"अश्रूंची झाली फुले" हे भारतात अतिशय गाजलेलं सुप्रसिद्ध नाटक अमेरिका दौऱ्यावर येतंय आणि डी .सी. मेट्रो भागात या नाटकाचा प्रयोग लवकरच होणार आहे हे कळताच येथील मराठी नाट्यरसिक खुश झाला. आनंदाची करणे तशीच होती. एक तर कोरोना काळात सगळं ठप्प झालेलं जग परत पूर्ववत येतय याचा आनंद होता. ओसाड पडलेले ऑडिटोरियम परत टाळ्यांच्या कडकडाटात निनादणार होते आणि "अश्रूंची झाली फुले" हे दर्जेदार नाटक बघायला मिळणार होते. परंतु सगळ्यात जास्त आनंदाचे कारण म्हणजे नाटकातील मुख्य कलाकारांसोबत प्रत्यक्ष भेटण्याची आणि गप्पा मारण्याची संधी आम्हाला मिळणार होती. या कलाकारांच्या चाहत्यांना ती संधी उपलब्ध करून देण्याची जवाबदारी घेतली डी. एम.वी. भागातील मैत्रिणींचा आपला आवडता कट्टा ‘मायबोली कट्ट्याने’.
वॉशिंग्टन डी. सी. ने ३ एप्रिल २०२२ रोजी या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले आणि मायबोली कट्टा टीमने ‘अश्रूंची झाली फुले’ ‘मीट अँड ग्रीट’ या कार्यक्रमाचे आयोजन ६ एप्रिल २०२२ रोजी करायचे ठरवले. नुकत्याच यशस्वी रित्या पार पडलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर लगेच ‘मीट अँड ग्रीट’ हा दुसरा कार्यक्रम तितक्याच यशस्वीपणे पार पडण्याचा विडा प्रिया जोशी आणि मायबोली कट्टा टीमने उचलला. याला भक्कम सोबत होती ती मोनिका देशपांडे आणि बाल्टिमोर मराठी मंडळाची. "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" हे ब्रीदवाक्य म्हणत कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली.
कार्यक्रमाची तारीख आणि वेळ ६ एप्रिल २०२२ संध्याकाळी ६:१५ ते ९:३० अशी ठरवण्यात आली. ठिकाण मेरीलँड मधील ‘मद्रास पॅलेस’ रेस्टॉरंट हे ठरले. ‘मीट अँड ग्रीट’ या कार्यक्रमाद्वारे अश्रूंची झाली फुले या नाटकातील मुख्य कलाकार आणि सर्वांचे आवडते सुबोध भावे, सीमा देशमुख, उमेश जगताप आणि शैलेश दातार यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार होती. ६ एप्रिलची ती संध्याकाळ सर्व प्रेक्षकांसाठी एक सुंदर अनुभव देणारी संध्याकाळ होती. सगळे ६/६:१५ पर्यंत ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. अजून कलाकार मंडळी येण्यास अवकाश होता, मद्रास पॅलेस या रेस्टॉरंट चा मुख्य हॉल सुंदर पद्धतीने सजवण्यात आला होता. कलाकार मंडळींना मंचस्थानी बसण्याची सोय केली होती. मागे मायबोली कट्टा तसंच official partners and sponsors ड्रीम अॅक्ट एण्टरटेन्मेंट, मॅग्नोलिया होम रिनोव्हेशन, लोकमत डॉट कॉम, बाल्टिमोर मराठी मंडळ आणि सावली एंटरटेनमेंट कंपनीचे बॅनर्स लावले होते.
शेजारी गणपती बाप्पांची सुरेख मूर्ती छान सजवून ठेवली होती. प्रेक्षकांना बसायला टेबलं आणि खुर्च्या मांडल्या होत्या. ‘मीट आणि ग्रीट’ या कार्यक्रमात ‘eat’ म्हणजे भोजनाचीही सोय केली गेली होती. प्रेक्षकांना थोडे लवकर बोलावून कलाकार मंडळींना भेटण्याआधी सुरवातीलाच अल्पोपहाराची सोय केली होती. याचे कारण म्हणजे आठवड्यातील मधला दिवस असल्यामुळे लोकं कामे आटपून संध्याकाळी येतील आणि पुढे जेवायला थोडा उशीर होण्याची शक्यता म्हणून आधी जरासा पोटोबा व्हावा आणि सगळ्यांना शांतपणे कार्यक्रम बघता यावा हा हेतू होता. हजर असलेल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद होताच आणि आपल्या आवडत्या कलाकारांना बघण्याची, ऐकण्याची आणि त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची उत्सुकता देखील होती. कलाकार मंडळी कधी येतील याची वाट बघणं सुरु होतं आणि तेवढ्यात मंडळींचे आगमन झाले. सुबोध भावे, उमेश जगताप, सीमा देशमुख आणि शैलेश दातार यांनी क्रमशः टाळ्यांच्या कडकडाटासह सभागृहात प्रवेश केला आणि सगळे स्थानापन्न झाले. अगदी साध्या वेशात असलेले आणि आपल्या सारखेच भासणारे हे दिग्गज कलाकार आपल्या इतक्या जवळ बसले आहेत हा अनुभव काही वेगळाच होता.
मायबोली कट्टाच्या संस्थापक प्रिया जोशी यांनी कलाकारांच्या स्वागतास्पर दोन शब्द बोलून पाहुण्यांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती केली. दीप प्रज्वलन पार पडले आणि परत सगळे स्थानापन्न झाले. नंतर कार्यक्रमाच्या मुख्य भागाला सुरवात झाली आणि ती म्हणजे कलाकार मंडळींशी प्रश्नोत्तरांद्वारे साधलेला संवाद !! आणि ही जवाबदारी आमच्या मैत्रिणी सुजाता देशमुख आणि प्राजक्ता सप्रे यांनी अतिशय चोखपणे बजावली. विचारण्यात आलेले प्रश्न अतिशय सुंदर होते. मर्यादित वेळेत चारही कलाकारांशी अगदी सारखा संवाद साधता यावा अशी . सुरुवात सुबोध भावे यांच्यापासून झाली. विचारलेल्या प्रश्नावर ते इतक्या सुंदर पद्धतीने बोलत होते की त्यांचे बोलणे थांबूच नये असं प्रत्येकाला वाटत होतं. आपल्या अभिनयाने सर्वांना या अभिनेत्याने उगाचच नाही वेड लावलं याचा प्रत्यय तेव्हा सगळ्यांना आला असेल.
इतकी प्रगल्भ आणि परिपक्व संभाषण कितीतरी वेळ ऐकत राहावं असं वाटत होत. नंतर शैलेश दातार यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील काही अनुभव आणि किस्से इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले की डोळ्यांसमोरून ते प्रसंग चित्रफिती प्रमाणे भराभर सरकत होते. १९८९ साली ते दूरदर्शन वर नवोदित मराठी बातम्या निवेदक होते. त्यांनी सांगितलेला त्या वेळचा त्यांचा पहिला बातम्या वितरणाचा अनुभव खूपच मनोरंजक होता. बातम्या देताना त्यांनी ‘मुंबईचे तापमान’ वाचण्याऐवजी चुकून ‘मुख्यमंत्र्यांचे तापमान’ असे वाचले आणि गम्मत म्हणजे त्या वेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी ते लक्षात ठेऊन त्याचा उल्लेख पुढे १०-१२ वर्षांनी दातार यांच्याशी भेट झाल्यावर "१०-१२ वर्षांपूर्वी बातम्या देताना माझ्या तापमानाबद्दल बोलणारे दातार तुमचे कोण?" असा हलका फुलका आणि विनोदी प्रश्न विचारून केला. या किस्स्या नंतर प्रेक्षकांनी कशी हशा आणि टाळ्यांनी दाद दिली हे वेगळ सांगायची गरज नाही. सीमा देशमुख या उत्तम गाणे म्हणतात हे बऱ्याच जणांना माहिती आहेच. त्यांनी प्रेक्षकांच्या विनंतीस मान देऊन "ऐरणीच्या देवा" हे मराठी गाणे त्यांच्या गोड़ आवाजात म्हंटले. इतकेच नव्हे तर त्यांनी पुढे येऊन सर्व प्रेक्षकांना गाताना साथ देण्याची विनंती केली. मंचावरील पाहुण्यांनी सुद्धा सर्वांसोबत हे गाणे गुणगुणले. त्यावेळी सभागृहात निर्माण झालेल वातावरण इतकं मधुर, साधं-सुंदर आणि सगळ्यांना आपलंसं करणारं होतं की त्या गाण्यानंतर आलेल्या टाळ्या सीमा ताईंच्या गोड़ गाण्यासोबतच त्यांच्या गोड़ आणि नम्र वागणुकीसाठीही होत्या. उमेश जगताप यांनी सुद्धा त्यांचे अनुभव त्यांचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले. त्यांनी सांगितलेल्या तालिमीच्या वेळी होणाऱ्या गमती जमती ऐकताना खूप मजा येत होती.
विचारण्यात आलेले कुठलाही प्रश्न आधी माहित नसताना आणि समोर कुठलीच स्क्रिप्ट नसताना ही मंडळी इतक्या सहजपणे इतक सुंदर बोलत होती कि जणू त्यांचं ते बोलणं त्यांचं अभिनयाशी असलेल्या एकनिष्ठ नात्याचं प्रमाण देत होतं. बोलताना त्यांचा एकमेकांबद्दल असलेला आदर आणि कौतुक पदोपदी त्यांच्या संभाषणातून प्रकट होत होता. नाटक सादर करताना स्टेज वरचं त्यांच समन्वय आणि एकी इथेही अगदी सहजपणे अंगवळणी पडल्यासारखी झळकत होती. सुबोध भावे यांना त्यांच्या छंदांबद्दल विचारल्यावर त्यांनी त्यांच्या लहानपणी जोपासलेल्या वेगवेगळ्या छंदांबद्दल माहिती दिली.प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचे अतिशय सुंदर पद्धतीने वाचन केले.
त्यानंतर प्रेक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचीही अतिशय माफक उत्तरे कलाकार मंडळींनी दिली. पुढे चारुता जोशींनी आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला आणि सोबत अश्विनी आगटे यांनी पाहुणे कलाकार मंडळींना मायबोली कट्टा टीम तर्फे भेटवस्तू देऊन सर्व कलाकारांचे आभार मानले. सर्वात शेवटी ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते तो कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे या सर्व आवडत्या कलाकारांसोबत छायाचित्राचा कार्यक्रम. प्रत्येकाला चौघांबरोबरही फोटोस काढायचे होते. कलाकार मंडळींच्या भोवती गर्दी वाढत होती परंतु चौघांनीही अतिशय संयम ठेऊन कोणालाही न दुखावता सगळ्यांना फोटो काढायची संधी दिली. एवढे मोठे दिग्गज कलाकार पण प्रेक्षकांसोबत अगदी समरस होऊन गप्पा मारत होते. यात कुठेच मी एक सेलिब्रेटी आहे आणि समोरची व्यक्ती साधारण प्रेक्षक असला अविर्भाव नव्हता. होतं ते केवळ एका कलाकाराच आणि त्याच्या रसिक प्रेक्षकांचं नातं ! शेवटी आपल्या आवडत्या कलाकार मंडळींना निरोप द्यायची वेळ आली. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचूनही आपल्या चाहत्या प्रेक्षकांशी जमिनीवर पाय रोवून अगदी नम्रपणे आणि माणुसकी जपून संवाद साधणाऱ्या महान कलाकारांना भेटण्याचे समाधान निरोप देताना समस्त रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. हा असा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समस्त मायबोली कट्टा टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!!
लेखिका: सौ. अश्विनी तातेकर देशपांडे
संपादिका: सौ. प्रिया जोशी