- लीना पांढरे
पूर्वी एक धमाल मराठी गाणं होतं, ‘ मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन गं बंगला..’ आता आभाळातील चंद्र-चांदण्या तोडून आणायच्या बाता मजनू लैलासाठी करत नाही. कारण आज खरंच तुम्ही तिला चंद्रावर घेऊन जाऊ शकाल किंवा ती घेऊन जाईल तुम्हाला चंद्रावर! नुकतंच नासाला चंद्रावर पाणी सापडले आहे. बर्फीले पाणी आणि कातळामध्ये असणारा ऑक्सिजन.. और क्या चाहिये जीने के लिए? कोण आहे तिकडे उगाच सांगतोय की ३५ अब्ज डॉलर्स हवेत चंद्रावरच्या सफरीसाठी.
यावर्षी अजून एक धमाल झालीय. आपण ऑक्टोबर महिन्यात एकदा २ ऑक्टोबरला पूर्ण चंद्रदर्शन घेतलं आहे आणि ३१ ऑक्टोबरला पुन्हा दुसऱ्यांदा पूर्ण चंद्रदर्शन योग. एकाच महिन्यातील दुसऱ्या चंद्रदर्शनाला ब्ल्यू मुन असे संबोधले जाते. चला तर मग आपण स्वागत करूया या निळ्या चांदण्यांचे. विद्युतदीपांच्या प्रकाशाची भेसळ नसणारा चंद्रप्रकाश अनुभवण्यासाठी गावाची वेस ओलांडावीच लागते आणि थेट हायवेला लागावं लागतं. वस्तीपासून दूर पोहोचल्यावर आपल्या बाइकचे किंवा कारचे हेडलाइट्स बंद करून चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघालेल्या चकचकीत डांबरी रस्त्यावर संथपणे सरकत जाणं म्हणजे अगदी पौर्णिमेची रात्र सार्थकी लागल्यासारखी वाटते.
अशा वेळेला सोबत देखणी प्रिया असेल तर त्याला वाटतं की ‘एक रात मे दो दो चाँद खिले. एक घुंगट मे एक बदरी मे..’ आभाळात संथपणे ढगाआडून सरकतं जाणारा चंद्र. चांदण्यात चमचमणारा नदीचा प्रवाह. दोन्ही बाजूने मागे पडत जाणारे घाट. नदीवर झुकलेली झाडं. पुढे सरकणारी नौका. चंद्रप्रकाश पाण्यावर प्रतिबिंबित झालेला. नौकेमध्ये पहुडलेला तो आणि त्याच्या आलिंगनात बद्ध ती. कुठल्याही कृष्णधवल चित्रपटातील खिळवून ठेवणारं हे उत्कट रोमँटिक चित्र. ‘वो चाँद खिला वो तारे हंसे ये रात अजब मतवारी है..’ अशा रक्तातून चंद्र विरघळून वाहणाऱ्या रात्री असा धुंद एकांत असल्यावर पापण्यांवर नीज येणार तरी कशी?
चंद्रासारखी सुंदर प्रेयसी पाहिजे असं कोणी सांगितलं? ती मनभावन असली की पुरे! ‘सुखालाही भोवळ यावी’ असा तिचा मृदु मुलायम चांदण्यांचा स्पर्श. साक्षात चंद्रानेही तिला प्राप्त करून घेण्यासाठी नि:श्वास टाकावेत.. चांदण्यांनी मंतरलेले क्षण कधी संपूच नयेत असं वाटतं आणि मग चंद्रालाही तू जाऊ नकोस थांब असं आळवलं जातं.
कधी कधी जीव जडवावा तो माणूस साक्षात आभाळीचा चंद्रमा असतो. आपल्या मातीच्या हातात सौख्याचा चंद्रमा कसा यावा? तो धरू जावं तर उजाडून येतं आणि मग ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात..’ असं सांगावं लागतं. त्या चंद्राला तरी कुठे खबर असते त्याच्या प्रेम दिवाणीची?
हातात हात घट्ट गुंफलेले असले तर मग येणाऱ्या संकटाची काय तमा ! नक्षत्रखचित आभाळही जमिनीवर आणता येते. रेगिस्तानात फुले फुलतात.. सुगंधित वारे वाहतात. फत्तरातून अत्तराचे झरे झुळझुळतात आणि साद घातली जाते ‘आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने मे भी आयेगी बहार झुमने लगेगा आसमान..’ जादुई माहोल असणारा सिनेमा पाकिजा आठवतो? राजकुमारवर फिदा होऊन रानावनात त्याच्यासह निघून गेलेली मीनाकुमारी. संध्याकाळ ढळणारी. दूर आभाळातील ढगाआडून डोकावणारा पूर्ण चंद्र. शुभ्र शिडं उभारून संथ जलाशायातून निघालेली नौका आणि परिकथेतल्या राजकुमारीसाठी बरसणारं स्वरांचं चांदणं.‘चलो दिलदार चलो चाँद के पार चलो, हम है तयार चलो..’
पण या सुखाच्या चंद्रम्याला विरहाचं ग्रहण लागलं तर पापण्यांतील नीज उडून जाते. ओठाची पाखरं गुमसुम होतात. ‘जो अपना है वो और किसी कां क्यूं है?’ - इस सवाल का जवाब नहीं. मग मुकेशच्या सुरात पियानोवर दर्दभरी धून छेडावी लागते,
‘ये सुहानी चांदनी राते हमे सोने नही देती..’
एकमेकांना आठवण्यातच रात्र सरते. आभाळभर नुसता नक्षत्राचा चुरा सांडलेला आणि त्याच्या काचा काळजात रुतून बसलेल्या. कधीही परतून न येणाऱ्या प्रियतमापाशी उभा जन्म तारण ठेवलेला. नूरजहाँनचा आभाळापर्यंत भिडलेला सूर.. ‘आ रात जा रही है यू जैसे चांदनी की बारात जा रही है’ वय वाढत जातं आणि पोक्तपणा येत जातो. पौर्णिमा कधी येते आणि जाते हे कळतसुद्धा नाही. कॅलेंडरवरचे सारे दिवस सारखेच होऊन जातात आणि कधीतरी आपल्या खिडकीवर चंद्राचे कवडसे येणं थांबून जातं. चांदीचं एकेक घुंगुर वाऱ्यावर सोडून द्यावं तसे सारे कवितांचे, गाण्यांचे संदर्भ एकेक करून पुसले जातात. तरीही कधीतरी गर्दीतून घरी परतताना अचानक उंच, गगनचुंबी इमारतीच्या गर्दीत सापडलेला आणि भांबावलेला चंद्र दिसतो. अचानक जुन्या गाण्याची एखादी अनवट तान कानावर पडते आणि मन पुन्हा तरुण होतं. परातीतील चंद्रबिंबासारखे असणारे अलभ्य चांदण्यांचे क्षण पुन्हा ओंजळीत येतात. मग आकाशातील चंद्रमा आणि आपले रिते हात न्याहाळत आयुष्याचा न सुटणारा उखाणा स्वतःलाच घालत ग्रेससारखं म्हणावं लागतं, ‘स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचेहे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे..’
(लेखिका साहित्याच्या आस्वादक आहेत.)
pandhareleena@gmail.com