- प्रमोद मुनघाटे
आम्ही पोचलो तेंव्हा एका मांडवात खडी गंमतचा एक प्रयोग रंगात आला होता. बाजूलाच पुढच्या प्रयोगातील दोन नर्तकी तयार होऊन सारख्या आरशात आपले रूप न्याहाळत, चहा पीत बसल्या होत्या. त्या नर्तकी मुली नसून मुलं आहेत, हे मला माहीत होते. पण आमच्यासोबतचे कॅमेराटीममधील लोक सारखे सारखे तिकडे बघून त्या खरोखरच मुली नव्हेत का? असे सतरा वेळ आम्हाला विचारत होते. तर, नागपूरजवळच्या कन्हानच्या शाहीर धर्मादास भिवगडे यांचा फोन आला. वराडा या गावी मंडई आहे, या म्हणून. निघालो आम्ही. शाहीर धर्मादास भिवगडे विदर्भ लोककला परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रथम आम्हाला त्यांच्या कार्यालयात नेले. तिथे चहा घेऊन निघालो आम्ही वराडा गावाकडे. गावात प्रवेश करता क्षणी दुतर्फा मुलांची खेळणी, सौंदर्य प्रसाधने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने मांडलेली दिसली. गावातील मोठ्या उंच घरांवर मोठमोठे भोंगे बांधले होते. प्रचंड आवाज एकमेकात मिसळून गाव दणाणून गेले होते.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा एक प्रकल्प आम्ही राबवितोय. राज्याच्या विविध भागात पारंपरिक लोककला आहेत. गोंधळ, भारुड, दंडार, तमाशा, खडी गंमत अशा सगळ्या ठिकठिकाणच्या लोककलांचे दृकश्राव्य संकलन करून ते जतन करण्याचे काम चालले आहे. नागपूर विभागात ती जबाबदारी आमच्यावर आहे. त्यासाठी ही धावाधाव. तर शाहीर धर्मादास भिवगडे म्हणजे खडी गंमत आणि दंडार वगैरे लोककलाकारांचे विदर्भाचे लीडर. त्यांच्या एका हाकेसरशी शेकडो कलावंत हजर होतात.वराडा गावात एकाच वेळी तीन खडी गंमत पाहायला मिळाल्या. खडी गंमत हा पूर्वविदर्भातील सर्वात लोकप्रिय आणि समृद्ध लोककलाप्रकार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तमाशाचे वैदर्भी रूप म्हणजे खडी गंमत. सगळा संच तोच असतो. शाहीर, नाच्या, गवळणी, मावशी. ढोलक, तुणतुणे, डफ आणि क्लारीनेट. सादरीकरणाचा क्र म थोडा इकडे तिकडे होतो.गण-गवळण या गोष्टी पारंपरिक साच्यातील असल्या तरी वर्तमान राजकीय व सामाजिक संदर्भ जोडून खडी गंमत अद्ययावतच सादर केली जाते. विनोद हा तर लोककलेचा प्राणच असतो. त्यामुळे शेकडो प्रेक्षक तासन्तास खिळून असतात. आम्ही गेलो त्या गावात एकाचवेळी तीन ठिकाणी खडी गंमत सुरु होत्या. तिन्ही ठिकाणी पाचशे-सहाशे स्त्रीपुरु ष प्रेक्षक दंग होऊन बघत होते.यंदा एकीकडे अवकाळी पावसाने शेतातील पिके झोपून गेली. कापणी केलेला माल सडून गेला. पण तरीही हे लोक कसे काय मनोरंजनात मन गुंतवितात असा प्रश्न पडतो. पण त्याशिवाय ते करणार तरी काय, असाही दुसरा प्रश्न आहे. दिवाळीच्या पाडव्याला ठराविक गावात अशी मंडई आणि खडी गंमत ही गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे.आजूबाजूच्या गावातील लोक गोळा होतात. घरोघर नातेवाईक येतात त्या उत्सवाला. पाहुणचार, आराम आणि रात्रंदिवस खडी गंमत तमाशाचा आस्वाद. खरं म्हणजे आज खेड्यापाड्यात सर्वत्र टीव्ही आणि मोबाईल फोन आहेत. बोटाच्या टोकावर जगातील कोणताही मनोरंजनाचा प्रकार हजर आहे. पण अशा प्रकारे दोन दिवस एकत्र येऊन खडी गंमतचा उत्सव साजरा करणे, या मागे वेगळ्या प्रेरणा आहेत असे मला वाटते. या कलांचा आस्वाद समूहानेच घेता येतो. ग्रामीण मानस समूहातच फुलून येत असते. खडी गंमत सादर करणारी काही घराणी आहेत. शंभरेक वर्षांची परंपरा आहे. आता तरु ण मुलं शिकतात. नोकरी करतात. पण तरीही घराण्याची परंपरा म्हणून डफ-तुणतुणे किंवा ढोलक हातात घेतातच.पण या तरुणांनी परंपरेला फाटा देऊन काही नवे प्रयोग पण सुरु केल्याचे दिसते. शेतकरी आत्महत्या. पाण्याचे दुर्भिक्ष्य, पर्यावरणाचा प्रश्न असे विषय आम्हाला परवाच्या खडी गंमतमध्ये दिसले. दुय्यम सामने, सवाल-जवाब पाहायला मिळाले. एका प्रयोगात मोबाईलचे वेड, त्यातून होणारे प्रेमप्रसंग आणि भानगडी असा विषय भन्नाट मनोरंजक होता. कलगी आणि तुर्रा या प्रकारात आध्यात्मिक मांडणीही एका फडात होती.विशेष म्हणजे एका प्रयोगात महिला शाहीर होत्या. श्रीमती माधुरी पाटील हे त्यांचे नाव. त्यातही त्यांच्या फडात जो डफ वाजविणारा सहकारी शाहीर होता, तो एका हाताने थोटा होता. तरीही त्यांनी फार रंगत आली.प्रत्येक फडात दोन स्त्रीवेशाधारी नाचे होते. त्यांचे अंगविक्षेप, विभ्रम आणि नाचगाणे हा खडी गंमत प्रकारात सगळ्यात लोकप्रिय आढळत होता. स्त्रीवेशाधारी नाचे ही तरुण मुलं आहेत हे सांगूनही विश्वास बसत नव्हता, इतकी बेमालूम वेशभूषा आणि रंगरंगोटी होती. परवाच्या वराडा गावातील एका पार्टीमध्ये दोन नाचे हुबेहूब तरु ण मुली झाल्या होत्या. त्यांना स्वत:लाच त्यांच्या स्त्रीरूपाचे खूप आकर्षण दिसत होते. नाचता नाचता शंभर वेळा त्या तरुण नर्तकींचे (म्हणजे नाचे मुलं) आरसा बघत आपले केस ठीक कर, लिपिस्टक लाव किंवा पोशाख नीट कर असे चालले होते.मुळात तमाशा किंवा खडी गंमतमध्ये या नाच्यांचे एक वेगळे विश्व असते. नाच्याचे रूप घेणाऱ्या तरुण मुलांच्या प्रेरणा, त्यांची मनोवस्था काय असेल. त्यांना त्यात केवळ पैसा मिळतो की आणखी काही वेगळे समाधान मिळते या प्रश्नांबरोबरच प्रेक्षकांना स्त्रीवेशधारी नाच्यांचे आकर्षण कां असते हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत.स्त्रीरूप धारण करणारे तमाशातील पुरुष पात्र म्हणजे ‘नाच्या’. स्त्रीसारखे नाजूक सुंदर रूप, बायकी आवाज आणि स्त्रीसारखेच लाजणे, मुरका मारणे आणि लटका राग आणणे असे हावभाव करणारा नाच्या हा तमाशा किंवा खडीगंमतचा प्राणच असतो. नऊवारी लुगडे घट्ट कासाट्याने आवळले असते. पायात घुंगरांच्या माळा बांधल्या असतात. अंगावर भरपूर दागिने असतात. नाकात नथ, कानात कर्णफुले, हातात भरपूर बांगड्या, बाहूवर बाजूबंद, कंबरेला चार पदरी कंबरपट्टा गळ्यात माळा आणि केसांना माळलेला गजरा अशी वेशभूषा असते.नाचणाऱ्या बाईपेक्षाही प्रेक्षक नाच्यांच्या या सौंदर्यावर आणि विभ्रमावर प्रेक्षक लुब्ध असतात. गावगाड्यातील लोकांच्या समूहजाणिवेतच हे सुप्त आकर्षण असते. स्त्रीदेहाची कमनीयता, चेहऱ्याचा रेखीवपणा, आणि डौलदार हालचालींचे मोहून घेणे ही एक अत्यंत सामान्य गोष्ट असली तरी या सौंदर्याचा आस्वाद ही दैनंदिन जीवनात सहजसाध्य नाही. मग ती अशा लोककलामधून नाच्याच्या अभिनयातूनच पूर्ण होऊ शकते.