- ज्ञानेश्वर मुळेनवी दिल्लीतील लोधी इस्टेटसारख्या प्रतिष्ठित भागात राहणारा ‘व्हीआयपी’ कुटुंबवत्सल मोर, बंगला क्र. ७९ च्या समोर कुंपणापलीकडच्या लिंबाच्या झाडावर रात्रीचं विसावणारं मोर कुटुंब, स्वत:ला संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव समजणारा ‘युनिसेफ’चा मोर, आपली राहिलेली कामे करून घेण्यासाठी ज्येष्ठ नोकरशहांना आणि राजकारण्यांना भेटायला येणारा कुणी मोराच्या जन्मातला अतृप्त आत्मा.. मोरांच्या अनेक आठवणी आहेत माझ्या ठेवणीत. घर असो की माझे कार्यालय, मोरांची ‘केकावली’ कायम मला ऐकू येत असते.न्यूयॉर्कहून परत येऊन मला फार तर पाच-सहा दिवस झाले असतील. संध्याकाळी लोधी उद्यानाकडे फिरायला म्हणून निघालो. घराजवळचा महर्षी रमण मार्ग ओलांडला आणि के. के. बिर्ला रोडवरून लोधी उद्यानाकडे मोर्चा वळवला. कुठल्यातरी विचारात आत्ममग्न होऊन चालता चालता समोर कसलीशी हालचाल दिसली म्हणून थांबलो, तर समोर चक्क ‘मोरोपंत’. जगातल्या अनेक राजधान्यांमधून मी राहिलो आहे. अनेक राजधान्यांमधली उद्याने पाहिली आहेत; पण चक्क रस्त्यात मोर असल्याचे आणि दिसण्याचे भाग्य एकट्या दिल्लीला लाभले आहे.मोर म्हटलं की माझ्या मनाचा पिसारा फुलतो. पिसारा मोराला असतो पण फुलतो आपण. कारण त्याचे सुखद, प्रेरणादायी, आश्वस्त करणारे रंग. हे रंग इतके बेजोड की याचं वर्णन करण्यासाठी ‘मयूरपंखी’ हाच ‘रंग’ सांगावा लागतो. निसर्गात किंवा मानवनिर्मित अशा फार कमी गोष्टी आहेत ज्या मोरापेक्षा सुंदर असतील. मोरांच्या अनेक आठवणी आहेत माझ्या ठेवणीत. हिरव्या ऊसमळ्यांवर उडणारे मोर पाहिलेत. दिल्लीतील ‘पुराना’ किल्ल्याच्या तटबंदीवर अधिराज्य करत असल्यासारखे मोर पाहिलेत. सरिस्का अभयारण्यात वाघ पाहायला गेलो, पण अनेक मोर बघून परतलो हे आठवतं. जगभरच्या वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयातले मोरही आठवतात. पण या सगळ्यांमध्ये मोराचे अतिस्मृतीव दर्शन झाले ते दौलताबाद (देवगिरी) किल्ल्यावर.मी, बाळ आणि वैद्य किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करून वर जात होतो. सकाळचे दहा वाजले असावेत. पावसाळी दिवस. पण उन्हं होतं. एकदम ढग गोळा झाले. अवचित गडगडाट सुरू झाला. हवेत थंडशी झुळूक जाणवली आणि उजवीकडच्या चौथऱ्यावर लक्ष गेलं. चक्क एका मोराने पिसारा फुलवला आणि आपल्या नृत्यविलासाने आम्हाला मंत्रमुग्ध केलं. त्याच्या शेजारी लांडोर आमच्यापेक्षा अधिक कुतूहलाने त्याच्या आजूबाजूला ‘पिंगा’ घालीत होती. निसर्गाच्या नक्षीदार नृत्याचे ते अपूर्व दर्शन होतं.. आणि आता माझ्यासमोर दिल्लीच्या संसदेपासून फार तर तीनेक किलोमीटर परिसरातील हा मोरोपंत. ‘मोरोपंत’ म्हणायचं कारण या मोराला आपण नव्या दिल्लीतील लोधी इस्टेटसारख्या प्रतिष्ठित भागात राहतो आहोत याची पूर्ण जाणीव असावी. इथे चालायला आपल्यासारख्या सोम्यागोम्यांना मज्जाव नसला तरी राहायचं असेल तर मात्र मंत्री, न्यायाधीश, आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, लष्करी अधिकारी, खासदार वगैरे असावं लागतं. मुळात अत्यंत ‘भूमिनिष्ठ’ असलेल्या मोराला जेव्हा अतिविशिष्ट व्यक्तींच्या वस्तीत राहण्याचं भाग्य मिळतं तेव्हा त्याचा तुरा अधिकच दिमाखदार होतो. पण हा व्हीआयपी तर कुटुंबवत्सलही निघाला. मोरापाठोपाठ लांडोर आणि दोन पिलंही! गेल्या तीनेक महिन्यात या संपूर्ण दीडेक किलोमीटर परिसरात असलेल्या के. के. बिर्ला मार्गावरील सगळे मोर माझ्या परिचयाचे झाले आहेत. मी साधारण संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या सुमारास फिरायला जातो. यावेळेत हे मोर कुठे असतात, कुठे बसतात, कुठे चारापाणी आणि संध्याकाळचे भोजन करतात आणि शेवटी कुठे झोपतात याची मला समज आली आहे. मोर सकाळी किंवा संध्याकाळी चाऱ्यासाठी उतरतात. सौंदर्याने विनटलेला मोर खाण्यापिण्याच्या बाबतीत फार खास आवडीनिवडी किंवा हट्ट बाळगत नाही. झाडाझुडपांचा, गवताचा कुठलाही भाग, छोटे कृषिकीटक असं खरं तर काहीही चालतं मोराला. जेव्हा मी बाहेर फिरायला निघतो तेव्हा हे ‘मौर्य’ कुटुंबही जेवायला बाहेर पडतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बागेत त्यांचं चालत-चालत भोजन सुरू होतं. थोडं अंतर ठेवून लवाजमा जातो. हा विठू एकदम लेकुरवाळा आहे. मागे बघतो, पुढे बघतो. जमिनीवर, गवतावर, झुडपांवर टोची मारतो. एकदम उडतो. कुंपणावर बसतो. तिथून आत जातो, पुन्हा बाहेर येतो. इथल्या सगळ्या बंगल्यांना छान हिरवळ आहे. या हिरवळीवर हे मोर तुटून पडतात. सुखी, संपन्न अशा या भागात हा सुखी, संपन्न परिवार मजेत वास्तव्य करतो. बंगला क्र. ७९ च्या समोर वडाच्या झाडाला लागून असलेल्या कुंपणापलीकडच्या लिंबाच्या झाडावर हे कुटुंब रात्रीला विसावतं. डाव्या बाजूच्या फांदीवर मोर, समोरच थोड्या खालच्या फांदीवर लांडोर आणि थोड्याशा तिरक्या कोनात एक खाली तर एक वर अशी दोन फांद्यांवर ती दोन लेकरं शांत बसलेली असतात. त्यानंतर कधी-मधी चाचपणीसाठी किंवा सगळ्यांना ‘जागते रहो’ अशी आरोळी ठोकणारा मोर सोडला तर बाकी सगळे आत्ममग्न किंवा स्वप्नमग्न.तिथून पुढे गेलं की मॅक्समुल्लर मार्ग येतो. तो ओलांडताच डाव्या बाजूला युनिसेफचं कार्यालय आहे. या कार्यालयाच्या फाटकाजवळ दुसऱ्या क्रमांकाचं झाड आहे सप्तपर्णीचं. या झाडाच्या उजवीकडच्या एका फांदीवर सूर्यास्तानंतर एक अत्यंत रुबाबदार मोर विश्रांतीला येतो. तो आपल्या त्या ठरावीक फांदीवर दक्षिण-पूर्व बाजूला तोंड करून बसतो. त्याच्या त्या बसण्यातली ऐट एखाद्या स्वाभिमानी सम्राटासारखी वाटते. आपल्या आसनावर स्थिरस्थावर व्हायच्या आधी तो युनिसेफच्या इमारतीच्या सौधावरून ‘आम्ही कोण म्हणूनी काय पुसता?’च्या थाटात फिरताना अनेकदा दिसतो. कितीही वेळ पाहिलं तरी डोळ्यांचं पारणं फिटूनही बघतच राहावंसं वाटतं. त्यानंतरच्या दुसऱ्याच इमारतीवर आणखी एक मोरोपंत. याआधीचा युनिसेफचा मोर स्वत:ला संयुक्त राष्ट्रसंघाचा महासचिव समजून वावरतो. या मोराला ‘फ्रेंचमन’ म्हटलं तर वावगं ठरू नये, इतका हा फे्रंचाळलेला आहे. फ्रेंच कल्चरल सेंटरच्या आधुनिक स्थापत्य असलेल्या इमारतीच्या शोभेसाठी उभारलेल्या कृत्रिम छताच्या एका कोपऱ्यावरती संध्याकाळी सातच्या आसपास (सूर्यास्तानंतर लगेच) याचं मयूरसिंहासन. तिथून तो संध्याकाळी कल्चरल सेंटरमध्ये फ्रेंच शिकायला येणाऱ्या युवक-युवतींना न्याहाळून कधी आपली कॅप (तुरा), तर कधी पिसारा दाखवत असतो. फ्रेंचांना सौंदर्याचं, कलात्मकतेचं वेड, तसंच या मोरालाही असावं. आतापर्यंतच्या सगळ्या ‘मोरे’ कुटुंबीयांपैकी हा मोर झाडावर नसल्याने स्पष्ट दिसतो. तोही आपलं स्थान काही इंचांनीही बदलत नसावा. दररोज त्याच ठिकाणी तसाच नेहमी पूर्वमुखी बसलेला असतो. एका अर्थाने त्याच्या दर्शनाने माझा दिवस संपतो. तिथून सरळ पुढे गेलं की लोधी उद्यानाचं द्वार क्रमांक २ येतं. या द्वाराजवळच्या प्रचंड पिंपळवृक्षावर कधी कधी मोर दिसतो. कधी कधी म्हणायचं कारण तो तिथं राहत नाही. हा त्याचा ‘ट्रांजिट पॉइंट’ असावा. या फांदीवरून त्या फांदीवर असं करतो. आणि थोडावेळ इथं-तिथं करून तो निघून जातो. इथं तो फक्त ज्येष्ठ नोकरशहांना आणि राजकारण्यांना पाहायला येणारा कुणी मोराच्या जन्मातला अतृप्त आत्मा असणार. ज्याला परवाना, कोटा, नोकर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही असा उद्योजक किंवा अजूनही पेन्शन न मिळालेला सरकारी नोकर. कुणी आपली फाइल क्लिअर करेल का, याच्या शोधात. - कारण लोधी उद्यानात जॉगिंग करणारे, पाय मोकळे करायला येणारे किंवा शतपावली घालणारे लोक या राजधानीतले कर्तेधर्ते असतात. एका अर्थाने तेच देश चालवतात (किंवा रखडवतात). इथे शेजारीच असलेल्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरने त्यांच्या गच्चीतल्या एका लांडोरीची कथा छायाचित्रित करून लावली आहे. मोर हा आज भारताचा राष्ट्रीय पक्षी आहेच, पण पुरातन काळापासून या पक्ष्याने सगळ्यांना मोहून टाकले आहे. कार्तिकेयाचं वाहन म्हणून त्याला प्रतिष्ठा आहेच; पण सर्वात चितचोर अशा मुकुटांत तर तो फारच शोभून दिसतो. कृष्णाच्या मोरपिसाशिवाय तो इतका रोमॅण्टिक दिसूच शकला नसता. इतके मनमोहक देव इतर धर्मांच्या नशिबी नसले तरी पर्शिया, सुमेरिया आणि ग्रीक संस्कृतीत मोराला महत्त्वाचं प्रतीक मानलं आहे. पण दिल्लीतले हे सात मोर खास माझे आहेत. याशिवाय घर असो की नेहरू उद्यानाजवळचं माझं कार्यालय, दिवसभर अनेक मोरांची ‘केकावली’ ऐकू येते. दिल्लीतील ‘डीअर पार्क’,‘नेहरू पार्क’, ‘चाणक्यपुरी’, ‘महावीर उद्यान’ अशा अनेक ठिकाणी मोर आहेत. कुणीतरी त्यांची शास्त्रीय पाहणी व त्यांच्या जपवणुकीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे.या देशाच्या राजधानीत फक्त स्वतंत्र भारताचे नागरिकच नव्हे इथले मोरही अभिमानाने वावरतात हे जगाला कळलं पाहिजे.हे सगळं होईल तेव्हा होईल, तूर्त मी माझ्या मोरांच्या बाबतीत ‘मोर मार्गदर्शक’ व्हायला तयार आहे!(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)
dmulay58@gmail.com