प्रवीण दवणे
प्रतिभावंतांचे जन्मदिवस साजरे करण्याची प्रथा नवी नाही, पण त्या प्रज्ञावंताच्या श्रेष्ठ महाकाव्याचा जन्मदिवस हा काव्यदिवस म्हणून संपन्न व्हावा हे भारतवर्षातच घडू शकते. महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या अजरामर श्रेष्ठ काव्याचा भावोद्गार... ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं , वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श।’ हा ठरला. पूर्वमेघ व उत्तरमेघ अशा दोन विभागात भरून उरलेला हा मेघ आषाढाच्या पहिल्या दिनी अंकुरला व एका इंद्ररंगी विरहमधुर विराणीचा जन्म झाला. मेघदूतात भरून उरलेली सुंदरता निसर्गाचीच नाही, तर संवेदनशील प्रिय हृदयातील स्पंदनांच्या हेलकाव्यांचीही आहे.
विरहव्याकुळ यक्षाने मेघाकरवी हा सांगावा धाडला तो आपल्या प्रियेला. कुठल्याशा अपराधाने रामगिरी पर्वतावर प्रियेविन राहण्याची कठोर शिक्षा यक्षाला मिळाली आणि ती शिक्षा केवळ ‘एकटे’ वा ‘एकाकी’ राहण्याची नव्हती, तर प्रियेविना तगमगत राहण्याची, विरह वणव्यात होरपळत, फक्त अश्रू ढाळण्याची ती शिक्षा होती. आरंभीचे काही दिवस कसेबसे कंठले, पण ज्येष्ठाचे वारे हे जेव्हा आषाढाचा पहिला श्याम मेघ आपल्या सांगाती घेऊन आले ,तेव्हा यक्षाचा धीरच सुटला व केवळ प्रेयसीच्या आठवणीने, तिला डोळा भरून कवळून घेण्यासाठीच तो आतुरला नाही, तर आपली ‘कांता’ ही अशीच आपल्या काळजीने हुरहुरत असेल ह्या जाणिवेने, निदान ‘तिला तरी माझे कुशल तू सांग-’ ही विनंती केली. पण मेघाने दूत म्हणून अलकानगरीत जायचं कसं? काय त्या पथावरच्या खाणाखुणा हे सांगताना त्याने अंतरातील धग व्यक्त केली. त्या ‘मेघदूता’चा जन्म दिवस म्हणजे आषाढाचा पहिला दिवस ! महाकवी कालिदास दिन!
कालिदासाने आषाढाच्या मेघालाच आपला दूत का केले असेल बरं? केवळ यक्षाने ताे ‘सावळा घनु’ येताना पाहून नव्हे, तर तो आषाढाच्या पहिल्या दिवसाचा पहिला मेघ! आभाळ एकच! निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, नदीनाल्यांचे, शेतीवाडीचे प्रणयार्त जिवांच्या विरहव्यथांना अधिकच पाझरते करणारे आभाळ आषाढाचे! ज्येष्ठातील कधी मंद तर कधी तीव्र होणाऱ्या उष्ण झळांनंतर व्याकुळलेली वसुंधरा आता वाट पाहते ती फक्त अंतर्बाह्य तृप्तावण्याची! पण तो आषाढघन वेळीच आला नाही तर...! तीच स्थिती यक्षाची कांताविरहाने झाली आहे. ही केवळ देहसंगाची ओढ नाही, तर सर्वांत प्रिय असलेल्या, श्वासच झालेल्या प्रियेवाचून मनाची जी आर्त अवस्था होते ती आषाढातच! महाकवी कालिदासाचे हृदय उलून आले, कवितेचे उन्मेष त्यातून लवलवून आले, त्या सृजनास निमित्त झाला तोच हा आषाढाचा पहिला दिवस! नि कालिदासातील यक्षाला दिसलेला आषाढाचा पहिला मेघ! म्हणून हा सृजनप्रेरणेचा बेधुंद दिवस! त्या आषाढघनाचं वर्णनच विलोभनीय आहे. अलकानगरीसारख्या देवभूमीपासून दूर, शासन म्हणून एकटेपण आणि त्यात कांताविरह! पुष्कळदा जिवलग विरहाची धग कार्यव्यग्रतेत वा सुखाच्या रोषणाईत तितकीशी जाणवत नाही, पण एकाकी अवस्थेत ती तीव्र होते, नि त्यात आषाढाचे मनातले टाके उसवणारे मेघ हे असे एकामागोमाग येऊ लागले तर...
महाकवी कालिदासानाने यक्षाच्या विरहरंगाची सल अधिक गडद करण्यासाठी आषाढमासच निवडला आणि त्यातला कवी आषाढ होऊनच तरल पिसांनी बरसू लागला. शृंगाररसाचा अतिशय मनभावन रसोत्कर्ष कसा पाझरू लागला पहा- कवी कालिदास म्हणतात, ‘आषाढ घनामुळे हृदयात जे काही घडते, अवघडते ते फक्त सखीविरहात जे आहेत, त्यांनाच कळेल. इतकेच काय, आपल्यावाचून आपली प्रिया ही किती वनवास सोसते आहे. याचीही प्रचिती आषाढातले हे मेघच देतात!
‘मेघदूता’च्या ह्या ओवीचा रसानुवाद करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजही लिहितात...मीलनकांक्षी यक्ष राहिला अवलोकित त्या घना!रोधुनि नेत्रांमधील पाणी, सावरूनीया मना!
त्या आषाढ घनाला पाहून मन कसं सावरायचं, नि नेत्रांमधील पाणी तरी कसं आवरायचं, असं त्या यक्षाला होऊन गेलं...! आषाढ घनातील जळथेंबांनी आपल्या डोळ्यांतल्या पाण्याला भेटावं नि आपली साद जिवलग कांतेकडे पोहोचवावी हा आतला सूर महाकवी कालिदास आळवतात.
प्रत्येकात तो शापित यक्ष दडलेला असतोच, त्या विरहव्याकूळ यक्षाचे अंतरंग प्रकट करणारे महाकाव्य आषाढाच्या पाहिल्या दिवशी जन्मावे हा सृष्टीतीलच एक अपूर्वयोग आहे. केवळ दंतकथातून, अनेक आख्यायिकांतून कालिदास आपापल्या -कुवतीनुसार उलगडत गेला. ‘कालिदास’ नावापासूनच अशा कथांना सुरुवात होते. त्याचा जन्म, बालपण, नावाचा अर्थ या बद्दल कितीही मत-मतांतरे असतील, पण एका बाबतीत मात्र मतैक्य आहे, ते म्हणजे कालिदासाची आषाढमेघासारखीच अथांग प्रतिभा! त्यांची नाटके! त्यांची महाकाव्ये!, खंडकाव्ये जन्मजन्मांतरी आस्वादाला पुरेल अशी अजोड रत्नमण्यांची दौलत त्यांनी आपल्यासाठी ठेवली. ‘मेघदूत’ हे त्यातील एक ‘घननीळ पदक’ आहे.
आज भेटीगाठीची, प्रीती अभिव्यक्तीची साधने बदलली आहेत. आजचा विरह व्याकुळ यक्ष... सरळ दूरभाषसंवाद करून प्रियेशी बोलेल. ‘मेघ’ बदलेल ,पण भावना तीव्रता तीच आहे. जो पर्यंत निसर्गाने रुजवलेल्या आदिम प्रेरणा व त्यातील मिलनओढ तीच आहे. तोपर्यंत वेगवेगळ्या रूपातील ‘मेघ’ हे ‘दूत’ होऊन जिवलग मनांना भेटतच राहणार. कवी लौकिक देहानेच जन्मत नाही, तर आलौकिक कलाकृतीतूनही तो नित्य नव्याने जन्मत असतो. कालिदास जणु ‘मेघदूत’ रूपाने जन्मला आहे, अजरामर झाला आहे. पुन्हा आषाढरंगांनी विरह हुरहुरीचा निरोप घेऊन तो असा समीप आला आहे. आपली जिवलग व्यक्ती ह्या क्षणी आपल्या निकट असो वा दूर असो! मेघदूत-आषाढातून आपला निरोप देणारच आहेत.(लेखक ज्येष्ठ कवी, साहित्यिक आहेत.)