- सुनील पु. आरेकर
महाराष्ट्राच्या भूमीत प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे अनेक गड-किल्ले, मंदिरे वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन कलाविष्काराचा उत्तम नमुना असलेले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कसबा येथील हेमाडपंती शिवालय अप्रतिम शिल्पकलेच्या दुनियेत घेऊन जाते. शिवशंकर व भगवान विष्णू यांची मूर्ती असल्यामुळे संयुक्त असे विदर्भातील एकमेव मंदिर म्हणता येईल. तेथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सामाजिक एकोपा निर्माण करणारा यात्रा महोत्सव वर्षानुवर्षांपासून साजरा केला जातो.दारव्हा-आर्णी राज्य मार्गावर असलेल्या महागाव कसबा येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात. सामाजिक एकात्मता जपणारा महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेरणादायी परंपरेची साक्ष देणारे भव्यशिवमंदिर आजही डौलात उभे आहे. प्राचीन संस्कृती, कलेचे दर्शन घडविणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महागावचे हेमाडपंती शिवालय होय. कळमेश्वरी नदीच्या तीरावर ते वसले आहे. विशेष म्हणजे कळसाखाली विष्णू तर गाभाऱ्यात शंकराचे अधिष्ठान आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर गरुड व शिवलिंग असलेल्या गाभाऱ्यासमोर नंदी हे दोन्ही देवतांचे वाहन आराधना करतानाचे मनोहारी दृश्य प्रसन्न करते. या वैशिष्ट्यामुळे कळमेश्वर मंदिर या नावाने संबोधले जाते. यादवकालीन राजवटीत १२६९-७० दरम्यान हेमाद्री नावाचा प्रधान हा प्रख्यात पंडित व शिल्पतज्ज्ञ होता. त्याने उभारलेल्या मंदिरांना हेमाडपंती म्हणून संबोधले जाते. गावात प्रवेश केल्यावर कळमेश्वराचे हेमाडपंती शिवालय मोठ्या दिमाखात आपला डोलारा सांभाळून उभे दिसते. सदर मंदिराचे महाद्वार पूर्वाभिमुखी असून दुमजली आहे. पुरातत्त्व विभागाने मुख्य प्रवेशद्वाराचा जीर्णोद्धार केला आहे. पडझड झालेल्या प्रवेशद्वाराची उभारणी झाल्याने मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. मंदिराची रचना अचंबित करणारी आहे. बाहेरच्या बाजूने चार व आतील बाजूने चार अशा अष्ट स्तंभावर हे मंदिर विराजमान आहे. महाद्वाराचे स्तंभ चित्तवेधक असून आत प्रवेश केल्यावर कोरीव खांबावर आधारलेले सभामंडप आढळते. प्रत्येक खांबावर रामायणकालीन चित्रे कोरलेली आहेत. दहा पायºया उतरल्या की गाभाºयात मधोमध शिवशंकराचे स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडते. शिवलिंगाच्या अगदी समोर मंदिराच्या पूर्वेला नंदी मंदिर आहे. घुंगरमाळा, बेलपत्री व चाळ अशा आभूषणांनी सजलेला भव्य नंदी लक्ष वेधून घेतो. हा नंदी म्हैसूरच्या चामुंडेश्वर मंदिरातील जगप्रसिद्ध नंदी मूर्तीची लघुप्रतिकृती आहे. पोळ्याच्या दिवशी नंदीची मनोभावे पूजा केली जाते. मंदिराची शिल्परचना औंढा नागनाथ, वेरु ळचे कैलास लेणे आदी प्राचीन वस्तूच्या शिल्पासारखी आहे. या मंदिराला क वर्ग तीर्थक्षत्र दर्जा प्राप्त आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने केंद्र शासनाकडून प्राप्त निधीतून मंदिराच्या प्रवेशद्वाराचा जीर्णोद्वार केला असून या प्राचीन शिवालयाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मंदिरालगत लघुसिंचन प्रकल्प पूर्णत्वास आल्यामुळे हा परिसर हिरवळीने नटला असून पर्यटकांना खुणावतोय.शिवमंदिरात महाशिवरात्री सप्ताहात परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. भागवत, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सप्ताहात दिवसरात्र अखंड टाळ -वीणेच्या गजरात ‘जय जय राम कृष्ण हरी’ असा हरिनाम जप केला जातो. सातही दिवस अन्नदान केले जाते. महाशिवरात्रीला आबालवृद्ध भाविक उपवास करतात. शिवलिंगाची पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते. विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे दोन दिवस सामाजिक एकोपा जपणारा यात्रा महोत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरतो. यामध्ये सर्वधर्मीय उत्साहात सहभागी होतात. ग्रामीण भागातील महागावची जत्रा एक नवी ऊर्जा देऊन जाते.