शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

‘नितळपणे भेटणारा माणूस’- अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 6:01 AM

कलावंत जन्मावा लागतो असं म्हणतात.  कोणतीही एक कला लाभली तरीही  आयुष्य इंद्रधनुच्या रंगांनी रंगून जातं.  बाबा (अनिल अवचट)च्या बाबतीत बोलायचं  तर एक इंद्रधनुष्य पुरणार नाही.  तो लेखक आहे, चित्रकार आहे, उत्तम बल्लव आहे,  फोटोग्राफर आहे, शिल्पी बासरीवादक आहे,  त्याला उत्तम गाणारा गळा लाभलाय,  तो वाचक आहे, उत्तम वक्ता, कवी आहे आणि  ओरिगामी कलावंतही आहे. इतक्या सार्‍या कला  अंगात भिनवूनही पाय जमिनीवर असलेला  तो एक नितळ माणूस आहे.

ठळक मुद्देकोणतीही एक कला लाभली तरीही आयुष्य इंद्रधनुच्या रंगांनी रंगून जातं. अनिल अवचट यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी एक इंद्रधनुष्य पुरणार नाही. इंद्रधनुष्यही बारा प्रकारची असतात म्हणे. त्यांच्यासाठी ‘इंद्रवज्र’ या इंद्रधनुष्याचाच आधार घ्यावा लागेल.

- सतीश पाकणीकर  एखादी छोटेखानी घरगुती अशी शास्त्रीय संगीताची मैफल असो किंवा भल्यामोठ्या सभागारातली  एखाद्या स्टार कलावंताची मैफल असो, एखादी मुलाखत असो अथवा एखादे व्याख्यान, साहित्यिक कार्यक्रम असो किंवा काव्यवाचनाचा जलसा असो त्या कार्यक्रमाला उपस्थित असेल तर एक व्यक्ती बरोबर आणलेल्या स्केच पॅडवर एकतर चित्रे तरी काढत बसलेली दिसेल अन्यथा पिशवीतून रंगीबेरंगी कागद काढून त्याच्या विविध घड्या घालत ‘ओरीगामी’ कलेची साधना तरी करताना दिसेल. बरं ती व्यक्ती त्यात कितीही गुंगून गेली असली तरीही सजग असे तिचे दोन कान मात्र त्या कार्यक्रमात काय घडतंय याची नोंद ठेवण्यात एकदम तयारीचे. अशाच एका कार्यक्रमात मी त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहिले. साधारण पस्तीस वर्षांपूवीर्ची आहे ही आठवण. किशोरी आमोणकरांची मैफल होती. सर्वात मागे ही व्यक्ती चित्र काढण्यात दंग. खादीचा पिस्ता कलरचा बुशशर्ट, खादीचीच पँट, मांडीवर खादीचीच शबनम पिशवी, वाढलेली पांढुरकी दाढी आणि डोक्यावर ‘सुतरफेणी’लाही लाजवतील असे घनदाट केस. इंटरव्हलला गाणं थांबलं तसंच त्या व्यक्तीचं चित्र काढणंही. मला तेव्हा कल्पनाही नव्हती की या व्यक्तीशी आपली कधीकाळी ओळख होईल. नुसती ओळखच नाही तर बर्‍याच आवडी समान निघून मैत्री होईल. आमच्यातील वयाचं अंतर बघता मी पुढच्या पिढीतला. पण कधीही कोणालाही अत्यंत ‘नितळपणे’ भेटणार्‍या अनिल अवचट या अवलिया बरोबर पहिल्याच भेटीत गट्टी जमली. त्या भेटीतच सुरुवातीला मी त्याला अहो-जाहो करीत होतो. यावर त्याने सांगितले की - ‘हे बघ सतीश, सगळे मला ए बाबा असेच म्हणतात. त्यामुळे तू पण मला तसेच म्हणायचे.’ त्याच्या सांगण्यात असलेली अकृत्रिमता असेल किंवा मधून मधून ‘हं’ असे म्हणण्याची त्याची लकब असेल ती नकळत माझ्या मनांत झिरपली आणि मीही  त्याला ‘ए बाबा’ म्हणूनच हाक मारू लागलो.कलावंत जन्मावा लागतो असं म्हणतात. कोणतीही एक कला लाभली तरीही आयुष्य इंद्रधनुच्या रंगांनी रंगून जातं. कलेच्या माध्यमातून तो कलाकार समाजात आनंदाची पखरण करतो. बाबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक इंद्रधनुष्य पुरणार नाही. इंद्रधनुष्यही बारा प्रकारची असतात म्हणे. पण बाबासाठी ‘इंद्रवज्र’ या इंद्रधनुष्याचाच आधार घ्यावा लागेल. तो लेखक आहे, तो चित्रकार आहे, तो उत्तम बल्लव आहे, तो फोटोग्राफर आहे, तो शिल्पी आहे, तो बासरी वादक आहे, त्याला उत्तम गाणारा गळा लाभलाय, तो वाचक आहे तो उत्तम वक्ता आहे, तो कवी आहे आणि तो ओरिगामी ही अनोखी कला सर्मथपणे हाताळणारा कलावंतही आहे. इतक्या सार्‍या कला अंगात भिनवूनही पाय जमिनीवर असलेला तो एक नितळ माणूस आहे.मी 2010 साली एक थीम कॅलेंडर केले होते. स्वर-मंगेश. नेहमीची माझी छपाई आर्ट पेपरवर असेच. पण त्या कॅलेंडरच्या काही प्रति चंदेरी रंगाच्या महागड्या परदेशी आर्ट पेपरवर छापायचे ठरवले. कारण चंदेरी सिनेजगतावर सहा दशकं अधिराज्य गाजवणार्‍या मंगेशकर भावंडांवर होतं ते कॅलेंडर. छपाईत काय गोंधळ झाला माहित नाही पण त्यावर मनासारखी छपाई होईना. बराच कागद वाया गेला. मग छपाई थांबवली. उरलेले व कापलेले  थोडे कागद  मी माज्या ऑफिसवर घेऊन आलो. कागदाचा चिवटपणा उत्तम होता. तसेच त्याचा स्पर्शही. काय करणार या कागदांचं? अचानक मला बाबाची आठवण आली. पूर्वी म्हणजे जेव्हा मी कृष्ण-धवल प्रकाशचित्रणाचं काम माझ्या डार्क-रूम मध्ये करीत असे त्यावेळी ते फोटोपेपर काळ्या कागदात लपेटलेले असत. त्या काळ्या कागदाला आतील बाजूस चंदेरी कागद (फॉइल) चिकटवलेला असे. तो चांगला मजबूतही असे. असे बरेच कागद मी बाबाला एकदा दिल्याचे आठवले. मी त्याला फोन केला. पलीकडून नेहमीप्रमाणे आवाज आला. ‘हं .. सतीश’. ही खास बाबाची पद्धत. मी त्याला माझ्याकडच्या कागदांविषयी सांगितले व म्हणालो - ‘कधी येऊ भेटायला?’ त्याने मला थांबवत सांगितले की - ‘परवा सकाळी मीच येतो तुझ्या ऑफिसवर.’ठरल्याप्रमाणे साडेदहा वाजता बाबा माझ्या ऑफिसवर पोहोचला. तो एक प्रकाशचित्रकारही असल्याने आधी सगळ्या गप्पांचा ओघ हा डिजिटल फोटोग्राफीवरच होता. नवे कोणते तंत्रज्ञान आले आहे, माझ्या नव्या कॅमेर्‍यात कोणत्या सोयी आहेत, फोटोशॉपचे कोणते वर्जन मी वापरतोय याविषयी अतिशय कुतूहलाने त्याने जाणून घेतले. ‘बघू या बरं फोटोग्राफरच्या खुर्चीत बसल्यावर कसं वाटतं?’ असं म्हणत माझ्या खुर्चीवर बसत त्याने नुकत्याच काढलेल्या पोट्र्रेट्स विषयीही तो बराच वेळ बोलला. नुसतं ऐकत राहावं असं वाटत होतं. मला त्याचं फोटोग्राफर अँन्सेल अँडाम्सबद्दलचं प्रेम माहित नव्हतं. मी त्याला माझ्याकडे असलेल्या अँन्सेल अँडाम्सची चार कृष्ण-धवल कॅलेंडर्स दाखवली मात्र, त्याला त्याविषयी किती बोलू अन किती नको असं होऊन गेलं. त्याचा आवडता अर्ल ग्रे हा कोर्‍या चहाचा कप त्याच्या हातात (ही सवय त्यानेच मला लावली होती) आणि तो हरवलेला अमेरिकेतील ‘योसिमिती’ च्या राष्ट्रीय उद्यानात. बर्‍याच वेळाने स्वारी परत मुक्कामी आली. मी सिल्वर कागदांचा गठ्ठा तयारच ठेवला होता. त्याचा एक नमुना मी बाबाला दाखवला. तो तर खूशच होऊन गेला. तेथल्या तेथे घड्या घालत त्याने एक पक्षी माझ्यासाठी बनवला. माझ्या टेबलावर एक-दोन पुस्तके ठेवली होती. त्यांना ‘सेलोफेन’ म्हणजे प्लास्टिकचे कव्हर घातले होते. ते त्याने बघितले व हे प्लास्टिक कुठून आणलेस असे विचारले. मी आत जाऊन त्याचा रोलच घेऊन आलो. त्याला देत म्हणालो- ‘हा रोल तू घेऊन जा. मी आणीन परत.’ लहान मुलाच्या चेहर्‍यावर जसा निर्मळ आनंद पसरतो तसा त्याच्या चेहर्‍यावर पसरला. जवळजवळ दोन तास होत आले होते. बाबा खुर्चीवरून उठला. सिल्वर पेपरचा गठ्ठा डोक्यावर व प्लास्टिकचा रोल काठीसारखा हातात पकडून नाट्यपूर्ण रीतीने म्हणाला- ‘निघाले कागदवाले बाबा, निघाले कागदवाले बाबा!’ माझा सहायक जितेंद्रने त्याची ही छबी कॅमेर्‍यात अचूक पकडली.माझं थीम कॅलेंडर देण्यासाठी मी त्याच्याकडे आवर्जून जातो. त्यावेळी निघताना त्याने मला बर्‍याच वेळा त्याचे एखादे नुकतेच आलेले पुस्तक भेट दिलेले असते. ‘प्रिय सतीश, वर्षावर्षाने उगवणारा!’ असे लिहून खाली - बाबा किंवा अनिल अशी सही करून.एकदा मी 2013 च्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्याला फोन केला व घरी पोहोचलो. त्यावेळी मी पूर्वीच्या फोटोग्राफर्सबद्दल चरित्रात्मक लिहिलेल्या माझ्या ‘भिंगलीला’ या पुस्तकाची डिजिटल प्रिंट असलेली डमी बरोबर घेऊन गेलो होतो. मला त्या पुस्तकासाठी प्रस्तावना हवी होती. त्याच्यासाठी बाबाइतकी योग्य व्यक्ती दुसरी कोण असणार? मी त्याला तसे म्हणालो. त्याला त्याच्या कामातून वेळ होणार नाही  असे त्याने सांगितले. मी थोडासा निराश झालो. पण त्याने भिंगलीला पुस्तक व्यवस्थित चाळले. निघताना म्हणाला - ‘सतीश, याची एक झेरॉक्स कॉपी काढून देतोस का?’ मी कॉपी पाठवतो असे सांगून तेथून निघालो. पुस्तकाची झेरॉक्स कॉपी काढली. जितेंद्रला ती कॉपी घेऊन पाठवले. एक दिवस मध्ये गेला. सकाळी सकाळी बाबाचा फोन. ‘काय करतो आहेस? लगेच ये!’ मी तासाभरात पोहोचलो. त्याने माझ्या हातात दोन कागद दिले. त्याच्यावर काही प्रश्न लिहिलेले होते. मुलाखतीचे. मला काही कळेना. मी विचारताच बाबा म्हणाला- ‘ अरे, असे झाले होय?’ ते कागद हातात घेत परत पालथे करून मला दिले व म्हणाला - ‘परवा रात्रीच मी भिंगलीला पूर्ण वाचले. मस्त झालंय. काल मुंबईत सुधीर गाडगीळनी माझी मुलाखत घेतली. सकाळीच आम्ही दोघे पुण्याहून तेथे गेलो. सुधीरने मला प्रश्न लिहिलेले हे दोन कागद दिले. ते वाचल्यावर जाताजाताच मी त्याच्या मागच्या बाजूला भिंगलीलासाठी प्रस्तावना लिहीलीय. इथं समोर बस. मी तुला वाचूनच दाखवतो.’ असे म्हणत त्याने वाचायला सुरुवात केली. काही सेकंदात मी त्याला थांबवले आणि म्हणालो- ‘बाबा, परत पहिल्यापासून वाच. मी त्याचं रेकॉडिर्ंग करतो.’ उत्तम लिहिलेली प्रस्तावना आणि त्याचं लेखकाच्याच तोंडून नाट्यमय असं वाचन.. मजा आली. नंतर 28 सप्टेंबर 2013 रोजी भिंगलीलाचं प्रकाशन अनिल अवचट व जब्बार पटेल या दोन डॉक्टर मित्रांच्या हस्ते झालं.दरम्यानच्या काळात म्हणजे 27 ऑगस्ट 2013 ला मी कॅमेरा घेऊन त्याच्याकडे गेलो होतो. त्याची पोट्र्रेट्स काढण्यासाठी. घरात गेल्यावर डाव्या बाजूस बाबाची नव्वदीतली आई टीव्ही पाहत बसलेली. मी गच्चीत डोकावलो. पत्रकार नगरमधील दाट झाडांची सुंदर पार्श्वभूमी तयारच होती. मी बाबाला तिथे उभं राहण्यास सांगितलं. काही प्रकाशचित्र टिपली. दिवाणखान्यात दक्षिणेच्या खिडकीतून येणारा प्रकाशाचा मंद झोत होता. तेथेच त्याचा वाचनाचा डेस्क ठेवलेला होता. मी कॅमेर्‍यातून फ्रेम पाहत असतानाच बाबा शांतपणे येऊन त्या डेस्कमागे बसला. तो स्वत: एक प्रकाशचित्रकार असल्याने मला काय फ्रेम अपेक्षित असावी याचा त्याने विचार केला होता. मी पुढच्याच क्षणी फक्त क्लिक करण्याचे काम केले होते. आमची ही फोटोग्राफी बाबाची आई म्हणजे इंदुताई निवांतपणे पाहत होत्या. मी बाबाला त्यांच्या शेजारी येऊन बसायला सांगितले. तो ही क्षण मी पकडला. सगळे अगदी सहज. बाबाच्या स्वभावाप्रमाणे.2014च्या जानेवारीत माझं ‘ओ. पी. नय्यर.. क्या बात है इस जादूगर की’ हे कॉफी-टेबल पुस्तक प्रकाशित झालं होतं. पण मला बाबाकडे जायला वेळ झाला नव्हता. साधारण जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात मी ते देण्यासाठी बाबाच्या घरी गेलो. त्या पुस्तकाचा आकार, त्यातील नय्यर साहेबांचे फोटो, उत्तम छपाई व महत्वाचे म्हणजे प्रत्येक पानावर दिलेल्या गाण्यातील नय्यर साहेबांच्या संगीताची पं. शिवकुमार शर्मा यांनी उलगडून दाखवलेली सौंदर्यस्थळं वाचताना बाबा नय्यरसाहेबांची गाणी न गुणगुणता तरच नवल होतं. त्यानी मला विचारलं की - ‘खूप खर्चिक झालं असेल नं हे पुस्तक?’ त्याच्या फक्त छपाई व बांधणीसाठी साडेसात लाख रुपये लागले हे ऐकताच त्याने डोळेच विस्फारले. ते पुस्तकही मीच प्रकाशित केलेलं असल्याने त्याच्या वितरणाबाबत काय असे त्याने विचारले. ती यंत्रणा माझ्याकडे नाही पण ज्याला माहित होतंय तो फोन करून माझ्याकडून प्रत विकत घेतोय हे मी सांगितलं. प्रकाशनाच्या कार्यक्रमातही बरीच पुस्तके विकली गेली होती. भारतभर असलेले नय्यरसाहेबांचे चाहते पुस्तक कुरिअरने मागवीत आहेत हे ही सांगितले. मी त्याला म्हणालो - ‘जाईल हळूहळू विकलं ! आपल्याला इथं कुठं घाई आहे?’ अर्थात हा असा व्यवहार म्हणजे अव्यवहारीपणाचा उत्तम नमुना होता. बाबा एकदम उठला. आतल्या खोलीतून त्याचं नुकतंच प्रकाशित झालेलं एक पुस्तक घेऊन आला. ‘माझी चित्तरकथा’ हे ते पुस्तक. जगातील तमाम नादिष्ट माणसांना त्याने हे पुस्तक अर्पण केलंय. एक त्याच्या समोरच बसला होता. त्याने पेन उघडून त्या ओळीच्या खालीच लिहिलं - ‘सतीश, तुझ्यासारखी अव्यवहारी माणसे आहेत, म्हणून जग जाग्यावर आहे. - बाबा ’  ‘ओ. पी. नय्यर.. क्या बात है इस जादूगर की’ हे कॉफी-टेबल बुक मी ज्या भावना मनात ठेऊन केलं त्याला मिळालेली ही दाद माझ्या दृष्टीने व्यवहाराच्या पलीकडची आहे.  असंच एकदा सहज गेलो असताना बाबा त्याच्या नेहमीच्या पसार्‍यात आरामात काही लिहीत बसला होता. शेजारीच त्याचा कॅमेरा आणि फोटोंच्या एक दोन फ्रेम्स ठेवल्या होत्या. मी सहजच ती फ्रेम बघितली. त्याच्या एका मित्राचे पोट्र्रेट होते ते. मी ते पाहत असतानाच बाबा मला म्हणाला - ‘व्वा! कॅमेरा हाताशीच आहे. तर फोटोग्राफरचाच फोटो काढतो आज.’ असं म्हणून त्याने माझे फोटो काढणं सुरू केलं. एक फोटो काढताना त्याने कॅमेरा माझ्या चेहर्‍याच्या खूपच जवळ आणला होता. मी त्याला म्हटलं- ‘त्या बागुलांना लोक ‘कपाळ काप्या’ फोटोग्राफर म्हणायचे. तू पण तसाच काढतोयंस का?’ यावर त्याचं उत्तर की - ‘ते आता तू प्रत्यक्ष प्रिंट आल्यावरच बघ.’ काही दिवसांपूर्वी र्शी. सदा डुंबरे मला म्हणाले की - ‘अनिलकडे तुझा फोटो बघितला. त्याने काढलेला. मस्तच काढलाय.’ मलाही उत्सुकता निर्माण झाली. मी बाबाला फोन केला. त्याने मला सांगितले की मी तुझ्या मुलाला भेटायला येणार आहे. त्यावेळी मी तो फोटो घेऊन येईन.’  मी बाबाची वाट पाहतोय आणि माझ्या त्या फोटोचीही.माझी खात्री आहे की पंधराव्या शतकातील कबीरापासून स्फूर्ती घेतलेला आणि त्याच्यासारखेच ‘खडी बोली’ मध्ये दोहे रचणारा हा आजचा कबीर अचानक येईल आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्या दोह्यातून शिकवण देईल की -‘अहंकार तो मालिक सबका, उससे निकली अवगुण गंगा                                                                         इर्षा, स्पर्धा, द्वेष अन बदला, गुस्सा कर देता है अंधा                                                                           अंहकार को रख काबू में, उभर आयेगी सद्गुण गंगा                                                      खिल जायेगी फूल अन कलियाँ, मन हो जावे तृप्त सुरीला !’ 

sapaknikar@gmail.com(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)