- शर्मिला फडके
मातिझनं माध्यमांचं बंधन झुगारून लावलं.त्याच्या स्टुडिओचा अवकाश कायम भारलेला, संमोहित करणारा.ती केवळ कलानिर्मितीची जागा नव्हती, जगभरातल्या अद्भुत गोष्टींचं ते म्युझियम, एक ‘प्रतिसृष्टी’च होती.स्टुडिओतल्या ज्या भिंतींवर त्याने कॅनव्हासवर आपली रंगांची दुनिया निर्माण केली, त्याच भिंतींनी त्याला शेवटच्या काळात कॅनव्हास बनून ‘आधार’ दिला.फ्रेंच चित्रकार हेन्री मातिझचा ‘द रेड स्टुडिओ’ माझा आणि त्याचा स्वत:चाही अतिशय आवडता. आपल्या पेंटिंगमध्ये कॅनव्हासवर त्याने रंगवलेला, त्याच्या स्वत:च्या स्टुडिओतला हा अवकाश. रंगवलेला म्हणजे शब्दश: ‘रंग’वलेला. कारण या पेंटिंगमध्ये इतर अनेक अद्भुत गोष्टी असल्या, तरी नजरेला जाणवतो आणि मनात शिल्लक राहतो फक्त त्यातला कॅनव्हासवरच्या सपाट अवकाशात सैलावून पसरलेला विशुद्ध, दाट लाल रंग. काही महिन्यांपूर्वी न्यू यॉर्कला म्युझियम आॅफ मॉडर्न आर्ट (मोमा) मध्ये भिंतीवर टांगलेलं ‘द रेड स्टुडिओ’ प्रत्यक्षात बघत असतानाही नजरेसमोरून हा लाल रंग ओघळत राहिला. इण्टेन्स, प्रत्यक्षात पाहताना जास्तच झळाळता दिसणारा, स्वत:त आकर्षून घेणारा जर्द लाल रंग. त्या लाल प्रवाहात पावलं बुडवून पुढे चालत गेल्यावर मात्र हळूहळू नजरेला त्या स्टुडिओतल्या इतका वेळ लाल रंगात बुडालेल्या इतर वस्तूंचं अस्तित्व पहिल्यांदाच स्पष्ट जाणवायला लागलं. मातिझचं इझल, क्रे यॉन्सचा खोका.. तो तर अगदी हाताखालीच.. माझ्या की त्याच्या?.. मग काही मोकळ्या खिडक्यांसारखे आकार, घड्याळ, फर्निचर, ड्रेसर, शिल्प.. खरं वाटावं असं जिवंतपण असलेलं कुंडीतलं झाड. बाजूच्या वेताच्या खुर्चीला लपेटून घेत ते नग्न देहासारखे वळणदार लयीत वाढत आहे. स्टुडिओतल्या वस्तू हळूहळू वितळून जातात पुन्हा त्या लाल रंगात. त्यांच्या कडा जणू स्वत:हून विरघळून जातात आणि मग पुन्हा शिल्लक उरतो फक्त दाट, आदिम लाल रंग. एखाद्या स्टुडिओचा अवकाश असा विलक्षण, नजरेला संमोहित करणाऱ्या रंगाचा कसा काय भरलेला असू शकतो? लाल रंगाची ही छटा नेहमीच्या जगातली, अनुभवातली नाही. एका काल्पनिक जगाचा उच्चार ठळकपणे त्यातून होतो आहे अशी मनाची खात्री पटत असतानाच बाजूच्या पॅनेलवर मोमामध्ये सुरू असलेल्या एका मुव्हिंग एक्झिबिशनची जाहिरात नजरेला पडली- ‘स्टेप इन टू द मातिझ स्टुडिओ’. मातिझच्या कारकिर्दीतल्या वेगवेगळ्या कालखंडातल्या (एकूण तीन) स्टुडिओंचा अंतर्भाग, त्यातल्या त्याने जमवलेल्या कलात्मक वस्तू आणि कट आउट्ससहित बघण्याची दुर्मीळ संधी समोर होती. मातिझकरता त्याचा स्टुडिओ म्हणजे केवळ कलानिर्मितीची जागा नव्हती, जगभरातून त्याने जमवलेल्या अद्भुत गोष्टींचं ते म्युझियम होतं. मातिझ एक अतिशय उत्तम कलावस्तू संग्राहक होता. जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या कलात्मक वस्तू आपल्या आजूबाजूला असलेल्या त्याला आवडत. त्यांच्या सहवासात त्याला कलानिर्मितीला आवश्यक असलेली ऊर्जा, प्रेरणा मिळे. या वस्तूंंना त्याच्या पेंटिंग्जमध्ये महत्त्वाचे स्थान होते. वेगवेगळे, एकात एक गुंतलेले पॅटर्न्स तो त्यातून निर्माण करायचा. या वस्तूंमध्ये फक्त आकारांचं सौंदर्य नव्हतं, चैतन्यमय सळसळती ऊर्जा होती, जी त्याने त्याच्या रंगांमधून कॅनव्हासवर जिवंत केली. थायलंड, बाली बेटांपासून ताहिती, आफ्रिका, मोरोक्को, स्पेन, चीन.. अनेक ठिकाणी मातिझ फिरला. बुद्धाच्या प्रतिमांपासून आफ्रिकन मुखवटे, लाकडी, हस्तिदंती वस्तू, नक्षीदार फर्निचर, रंगीत वस्त्रं, भरतकाम केलेलं रेशीम, रजया, ब्लू पॉटरी, समुद्र शिंपले, कॉफी-चहाची सुबक, देखणी उपकरणे, बश्या, पितळी भांडी.. असंख्य वस्तू त्याने तिथून जमा केल्या. मातिझच्या पेंटिंग्जमध्ये या वस्तू वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. ‘द रेड स्टुडिओ’मध्येही त्यांचं अस्तित्व अर्थातच आहे. स्टुडिओतल्या वस्तूंना अशा तऱ्हेने आपल्या पेंटिंग्जमध्ये स्थान देण्याच्या त्याच्या शैलीमुळे मातिझ हा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा वेगळा ठरला. या वस्तूंकरता मातिझ आपल्या स्टुडिओमध्ये मनमोहक सेट उभारत असे. आफ्रिकेतून आणलेल्या रंगीत कापडांवर चायनिज कॅलिग्राफीमध्ये सुंदर आकृत्या रंगवून तो त्याचे बॅकड्रॉप्स स्टुडिओत सोडायचा. वस्तू फार महागड्या, दुर्मीळ होत्या असंही नाही. पण त्याने त्या स्वत: पारखून, कष्टाने जमवलेल्या, त्याच्या वैयक्तिक आवडीच्या होत्या. प्रत्येक वस्तूमागे एक कहाणी होती. स्टुडिओत आलेल्यांना आपण या वस्तू कुठून, कशा जमवल्या याच्या कथा रंगवून सांगायला त्याला आवडे. पुन्हा पुन्हा त्या वस्तूंच्या जन्मस्थानी भेट द्यायला त्याला आवडत होतं कदाचित. रंगांची उधळण कॅनव्हासवर कितीही केली तरी या स्टुडिओच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्याचं रंगसौंदर्य नाहीच उमटवता येणार कॅनव्हासवर असं मातिझ म्हणायचा. रेजिना हॉटेलच्या परिसरात असलेल्या या स्टुडिओच्या भोवताली पाम, आॅलिव्ह, बदामाच्या वृक्षांची दाट झाडी होती. निशे आणि चेकॉव्ह तिथे राहून गेले होते. आजारपणातून नुकत्याच उठलेल्या, तब्येत सुधारायला आलेल्या मातिझला ही जागा इतकी आवडली की तिथेच त्याने आपला स्टुडिओ थाटला. मागच्या बाजूला मेडिटरेनियन निळाभोर समुद्र. त्यावरचा स्वच्छ, सुंदर प्रकाश. रोज उठल्यावर स्टुडिओतून हा प्रकाश दिसेल ही खात्रीच त्याला पुरेशी होती. इथला चौदा वर्षांचा काळ मातिझच्या आयुष्यातला कलानिर्मितीचा शेवटचा कालखंड ठरला. इथली कलानिर्मिती त्याच्या आजवरच्या निर्मितीपेक्षा, पेंटिंग्ज आणि शिल्पांपेक्षा संपूर्ण वेगळी, केवळ अद्भुत अशी. मातिझने केलेलं कातरकाम, कागदाचे आणि कापडाचे ‘कट आउट्स’. कात्रीने कापलेल्या पातळ, रंगीत कागदांच्या तुकड्यांची झाडं, पानं, फुलं, पक्षी असलेलं अद्भुत जंगल कोलाज, कागदी, रेशमी कापडी तुकड्यांमधून साकारलेलं ‘ओशियाना’ - समुद्र आणि आकाशातलं जग, निळ्या, प्रवाही आकारातलं ब्लू न्यूड.. मातिझने आपल्या स्टुडिओच्या भिंतींवर कागदी ‘कट आउट्स’मधून निर्माण केलेली ही शब्दश: ‘प्रतिसृष्टी’. कलाकाराला त्याच्या कलानिर्मितीकरता माध्यमाचं बंधन कधीच नसतं हे सिद्ध करणारा मातिझचा हा स्टुडिओ. नुकत्याच एका दुर्धर आजारातून बरा झालेला मातिझ हॉटेल रेजिनामध्ये राहायला आला तेव्हा कमालीचा अशक्त झाला होता. तिथल्या खोलीत त्याने आपला स्टुडिओ थाटला खरा; पण पेंटिंग म्हणजे ‘रंग’ आणि ‘आकार’ असं मानणाऱ्या या ‘फॉव्ह’ चित्रकाराला हातात ब्रश धरून कॅनव्हासवर रंग पसरवण्याचे श्रमही झेपेनासे झाले. बिछान्यावर पडून कंटाळलेल्या, हॉटेलच्या एकसुरी, बिनरंगी भिंतींना विटलेल्या मातिझने एक दिवस वाचून झालेल्या जाड, रंगीत मासिकाचे कागद कात्रीने कापायला सुरुवात केली. त्यातून एका सुंदर, लहानशा पक्ष्याचा आकार निर्माण झाला. ते पाहून मातिझ स्वत:च हरखला. तो आकार तसाच टाकून द्यायचं जिवावर आलं म्हणून त्याने तो बाजूच्या भिंतीवर चिकटवला. तिथला एक डाग त्याच्या सौंदर्यासक्त नजरेला खूपत होताच कधीपासून. मग पुढच्या काही दिवसांत त्याने अजूनही अनेक आकार कापले, ते भिंतीवर विराजमान झाले. भरारी घेणारे पक्षी, तरंगते जेलीफिश, सूर मारणारे शार्क, लवलवतं हिरवं शैवाल, पानं, डाळींब, जलपरी.. सुरुवातीला मातिझ मनात येईल ते आकार कापायचा. काही विशिष्ट थीम त्याच्या डोक्यात नव्हती. मात्र एकेक आकार भिंतीवर जमायला लागले आणि मातिझला त्यात वेगळं जग दिसायला लागलं. कधी समुद्रातलं, कधी अमेझॉनमधल्या दाट जंगलातलं, कधी ताहिती, मोरोक्कोला केलेल्या प्रवासातलं.. तिथली घरं, वस्त्रं, प्रकाश यांचं त्याला विलक्षण आकर्षण. कागदाच्या तुकड्यातून त्याने ते पुन्हा उभारलं. अनेक व्यक्तिरेखा जिवंत होऊ लागल्या. आजवर आपल्या स्टुडिओतल्या वस्तूंचे अद्भुत आकार तो पेंटिंगमध्ये रंगवायचा. आता त्याच्या हातात ब्रशऐवजी कात्री होती आणि रंगांऐवजी रंगीत कागद आणि उत्कृष्ट पोत असलेलं रेशमी कापड. जन्माने फ्रेन्च असलेल्या मातिझला उपजत टेक्स्टाईल सेन्स होता. कापडाचा रंग, पोत, डिझाइन यांची उत्तम जाण होती, शिवणकलेवरही प्रभुत्व असल्याने अत्यंत सफाइने आणि ब्रशइतक्याच नजाकतीने तो कात्री हाताळे. आयताकृती आकारांमध्ये अतिशय कुशलतेनं कापलेले कागदांचे डौलदार आकार, अनेकदा त्यांच्या कडा एकमेकांना चिकटल्यामुळे एक आकार कुठे सुरू झाला आणि दुसरा कुठे संपला हे सांगणं अवघड. त्यामुळेच एक सुंदर प्रवाहीपणा होता या आकारांमध्ये. ते जिवंत, नैसर्गिक, सहज वाटत होते. जणू मातिझची पेंटिंग्ज आता स्टुडिओतल्या इझलवरच्या कॅनव्हासमधून बाहेर पडून स्टुडिओच्या भिंतींवर जिवंत झाली. ज्या निसर्गरम्य जागेच्या मोहात पडून त्याने आपला स्टुडिओ उभारला, तिथे पायी फिरून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं शक्य नव्हतं म्हणून मग त्याने आपल्या स्टुडिओत बाहेरचा निसर्ग आणून वसवला. कट आउट्सच्या मदतीने प्रतिसृष्टी निर्माण केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रभाषेत क्रांतिकारी बदल करणारे दोन चित्रकार- एक पिकासो, दुसरा मातिझ. रंगांवर विलक्षण हुकूमत असणारा मातिझ फॉव्ह चित्रशैलीचा जनक. रंगांच्या वापरातून मानवी, आदिम भावभावना जिवंत करण्याचं त्याचं कौशल्य अद्वितीय. तो कुशल ड्राफ्ट्समन आणि शिल्पकारही होता. आपल्या चित्रांकरता त्याने कधीच जिवंत माणसांची ‘मॉडेल्स’ वापरली नाहीत. आपण जमवलेले आफ्रिकन मुखवटे आणि शिल्पे त्याला जास्त ‘एक्स्प्रेसिव’ वाटत.मातिझला पॅटर्न्स रचायला आवडायचे. ते त्याचं खास वैशिष्ट्य. एकात एक असलेले सुबक, डेकोरेटिव्ह पॅटर्न्स.. टॅपेस्ट्रीवरचं डिझाइन, कशिदाकाम, भरतकाम, रेशमावरचे नक्षीकाम, उभे आडवे पट्टे, कुयऱ्या, बुंदके, ठिपके, खडी.. अनेक पॅटर्न्स अतोनात सजवलेल्या दालनांमधला झगमगीत पसारा पेंटिंगच्या आत तो रचायचा. स्पेनमध्ये असताना तो इस्लामिक आर्टच्या प्रेमात पडला. इस्लामिक शैलीच्या रचनेत एका भरगच्च जगाचा आभास होतो. त्यात सर्व गोष्टी डोळ्यासमोर दाटीवाटीने गर्दी करून उभ्या राहतात. आपल्या गडद, दाट रंगांमध्ये मातिझ त्या आकृत्यांची, नक्षीची पुनर्रचना करायचा. याच काळात त्याचा ‘द रेड स्टुडिओ’ (१९११) जन्माला आला. आपल्या भोवतालचं, स्वत:च्या स्टुडिओतलं जग मातिझने ज्या कौशल्याने आपल्या पेंटिंगमध्ये उतरवलं आहे, त्यातल्या प्रत्येक एलेमेंटला स्वत:ची अशी खास जागा बहाल केली आहे ते थक्क करून टाकणारं आहे. ‘द रेड स्टुडिओ’मध्ये त्याने त्याच्या कलात्मक, नक्षीदार वस्तू सघन आकारात रंगवल्या आहेत. फर्निचर आणि भिंतींकरता रेषांचा वापर केला आहे. दाट, लाल रंगावर उमटलेल्या भेगांसारख्या या रेषा वाटतात. जवळून पाहताना त्यातून खालच्या कॅनव्हासवर आधी लावलेल्या निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. ‘स्टुडिओतल्या भिंतींचे मी राहायला येण्याअगोदरचे हे आयुष्य’ - मातिझ त्याबद्दल बोलताना सांगतो.चित्रकाराकरता त्याचा स्टुडिओ ही अतिशय महत्त्वाची जागा असं मानणाऱ्या मातिझने अत्यंत काळजीपूर्वक आपल्या स्टुडिओच्या अंतर्भागाची मांडणी केली होती. आपल्या पेंटिंगमध्ये ते उतरवतानाही त्याने तीच काळजी घेतली. काटकोनातल्या रेषांमधून त्याने स्टुडिओतला खोल अंतर्भाग दर्शविला. खिडकीतून येणाऱ्या निळ्या हिरव्या प्रकाशामुळे स्टुडिओच्या आतल्या अवकाशाची जाणीव तीव्र होते, त्याच वेळी आत पसरलेल्या लाल रंगामुळे त्याला सपाटपणा येतो. मातिझ खऱ्या अर्थाने ‘रंगारी’ होता. त्याचे रंग आनंदाने नृत्य करतात किंवा नुसतेच भोवतालच्या अवकाशात सैलावून पसरतात. त्याचे रंग कोलाहल माजवत नाहीत, छान संवाद साधत असतात परस्परांशी आणि मग आपल्याशी. पुरेसा अवकाश एकमेकांना देत-घेत. त्याचे रंग मनाला शांत करतात. ते जितके गडद तितकी शांतता खोल झिरपते. प्रवाही रेखाटन, दाट, गडद रंगांचं पॅलेट, जाड ब्रशस्ट्रोक्स, आकारांचा विलय हे फॉव्हिझमचं वैशिष्ट्य, जे अर्थातच मातिझच्या स्वत:च्या शैलीतून विकसित झालं होतं. मात्र सुरुवातीच्या काळात त्याच्या पेंटिंग्जमधल्या रंगाचं हे मुक्त अस्तित्व समीक्षकांच्या नजरेला अस्वस्थ करणारं ठरलं. मातिझच्या रंगातला भावनांचा पौर्वात्य, तीव्र आवेग तेव्हाच्या सभ्य, सौम्य पॅरिशियन्सना सहन होणारा नव्हता. जंगली श्वापदांचा उन्मत्त रासवटपणा त्यांना त्याच्या रंगकामात दिसला. त्यांची प्रतिक्रि या तीव्र, नकारात्मक उमटली यात काहीच आश्चर्य नाही. मातिझच्या या चित्रशैलीला म्हणूनच ‘द फॉव्हज’ (रानटी श्वापदे) असं नाव दिलं गेलं. मातिझ ज्या काळात आपली कला कारकीर्द घडवत होता, तो काळ राजकीयदृष्ट्या भयंकर उलथापालथीचा. पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा विस्फोट, महायुद्धे, वांशिक विद्वेषातून घडून आलेली क्रूर हत्त्याकांडे.. असे अनेक उत्पात त्याने पाहिले. मात्र त्याचा लवलेशही आपल्या चित्रांमध्ये त्याने उमटू दिला नाही. मातिझच्या स्टुडिओतले, त्याच्या ‘द ग्रेट इनडोअर्स’ मधलं जग बाह्य जगातल्या विध्वंस, घडामोडींपासून अलग असं एक वेगळंच, स्वप्नवत जग होतं. आपलं मानसिक संतुलन अबाधित राखणारी त्याची दुनिया. सलग साठ वर्षे तो या जगात आरामदायी, आश्वासक, समाधानाचा आभास निर्माण करणारी चित्रं रंगवत राहिला. विसाव्या शतकातल्या अस्थिरतेचा आरसा असलेल्या मॉडर्न आर्टमधून सातत्याने प्रतिबिंबित होणारा विद्रोह त्याच्या चित्रांमध्ये जराही उमटला नाही. त्याची चित्रं त्याच्या स्टुडिओसारखीच. मनाला आश्वस्त करणाऱ्या, सुखदायी विश्रांतिस्थळांसारखी. लढाया, हल्ले, इतिहासाचा विनाश करणाऱ्या जगापासून लांब. ‘दमलेला उद्योगपती आरामखुर्चीवर विसावताना सुखावतो तसा परिणाम माझ्या चित्रांमधून मिळायला हवा’ असं तो एकदा म्हणाला. साठच्या दशकात, कलेत जगाला बदलवून टाकण्याची ताकद आहे असा विचार सर्वत्र प्रबळ असताना, त्याचा हा विचार फारच मर्यादित, संकुचित स्वरूपाचा वाटू शकतो. पण मातिझला आपल्या रसिकांच्या अपेक्षांबद्दल काही गैरसमज नव्हते. सुसंस्कृत धनाढ्य हेच कलेचे आश्रयदाते आहेत आणि कायम राहणार हे त्याला माहीत होतं. इतिहासाने त्याचा समज खोटा ठरवला नाही.