- मुकेश माचकरवसंतराव गेले दोन तास हॉलमध्ये सोफ्यावरच बसून आहेत.सकाळी 8 वाजता त्यांनी मोबाइलमध्ये मेसेज पाहिले तेव्हा त्यांनी बाहेर जाण्याचे कपडे चढवले, ते अजून अंगात आहेत. मध्येच ते उठतात, दरवाजापाशी जातात, पुन्हा मागे येतात, पुन्हा मोबाइल पाहतात आत जातात, बाहेर जाण्याचे कपडे काढू पाहतात, मग पुन्हा विचार करतात, हॉलमध्ये बसतात आणि पुन्हा मोबाइल पाहतात.वसंतरावांना बाहेर जाण्याची इच्छा आहे, यात काही आश्चर्य नाही.ङ्घ20 मार्चला टाळेबंदी जाहीर झाली, तेव्हापासून म्हणजे गेले तीन महिने ते घरातच बंद आहेत. वय सत्तरीपार. रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही विकारांनी शरीराचा ताबा घेतल्याला 20 वर्षं उलटली आहेत. बाहेर टाळ्याथाळ्यांचा नाद चालला होता, तेव्हा सतीशने म्हणजे त्यांच्या मुलाने त्यांना निक्षून सांगितलं होतं की, यापुढे अनिश्चित काळासाठी मॉर्निंग वॉक बंद, इव्हेनिंग वॉक बंद, दूध घरपोच येणार आहे, भाजी-किराणाही घरपोच किंवा बिल्डिंगच्या आवारात विकायला येईल, तोच घ्यायचा. औषधांचीही होम डिलिव्हरी मिळणार आहे. त्या उप्पर काही आणायचं असेलच तर मी किंवा स्वाती जाऊ. आई आणि तुम्ही बाहेर पडायचं नाही.सतीश काहीच चुकीचं बोलला नव्हता. कोरोनाचा संसर्ग कसा होतो, तो कुठे कसा आघात करतो आणि त्याच्या संसर्गाचा प्राणघातक फटका कुणाला बसतो, हे स्पष्टपणे माहिती असताना नसती धाडसं करायची कशाला? मात्र, अनलॉक 1.0 सुरू झाल्यापासून वसंतरावांना काही कळेनासं झालंय. आधी टाळेबंदी होती, असं स्पष्ट होतं. आता टाळेबंदी आहे, असंही स्पष्ट नाही आणि ती नाही, असंही. त्यामुळे आता बाहेर पडता येईल का, याविषयी त्यांच्या मनातच गोंधळ उडालाय.आज सकाळचीच गोष्ट पाहा. पद्याने (हेही 70 वर्षांचे. प्रदीप पोंबुर्पेकर. वसंतरावांचे शाळूमित्र. यांच्यासाठी ते पद्या आणि त्यांच्यासाठी हे वश्या.) फोन करून सांगितलं, ‘मी मस्त मॉर्निंग वॉक सुरू केलाय, पर्वतीवरही जाऊन आलो. आमच्या पुण्यात केवढा प्रकोप आहे कोरोनाचा. पण आमचे आयुक्त एकदम कूल आहेत. ते म्हणाले, आपण या रोगासोबत जगायला शिकलं पाहिजे. मीही बायकोकडे पाहात मनाशी म्हणालो की, आम्हाला तर तशी सवयच आहे ! काढली स्कूटी आणि गेलो पर्वतीला. आपण काळजी घेतली की काही होत नाही रे.’झालं, अगदी वॉकला नाही; पण गल्ली जिथे मुख्य रस्त्याला मिळते, त्या नाक्यापर्यंत फेरी मारून यायला हरकत नाही. इथे काही दुकानं नाहीत, गर्दी नाही, रोगसंसर्गाची शक्यता नाही, असं त्यांच्या मनाने घेतलं आणि ते कपडे बदलून, तोंडावर मास्क लावून सज्ज झाले. तेवढय़ात समस्त ग्रामस्थ मित्रमंडळाच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर मेसेज आला, ‘दिनू डेरवणकर गेला.’ अरे बापरे, तो तर चाळिशीचा होता, कसा गेला? दिनूला मॉर्निंग वॉकचा हट्ट नडला, असं त्याच्या मोठय़ा भावाने लिहिलेल्या र्शद्धांजलीच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं आणि मेसेज वाचणार्यांनी भलते हट्ट करून जीव धोक्यात घालू नये, अशी कळकळीची विनंतीही केली होती. वसंतरावांनी पुन्हा घरातले कपडे घालायचं ठरवलं. तेवढय़ात स्वातीच म्हणाली, बाबा, गल्लीच्या तोंडापर्यंत जाऊन यायला काहीच हरकत नाही. आपल्याकडच्या रुग्णांची संख्या कमी झालेली आहे आणि आता संसर्गाचा वेगही मंदावलाय. सायंटिस्ट बावडेकरांची पोस्ट आलीये तशी आमच्या शाळेच्या ग्रुपवर.वसंतराव पुन्हा हॉलकडे वळले, तेव्हा सतीश म्हणाला, भलत्या भ्रमात राहू नका आबा. कोरोनाची आकडेवारी डायल्यूट करण्याचा सरकारचा आदेश आहे, असं माझ्या मित्राला त्याच्या मित्राने सांगितलंय. कोरोना आता हवेतूनही फैलावण्याची ताकद कमावून बसलेला आहे, असं आत्ताच एका बातमीत वाचलं मी. तुम्ही कंटाळला आहात, याची मला कल्पना आहे. नीट सगळं बांधून गेलात, आल्यावर हात स्वच्छ धुतलेत किंवा सरळ अंघोळच केलीत तर काही हरकत नाही; पण ही रिस्क घ्यायची की नाही, ते तुम्ही ठरवा.तर एकंदर हे असं आहे.ङ्घवसंतराव अजूनही घरात बसलेले आहेत, अजूनही अंगात बाहेर जाण्याचे कपडे आहेत आणि घराचा दरवाजा ते बेडरूमचं दार अशा फेर्यांमध्येच त्यांचा मॉर्निंंग वॉक आता पूर्ण होत आलेला आहे !
mamnji@gmail.com
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)चित्र : गोपीनाथ भोसले