- सुलक्षणा महाजन
संगमरवराचा एक मोठा ठोकळा १४६० सालापासून नैसर्गिक हवेला तोंड देत इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात, एका चर्चच्या आवारात पडून होता. १५०१ साली चर्चच्या बांधकाम समितीने या संगमरवराच्या ठोकळ्यामधून एक पुतळा कोरण्याचा निर्णय घेतला, डेव्हिड असे त्याचे नावही ठरविले. शिल्प कोरण्यासाठी २६ वर्षांच्या मायकेल एन्जेलो बुनारोत्ती या शिल्पकाराची निवड झाली. जून १५०३ मध्ये पुतळा जवळपास पूर्ण झाला आणि शिल्पकाराचे काम बघायची इच्छा असलेल्या नागरिकांना कामाच्या ठिकाणी जाऊन तो बघण्यासाठी खुला झाला.मोठ्या संगमरवराच्या ठोकळ्यामधून डेव्हिड साकारणे म्हणजे एक मोठी जादूच होती. मायकेल एन्जेलोच्या हातांनी ‘मृत ठोकळ्याला जिवंत’ करण्याची किमयाच साधली होती. पुतळा बघून हे भव्य, देखणे शिल्प कोठे ठेवावे यावर सार्वजनिक चर्चा सुरू झाली. वास्तवात हे शिल्प चर्चच्या इमारतीला आधार देणाऱ्या उंच दगडी खांबावर बसविण्यासाठी तयार केले होते. परंतु बहुसंख्य नागरिकांना ते शिल्प रस्त्याजवळ, सर्वांना सहज बघता येईल अशा ठिकाणी उभारायला हवे असे वाटत होते. शेवटी शिल्प कोठे उभारावे हे ठरविण्यासाठी तज्ज्ञ लोकांची एक सभा भरविण्यात आली. फ्लॉरेन्समधील जवळजवळ सर्व वास्तुरचनाकार आणि कलावंतांना, तसेच प्रतिष्ठित नागरिकांनाही या अभूतपूर्व चर्चेत भाग घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. फ्लॉरेन्स राज्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा विषय बनला होता. त्याच काळात फ्लॉरेन्सला बाह्य शत्रूच्या आक्र मणांचा धोका असतानाही सामाजिक स्वायत्ततेची परंपरा जपण्यासाठी ही सर्व धडपड चालली होती. त्यामुळेच डेव्हिडचे शिल्प फ्लॉरेन्समधील नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक बनले होते.डेव्हिडला कोठे उभारावे याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते होती. तरीही तो पुतळा रस्त्याच्या जवळ असावा याबाबत सर्वांचे एकमत झाले. माणसाच्या उंचीपेक्षा तीनपट उंच असलेल्या या पुतळ्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला व्यत्यय आला असता, त्यामुळे पादचारी लोकांच्या मार्गात काय अडचणी निर्माण होतील याबद्दल सभेमध्ये सातत्याने शंका उपस्थित केल्या जात होत्या. शहरी वाहतुकीला अडचण ठरणार नाही; पण तरीही पुतळ्यासाठी सुयोग्य आणि सुरक्षित जागा त्यांना निवडायची होती. त्याचवेळी हा पुतळा सर्व बाजूंनी बघता आला पाहिजे अशीही लोकांची अपेक्षा होती.या चर्चेदरम्यान कलाकार, सुतार, वास्तुरचनाकार, प्रशासक यांनी वेगवेगळी ठिकाणे सुचवली. एका वास्तुरचनाकाराची राजवाड्याच्या बाहेर इमारतीमध्येच कोनाडा तयार करून त्यात पुतळा बसविण्याची सूचनाही सर्वांनी विचारात घेतली. शेवटी सर्वानुमते सिग्नोरा या राजवाड्याच्या दर्शनी भागात, मुख्य दरवाजाच्या एका बाजूला, तेथील दोनातेलोने तयार केलेले जुडीथचे १४९५ साली बसविलेले शिल्प काढून त्याजागी डेव्हिडला स्थानापन्न करण्याचा निर्णय झाला. ज्युडिथचा पुतळा हलवून त्याजागी डेव्हिड उभारावा ही सूचना सर्वप्रथम फ्लॉरेन्स प्रशासनाच्या प्रमुखाने केली होती. त्याकाळी फ्लॉरेन्सच्या एकाही नागरिकाला ज्युडिथच्या शिल्पाचे प्रेम नव्हते. तो पुतळा म्हणजे मृत्यूचे प्रतीक आहे असे काहींना वाटत असे. ‘एका स्त्रीने पुरुषाचा वध करणे शोभत नाही, तसेच हा पुतळा आकाशस्थ ग्रहांच्या वाईट मुहूर्तावर उभारला गेला असल्यामुळे तेव्हापासून फ्लॉरेन्सची परिस्थिती बिघडत गेली आहे’, असेही काहींचे म्हणणे होते. दुष्ट ग्रहांच्या अफाट शक्तीवर विश्वास असणाºया लोकांना तर हा पुतळा हलविल्यामुळे आनंदच झाला. रेनेसाँ काळातील फ्लॉरेन्समध्ये जर एखाद्या शिल्पामुळे समस्या निर्माण झाली तर त्यावर उत्तर म्हणून कलेकडेच बघितले जात असे. ज्युडिथच्या पुतळ्याच्या ठिकाणी डेव्हिडचा पुतळा बसविला गेल्यानंतर अशांत फ्लॉरेन्समध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली.चर्चमधील कार्यशाळेतून डेव्हिडचा पुतळा वाहून आणणे आणि तो नियोजित जागी उभा करणे हे एक मोठे आणि धोकादायक आव्हान होते. एका वाहनावर उभा केलेल्या डेव्हिडचा, चर्च ते नियोजित स्थान असा प्रवास सुरू झाला. चाळीस लोक ते वाहन ढकलत होते. त्या प्रवासाला चार दिवस लागले. सिग्नोरा राजवाड्यासमोर तो स्थानापन्न झाला आणि पहिल्या दिवसापासून फ्लॉरेन्सच्या नागरिकांनी चर्चेच्या फेºयातून गेलेल्या डेव्हिडला आपलेसे केले. नागरिकांनी कल्पनाशक्ती लढवून या भव्य शिल्पासंबंधी नंतर अनेक आख्यायिका रचल्या. डेव्हिड हा केवळ शक्तीचे प्रतीक न राहता फ्लॉरेन्समधील नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक बनला. फ्लॉरेन्सच्या चतुर नेत्यांचा हाच खरा छुपा हेतू होता असे आज अनेकांचे मत आहे. प्रतीकाचा वापर आणि लोकसहभागातून जनमान्यता हे दोन हेतू तेव्हा राज्यकर्त्यांनी साध्य केले.नागरिकांना समान उद्दिष्टांच्या भोवती एकत्र करणे हा अशा पुतळ्यांचा किंवा प्रतीकांचा खरा हेतू असतो, नव्हे असायला हवा. महात्मा गांधीजींचा चरखा हे त्याचे आपल्या स्वातंत्र्य चळवळीचे, शांततेचे आणि सत्याग्रहाचे सर्वात प्रभावी प्रतीक होते. दुर्दैवाने आज आपल्याकडे मात्र अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांच्या शांततेनं जगण्याच्या इच्छा आणि अपेक्षा डावलून, राजकीय-सामाजिक दुफळी माजविण्यासाठी पुतळे उभारले जात आहेत, तोडले जात आहेत आणि प्रतीकांचा अवमान करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. जाती-धर्म-भाषा आणि पुतळे-प्रतीके यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वितुष्ट आणून फूट पाडली जात आहे. राजकीय नेते स्वत:ची सत्तास्थाने बळकट करीत असले तरी देशाला मात्र अशक्त करीत आहेत. भारताला आज कशाची आवश्यकता असेल तर मायकेल एन्जेलोसारखा कलावंत, डेव्हिड किंवा चरख्यासारख्या प्रतीकाच्या निर्मितीची आणि नागरिकांना त्याभोवती एकत्र करण्याची.