(क्षण-चित्र)
- सुधारक ओलवे
काही शतकं जुन्या कोरीव दगडी मूर्तीच्या विशाल बाहूंवरून, अंगाखांद्यावरून दुधाचा धबधबा वाहत होता. त्यानंतर केशर-तुपाच्या नद्या झुळझुळत वाहू लागल्या. त्या अभिषेकासोबतच पवित्र मंत्रंचं उच्चरण वातावरण पवित्र, धीरगंभीर करत होतं. आणि हात जोडून, जिवाचे अक्षरश: डोळे करून लाखोंची गर्दी ते चित्र आपल्या मनात साठवून घेत होती. हे सारं आपल्यासमोर घडताना पाहण्याचं सुखही त्या लाखो माणसांच्या नजरेतून ओसंडून वाहताना दिसत होतं.
महामस्तकाभिषेक. दर बारा वर्षानी साजरा होणारा हा उत्सव.
कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ शहरातली ही गोष्ट. 2006 मध्ये या सोहळ्यासाठी गेलो होतो. गोमतेश्वर बाहुबलीची अतिभव्य मूर्ती. ही मूर्ती आपल्याला 2300 वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाते. जैन धर्मीयांचं हे एक तीर्थस्थान. जैन कला, स्थापत्यकला आणि धार्मिक महत्त्व यासाठी ही जागा अतीव पवित्र! सुंदर तळ्यांचं आणि लहानमोठय़ा मंदिरांचं हे शहर. या शहराविषयी, तिथल्या सौंदर्याविषयी आणि त्या सोहळ्याविषयी मी बरंच काही ऐकलं होतं. फोटो पाहिले होते. 2004 मध्ये ठरवलंच की हा नेत्रसुखद, अतिभव्य सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी श्रवणबेळगोळला जायचंच! महाभव्य बाहुबलीची ही 57 फुटांची मूर्ती एकसंध ग्रॅनाईटच्या खडकातून कोरलेली आहे. गंगा राजवंशातले एक मंत्री आणि सेनापती चामुंडराय यांनी बारा वर्षाच्या अथक मेहनतीनं हे शिल्प साकारलं. बाहुबलीच्या विशाल कर्तृत्वाला प्रत्यक्ष साकार स्वरूप देण्याचं काम या महाकाय शिल्पानं केलं. पहिले जैन र्तीथकर रिषभनाथ यांचे बाहुबली हे सुपुत्र. राज्यसत्तेसाठी बाहुबलींनी त्यांच्या मोठय़ा भावाशी भारतशी तीनदा युद्ध करून त्याचा पराभव केला. अखेरीस भारतने आपल्या भात्यातलं अत्यंत प्राणघातक अस्त्र, ‘चक्र’ बाहुबलींवर चालवलं. पण त्या चक्रानं बाहुबलींना एक प्रदक्षिणा घातली आणि ते त्यांच्या उजव्या बाजूला येऊन स्थिरावलं. या उत्तुंग विजय-क्षणी बाहुबलींना साक्षात्कार झाला संपत्ती आणि सत्तेच्या व्यर्थतेचा. क्षणभंगूरतेचा. त्याक्षणी त्यांनी संन्यास घेत सर्वसंग परित्याग केला. तपस्येला सुरुवात केली. वर्षभर अन्नपाण्याविना घोर तपश्चर्या केली, त्यांच्या पायाशी मुंग्यांनी वारुळं केली, अंगाखांद्यावर वेली चढल्या. त्या तपस्येतूनच बाहुबलींना असीम ज्ञानाची प्राप्ती झाली. ‘केवली अरिहंत’ या स्थितीस ते प्राप्त झाले. बाहुबली नावाच्या एका पराक्रमी योद्धय़ाचं साक्षात ईश्वरी रूपांतर झालं!
महामस्तकाभिषेक हा भव्य सोहळा दर बारा वर्षानी साजरा होतो तोच, ही सारी भव्यता यथार्थ ठरवत. (आगामी सोहळा 2018 मध्ये आहे.) या मूर्तीवर दुधातुपाचा, उसाच्या रसाचा अभिषेक होतो. मूर्तीला केशराचा लेप लावला जातो. चंदनपावडर, हळद, कुंकवानं पुजलं जातं. सोन्याचांदीची नाणी, मौल्यवान मोती, रत्नंही अर्पण केली जातात. हे सारं सुरू असताना त्या मूर्तीवरून क्षणभरही नजर हटत नाही. ते पाहता पाहता आपण काही शतकं जुन्या काळात जातो, तेव्हाची संस्कृती पाहतो आणि वाटतं, ही भव्य मूर्ती जशी काळाच्या निरंतर प्रवाहात टिकून राहिली आहे, तशीच ती संस्कृतीही तितक्याच जोरकसपणो आपली मुळं घट्ट धरून आहे. आजही!
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)