे मला प्रत्यक्ष जीवनात ब्रह्मदेशात घेऊन जाण्याला कारणीभूत झाला. भूगोल हा सजीव विषय होता, बुद्धीवरचा भार नव्हता. राजनीती व सामान्यज्ञान यासाठी आमचे शिक्षक फार वेगळा मार्ग वापरीत. दररोज संध्याकाळी ते आम्हा सर्वांना वर्तमानपत्रातील ठळक किंवा रंजक बातम्या वाचून दाखवीत व सोबत त्या घटनांमागचा इतिहास, राजकारण सांगीत. क्युबाला रशियाने पाठवलेली अणुअस्त्रे व ती थांबवण्यासाठी अमेरिकेने केलेली कारवाई ही त्या काळातली एक प्रमुख घटना होती. त्यावरून दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचे भांडवलशाही व साम्यवादी अशा दोन गटात झालेले विभाजन व त्याचा इतिहास, अमेरिका व रशिया यामधील वैमनस्याचे कारण, क्युबाच्या क्रांतीची माहिती सांगत. त्या काळात भारत-चीन सीमावाद, तिबेटचा प्रश्न, आयुबखानांची लष्करी हुकूमशाही, केनेडींचा भारत दौरा या सर्व गोष्टी घडत होत्या. ही सर्व आमच्या रोजच्या शिक्षणाची सामग्री होती. इस्राईल देशाचे श्री. हलेवी सेवाग्राममध्ये राहत होते. त्यांनी बैलाऐवजी घोडा लावून शेत नांगरले याची आम्हाला फार मजा वाटायची. हलेवींमुळे इस्राईल नावाचा देश, त्याच्या निर्मितीचा इतिहास, ज्यू लोकांचा प्रश्न यांच्याशी ओळख झालीच; शिवाय इस्राईलमधला सामुदायिक जीवनाचा, किबुत्जचा प्रयोग, त्याच्याशी विनोबांचे ग्रामदान व चीनमधील कम्यून यांचे साम्य व भेद सर्व सहज कळत गेलं. अभिनव पद्धती या शाळेत परीक्षेत पेपर सोडवण्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष शेती व स्वयंपाक करण्यापासून नाटक बसवून सादर करणे, भाषण देणे, लेख लिहिणे या विविध अंगांची परीक्षा व्हायची. सर्वात आगळा प्रयोग म्हणजे वर्ग ही कल्पना अत्यंत लवचिक करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थी काही विषयांत अधिक चांगला व काही विषयांत कमी चांगला असतो. त्याला सर्व विषयांसाठी एकाच वर्गात बसवण्याऐवजी प्रत्येक विषयातील त्याच्या पातळीनुसार त्या त्या विषयांसाठी वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले. म्हणून मी एकाच वर्षी इंग्रजीत सातवी, गणितात नववी व मराठीत दहावीमध्ये होतो. इंग्रजीत सातवीत होतो कारण मध्यंतरी दोन वर्षे मी इंग्रजीविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला होता. ‘भारतावर गुलामी लादलेल्या देशाची भाषा मी शिकणार नाही’ अशी माझी भूमिका होती. मला शिक्षकांनी समजवून पाहिलं. पण माझा हट्ट कायम होता. गांधीजींच्या शाळेत माझ्यावर इंग्रजी लादणे नैतिकदृष्ट्या शिक्षकांना शक्य नव्हतं. त्यांनी माझं स्वातंत्र्य मान्य केलं. दोन वर्षे माझा इंग्रजीविरुद्ध सत्याग्रह चालला. त्यामुळे माझं इंग्रजी सुरुवातीला थोडं मागे राहिलं. पण त्याहून महत्त्वाचं - निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य - मी शिकलो. पुढे ते पदोपदी कामी आलं. मूल्यशिक्षण हा या शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. विचारस्वातंत्र्य, श्रमनिष्ठा, स्वावलंबन, समता, सामूहिकता या गोष्टी आम्ही शाळेत दररोज प्रत्यक्ष आचरणात आणून जीवनात जिरवत होतो. शिवाय या मूल्यांसाठी चालणाऱ्या व्यापक चळवळीतही विद्यार्थ्यांचा सहभाग होता. दरवर्षी काही काळ पूर्ण शाळा बंद होऊन भूदान चळवळीत भाग घ्यायला जायची. पुढील आयुष्यात मी अनेक भूमिका जगलो. डॉक्टर झालो, समाजसेवकही झालो, वैज्ञानिक संशोधनही केलं, राजनैतिक आंदोलनही केलं, संस्था-संघटनाही उभ्या केल्या, शिकलो-शिकवलं, एवढंच काय तर लेखक, संपादक व वक्ताही व्हावं लागलं. या सर्वच भूमिकांसाठी माझी तयारी नववीपर्यंतच्या त्या नई-तालीम शिक्षणाने केली. गिळंकृत झालेले बेट माझ्या शाळेचे हे वर्णन आज सांगतो तेव्हा अनेकजण विचारतात, ‘आता आहे का ती शाळा? आम्ही आमच्या मुलांना पाठवू.’ हीच या शाळेची शेवटची गोष्ट सांगायची राहिली. गांधीजींचे ग्रामोद्योग शासनाने अडगळीत टाकले व प्रस्थापित कारखान्यांच्या स्पर्धेत ते बाद झाले. तसंच, या शाळेला शासकीय मान्यता नसल्याने तीदेखील प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकू शकली नाही. शासकीय मान्यता नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पुढे शैक्षणिक भवितव्य नसे. निव्वळ या एका कारणाने पालक या शाळेत आपली मुले पाठवू इच्छित नसत. समाज व शासन या शिक्षणाला मोजत नव्हते. परिवर्तनाचे बेट आजूबाजूच्या विरोधी वातावरणात फार काळ टिकून राहू शकत नाही. याच कारणांनी समाजाच्या स्वार्थाच्या व स्पर्धांच्या लाटांनी एक दिवस शिक्षणाचे हे अद्भुत बेट गिळून टाकले. नंतर माझ्या मुलांना मी त्या बेटावर पाठवू इच्छित होतो. पण ते जादूभरे बेट आता कुठे होतं? 

 
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सर्च’चे संस्थापक आहेत.)
 

shodh.yatra@gmail.com