- वंदना अत्रे
ताकाहीरो अराई नावाच्या जपानी तरुणाशी गप्पा मारीत होते. विषय अर्थातच भारतीय संगीत. ताकाहीरो जन्माने आणि नावाने जपानी असेल; पण मनाने फक्त भारतीय. छानसे हिंदी बोलणारा. भारतीय संगीत आणि अन्न यावर तुडुंब प्रेम करणारा. तो भारतात आलाच मुळी संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचे बोट धरून. अन्य काही करणे त्याला अगदी नामंजूर होते. त्याला विचारले, ‘आपला देश, कुटुंब, शिक्षण सोडून एका नव्या देशाशी आणि वातावरणाशी जमवून घेताना कधी थकवा आला? वैफल्य जाणवले?’
‘वैफल्य?’ एक क्षणभर थांबत तो म्हणाला, ‘ते एकदाच येऊ शकते. माझ्या गुरुंना सोडून जायची वेळ माझ्यावर आली तर..! तशी वेळ आलीच तर माझ्यासमोर फक्त नैराश्याचा अंधार असेल !’
मुंबईत पाय ठेवीपर्यंत गुरु-शिष्य परंपरा हे शब्दसुद्धा ज्याच्या कधीच कानावर पडले नव्हते असा हा तरुण. गुरुंबरोबर प्रवास करताना त्यांच्या बारीक-सारीक गोष्टी आणि गरजा लक्षात घेत गुरु-शिष्य नात्याची घडण आणि वीण अनुभवत गेला. त्याबद्दल आपल्या गुरुकडून ऐकलेल्या कितीतरी गोष्टी मला सांगत राहिला तेव्हा मनात आले या गोष्टी आणि परंपरा माझ्या देशात किती लोकांना ठाऊक असतील? गुरु-शिष्यांचा परस्परांवर असलेला अधिकार आणि तरीही दुसऱ्याच्या आत्मसन्मानाचा सांभाळ हा अवघड तोल जाणला नेमका आम्ही?
गुरु-शिष्य परंपरा म्हटल्यावर नेहेमी आठवतो तो रामकृष्ण बाक्रे यांच्या ‘बुजुर्ग’ पुस्तकात वाचलेला एक तरल अनुभव. गुरुच्या माथ्यावर सदैव असणाऱ्या साफ्याच्या केशरी रंगाचा सौम्य झळाळ सांभाळण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांच्या देठाचा रंग करणाऱ्या शिष्येचा!
कोल्हापुरात गुरु अल्लादिया खाँसाहेब यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या आणि मनापासून त्यांची भक्ती करणाऱ्या तानीबाई यांनी या कामासाठी धोंडीबा अडसुळे नावाच्या माणसाची खास नेमणूक केली होती. प्राजक्ताच्या हंगामात या फुलांचे देठ गोळा करून, ते सुकवून, कुटून ठेवायचे हे त्याचे काम. ही पूड उकळून त्यात साफा बुडवून ठेवला की देठांच्या मंद केशरी रंगाची हलकी झाक गुरुजींच्या साफ्यावर चढत असे..!
पुढे गुरु मुंबईत आले. कोल्हापुरात असलेले हे प्राजक्ताच्या फुलांचे वैभव मुंबईत कुठून मिळणार? तेव्हा केशरी रंगाच्या वड्या वापरून वेळ निभवावी लागे! या साफ्यासाठी त्यांना अतितलम मलमल लागे. ती इतकी पारदर्शक आणि तलम असायची की तळहातावर चौपदरी घडी ठेवली तरी हातावरच्या रेषा स्पष्ट दिसत असत...!
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही मलमल मिळवण्यासाठी फार धावाधाव करावी लागायची. पण या छोट्या-छोट्या गोष्टी सहज उत्स्फूर्तपणे घडत होत्या. अपेक्षा नसताना केल्याची एक मौज होती त्यात. आणि ही सहजता त्या गुरुमधेही होतीच की, समोर असलेला एखादा पेच शिष्यापुढे सांगायला संकोच वाटू नये, अशीच ही सहजता होती.
अशीच एक घटना बाक्रे यांनी या पुस्तकात लिहिली आहे. ही आठवण जगन्नाथबुवा पुरोहित यांची. एका रात्री अडीच वाजता बुवांच्या शेजारी राहणारे एक गृहस्थ पंडित वसंतराव कुलकर्णी या बुवांच्या शिष्याच्या घरी गेले. वसंतराव दचकले, म्हणाले ‘एवढ्या रात्री आलात?’ ‘असाल तसे या असा निरोप दिलाय बुवांनी’. ‘तब्येत ठीक आहे ना त्यांची?’ ‘हो.. थोडे चिंतित वाटले...’ वसंतराव गुरुकडे पोहोचले तेव्हा डोक्यावरून शाल पांघरून बुवा बसले होते. बुवांनी एक कागद त्यांच्या हातात दिला. अहिर भैरव रागातील एक नवी बंदिश होती ती. शब्द होते
‘अरे तू जागत रहियो, मान लो मेरी बात,
जग झुटा, सब माया झुटी, कोई नाही तेरा गुनिदास’
वाचून वसंतराव गुरुजींना म्हणाले, ‘छानच झालीय..’ कातावून गुरुजी म्हणाले, ‘अहो, समेवर यायला दोन मात्रा कमी पडतायत.. जरा हाताने ताल धून गुणगुणून बघा... कौतुक कसले करताय...’
हातातले कॉफीचे कप खाली ठेवीत दोघेही काही क्षण स्वस्थ बसले. मग वसंतरावांनी पेन उचलला आणि लिहिले, ‘कोई नाही तेरा गुनिदास, इस जगमे...’ सम बरोबर साधत होती! प्रसन्न झालेले गुरुजी त्या उत्तररात्री, शिष्याने दुरुस्त केलेली अहिर भैरवची बंदिश पहाट होईपर्यंत गात राहिले...!
(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
vratre@gmail.com