- महेश एलकुंचवार
नागपुरात अलीकडेच जागतिक मराठी अकादमीच्या वतीने १६वे जागतिक मराठी संमेलन संपन्न झाले. या संमेलनात झालेल्या मुलाखतीचे संकलित शब्दांकन.* लेखनाच्या क्षेत्रात याल असं कधी वाटलं होतं का..नाही. कधीच नाही. लेखक होणे किंवा लिहिणे हा माझ्या जीवनाचा अग्रक्रम कधीच नव्हता. जगणं हाच खरा जीवनाचा अग्रक्रम होता आणि तो तसाच असला पाहिजे. गाणारा सुरांशी खेळतो, चित्रकार रंगांशी, तसं लेखकाला जगण्याशी खेळता आलं पाहिजे. कारण तेच त्याच्या कलेचं मूलद्रव्य असतं. गाणाऱ्याचं मूलद्रव्य सूर असतात, चित्रकारासाठी ते रंग असतात. जगणं हेच माझ्या लेखनाचं मूलद्रव्य आहे.वयाच्या २८व्या वर्षापर्यंत म्हणजे शिक्षण संपेपर्यंत उनाडपणा करणे हेच अंतिम ध्येय होतं. पुढेही नोकरी लागल्यानंतरही ते तसंच राहिलं. माझे वडील व काका प्रचंड वाचायचे. मॉरिस कॉलेजची लायब्ररी होती. रोज एक नवीन पुस्तक वाचायचो. त्यातच मौज वाटायची. लेखक वगैरे व्हावं हे नव्हतंच. कारण जगण्यातच इतकी मौज होती की कुठं लेखक वगैरे होण्याचे कष्ट घेता...* महेश एलकुंचवार म्हटलं की, एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व समोर येतं. त्यांची शिस्त कोणी मोडू शकत नाही.. याबद्दल काय सांगाल?आपल्याकडं लोक लेखकांना, लेखकांनाच काय कोणालाही प्रतिमांनी ओळखतात. समोरची व्यक्ती काय बोलते, कसं बोलते यावर त्या प्रतिमा तयार होत असतात. माझ्या ज्या प्रतिमेविषयी लोक बोलतात आणि निष्कर्ष काढतात ते त्यांचे आहेत. त्या प्रतिमेशी माझा काही संबंध नाही. दुसरं म्हणजे मला वेळ पाळायला आवडतं. तो माझा पिंड आहे. ठरल्यावेळेआधीच मी कार्यक्रमांना पोहचत असतो. आपण वेळेवर का नाही पोहोचू शकत? काही कामे असतील तर ती आधीच आटोपता येत नाहीत का? माझ्या घरातल्या शिस्तीमुळे हा माझा पिंड बनला आहे. मी वेळ पाळतो आणि शब्दही पाळतो.* मराठी भाषेविषयी अलीकडे चिंता व्यक्त केली जाते. ती लवकरच लोप पावेल असंही म्हटलं जातं आहे.. तुमचं काय मत आहे?मराठी भाषेविषयी हे जे बोललं जातं, त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. आपल्या समाजातील सुशिक्षित मध्यमवर्गाने ती भाषा आता टाकल्यागत झाली आहे. आणि गंमत ही की ती भाषा संपत असल्याचा आरडाओरडा हाच वर्ग करतो आहे. मराठीसाठी शासनाने काहीतरी करावं हा आग्रह हे नाठाळ आणि आळशीपणाचं लक्षण आहे. सरकारने भाषेसाठी मंडळं स्थापन केली आहेत. माणसं नेमली आहेत. अनुदानं दिली आहेत. त्यामुळे भाषा टिकवण्याची मुख्य जबाबदारी मध्यमवर्गाची आहे, सरकारची नाही.दुसरं असं की, आपण कधी सहज मराठी बोलतो का याचा विचार करावा. दूरचित्रवाहिनीवर खाद्यपदार्थ तयार करण्याचे कार्यक्रम असतात. त्यात शालू नेसलेली, दागदागिने घालून खाद्यकृतीची माहिती देणारी स्त्री क्रियापद वगळता एकही मराठी शब्द बोलत नाही. तुम्ही कधी ऐका ते.. फ्रेश व्हेजिटेबल आणून ते बॉइल करा.. मग ते मॅश करा... आणि नंतर त्याच्या रिंग्ज कट करून त्या डीप फ्राय करा.. फक्त क्रियापदंच तेवढी मराठी!मुख्य म्हणजे आपल्या दैनंदिन संभाषणात आपण किती मराठी वापरतो? मला प्रॉब्लेम आला म्हणतो आपण. मला फार टेन्शन आहे... असंही म्हणतो. मी जरा अडचणीत आहे किंवा जरा ताणात आहे असं बोलायचं मनातही येत नाही का? जिथं सहजगत्या मराठी बोलता येऊ शकतं तिथं आपण इंग्रजी बोलतो आणि मग आक्रमण होतंय अशी आदळआपट करत राहतो.शाळेत प्राथमिक व माध्यमिक स्तरावर उत्कृष्ट मराठी शिक्षक असतील तरच हे चित्र बदलेल.सामान्य माणसांची ही कथा तर मराठी लेखकांचं काय सांगावं.. एका थोर लेखकाने लिहिलं होतं की, आईची आठवण इतकी येतेय की, मी पर्युत्सुक झालो आहे... आता पर्युत्सुक हा शब्द कामभावनेशी निगडित आहे आणि पर्युत्सुक हा पुरुष होत नसतो. ती विरहिणीची भावना आहे. लेखकांना हे संदर्भच माहीत नसतात. कारण वाचन नसतं. दुसºया एका लेखकाने कुठेतरी लिहिलं, जनावर गोठ्यात मरून पडले होते. तिथे मी कंदील नेला तेव्हा त्या कंदिलाची आभा सभोवार पसरली. अरे, कसलं मराठी लिहिता? कंदिलाची कधी आभा असते काय? जिथं अशी दुर्दशा आहे तिथं शासनाला काय बोल लावता तुम्ही? मराठी माणसात बौद्धिक आळसच प्रचंड आहे...* लेखक आणि सन्मान याबाबत तुमची भावना काय आहे..भारतीय समाजात लेखक ही दुय्यम म्हणजे बिनमहत्त्वाची गोष्ट आहे. ज्या समाजात असं चित्र असेल त्या समाजाची प्रकृती बरी नाही असं मी समजतो. लेखकाने स्वत:ची प्रतिष्ठा जपावी. कुणीतरी आपली प्रतिष्ठा, मान ठेवेल अशी अपेक्षा करू नये. लेखक स्वत:ची प्रतिष्ठा जपत नाहीत. राजकारणी दिसल्यानंतर त्यांच्यासमोर ते झुकतात. पद्मश्री, जीवनगौरवासाठी पाय पकडतात. मग राजकारण्यांनी तरी त्यांना का मानाने वागवावं?* आज तुम्हाला तुमच्या नाटकांकडे पाहताना काय वाटतं. त्यांच्या मांडणीबद्दल ..?मला माझं प्रत्येक नाटक अयशस्वीच वाटलं. मला वाडा चिरेबंदीत दोष दिसतात. मी वाडा पहात नाही. कारण मग जागोजागी ते मला दिसू लागतात. पण मी ते तुम्हाला कशाला सांगू? अपयशाइतकी सुंदर गोष्ट नाही एका लेखकाच्या जीवनात. अपयशामुळेच तो उभां राहतो आणि पुढचं पाऊल टाकतो. अपयशासारखा सोबती नाही. जो कायमच यशस्वी होतो त्या माणसाचं काही खरं नसतं.* ज्या काळात तुम्ही नाटकं लिहित होतात, त्या काळातील अन्य नाटककारांसोबतचे तुमचे संबंध, त्या काळातलं वातावरण याविषयी काय सांगाल? त्यावेळी कुठला समान धागा तुमच्यात होता..?परस्परांवर प्रेम होतं आणि आदर होता, एवढंच सांगता येईल. आमच्या नाटकांची संहिता भिन्न होती, भाषा भिन्न होती. तेंडुलकर, गिरीश कर्नाड किंवा बादलबाबू या सर्वांचा स्वतंत्र बाज होता. आम्हा सर्वांमध्ये घट्ट मैत्री होती. तेंडुलकरांनी तर माझ्यावर छत्रच धरलं होतं. गिरीशचे आणि माझे प्रेमाचे संबंध आहेत. आम्ही भेटतो.. नवीन पिढीतले लेखकही संबंध ठेवून आहेत. हे सर्व निरोगीच राहिलं आहे. मात्र अलीकडच्या नाट्यव्यवहाराबाबत माझा भ्रमनिरास झाला. कारण तिथे प्रत्येकाचा एक अजेंडा आहे. कुणाला टीव्हीसाठी काम करायचं आहे, कुणाला सिनेमात जायचं आहे. त्यामुळे पूर्वी एकत्र बसून चर्चा व्हायची, तालमीच्या वेळी एकमेकांना समजून घेता येत होते. आता ते वातावरण राहिलं नाही.* तुम्हाला कधी नागपूर सोडून पुण्या-मुंबईत स्थायिक व्हावंसं वाटलं नाही का?तसं कधीच वाटलं नाही. सगळे महत्त्वाचे लेखक ग्रामीण भागातूनच आले आहेत. मी जाऊ शकलो असतो की मुंबईत. पण कुठेतरी भार्इंदरला राहून लोकलला लटकून मी रोज चर्चगेटला जातोय ही कल्पनाच असह्य आहे. मला न पैसा हवा होता न प्रसिद्धी. मी नागपुरातच खूश होतो. आहेही. या इथे निवांतपणात जे लिहिता येतं ते मुंबई-पुण्यात अधिक सकसतेने आलं असतं, असं का वाटत असावं?इथं अडीच मिनिटांच्या अंतरावर कॉलेज आहे. मी कशाला धावू मग.. असं काय मिळणार होतं तिथे? मी मुंबईत सलीम जावेद किंवा फारतर गुलजार झालो असतो. पण मग वाडा लिहू शकलो असतो का...?मला अस्सलच गोष्ट लागते. शिवाय वैदर्भीय आळसही आहेच. दगदग नको वाटते. महानगरात गेलं तरच जीवन विस्तारतं असंही नाही. फारतर मुंबईचं एक वेगळं जीवन दिसलं असतं. पण मग आमच्याकडे जीवन नाही की काय.. ? मला तर असं म्हणायचं आहे की, आता साहित्याचं केंद्र पुण्या-मुंबईकडून केव्हाच सरकलं आहे.आमचा सदानंद देशमुख पहा. त्याने बारोमास ही कादंबरी लिहिलीय. काय ताकद आहे त्याच्यात ! श्रीकांत देशमुख, आसाराम लोमटे हे छोट्या गावातले लेखकही कसदार लिहितातच ना.. त्यामुळे मी मुंबईला स्थलांतरित झालो नाही याचं समाधानच वाटतं.* अलीकडे खूपजण लिहितात. सोशल मीडियामुळे तर, जो लिहितो तो लेखक, असंच समीकरण दिसतं आहे. त्यातील दर्जाबाबत तुमचं मत काय..?माझी त्यांच्या लिहिण्याला काही हरकत नाही. जे लिहितात ते लिहू दे की, आकाशात सगळ्या पक्षांना जागा आहे. चिमण्या उडतात, कावळे उडतात तसे गरूडही उडतात. ते लिहितात तसं त्यांचं वाचणारेही असतात. त्या लिखाणाने समाजातल्या एका ग्रुपची गरज भागत असेल तर काय हरकत आहे, चालू द्यात..* आपण नाटक लिहिणं थांबवलंत, यामागचं काय कारण..?मला वाटतं लेखकाने सतत लिहू नये.. जेव्हा लिहावंसं वाटतं तेव्हाच लिहावं. ते अगदी आतून यायला हवं. अलीकडे दररोज लिहिणारे दिसतात. मी आठ आठ वर्ष न लिहिता थांबलेलो आहे. नाटक ही सामूहिक कला असते आणि त्यातील सर्वात सुंदर काळ नाटक सादर होण्याचा किंवा पुरस्कार मिळण्याचा नसतो. तो असतो तालमींचा! या तालमीच्या काळात आंतरिक संबंध मजबूत होतात आणि हीच खरी मानवी जीवनाची गंमत आहे.मात्र नंतरच्या काळात हे आंतरिक संबंध तुटत गेले.मुलाखत :चंद्रकांत कुलकर्णी, डॉ. श्रीकांत तिडके
शब्दांकन : वर्षा बाशू
varsha.bashu@lokmat.com