- सुकृत करंदीकर-
साठ-सत्तरच्या दशकात इस्राईलमध्ये स्थलांतरित झालेल्या मराठी ज्यूंची तिसरी पिढी आता इस्राईलमध्ये वाढते आहे. खासकरून कोकण किनारपट्टीवरच्या मुंबई, अलिबाग, पेण, पनवेल, नौगाव, मुरूड, झिराड, तळा, श्रीवर्धन, आवास आणि पुणे आदी गावांमधून ही सगळी मंडळी इस्राईलला गेली. जेरुसलेम, तेल-अविव, अशदोद, हायफा, रामले, पेताह तकवा, लूद, नेत्याना, किर्यात गात, बेरशबा आदी इस्रायली शहरांमध्ये स्थिरावली. इस्राईलला जेव्हा-जेव्हा गेलो, तेव्हा प्रत्येक वेळी तिथल्या मराठी ज्यू कुटुंबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी आवर्जून केला. दोनदा तर मराठी ज्यू कुटुंबातच राहिलो. पहिल्या खेपेपासून एक नाव सातत्यानं ऐकायला मिळायचं ते ‘नोहा मस्सील’ हे. हा मराठी ज्यू माणूस गेली चार दशकं इस्राईलमध्ये चक्क मराठी मासिक चालवतोय. ‘मायबोली’ त्याचं नाव. पहिल्या दोन्ही दौऱ्यांत नोहा यांची भेट घेणं जमलं नव्हतं. तिसऱ्या दौऱ्यात हा योग जुळून आला. जेरुसलेमपासून ३६ मैलांवर असताना मी नोहाचा फोन नंबर फिरवला. पलीकडून अगदी शुद्ध आणि स्पष्ट मराठी उच्चार ऐकायला मिळाले. मराठी भाषा इतकी उत्कृष्ट, सफाईदार की क्षणभर वाटून गेलं, पुण्यात तर फोन लागला नाही ना? पत्ता घेतला, भेटीची वेळ निश्चित केली. ठरल्याप्रमाणं जेरुसलेममधल्या सुंदर टेकडीवरचं त्यांचं टुमदार घर शोधून काढलं. पुढचे तीन-चार तास जणू जेरुसलेममध्ये नव्हतोच मी. हसणं-बोलणं-खाणं-पिणं-पाहुणचार....सगळं काही अस्सल मऱ्हाटमोळं. मग पुढेही भेटी होत राहिल्या. प्रत्येक वेळी तोच प्रत्यय येत राहिला.नोहा यांच्या इस्राईलगमनाची कथा मराठी ज्यूंच्या स्थलांतराबाबत प्रातिनिधिक ठरावी अशीच आहे. रायगड जिल्ह्यातल्या तळा येथे जन्मलेला नोहा सात भावंडांमध्ये सगळ्यांत धाकटा. दीड वर्षाचा असताना त्याची आई वारली. दहावीपर्यंतचं शिक्षण तळ्याला झाल्यानंतर पोटानं त्याला मुंबईत आणलं. छोट्या-मोठ्या नोकºया चालू झाल्या. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा कोर्स करून झाला. हे सगळं साठच्या दशकातलं. महाराष्ट्र राज्य नुकतचं जन्माला आलेलं. मराठी भाषा, मराठी संस्कृती याबद्दलचं वारं जोरात वाहण्याचे ते दिवस. नोहाला स्वत:लाही मराठी भाषेबद्दल कमालीची आत्मीयता. मराठी ऐकणं, मराठी वाचणं, मराठी लिहिणं हे सगळं तो आवडीनं करत होता. मुंबई परिसरातल्या ज्यूंसाठी निघणाऱ्या ‘मक्काबी’ या मराठी मासिकात तो लिहिता झाला. मासिक फक्त ज्यूंसाठीचं; पण तरी ते मराठीतून निघत होतं. (तेव्हाची मुंबई ‘मराठी’ होती, हे यावरून लक्षात यावं.) जेरुसलेममध्ये गप्पा मारत असताना नोहानं मला सांगितलं होतं, ‘‘मुंबईत असताना मी शिवसेनेचा सभासद झालो होतो. बाळासाहेबांच्या भन्नाट सभा ऐकायला मला खूप आवडायंच.’’सन १९६७मध्ये इस्राईल आणि अरब राष्ट्रांमध्ये ‘सिक्स डे वॉर’ होऊन गेलं होतं. या युद्धानं जगभरच्या ज्यू मंडळींच्या धार्मिक अस्मिता फुलून आल्या. त्याचीच परिणती म्हणून २४ वर्षांच्या नोहानं १९७०मध्ये इस्राईल गाठलं. गाडी रुळाला लागल्यावर नोहाचा मूळचा सांस्कृतिक पिंड उफाळून आला. सन १९८१मध्ये नोहाची संपादकीय कारकीर्द सुरू झाली ती इस्राईलमधल्या ‘बातमी’ नावाच्या पहिल्या मराठी मासिकाच्या माध्यमातून. पहिल्याच संपादकीयात नोहाने लिहिले- ‘‘प्रत्येक सुशिक्षित माणसाला देशी-विदेशी घडामोडींबद्दल माहिती असणं आवश्यकं वाटतं. चारचौघात बसल्यावर अपुऱ्या माहितीअभावी माघार घ्यावी लागते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप न पाडता आल्यानं आपण मागासलेले गणले जातो. यावर उपाय म्हणजे हिब्रू भाषा शिकणं. पण, ते सर्वांनाच शक्य नाही. मराठी भाषेत बातम्या पुरविणारं एकही साधन नसल्यानं आम्ही कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे. कारण रेडिओ, टीव्हीवरील बातम्या ऐकूनही कळत नाहीत. पेपर (हिब्रू) समोर असून वाचू शकत नाही. त्यामुळे पेपरातल्या ठळक बातम्यांचे मराठीत भाषांतर करून ते प्रसिद्ध करणार आहोत.’’ महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं इस्राईलमध्ये स्थलांतरित होणाऱ्या प्रौढ-वृद्ध ज्यूंना हिब्रू भाषा येत नव्हती, त्यांची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न ‘बातमी’नं केला. ‘हिब्रू मास्तर’ या सदरातून मराठीला पर्यायी हिब्रू शब्द दिले जाऊ लागले. साहजिकपणे इस्राईलमध्ये नव्याने रुजू पाहणाºया मराठी ज्यूंना ‘बातमी’ने मोठा भावनिक आधार दिला.