- दिलीप प्रभावळकर
जसजसं आपण पुढे जातो, तसंतसं मन मागे वळून पाहण्यात दंग होतं.. गेल्या वर्षाचा हाच काळ.. त्या वेळी ‘विटी-दांडू’चं चित्रीकरण सुरू होतं. नदीच्या काठी नारळी पोफळीच्या बागेत.. निसर्गाच्या सान्निध्यात चित्रीकरणाची प्रक्रिया जगत होतो.. आज त्याबद्दल लिहायचंय.. मी तसा चोखंदळ आहे.. पण हा सिनेमा तरुणाईने सळसळणारी टीम करणार, याचं कौतुक होतं.. का कोण जाणे.. पण आजच्या पिढीबद्दल मला कायम आत्मीयता वाटत राहिली आहे. तरुणाई अन् बदल घडवण्याची प्रक्रिया हे एक नातं आहे अन् त्या सगळ्य़ासोबत तंत्रावरची हुकूमत अन् त्या विषयाची मांडणी या सार्याबद्दल एक वेगळं कुतूहल होतं अन् ते कायम राहिलं.. भोवताल बदलत राहिला तरी.. हे सारं विचारांचं कोलाज मनात येण्यामागचं कारणही तसंच. ‘विटी दांडू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या निमित्ताने.. या सिनेमाच्या आठवणींच्या वाटांवरून नकळत कधी प्रवास सुरू झाला, हे कळलंच नाही. मला पुढच्या पिढीबद्दल वाटणारं आश्वासक चित्र इथे पूर्ण होताना दिसतं. अमूर्तातून साकारत जाणं अन् त्याला मूर्त स्वरूप येणं.. या सगळ्य़ामध्ये सर्जनशीलतेची एक प्रक्रिया दडलेली असते. आजच्या पिढीसोबत ही सारी गोष्ट जगण्याचं भान होतं, पण त्या स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जोडणारा दुवा म्हणजे ती संहिता घेऊन विकास कदमचा प्रस्ताव आला.. गोष्ट ऐकणं अन् ती मांडण्यासाठी गणेश कदम आला.. त्या वेळी कागदावर लिहिली जाणारी गोष्ट.. प्रत्यक्षात येईल. याचा विश्वास मनोमन पटला.. अभिनेता अन् पटकथा लेखक विकास कदम याच्याशी सूर जुळले होते ते ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’च्या दिवसांमध्ये.. त्या मालिकेत तो माझ्या नातवाचं म्हणजे शिर्याचं काम करायचा.. त्याने लिहिलेली ही गोष्ट.. त्याच्याकडून विचारणा झाल्यावर हे प्रकरण थोडंसं गंभीर आहे, याची जाणीव झाली होती.
माझी व्यक्तिरेखा अन् सिनेमा असं द्वंद्व माझ्या मनात सुरू झालं. मनात प्रश्नाचं मोहोळ उठलं. प्रत्येक गोष्ट तपासून पाहायची.. तावून सुलाखून घ्यायची, हा शिरस्ता.. कारण आपल्याकडून घडणार्या प्रत्येक गोष्टीने प्रेक्षकाला काहीतरी नवीन द्यायला हवं, ही भावना त्यात आहेच, पण आपल्या मनाचं देखील समाधान व्हायला हवं.. असं कुठंतरी खोल दडलेलं आहे.
दाजी नावाची माझी यामधील व्यक्तिरेखा.. त्या अनुषंगाने येणार्या गोष्टी मनात रुंजी घालत होत्या. आजोबा-नातू एवढय़ापुरती ही गोष्ट र्मयादित राहत नाही. स्वातंत्र्यसंग्रामाची असलेली पार्श्वभूमी अन् त्या सगळ्य़ा गोष्टीला देशप्रेमाचं वलय. हे सारं व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीला धरून असणारा मनोरंजनाचा आविष्कार एका वेगळ्य़ा पद्धतीने घडवेल, असं वाटून गेलं. यामधलं पात्र गोविंद म्हणजे माझा नातू.. स्वातंत्र्यसमरात धुमसणारं गाव.. अन् तिथल्या माणसांमध्ये नातं शोधण्याचा एक वेगळा प्रवास करताना या काळाशी त्याचं नातं जोडण्याचा केलेला प्रयत्न मला महत्त्वाचा वाटला.. तो दुवा.. तो अन्वय.. या सिनेमाच्या मांडणीतला, त्या कथेमधला महत्त्वाचा भाग आहे.. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरेतून पाहताना. भूतकाळ अन् वर्तमानाची इतकी उत्तम सांगड घातली गेलीय.. पण हा काळ उभं करणं.. अन् त्यामधल्या आजोबा-नातवाच्या नात्याला असलेला कंगोरा अन् स्वातंत्र्याची पार्श्वभूमी हे सारं प्रकरण मला आवडून गेलं होतं.. चित्रीकरणासाठी पोहोचलो.. तेव्हाच त्या कोकणामधील गावाने मनात एक घर केलं.. गर्द झाडी.. त्यातून नागमोडी वळत जाणार्या पायवाटा.. नारळाची डोलणारी झाडं.. उतारांवरची घरं.. काही आडोशाला असणार्या घरांचं डोकावून पाहणं.. त्या सगळ्य़ा गोष्टी पुन्हा आठवण करून देत होत्या. विचारांचा कल्लोळ होता मनात.. मन शांत असलं तरी अस्वस्थतेचं काहूर माजलं होतं.. चित्रीकरणाचा दिवस उगवला.. व्यक्तिमत्त्वाची उकल हे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आ वासून उभं होतं.. सभोवताली पसरलेला संधिप्रकाश.. मिणमिणत्या कंदिलाचा दिवा पेटत होता.. होडीमध्ये मी.. नदीच्या मध्यभागी.. अन् त्या दाजींचं मनातलं आक्रंदन.. तिथे डोळ्य़ातून ओघळणार्या अश्रूंमध्ये हे दाजी नावाचं पात्र मला भेटलं.. स्वातंत्र्यासाठी लढा देणार्यांची ही गोष्ट आहे.. त्या सार्या गोष्टीला एक अन्वयार्थ आहे..
व्यावसायिक मनोरंजनाच्या ज्या चौकटी मानल्या जातात. त्या मोडून नवीन विटी अन् नवीन दांडू असं समीकरण प्रस्थापित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथे माझ्यासोबत असलेला नातू म्हणजे निशांत भावसार.. हा चिमुरडा.. अत्यंत चुणचुणीत.. लाघवी स्वभावाचा.. त्याच्यासोबतचे माझे सीन्स इतके छान रंगले. मुळात मुलांसोबत मला खूपच मनमोकळं वाटतं. त्यांच्यासोबतचं वागणं अन् वावरणं हे वेगळ्या अर्थाने मनाला खुलवणारं असतं. रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यामध्ये माझं असणं इथपासूनचा तो प्रवास खर्या अर्थाने जगणं समृद्ध करत गेला आहे. त्यामधल्या अनुभवांची शिदोरी कधी वेगवेगळ्या अर्थाने उपयुक्त ठरते. निशांत.. इथे गोविंद म्हणून आपल्याला भेटतो.. त्याच्या वागण्याबोलण्यात असलेली स्वाभाविकता.. त्याचं रिअँक्ट होणं, त्याच्यामधली निरागसता काही गोष्टी मनात राहिल्या आहेत. स्वातंत्र्याची गोष्ट अन् विटी दांडू या खेळाचा त्याच्याशी साधलेला अन्वय या सगळ्य़ा गोष्टी वेगळ्य़ा विश्वाशी आपली नाव जोडू पाहतात.. पाहता पाहता एक वर्ष उलटून गेलं. निर्मिती प्रक्रियेमध्ये आजच्या घडीला बर्याच गोष्टी इन्स्टंट घडत असतात.. पण त्या कोणत्याही प्रक्रियेच्या आहारी न जाता.. आपल्याला हवं ते मांडण्याची ताकद मला महत्त्वाची वाटते. ‘विटी दांडू’ मध्ये नेमकं तेच घडलंय, असं मला वाटतं. वर्षभराच्या निर्मिती प्रक्रियेनंतर आता प्रेक्षकांसमोर आलेल्या या ऐतिहासिक गोष्टीला दिलेला नावीन्याचा स्पर्श अन् ती गोष्ट सांगण्यामधील निरागसपणा या गोष्टी ज्या आजच्या घडीला अभावाने अन् अपवादात्मक पद्धतीने कलात्मक शैलीत मांडण्याचा केलेला
प्रकार दिसतो.. हे सारं ‘विटी दांडू’च्या निमित्ताने जुळून आलं आहे. केवळ सिनेमा अन् त्यासाठी प्रेक्षकांनी बघावा, या अट्टहासापोटी केलेलं हे प्रमोशन नाही.. पण वेगळ्य़ा चाहूलीची ही नांदी म्हणून या ‘विटी दांडू’कडे पाहता येईल.
(लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत.)