- राजू इनामदार-
महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील अन्य काही राज्यांच्या निर्मितीमागेही मोठा इतिहास आहे. मात्र याबाबत आपण अज्ञानी असतो. कारण आपल्याला त्याची गरज वाटत नाही किंवा वाटली तरी कोणी त्याबद्दल फारसे काही सांगतही नाही. एका राज्याच्या निर्मितीबाबत मात्र ही उणीव भरून निघाली आहे. छत्तीसगड हे त्या राज्याचे नाव व लाल श्याम शाह हे त्या राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार. काँग्रेसच्या अधिवेशनावर ४० हजार आदिवासींचा मोर्चा नेऊन थेट पंतप्रधान नेहरू यांना आदिवासींबरोबर बोलण्यास भाग पाडणाºया शाह यांची जीवनकथा साधना प्रकाशनाने मराठीत आणली आहे. गोंडवना या प्रदेशाच्या वर्णनापासून व भारताच्या फाळणीपासून या कथेची सुरुवात होते. पाकिस्तान व बंगालमधून येणाऱ्या लाखो निर्वासीतांचे करायचे काय, हा नव्या सरकारसमोरची फार मोठी समस्या होती. त्यांना त्या वेळचा मध्यप्रांत असलेल्या आदिवासीबहूल भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी तेथील जंगलांची कत्तल सुरू झाली. जंगलांच्या साह्याने जगत असलेल्या स्थानिक आदिवासी समूहांवर हा अत्याचारच होता. लाल श्याम शाह हे जमीनदार. अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रज सरकारने घेतली. राजकुमारांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर स्वातंत्र्याची पहाट झाली. इंग्रज निघून घेले. शाह सज्ञान झाल्यामुळे त्यांना त्यांची मालमत्ता मिळाली. आदिवासींसाठी, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा वसाच शाह यांनी उचलला व तो जीवनभर निष्ठेने पाळला. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे १९५७ मध्ये ते चांदा या विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा अपक्ष आमदार झाले, मात्र आदिवासींच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करते आहे अशी टीका करत त्यांनी दोन्ही वेळा राजीनामा दिला. आदिवासी लोक शाह यांना महाराज म्हणत. संसदेच्या कायद्याप्रमाणे जंगलातील झाडांची मालकी आदिवासींची झाली, मात्र ठेकेदार त्यांना फसवत. आदिवासींवर होत असलेल्या अशा अत्याचाराच्या विरोधात शाह यांनी आवाज उठवला. त्यासाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. एक नियतकालिकही चालवले. १९६७ मध्ये खासदारकीची निवडणूक लढवून ते जिंकले व आदिवासींच्या प्रश्नांवर सरकारला जबाबदार धरत त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. त्यांची सर्वच राजीनामापत्रे मूळातून वाचण्यासारखी आहेत. गोंडवना राज्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या हयातीत ती पुर्ण झाली नाही व नंतर झाली ती छत्तीसगड या नावाने. तत्पुर्वीच सन १९८८ मध्ये आपल्या स्वाक्षरीपुढे आदीवासी असे लिहिणाºया या राजाने देह ठेवला होता. सुदीप ठाकूर हे हिंदीभाषिक पत्रकार मुळ पुस्तकाचे लेखक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी शाह यांच्याबाबत केलेल्या एका उल्लेखाने त्यांना प्रेरणा मिळाली. चंद्रकांत भोंजाळ यांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद साधना प्रकाशन यांनी प्रकाशित केला आहे. साने गुरूजींचे आंतरभारतीचे स्वप्न साधना या पद्धतीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पुस्तकाच्या अखेरीस नायकाचा जीवनपट दिला असता, तर अधिक परिपूर्ण झाले असते. (लेखक लोकमत पुणे आवृत्तीत वरिष्ठ बातमीदार आहेत.)