गजानन दिवाणपरभणी जिल्ह्यातील पुंगळा हे गाव यंदा प्रथमच प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करतेय. या गावकऱ्यांनी गुरुवारी रात्री महादेव मंदिरात झालेल्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर केला. फटाके आणि वीज रोषणाईवर होणारा खर्च वाचवायचा आणि झेंडूच्या फुलांनी दिवाळीच्या या सणात अख्खे घर सजवायचे. यासाठी लागणारी झेंडूची फुले शेतकऱ्यांकडूनच घ्यायची आणि ती किमान ५० रुपये किलो या दरानेच घ्यायची, असेही या गावकऱ्यांनी ठरवून टाकले.हे सारे कशासाठी?
फटाक्यांवर विनाकारण होणारा खर्च टाळण्यासाठी. यातून होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी. लखलखत्या दिव्यांवर होणारा भरमसाठ वीजवापर टाळण्यासाठी आणि पर्यायाने भारनियमन टाळण्यासाठी. थोडक्यात काय, तर पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बळीराजाला बळ देण्यासाठी.दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट आले असतानाच ‘झेंडूची फुले अभियान’ प्रचंड वेगात पसरत आहे. शेतीतील प्रत्येक मालाला भाव आणि बळीराजाला बळ देण्यासाठी एका शिक्षकाने सुरू केलेली ही मोहीम केवळ मराठवाड्यातच नव्हे तर पुणे-मुंबईतही पोहचली आहे.पुंगळा या गावचे मूळ रहिवासी अण्णासाहेब संजाबराव जगताप हे पेशाने शिक्षक. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुत्न (ता. सेनगाव) येथील जयभारत विद्यालयात नोकरी करतात. ते राहतात हिंगोलीत. यंदाच्या दसऱ्याने त्यांना अस्वस्थ केले. दसºयाच्या पहिल्या दिवशी ४० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले रात्री ३ रुपये किलोने घ्यायला कोणी तयार नव्हते. यंदा बाजारात अचानक झेंडूची आवक वाढली आणि फुलांचा अक्षरश: कचरा झाला. फुले रस्त्यावर फेकून शेतकºयांना रिकाम्या हाताने गावी परतावे लागले. फुले विकून सण साजरा करण्याचे स्वप्न घेऊन शहरात आलेल्या बळीराजाचा ‘दसरा’ कसा साजरा झाला असेल?जगताप यांना झेंडूची शेती नवी नाही. एकट्या हिंगोली जिल्ह्यात यंदा झेंडूचे क्षेत्र चारशे हेक्टर एवढे आहे. त्यांच्याच शाळेत ३००च्या आसपास विद्यार्थी झेंडूची उत्पादक आहेत. ही सर्व मुले आणि सोबत या शेतावर कामाला जाणारी शाळेतील इतरही गोरगरीब मुले दसऱ्याच्या अगोदर फुले तोडण्यासाठी गैरहजर राहिली. सण आला की शाळेत हे असे घडतेच. सणाला या परिसरातून हैदराबादला रोज हजार ते दीड हजार टन फुले जातात. त्यामुळे या दिवसांत शाळेपासून चावडीपर्यंत सर्वत्र झेंडूचीच चर्चा असते. ती तशी दसऱ्यालाही होती. दसºयाच्या दुसऱ्या दिवशी मात्र परिसरात वेगळीच चर्चा होती. तुझ्या फुलाला किती भाव मिळाला? किती फुले तू रस्त्यावर फेकून दिली? माझा तर जाण्या-येण्याचा खर्चही नाही निघाला. बातम्यांमध्येही हाच विषय होता.दसऱ्याच्या आदल्या दिवशी जगताप पत्नीसह फुले आणण्याठी बाजारात गेले होते. तिथे फुले विकताना त्यांना त्यांचाच विद्यार्थी दिसला. उत्पादन खर्चाचे गणित मनातल्या मनात मांडून तीन किलो फुलांचे १५० रुपये त्यांनी मुलाला देऊ केले. गुरुकडून पैसे कसे घेणार? पत्नी जगताप यांना म्हणाली, ‘पोराचं तोंड कसं फुलासारखं सुकल्यावानी दिसतंय.’जगताप कविमनाचे. त्यांना पत्नीचे हे वाक्य खूप भावले आणि मनातल्या मनात बोचूही लागले. शाळेत आल्यानंतरही हा विषय पाठ सोडत नव्हता. मग त्यांनी कविता लिहायला घेतली.‘ग्राहकाने स्वत:च्या इच्छेनेच उत्पादन खर्चात नफा मिसळून शेतकºयाचा माल खरेदी केला पाहिजे’ ही दिशा त्यांना या कवितेने दिली. अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या जगताप यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हाच कायमचा उतारा दिसला. त्यांनी लगेचंच ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ ही मोहीम हाती घेतली.पहिले घर स्वत:चेच निवडले. मुलानेही शपथ घेतली. ‘मी अर्णव. या वर्षी फटाके वाजवणार नाही. घरात लायटिंग करणार नाही. या पैशांतून शेतकऱ्यांकडील झेंडूची फुले किमान ५० रुपये किलो दराने विकत घेईन. या फुलांनीच दिवाळीत घर सजवेन. तुम्ही माझ्यासोबत आहात का मित्रांनो?’मुलाचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला. झेंडूच्या शेतीवर लेख लिहिला. तोही फेसबुकवर टाकला. त्याच दिवशी व्हॉट्सअॅपवर ‘झेंडूची फुले हिंगोली’ हा ग्रुप सुरू केला. त्यात जवळपास २५० लोक. ५०० ग्राहक तयार करायचे होते. दोनच दिवसांत हा आकडा गाठला. आता वेगवेगळ्या गावाचे असे अनेक ग्रुप तयार झाले आहेत. हिंगोलीपासून मुंबईपर्यंत अनेकजण त्यात सहभागी झाले आहेत. वसमतच्या पोलीस उपनिरीक्षक रूपाली कांबळे यांनी आपल्या कॉलनीत बैठक घेऊन या मोहिमेला गती दिली. हिंगोलीचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनीही हातभार लावला. अनेक मुलांचे शपथ घेतलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. वैयक्तिक पातळीवर ही मोहीम जोर धरत आहे. आता जगताप यांना ती गावपातळीवर राबवायची आहे. त्याची सुरुवात त्यांनी स्वत:च्या पुंगळा या गावापासूनच केली आहे. आज ही मोहीम फक्त झेंडूच्या फुलांसाठी राबविली जात आहे. उद्या ती शेतकऱ्याच्या प्रत्येक मालासाठी असेल..फुलांच्या शेतीचे गणित(जवळा बु. येथील नागोराव इंगोले या शेतकºयाने सांगितलेला फुलशेतीचा एकरी उत्पादन खर्च)उन्हाळी नांगरणी व कोळपणी १६०० रु.बियाणे (सात पाकिटे प्रत्येकी २००० रु.) - १४००० रु.रोपे तयार करणे - २००० रु.लागवड - ४००० रु.खत - ६००० रु.निंदणे - ५००० रु.फवारणी १०००० रु.कोळपणी - ३००० रु.तोडणी - १०००० रु.वाहतूक खर्च (दोन खेपा हैदराबाद) - ६०००० रु.या शिवाय आडत विक्री १० टक्के वेगळी आणि एकरी जमिनीचा खंड (मक्ता, ठोका) हा वेगळाच. असा एकरी जवळपास एक लाख ३० हजार रुपये खर्च येतो.
(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीतउपवृत्त संपादक आहेत.)gajanan.diwan@lokmat.com