- सुधीर लंके‘आम्हाला अन्न-पाणी नको, आम्हाला घरी जाऊ द्या’, अशी मागणी करत गत आठवड्यात शेकडो परप्रांतीय कामगार मुंबईत वांद्रे स्थानकावर जमले होते. या कामगारांनी आहे तेथेच थांबावे. आम्ही त्यांची सगळी सोय करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. तरीही हे कामगार अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता का आहे? वांद्रे स्थानकावर जे चित्र दिसले त्यात बहुतांश कामगार हे पुरुष होते. महिला फारशा दिसत नाहीत. मुळात मुंबई, पुणे व मोठय़ा शहरांमध्ये जे परप्रांतीय कामगार आहेत त्यात पुरुषांचा टक्का मोठा आहे. कुटुंब गावाकडे ठेवून हे पुरुष शहरांमध्ये येतात. वर्षभर गावाकडेच जात नाहीत. इतर कामगारांसोबत ते जागा मिळेल तेथे दाटीवाटीने राहून दिवस काढतात. वडापाव खाऊन व फूटपाथवर झोपूनही दिवस काढण्याची त्यांची तयारी असते. कुटुंब गावाकडे ठेवून परमुलखात एकटे राहतात अशा पुरुषांना उत्तर प्रदेश व बिहारमध्ये ‘छेडेभाई’ म्हणतात. ‘लोकमत’ने 2015 साली ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात एकटेपणाने राहणार्या या पुरुषांवर ‘बिदेसिया’ नावाचा लेख प्रकाशित केला होता. या लेखासाठी फिरलो तेव्हा या पुरुषांचे भावविश्व जवळून पाहिले होते.मुंबईत नालासोपारा भागात साड्यांची छपाई करणारे कारखाने मोठय़ा प्रमाणावर आहेत. या कारखान्यांत बहुतेक कामगार पुरुषच असतात. लांबलचक असणार्या आयताकृती लाकडी टेबलांवर साड्या अंथरायच्या व त्यावर छाप उमटवायचा. दिवसभर तुम्ही जेवढे काम करणार तेवढा पगार. थोडक्यात अंगावर पगार. या कारखान्यात उत्तर प्रदेशचा महेंद्र मौर्या नावाचा कामगार भेटला होता. त्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. बायको गावाकडे. त्याला पहिले मूल झाले तेव्हा त्याचा चेहरा पहायलासुद्धा हा गावी जाऊ शकला नव्हता. आजारपणाने हे मूल पुढे दगावले. तेव्हाही हा गावाकडे जाऊ शकला नाही. या कारखान्यांत हे कामगार रात्री टेबलाखाली जागा करून झोपतात व दिवसभर याच टेबलांवर छपाईचे काम करतात. टेबलांखालीच स्वयंपाकाचा स्टोव्ह व थोडाबहुत किराणा. हा टेबल म्हणजेच त्यांचे जगणे. पुण्यात प्रभात रोडवर बहादूर नावाचा नेपाळचा कामगार भेटला होता. तो 37-38 वर्षे भारतात आहे. गावाकडे फक्त वर्ष-दोन वर्षातून एकदा जातो. पुण्यात अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाची नोकरी करून बहादूर गावाकडच्या नऊ मुलांचा सांभाळ करत होता. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे काही परप्रांतीय मजूर तर दिवसा एका अर्पाटमेंटची सुरक्षा करतात व रात्री दुसर्या. कारण का, तर राहण्यासाठी जागाच नसते. चोवीस तास पहारा देण्याची नोकरी मिळाली तर निदान राहण्याचा प्रश्न मिटून जातो. चोवीस तासाच्या पुढे घड्याळ जात नाही म्हणून चोवीस तास. अन्यथा त्याहीपेक्षा अधिक काम करण्याची या कामगारांची तयार असते. कारण काम केले तर आपणाला पैसे मिळतात व पैसे कमविण्यासाठी आपण शहरात आलो आहोत हा सिद्धांत त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे. कोरोनाच्या संकटात जगभर आज ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द चर्चेत आला आहे. चौदा दिवस कुटुंबापासून ‘क्वॉरण्टाइन’ केले तर लोक कसा थयथयाट करतात हे दिसले आहे. मात्र, हे कामगार वर्ष-वर्ष कौटुंबिक डिस्टन्सिंग पाळतात. भावना, शरीर, मन या सर्वांवर ताबा ठेवत. कामगारांनी कामासाठी स्थलांतरित होणे हा अर्थव्यवस्था व जागतिकीकरणाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. गावात हाताला काम नसते म्हणून माणूस स्वत:साठी मार्केट शोधून बाहेर पडतो. हे स्थलांतरित कामगार म्हणजे एकप्रकारे शहरांचे निर्मातेच आहेत. त्यांच्या कष्टावर शहरं उभी आहेत. आपलं शहरीकरण हे ‘सक्यरुलेटरी अर्बनायझेशन’ आहे. म्हणजे शहर-गाव असे सायकल सतत सुरू असते. लोक गावातून शहरात येतात व पुन्हा गावात जातात. लॉकडाउनमुळे कामगारांचे पगार कापू नका, असे पंतप्रधानांनी जरी सांगितले असले तरी मुंबई, पुणे व मोठय़ा शहरांत ज्या कामगारांना कामाच्या बदल्यातच पैसे मिळतात त्यांना कोण पैसे देणार आहे? त्यांना ना वर्क फ्रॉम होम आहे, ना रजांचा अधिकार. काम नाही, तर पैसा नाही. शहरच ठप्प झाल्याने शहरांत बसून खाणे या मजुरांना परवडणारे नाही. सरकार भलेही त्यांना दोन वेळचे जेवण देईल. पण, काम करून दिवसाकाठी जे पैसे मिळत होते त्याचे काय? असे भाकड दिवसही त्यांना कर्जबाजारी करू शकतात. त्यापेक्षा गावात जाऊन कुटुंबात राहू. घरची कामे करू, या आशेने या कामगारांना गावांची ओढ लागली आहे. अशा संकटाच्या काळात कुटुंबाचा सहवास आपणाला हवा अशीही त्यांची अपेक्षा असणार. या ओढीपोटी ते गाडी कोणत्या स्टेशनाहून सुटेल याची प्रतीक्षा करत आहेत. मजुरांना धावणारे, हाताला काम देणारे शहर आवडते. आज मुंबई, पुणे ही मोठी शहरेच हाताला काम देत नसल्याने मजुरांची ना घर का ना घाट का, अशी अवस्था आहे. म्हणून ते गावाकडे निघाले आहेत. ते मजबूर व हवालदिल आहेत.
धावते शहर भाकड झाल्यावर दुसरे करणार काय?1. जेवून-खाऊन अख्खा दिवस शंभर रुपयांत काढायचा व शिलकीचे पैसे गावाकडे पाठवायचे, असे मुंबई, पुण्यातील बहुतांश परप्रांतीय कामगारांचे अर्थशास्र असते. 2. अनेक टॅक्सीचालक कोठेतरी खोलीवर रात्र काढतात व दिवसभर टॅक्सीत असतात. 3. मुंबईत साकीनाका परिसरात अशा एका खोलीवर रात्र काढून मी या कामगारांसोबत राहण्याचा अनुभव घेतला आहे. 4. भर नाल्याच्या कडेला ही पत्र्याची खोली होती. दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव. कोंदट, कुबट वातावरण. अशा ठिकाणीही हे कामगार राहतात. दुसरा पर्याय नसतो. 5. दिवसातून दहा-बारा तास हे लोक काम करतात. आठवड्याची सुटीदेखील नाही. कोठे फिरणे नाही की मौज नाही. 6. अशा अवस्थेत या मजुरांना तग धरून ठेवते ते धावते शहर. तेच आता ठप्प आणि भाकड झाले असेल, तर यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे?
sudhir.lanke@lokmat.com(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)