मी थोरले चुलते राम नरेशसिंग यांना ‘मुंबईत पाय ठेवत नाही’ असा शब्द १९८० ला दिला; त्यामुळे मुंबई सोडून दिली. आता पुन्हा कधी मुंबईत पाय ठेवायचा नाही, असा मी स्वत:हूनच निश्चय केला. माझ्या कुस्तीच्या आयुष्यात मुंबईचे स्थान फार मोलाचे आहे; कारण माझ्या बहुतांश महत्त्वाच्या सर्व कुस्त्या मुंबईत झाल्या व त्याही तिकीट लावून झाल्या. मुंबईनेच माझ्या पैलवानकीला आर्थिक आधार दिला, मोठेपण दिले, मानसन्मान दिला; परंतु कौटुंबिक धर्मसंकट उभे राहिल्यावर मला मुंबईचा नाद सोडणे भाग पडले.
याच मुंबईत पुढील तब्बल ३५ वर्षे मी पाय ठेवला नाही. त्यानंतर ७ जून २०१६ ला एक प्रसंग घडला. मुंबईत मूळचा उत्तर भारतीय रजपूत समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची प्रताप को-आॅप. बँक मुंंबईत आहे. ती चांगल्या आर्थिक स्थितीतील बँक आहे. तिचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंग आहेत. ते कोल्हापूरला आले होते. या चंद्रकुमार सिंग यांच्याशीही माझे वेगळे ऋणानुबंध आहेत. त्यांचे वडील मिठाईलालसिंग हे मुंबईतील उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष होते.
‘आमच्या क्षत्रिय समाजाचे नेते’ अशी त्यांची ओळख होती. मी त्यांच्याकडे कायम घरी जात होतो. ती ओळख लक्षात घेऊन चंद्रकुमार सिंग माझे कोल्हापुरातील घर शोधत आले. त्यांनी मला मुंबईला घरी येण्याचा आग्रह केला. ७ जूनला माझा वाढदिवस असतो व त्याच दिवशी महाराणा प्रताप जयंती असते; त्यामुळे त्यांनी मी मुंबईला यावे यासाठी प्रताप बँकेतर्फे पुरस्कार जाहीर केला व त्याचे वितरण मुंबईत ठेवले. तुम्ही गाडी करून यावे असा आग्रह त्यांनी धरला. त्यांच्या आग्रहाखातर मी मुंबईला गेलो. त्यांनी मला बँकेतर्फे १ लाख ५१ हजार रुपयांचा पुरस्कार दिला. शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार आनंदराव आडसूळ हे या समारंभाचे अध्यक्ष होते.
आपल्या समाजातील एका मल्लाने देशपातळीवर नावलौकिक मिळविल्याचा आनंद म्हणून उत्तर भारतीय समाजानेही रोख बक्षीस दिले. आडसूळ हे बँकिंग फेडरेशनचे अध्यक्ष असल्याने त्यांनी बँक कर्मचाऱ्यांच्या वतीनेही २५ हजारांची मदत केली. या समारंभात मला तब्बल ३ लाख ५१ हजार रुपयांची मदत मिळाली.मी जरी मुंबईला विसरलो असलो तरी या सत्कारातून ‘मुंबई आज भी तुम्हे चाहती है!’ याचेच प्रत्यंतर आले. या सत्कारामुळे इतक्या वर्षांनंतरही मुंबईने मला नाकारले नाही याचा आनंद वाटला.
लहानपणी मी जेव्हा माटुंगा तालमीत होतो तेव्हा तिथे गोली पैलवान होते. ते कुस्ती बंदूकीतून गोळी सुटल्यासारखे फास्ट करायचे म्हणून त्यांची ओळख ‘गोली पैलवान’ अशी झाली होती. कुस्ती बंद झाल्यानंतर त्यांची कधी भेट झाली नाही. ते मुंबईत नालासोपारा येथे राहतात. एका लग्नात भेट झाली. त्यातून नातेसंबंध जोडण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यांच्या धाकट्या मुलग्यास माझी थोरली मुलगी दिली; परंतु मला मुंबईत जाण्यास अडचण होती; म्हणून हे लग्न आम्ही आमच्या उत्तर प्रदेशातील कुत्तूपूर या मूळ गावी केले. जौनपूर जिल्ह्यात पट्टी गाव आहे. तिथे प्रजलजित सिंह हे जनावरांचे मोठे व्यापारी होते. मिठाईलाल सिंग, सुद्दनसिंग व हे प्रजलजित सिंग पट्टी हे तिघेही मुंबईतील माझ्या सर्व कुस्त्यांना हजर असत व कुस्ती जिंकली की त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचे बक्षीस मला हमखास मिळे. ज्यावेळी सोने १८० रुपये तोळा होते, तेव्हा हे तिघे मला ५०० रुपयांचे बक्षीस द्यायचे; यावरून त्या बक्षिसाचे मोल समजू शकेल. हे एका कुस्तीपुरते नव्हते.
प्रत्येक कुस्तीला हे बक्षीस मला मिळाले आहे. या पट्टी गावातील परवीनसिंह यांच्याशी माझ्या दुसºया मुलीचे लग्न झाले. तीपण मुंबईतच कोल डोंगरी परिसरात राहते; परंतु त्यांच्याकडेही मी कधी गेलो नाही; कारण पायांत चुलत्याला दिलेल्या वचनाची बेडी होती. दिलेला शब्द मोडायचा नाही, म्हणून पोटच्या मुलीच्या घरीही जाणे मी टाळले. दिलेला शब्द आपण मोडता कामा नये, ही माझी जीवनपद्धती आहे आणि ती सांभाळत मी वाटचाल केली. माझी दोन्ही मुले अभयसिंह व निर्भयसिंह हे सुरुवातीला कुस्ती खेळत होते; परंतु ते शाहू कॉलेजला गेल्यावर प्रा. संभाजी पाटील यांच्यामुळे कबड्डी खेळू लागले. या दोन्ही मुलांची लग्ने पैलवानकी करणाºया कुटुंबांतील मुलींशीच केली. कुस्तीबद्दलचे प्रेम त्यातूनही जपण्याचा प्रयत्न केला.
शब्दांकन : विश्वास पाटील