हीनाकौसर खान-पिंजार
अभिजितच्या कुटुंबातली कुस्तीतली ही पाचवी पिढी. त्याच्या पणजोबांपासून ते त्याच्या घराण्यात साºयांनी स्वप्न पाहिलं ते आखाड्यातल्या कुस्तीचंच. अभिजितच्या वडिलांनीही अभिजितपुढे वयाच्या दहाव्या वर्षापासून पैलवानीचंच स्वप्न ठेवलं आणि त्याला पुण्यात थेट तालमीतच आणून ठेवलं. सोबत बजावलं, बेटा, घराण्याचं नाव काढ, ‘गदा’ आपल्या घरात यायला हवी!..
अभिजितऽऽ अभिजित आहे का?’शिवरामदादा तालमीचं दार ढकलत मी बाहेरूनच आवाज दिला. तालमीजवळ येण्याआधी पुण्यातल्या पेठांतल्या वेगवेगळ्या गल्लीबोळांना वळसा घालत मी नानापेठेतून रविवारपेठेत शिरले. तिथे हनुमानाचं एक मंदिर लागलं तसं इथं जवळपासच तालीम असणार अशी एक खात्री वाटून गेली. मीरा दातार दर्ग्याच्या समोरच्या गल्लीच्या प्रारंभालाच ‘शिवरामदादा तालीम’ म्हणून एक लोखंडी कमान दिसली. त्याशेजारीच ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकलेला अभिजित कटकेचा मोठा बॅनर. गदा घेतलेल्या अभिजितचा फोटो. खाली अभिनंदन आणि शुभेच्छुकांची भाऊगर्दी. त्या गल्लीत शिरताच तालमीचं मुख्य द्वार म्हणून मी जायला पुढे झाले तसं मागून एकानं हटकलं..‘तिथं पोरं कसरती करत असतील. सकाळची प्रॅक्टिस सुरू असल. तुम्ही जरा त्या छोट्याशा बोळीतून जाऊन लगेच दार दिसल तिथून जा.’ त्या सूचनेबरहुकूम एक माणूस जाऊ शकेल अशा त्या बोळीतून आत शिरले आणि दार दिसलं. जुन्या पद्धतीचं. वाड्यांना किंवा जुन्या घरांना दोन फळ्यांचं दार असतं तसं. आधीच्या व्यक्तीनं कसरती करणाºया पोरांविषयी फारच गडबडीनं बोलल्यानं मीही उगीच सावधपणे बाहेरूनच आवाज दिला..अभिजितऽऽआपला आवाज गेला, न गेला असं वाटून मी एक पाऊल आत टाकून डोकावलंच. तसं लंगोटी घालून सराव करणारा एक मुलगा मला पाहून घाबरला आणि भिंतीमागे झाला.‘काय पाहिजे?’ तो तिथूनच कसाबसा पुटपुटला.‘अभिजित कटके. तो इथंच असतो ना.’‘व्हय, व्हय. थांबा मॅडम. जरा पाच मिनिटं बाहेरच थांबता का? सांगतो निरोप.’लंगोटी घातलेला दुसरा तरुणही जरासं डोकावून पुन्हा मातीत बसला. पाच मिनिटांनी मला वरच्या मजल्यावर जायची खूण झाली. खालच्या मजल्यावर सगळीकडं भुसभुशीत माती होती. वर जाण्यासाठी मला तालमीत यावंच लागणार हे बघून, धिप्पाड शरीराचे अन् पैलवान असल्याच्या खाणाखुणा सांगणारे पाच-सहा जण मातीत बसले तर कुणी आडोशाला भिंतीमागे उभे राहिले.जवळपास ४०-५० जणांना सांभाळणारी ही तालीम टेरेससह तीन मजले अशी उभी होती. तळ मजल्यावर माती आणि सरावाची साधनं. सरळ जात वळसा घालून पायºया चढत गेल्यावर पहिला मजला. त्या मजल्याच्या तीनचतुर्थांश भागात मॅट अंथरलेली होती, तर दुसºया भागात तालमीत राहणाºया मुलांच्या पॅण्टी, ट्राऊजर्सनं एक संपूर्ण भिंत झाकली गेली होती. काहींच्या झोपण्याची अंथरूणं गुंडाळलेली होती तर काहींच्या बॅगा इतस्तत: पडलेल्या होत्या. मॅटची एक बाजू ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या अभिजितच्या अभिनंदनाची साक्ष देत होती. लहान मोठे हार, माळा, पुष्पगुच्छ मॅटवर दिमाखात बसलेले होते.तिसरा मजला म्हणजे त्यांचं एकप्रकारे घरच. तिथंच स्वयंपाकाची व्यवस्था. तालमीत आपला स्वयंपाक स्वत:चा स्वत: करावा लागतो. सगळी मुलं मिळून आपला हा भार उचलतात.मी तालमीत शिरले त्याहीवेळी एक गृहस्थ पुष्पगुच्छ घेऊन आले होते.उंच, धिप्पाड आणि पैलवानी रुबाब जाणवणाºया अभिजितनं अतिशय विनम्रतेनं तो पुष्पगुच्छ स्वीकारला. आभार मानले. पुढे फार वेळ ना त्या पुष्पगुच्छात घालवला ना शुभेच्छुकांसोबत. नम्रतेनंच त्यानं त्यांची रजा घेतली. दणकट शरीराच्या अभिजितचा चेहरा मात्र फारच विनम्र आणि सालस असल्याचं त्याला पाहताक्षणी जाणवतं. कौतुकात वाहून जायचं नाही हेही सूत्र त्यानं इतक्या लहान वयातच आत्मसात केल्याचं त्याच्याशी बोलताना पूर्णवेळ जाणवत राहिलं.‘महाराष्ट्र केसरी झालो तेव्हापासून लोकं अभिनंदनाबरोबरच आमंत्रणंसुद्धा देत राहतात. कुठल्या कुठल्या कार्यक्र मात सत्कारासाठी बोलवतात. अमुक तमुक ठिकाणी याच म्हणून गळ घालतात. असं सत्कार स्वीकारत फिरलो तर आपली प्रॅक्टिस राहते ना बाजूला. म्हणून मग पार्टनरलाच फोन दिला. तोच बोलतो अन् कामाचं असंल तर सांगतो..’ संवादाची सुरुवात तर अभिजितनं मनमोकळी केली; पण त्याचबरोबर त्याच्या ‘फोकस्ड’ वृत्तीची झलकही सहजपणे दिली.कुस्तीच्या मैदानात मानाचा समजला जाणाºया महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकल्याचा अभिजितला आनंद/ अभिमान निश्चितच असेल; पण त्याची प्रौढी मिरवावी, घमेंड करावी असा अविर्भाव अजिबातच दिसत नव्हता. आजच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं तर तो अगदी ‘कुल’ होता. एक टप्पा गाठला, असे अनेक टप्पे अजून गाठायचे आहेत, अशा सरळसोप्या विचारांचा तो वाटला.***वयाच्या दहाव्या वर्षापासून अभिजित कुस्ती खेळतोय. त्याच्या कुटुंबातील ही पाचवी पिढी. त्याचे पणजोबा, आजोबा, वडील आणि सख्खे चुलत भाऊ यांनी पैलवानी अनुभवली आहे. अभिजितच्या वडिलांना चंद्रकांत कटके यांना कुस्तीची फारच आवड. आपल्या घरात ‘गदा’ यायला हवी असं त्यांना खूप वाटायचं, परंतु परिस्थितीनं गांजलेल्या चंद्रकांत कटके यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. आपण नाही तर, किमान आपल्या मुलानं तरी कुस्तीतले मानाचे किताब जिंकावेत, असं त्यांना खूप वाटायचं. त्यांनी दहा वर्षाच्या अभिजितपुढेही पैलवानीचं आणि गदा आणण्याचचं स्वप्न ठेवलं.अभिजित सांगतो, ‘वयाच्या आठव्या नवव्या वर्षापासून पप्पा माझा घरच्या घरी व्यायाम घ्यायचे. रनिंग करायला लावायचे. पीटी घ्यायचे. पुण्याजवळ वाघोलीला आमचं घर आहे. घरासमोर मोठं ग्राउण्ड होतं. तिथं व्यायाम सुरू असायचा. सुरुवातीला मला खूप कंटाळा यायचा. व्यायाम नको वाटायचा. पण पप्पांनी माझ्या कंटाळ्याकडे लक्ष दिलं नाही. ते त्यांच्याच पद्धतीनं काम करत राहिले. मग ते दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या सुट्टीत मला पुण्यात तालमीत ठेवू लागले. घर सोडून इथे रहायला यायचं म्हणजे मला खूप वाईट वाटायचं. नको वाटायचं. कसेबसे ते दिवस निघून जात आणि मी पुन्हा वाघोलीला जायचो. त्यानंतर अकराव्या वर्षी मला तालमीतच ठेवायचा पप्पांनी निर्णय घेतला. सुरुवातीचे दोन-तीन महिने तर मी सारखा रडायचो. कुस्ती, डावपेच असं काही तेव्हा समजायचंही नाही अन् जमायचंही. शिवाय घर सोडून रहायला जीव नको वाटायचा. मग पप्पा मला लहान-मोठ्या गावातील कुस्तीची स्पर्धा पहायला घेऊन जाऊ लागले. छोट्या गावातल्या त्या कुस्तीतला जल्लोष, पैलवानांचा खेळ बघून बघून मलापण आवड वाटू लागली. मग कुस्तीत माझं मन रमायला लागलं. दोन तीन वर्षातच मला कुस्ती जमू लागली. चांगलं खेळता येऊ लागलं. कुठं, कधी, काय करावं हे कळू लागलं. मग कुस्तीची मजा येऊ लागली.’अभिजितनं मागच्या वर्षी, २०१६मध्येही महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामान्यापर्यंत मजल मारली होती; पण त्या वर्षी किताबानं त्याला हुलकावणी दिली होती. तो सांगतो, ‘खेळायला पुन्हा सुरवात केल्यावरही ८-९ स्पर्धा खेळलो होतो; पण महाराष्ट्र केसरीसारखी मोठी स्पर्धा खेळलो नव्हतो. त्यामुळे अशा मोठ्या स्पर्धेची पुरेशी जाण नव्हती. त्यामुळे डावांची आखणीही पुरेशी नव्हती. डावपेच करण्यामागचं शहाणपण पक्कं आलेलं नव्हतं. अर्थात हे आता जाणवतं. नुसतं पैलवानी शरीर बनवणं किंवा कुठलीही कुस्ती खेळणं वेगळं आणि आपण डोकं लढवून समोरच्याला चित करणं वेगळं. त्यामुळेच कदाचित मी तेव्हा अंतिम सामान्यात जाऊनही हरलो. पण मग अजूनच इरेला पेटलो.’सरावाची बात निघाल्यावर अभिजितनं दिनक्र मच सांगायला सुरुवात केली. ‘पावणेचारला उठायचं. मग फ्रेश होऊन पहिल्यांदा सपाट्या मारायच्या. त्यानंतर रनिंग. एक दिवशी बॉल, एक दिवशी पायºया, एक दिवशी क्र ॉस कंट्री.. असे वेगवेगळे व्यायाम प्रकार करायचे. सगळं झाल्यावर जरावेळ झोपायचं. पुन्हा साडेनऊला उठायचं आणि व्यायाम सुरू करायचा. एक दिवशी जिम, एक दिवशी आखाडा खोदायचा, एक दिवशी कुस्तीतल्या टेक्निकचा सराव करायचा. दुपारी तीनपासून पुन्हा सराव. अडीच तीन तास चालतो हा सराव. रात्री नऊ-साडेनऊला झोपायचं. यात कुठलाही खंड नाही. गुरुवारी एक दिवस सुट्टी. पण तो दिवस आरामात जातो. बाहेर कुठं जात नाही. घरीसुद्धा महिन्यातून एकदा चक्कर मारतो. तेही एखाद दिवसासाठीच. नाहीतर पुन्हा शरीराला कुस्तीसाठी तयार करायला अवघड जातं. व्यायामात खंड पडला की शरीर लगेच त्रास देतं. व्यायामाला खुराकपण लागतो. बदामाची थंडाई, अंडी, दूध, मांसाहार.. शिवाय सगळं जेवण तुपातलं.यावर्षी महाराष्ट्र केसरी मिळवायच्या हेतूनं मी खूपच सराव केला. मागच्या वर्षीच्या हुलकावणीनं यावर्षी फार मनावर घेतलं होतं. खेळही रंगतदार झाला होता. पप्पासुद्धा म्हणायचे, मंदिर तयार झालंय, आता कळस बांधायचंय फक्त. पणजोबांपासून पैलवानीनं मंदिराचा पाया रचला गेलाय, आता तू त्याचा कळस चढव. किताब मिळवायच्या ईर्षेनं मीही पेटलेलो होतोच आणि शेवटी तो मी पटकावलाच.’महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर साहजिकच अभिजितच्या गावी वाघोलीला जल्लोष झाला. लोकांनी स्वत:हून पेढे वाटले. पुण्यातही जागोजागी अभिजितला शुभेच्छा देणारे फलक लागले; परंतु तो मात्र या यशानं हुरळून गेलेला नाही. याच वर्षी महाराष्ट्र केसरी किताबाच्या आधी सप्टेंबरमध्ये भारत केसरीचा किताब त्यानं मिळवला. तसेच हिंद केसरीच्या अंतिम सामान्यापर्यंतही त्यानं मजल मारली होती.
या सगळ्या प्रवासात त्याच्या शिक्षणाविषयी काही कळत नव्हतं म्हणून त्याला त्याविषयी विचारलं तर तो म्हणाला, ‘सुरवातीला शाळेत जात होतो. पण शाळेतल्या दिनक्र माने माझा इथला दिनक्रम बिघडायचा. त्यामुळे तालमीच्या पहिल्या वर्षी मी सारखाच आजारी पडू लागलो. असं का होतंय हे शोधल्यावर शाळेचा आणि व्यायामाचा बसत नसलेला मेळ ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे माझं शरीर थकून आजारी पडू लागलं होतं. म्हणून मग बाहेरून परीक्षा द्यायचं ठरवलं.’घरात दोन बहिणींच्या पाठचा असणाºया अभिजितनं उत्तम पैलवानी करावी अशीच घरच्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शिक्षणापेक्षा त्यांनी त्याच्या कुस्तीतल्या शिक्षणावर जास्त मेहनत घ्यायचं ठरवलं आणि त्याला तशी सूट दिली. भरत म्हस्के, अमर निंबाळकर, हणमंत गायकवाड यांच्या तालमीत, मार्गदर्शनाखाली त्यानंही स्वत:ला झोकून दिलं. यंदा अभिजित बारावीची बाहेरून परीक्षा देणार आहे. यानिमित्ताने तो विद्यापीठातल्या खेळातही सहभागी होणार आहे.अभिजित म्हणतो, ‘पप्पांनी सांगितलं की तू शिकला नाहीस तरी चालंल; पण उत्तम पैलवानी शिक. मलाही तसंच वाटत होतं. म्हणून कुस्तीवरच मी पूर्ण लक्ष देऊ लागलो. गेल्या तीन वर्षात तर कुस्तीला फारच ग्लॅमर आलेलं आहे. मीडियानं लक्ष घातल्यामुळे आणि दंगलसारखे पिक्चर आल्यामुळं तर नवीन मुलंही खूप येऊ लागले आहेत. ज्यांच्या घरात कुस्ती, पैलवानी नाही अशीसुद्धा मुलं आता तालमीत येतात. हे चांगलं आहे.’राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा मॅटवर होत असल्याने त्यानं मॅटवरचा सराव वाढवला आहे; परंतु महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे किताब मातीतल्या कुस्तीत असतात. तेव्हा त्या स्पर्धांच्या आधी मातीत सराव करायचा असं सूत्र त्यानं स्वत:पुरतं आखून घेतलं आहे. हिंद केसरी, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स, आॅलिम्पिक.. असं पुढचं लक्षही अभिजितनं ठरवून घेतलं आहे. एवढ्याचसाठी तर त्यानं ‘महाराष्टÑ केसरी’ झाल्यानंतर जागोजागच्या सत्कारांपेक्षा आपल्या सरावाकडं लक्ष वळवलं आहे.अभिजित सांगतो, ‘किताब जिंकल्यानंतर सहा दिवस आराम पुरे असतो. त्यातच अडकून पडलो तर तिथेच राहू. पुढचे किताब कायम खुणावत राहतात..’- अभिजितचा आपल्या लक्ष्याविषयीचा आत्मविश्वास, आणि त्यासाठीचे त्याचे कष्ट.. दोन्हीही गोष्टी स्पष्टपणे दिसत होत्या.. त्याची ही जिद्द आणि मेहनत त्याला आणखी किती पुढे घेऊन जाते हे आता बघायचं..
खुराकाचा खर्च दरमहा पन्नास हजार रुपये!सध्या स्पर्धांचं प्रमाण वाढलं आहे; पण प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावं का असं विचारल्यावर अभिजित उत्स्फूर्तपणे म्हणाला, खेळाची भीती राहत नाही ना मग. मुलांना अशा स्पर्धांतून पैसासुद्धा मिळतो. खुराकाचा खर्च किती असतो?-मला चाळीस-पन्नास हजार रुपये लागतात दर महिन्याला. वडिलांनी मनावर घेतलंय म्हणून, ते कुठूनही जमवतात. पण तसं सगळ्यांचंच नसतं. शिवाय अशा वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्यानं टेक्निक कळतं. कसं खेळायचं याचा आत्मविश्वास येतो. आम्ही तालमीत सराव करतो त्यामुळे आम्हाला इथल्या कुस्तीचं काहीच वाटत नाही. तसंच बाहेरच्या स्पर्धांमध्ये खेळल्यानं मोठमोठ्या स्पर्धांचंही काही वाटत नाही.’अभिजितनं एकाचवेळी आर्थिक अडचणीचं वास्तव आणि त्याकडे पाहण्याचा सकारात्मक भाव सांगितला..
..कुस्ती जवळपास कायमचीच संपली होती !अभिजित वेगवेगळ्या छोट्या स्तरावरच्या स्पर्धा खेळत होता. जिंकणं-हारणं सुरू होतं. पण या दरम्यान नेमकी त्याच्या खांद्याला जबर दुखापत झाली. अस्थिबंधन- लिगामेंट फाटली. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. ही गोष्ट २०१३ मधली. वयाच्या सतराव्या वर्षातली. डॉक्टरांनी सहा महिने आराम सांगितला. नुसताच आराम नव्हे तर कुस्ती खेळता येईल का नाही याबाबत कुठलीही खात्री त्यावेळेस दिलेली नव्हती. कदाचित खेळताच येणार नाही असाच त्यांचा सूर होता. तो आतून पार कोलमडला. आपण आत्ता कुठं कुस्ती करायला लागलो होतो. स्पर्धा जिंकायच्या, किताब मिळवायचे, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पदकं मिळविण्याची स्वप्नं उराशी आणि दुसरीकडे निखळलेल्या खांद्याचं दु:ख. अशा उमेदीच्या काळात माणूस खचल्याशिवाय राहणार नाही. अभिजितही खचला; पण त्यानं उमेद सोडून दिली नाही. स्वप्नांच्या वाटेवर कस्सून धावायला सुरुवात केल्यानंतर अचानक थांबावं लागल्यामुळे तो दुखावला गेला, रडलाही; पण कायम रडत बसला नाही. त्यातून सावरला आणि नव्या जिद्दीनं पेटून उठला.
..मग मारायचो दोन हजार बैठका, करायचो दहा किलोमीटर रनिंग..
अभिजित सांगतो, ‘मी खरं तर खूप आधीच महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकायला हवा होता. म्हणजे जिंकलाच असता, पण खांद्याचं दुखणं आलं. सहा महिन्यात ठीक होईल असं वाटलं होतं; पण दीड वर्ष लागलं. कुस्तीपासून दुरावलोे होतो; पण आतून जिद्द कायम होती. पहिल्या सहा महिन्यात तर आरामापेक्षा रडायलाच जास्त यायचं. स्वत:वर खूप चीड यायची. राग यायचा. नंतर मी सावरलो. रागाचं रूपांतर व्यायामात करू लागलो. अप्पर बॉडी व्यायाम शक्य नव्हता. मग सकाळी १० हजार मीटर पळायचं आणि संध्याकाळी दोन हजार बैठका काढायच्या. राग कशावर तरी काढायचा असायचा. तो असा व्यायामातूनच निघायचा. याचवेळी माझ्या मागाहून तालमीत आलेली मुलं पुढं जाऊ लागली. आपणपण कुस्ती खेळायला पाहिजे म्हणून ईर्षा वाढू लागली. पप्पासुद्धा म्हणायचे, बघ तुझ्यापेक्षा लहान मुलं खेळू लागलीत. जिंकू लागलीत. गदा आणण्याचं स्वप्न राहिलं बघ. मला अजूनच चीड यायची. दीड वर्ष हा संघर्ष केल्यानंतर हळूहळू कुस्तीचा सराव सुरू झाला. २०१५ मध्ये युवा स्पर्धेत उतरलो. गमावलेला आत्मविश्वास परत येऊ लागला..’
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)