- राजानंद मोरे- पुण्यात मोठ्या सभागृहांमध्ये नेत्यांची, तज्ज्ञांची भाषणे दररोज होत असतात. विविध विषयांवर मतमतांतरे व्यक्त होतात. पण सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर चर्चा होत नाही. ती झालीच तर सभागृहाबाहेर येत नाही. तसेच त्यात प्रत्यक्ष नागरिकांचा किती सहभाग असतो? ‘ पीपल्स पॉइंट’ त्याला अपवाद ठरला. मागील काही वर्षांत राष्ट्रवादाची व्याख्याच बदलत चालली आहे. सरकारविरोधात अभिव्यक्त होणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले. देश सोडून जा, पाकिस्तानात जा... असे फतवे निघाले. ते आजही निघतात. एक नागरिक म्हणून व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला, प्रश्न उपस्थित केले तर राष्ट्रद्रोहीचे लेबल लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली. त्यावर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटल्या. मग व्यवस्थेला जाब कसा विचारायचा, अभिव्यक्त कसे व्हायचे? ही लढाई कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून, व्यवस्थेतील त्रुटींमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आहे, हे कसे पटवून द्यायचे? त्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. त्यातूनच ‘पीपल्स पॉइंट’ या नावीन्यपूर्ण संकल्पनेचा जन्म झाला. रवींद्रनाथ टागोरांची ‘जिथे मन असेल भयमुक्त’ ही अक्षरपंक्ती दक्षिणायन चळवळीचे ध्येयवाक्य आहे. ‘पीपल्स पॉइंट’ ही संकल्पनाही त्यावरच आधारलेली आहे. पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये ५ मार्चला विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची एक सभा झाली. त्या सभेत डॉ. गणेश देवी यांनी ‘महाराष्ट्र नागरिक सभे’चा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव सर्वांनी स्वीकारला व सामुदायिक नेतृत्वाने ही नागरिक सभा स्थापन करावी असे ठरले. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्यही या सभेला उपस्थित होते. त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, संदेश भंडारे, सुरेश खैरनार, धनाजी गुरव, अरुणा सबाणे, मिलिंद मुरुगकर, प्रदीप खेलुरकर, सुरेखा देवी, रमेश ओझा, सदाशिव मगदुम, सुभाष वारे, गीताली वि. म., विजय तांबे, राजाभाऊ अवसक, रझिया पटेल, विलास किरोते, पुष्पा क्षीरसागर, विनायक सावंत, आनंद मंगनाळे, संजीव पवार, माधव पळशीकर आदी प्रतिनिधींनी या सभेत सहभाग घेतला होता. प्रत्यक्षात एप्रिल महिन्यात ‘महाराष्ट्र नागरिक सभा’ हे अराजकीय व्यासपीठ उभे राहिले. सभेचे राज्य समन्वयक संदेश भंडारे यांनी संकल्पनेमागची भूमिका स्पष्ट केली. ही नागरिक सभा राजकीय पक्ष असणार नाही. आणि ही नागरिक सभा स्वत: निवडणूक लढविणार नाही. वेगवेगळ्या स्तरांतील लोकप्रतिनिधींकडून नागरिकांचा अजेंडा राबविण्याचे काम नागरिक सभा करेल. व्यवस्थेवर नागरिकांची पकड बसविणे हा महाराष्ट्र नागरिक सभेचा हेतू आहे. यामध्ये कोणीही नेता नाही. महाराष्ट्रात २८८ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात १५ जणांची एक याप्रमाणे नेतृत्व समित्या असतील. त्या-त्या तालुका, जिल्ह्याचे समन्वयक असतील. सामाजिक सद्भावना, विकास आणि रोजगार, शिक्षण, आरोग्य, स्त्री अधिकार, लोकशाही रक्षा, दलित-आदिवासी-भटके, शेती, पाणी आणि सिंचन, कला, संस्कृती, मेळावे, यांसह त्या-त्या तालुक्यातील निकडीचे प्रश्न खात्रीलायक माहितीच्या आधारावर राज्यपातळीवर मांडले जातील. याअंतर्गत ‘पीपल्स पॉइंट’ हा आगळावेगळा उपक्रम पुण्यात १२ नोव्हेंबर या दिवशी वेगवेगळ्या १२ ठिकठिकाणी दुपारी १२ वाजता राबविण्यात आला. यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्त्री अधिकार, शेती व पाणी, पर्यावरण, कला-साहित्य-संस्कृती, सामाजिक न्याय, सार्वजनिक वाहतूक, सार्वजजिक स्वच्छता, सार्वजनिक पाणीपुरवठा, कायदा सुव्यवस्था आणि पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ या विषयांवर मान्यवरांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. पोलीस आयुक्तालय, बालगंधर्व चौक, गोखले इन्स्टिट्यूट, फर्ग्युसन रस्ता अशी महत्त्वाची ठिकाणे त्यासाठी निवडण्यात आली होती. या माध्यमातून थेट लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा, त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्याची मान्यवरांकडूनही दखल घेण्यात आली. पण पुण्यासारख्या शहरात याची सुरुवात करताना त्याला विरोध होणेही अपेक्षितच होते. आदल्या दिवशी एके ठिकाणी कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असताना एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. या उपक्रमात नागरिकांना सरकारच्या धोरणांविषयी उघडपणे बोलता येणार असल्याने हा विरोध झाला. तुम्हा ठराविक एका पक्षाचे असल्याने विरोध केला जात आहे, असे बोलले गेले. पण त्याला न जुमानता १२ ठिकाणी नागरिकांना अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ खुले करण्यात आले. हळूहळू लोकांनी प्रश्न मांडण्यास सुरुवात केली. तरुणांसह ज्येष्ठांचा प्रतिसादही चांगला मिळाला. सध्या खरे काय आणि खोटे काय? याचा शोध घेताना सर्वसामान्य नागरिकांची फसगत होत आहे. पुणेकर नागरिकांसाठी ही संकल्पनाच नवीन आहे............................शेतकरी प्रश्नांबाबत शहरांत जागृतीज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील अनेक शेतकरी संघटना एकत्र येऊन २९ नोव्हेंबरला दिल्लीत मोर्चा काढणार आहेत. देशभरातील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याअनुषंगाने यादिवशी पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी शेतविषयक विविध प्रश्नांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. शहरी भागातील उच्चभू्र भाग त्यापासून दूर असतात. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने उच्चभ्रू भागात ही जागृती केली जाईल, असे भंडारे यांनी सांगितले.
...............................
नागरिकांचा जाहीरनामालोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेत लोकप्रतिनिधींसमोर मांडले जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा जाहीरनामा तयार केला जाईल. राज्यासह प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र जाहीरनामा करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे संदेश भंडारे यांनी नमूद केले.