- डॉ. कल्याण गंगवाल
(संस्थापक अध्यक्ष, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान)
भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन व महान संस्कृती असून, या संस्कृतीस महायोगदान श्रमण संस्कृतीने दिले आहे. भगवान महावीर यांचे जीवन म्हणजे ज्ञानवीर, कर्मवीर व धर्मवीर यांचा सुरेख त्रिवेणी संगम होता. जन्म-मृत्यूच्या वेगवान प्रवाहात मानवाला सर्वश्रेष्ठ मानव धर्माचे दर्शन घडविणारे भगवान महावीर यांचे जीवन आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. २६०० वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले तर सर्वत्र हिंसेचे थैमान होते. स्वार्थ, अज्ञान, अत्याचार व अनाचार याचे समाजात प्राबल्य होते. सुखाच्या लालसेतून केवळ स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञयागात हजारो मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. ही हिंसा कायमची नाहिशी करण्याचे श्रेय जैन धर्माला व भगवान महावीरांना असल्याचे लो. टिळकांनीदेखील मान्य केले आहे. महावीरांची अहिंसा ही पुरुषार्थी अहिंसा होती. दुर्बल माणसाची अहिंसा कधीच नव्हती. अहिंसेची महती गाताना महावीरांनी संयमाची प्रशंसा केली.
समाजात पराकोटीला पोहोचलेल्या सामाजिक विषमतेला आणि वर्णव्यवस्थेला महावीरांनी कठोर विरोध केला. शूद्र व स्त्रिया यांना कोणतेही धार्मिक अधिकार नव्हते, त्या काळात भगवान महावीरांनी शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी मोक्षमार्गावर चालण्याचा अधिकार दिला. महावीरांनी प्रतिपादित केलेले जीवनविषयक सूत्र उत्तराध्ययनात आले आहे. ‘डोक्याचे मुंडण करून कोणी श्रमण होत नाही, ओंकाराचे पठण करून कोणी ब्राह्मण होत नाही, वनवासात जाऊन मुनी होत नाही आणि दर्भवस्त्रे धारण करून तपस्वी होत नाही. उलट समतेने मनुष्य श्रमण बनतो. ब्रह्मचर्याने ब्राह्मण, ज्ञानाने मुनी, तपाने तपस्वी ठरतो. महावीरांनी समाजापुढे ठेवलेले हे सूत्र जन्माधिष्ठित नसून कर्माधिष्ठित आहे. इ. स. पूर्व सहाव्या शतकात मांडलेले हे विचार निश्चितच क्रांतिकारक होते. भगवान महावीर केवळ उपदेशकच नव्हते. त्यांनी आपल्या संघामध्ये जातीनिरपेक्ष सर्वांना प्रवेश दिला. भगवान महावीरांचे सर्व गणधर हे जन्माने ब्राह्मण होते. स्त्रियांनासुद्धा भगवान महावीरांनी दीक्षा दिली. महावीरांच्या या महान कार्यामुळे इतिहास प्रथमत:च जैन धर्माच्या समता व अहिंसेच्या झेंड्याखाली सर्व मानवाला उच्चतम ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले.
भगवान महावीरांनी प्रतिपादित केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान सर्व जगाला मार्गदर्शक ठरले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी याच अहिंसा शस्त्राचा वापर करून आपापल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. भगवान महावीरांच्या विचारांची मोठी पकड महात्मा गांधींच्या जीवनावर होती. महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरू श्रीमद् राजचंद्र हे जैन धर्मानुयायी होते. महात्मा गांधींचे उपवास, पायी प्रवास, सत्य आणि अहिंसेवर असलेला गाढा विश्वास ब्रह्मचर्यावर दिलेला जोर हे सर्व जैन धर्माचीच देणगी होती.
महावीरांची संपूर्ण शिकवण विज्ञानाधिष्ठित होती. भगवान महावीरांनी दिलेला शाकाहाराचा महामंत्र आज विश्वविख्यात होत आहे. शाकाहाराचा इतका कडवा पुरस्कार करणारा या पृथ्वीवर जैन धर्माशिवाय दुसरा धर्म नाही. आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी महावीरांनी शाकाहार, मित आहार, पायी प्रवास, उपवास आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते; पण त्यांनी या धर्माला परमोच्च अवस्थेत पोहोचवण्याचे महान कार्य केले. भगवान पार्श्वनाथांनी प्रवर्तित केलेल्या चतुरयाम धर्माला त्यांनी ब्रह्मचर्याची जोड दिली. भगवान बुद्ध व भगवान महावीर हे समकालीन होते. दोघांनीही आपल्या धर्मात अहिंसेला परमोच्च स्थान दिले. भगवान महावीरांनी नेहमीच गुणवत्ता, चारित्र्य, आहारावर जास्त जोर दिला.
वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी अनेक महान तत्त्वे महावीरांनी समाजाला दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना समाजात रूजविली. अहिंसा परमो धर्म: हा महान उद्घोष महावीरांनी दिला. सर्व समाजाने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली होईल.