-डॉ. यश वेलणकर
आजचा जमाना एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याचा आहे. मुले गाणी ऐकत अभ्यास करतात. माणसे गाडी चालवताना फोनवर बोलत असतात. कॉर्पोरेट कंपन्यात काम करताना मल्टिटास्किंग करावेच लागते. एक काम करीत असतानाच मेसेज, इमेल पहावे लागतात. लीडर्स एकाचवेळी अनेक प्रोजेक्टवर काम करीत असतात. ब-याच स्त्रिया निसर्गत: एकाच वेळी अनेक कामे करू शकतात. त्या हाताने पोळ्या लाटत असताना डोळ्याने दूध उतू जात नाही ना, हे पाहत असतात. बंड्या स्पेलिंग पाठ करतो ते ऐकत असतात आणि तोंडाने नव-याला सूचना देत असतात.
असे असले तरी मेंदूच्या संशोधनानुसार एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देणे शक्य नसते. मल्टिटास्किंग करणारी व्यक्ती वेगाने अटेन्शन शिफ्ट करीत असते, एका कामावरून दुस-या कामावर लक्ष वेगाने नेत असते. असे करताना मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे तो तुलनेने लवकर थकतो, चुका करतो. फोनवर बोलत गाडी चालवल्याने अपघात होतात, लेखन करताना लक्ष सतत विचलित होत असेल तर वाक्ये चुकीची लिहिली जातात. फोनवर जे बोलणे होते त्याचा अर्थ मेंदूत रजिस्टर्ड होत नाही. काहीजण मात्न मल्टिटास्किंग उत्तम करतात असे पाहायला मिळते. काहीजण एकाच वेळी अनेक वाद्ये वाजवतात, तोंडाने शीळ आणि त्याचवेळी हाताने व्हायोलिन किंवा तबला वाजवणारी माणसे आहेत, स्वत: हाताने संवादिनी वाजवत गाणारे अनेक गायक आपण पाहतो. एकाच वेळी दोन्ही हातानी लिहिणारी किंवा चित्रे काढणारी माणसे असतात. त्यांना हे शक्य होते कारण या दोनपैकी एक कृती सवयीने होत असते, सायकल चालवायला शिकल्यानंतर ती चालवताना आपण मनात विचार करू शकतो तसेच हे होते. एक कृती सवयीने होते आणि दुस-या कृतीत लक्ष दिले जाते. त्यामुळे असा चमत्कार वाटणा-या कृतीही निरंतर मेहनतीचा परिणाम असतात, प्रत्यक्षात ते मल्टिटास्किंग नसते. कारण मेंदूत एकाचवेळी अनेक चक्र अनेक विचार चालू असले तरी अटेन्शन एका वेळी एकाच ठिकाणी असते. माणसाचा मेंदू आणि कॉम्प्युटर यामध्ये हा फरक आहे. कॉम्प्युटर ख-या अर्थाने मल्टिटास्किंग करतो, त्याच्या आत एकाच वेळी अनेक प्रोग्राम चालू असतात आणि त्याच्या नवरदेखील एकाच वेळी छोट्या छोट्या अनेक विंडो ओपन राहू शकतात. मेंदूच्या आतमध्ये अनेक फाइल्स ओपन असल्या तरी स्क्रीनवर मात्र एका वेळी एकच विंडो ओपन असते, ती वेगाने बदलते म्हणून आपल्याला ते मल्टिटास्किंग वाटते. आपले लक्ष एका कामावरून दुस-या कामावर न्यायच्या वेळेस सजगतेचा सराव खूप उपयुक्त ठरतो. क्षणस्थ राहण्याचा सराव अधिक काळ केला की आफ्टर इमेज, मनात तेच तेच विचार येण्याचा कालावधी कमी होतो. मेंदू मागील अनुभवात रेंगाळत न राहता वर्तमान क्षणातील माहिती घ्यायला सक्षम होतो. याचसाठी मन वर्तमानात आणायचा सराव शक्य असेल तेव्हा करायला हवा, भूतकाळात रेंगाळणा-या मेंदूला पुन:पुन्हा वर्तमानात आणायला हवे. आपले लक्ष कृतीवर, श्वासावर किंवा त्या क्षणी जाणवणा-या स्पर्शावर, आवाजावर पुन:पुन्हा आणायला हवे. माइण्डफुलनेसच्या सरावामध्ये नेमके हेच केले जाते. त्यासाठी तो सराव नियमितपणे करायला हवा. सायकल चालवताना, अंघोळ करताना, जेवताना आणि बोलतानादेखील असा सराव करता येतो कारण सजगता हे स्मरण आहे, क्षणस्थ होण्याचे. ते झाले की आपण लक्ष वर्तमान कृतीवर आणू शकतो आणि या कृती वेगाने बदलूही शकतो.म्हणजेच एकाचवेळी अनेक कामे, मल्टिटास्किंग करू शकतो. अर्थात असे मल्टिटास्किंग करून कामे वेगाने झाली तरी त्याचा एक तोटा होऊ शकतो. आपण पाहिले आहे की मेंदू आधीच्या अनुभवात रेंगाळत असतो त्याचमुळे तो अनुभव मेंदूत साठतो म्हणजे त्याची स्मृती तयार होते, त्या अनुभवाची आठवण राहते. मेंदूने माहिती घेतली असेल तर ती साठवली जाते. आपण मेंदूला त्या माहितीमध्ये रेंगाळू दिले नाही तर ती मेंदूत साठवली जात नाही.
आज व्हॉट्सअँपच्या मेसेजबद्दल असेच होते. इतके वेगवेगळ्या विषयावरचे मेसेज आपण एका नंतर दुसरा असे वाचत असतो की ते मेंदूत साठवलेच जात नाहीत. त्यामुळे तेच तेच मेसेज नवे म्हणून पुन:पुन्हा फिरत असतात. अर्थात बरेचसे मेसेज विसरून जावे असेच असतात. पण असे सारेच विसरून चालत नाही, काही पुढे उपयोगात येईल अशी माहिती मेंदूतही साठवून ठेवावी लागते. ती साठवून ठेवायची असेल तर मेंदूला त्या अनुभवात थोडे रेंगाळू द्यायला हवे. आपण व्हॉट्सअँपवर आलेला एखादा महत्त्वाचा मेसेज स्टार करून साठवून ठेवू शकतो तसाच मेंदूतही साठवून ठेवायला हवा. विशेषत: सुखाचा क्षण, आनंददायी अनुभव असा साठवून ठेवणे अधिक आवश्यक आहे असे मेंदूशास्त्नज्ञ सांगतात. त्यावेळीही आपण मल्टिटास्किंग करत असू, घाईघाईने सुख ओरबडत असू तर त्या सुखाची स्मृती मेंदूत साठवलीच जात नाही. परिणाम म्हणून औदासीन्य वाढत जाते. थोडा वेळ मुरत ठेवलेल्या चहाला अधिक चांगली चव येते, आयुष्याची चव वाढवायची असेल तर सुखाचा क्षण सजगतेने मेंदूत मुरत ठेवायला हवा. मल्टिटास्किंग कधी करायचे आणि कधी नाही करायचे याचा विवेक ठेवायला हवा.
काय कराल?
* आपल्या रोजच्या आयुष्यात एकाचवेळी अनेक कामे करायची असतील, तथाकथित मल्टिटास्किंग चांगले आणि कमीत कमी चुका करत करायचे असेल तर त्यासाठी सजगतेचा सराव आवश्यक आहे.
* एकाच वेळी आपण अनेक कामे करू शकतो याचे कारण आपल्या मेंदूच्या कार्यशैलीत आहे. आपला मेंदू काम करताना आधीच्या क्षणाची माहिती लगेच पुसून टाकत नाही, ती बराचवेळ रेंगाळत राहते.
* आपण एखादे दृश्य पाहतो, नंतर डोळे बंद केले तरी बंद डोळ्यांनी ते दृश्य दिसते, याला आफ्टर इमेज म्हणतात.
* कानावर पडलेली धून आपण बराचवेळ गुणगुणत राहतो आणि एकदा बोललेली वाक्ये बोलणे थांबवले तरी मनात पुन:पुन्हा येत राहतात. एकच विचार मनात पुन:पुन्हा येत राहतो.
* आपला मेंदू प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावतो आणि तो त्याला महत्त्वाचा वाटला तर स्मृतीमध्ये साठवून ठेवतो.
* मेंदूची कामाची हीच पद्धत मल्टिटास्किंग करताना मात्र त्रासदायक ठरते, त्यासाठीच एका कामाचा अनुभव पुसून टाकून दुस-या कामावर लक्ष नेताना मेंदूला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. सजगतेच्या सरावाने मात्र मल्टिटास्किंग चांगले जमू शकते..
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
yashwel@gmail.com